शब्द झाले मुके 2

कथा तिच्या कर्तव्याची.. कथा एका प्रेमाची..
शब्द झाले मुके 2

नेहा मेघनाला समजावत होती; पण मेघना मात्र तिचेच उत्तर देत होती. तिला फक्त तिचे कर्तव्य दिसत होते.
"तुला खूप महान बनायची इच्छा असते. नेहमी दुसऱ्याचा विचार करत बसतेस. कधी स्वतःकडे पहा. तुझे लग्न झाले की, सगळं सुरळीत होईल." नेहा मेघनाला समजावत होती.

"माझे लग्न बहुधा या जन्मी शक्य नाही. मी अशीच राहीन." मेघना सहजच म्हणाली.

"वेडी आहेस का तू? आयुष्य काय एकटीने काढणार आहेस का? एकटं राहणं इतकं सोप आहे का? आयुष्यात सोबत हवीच गं." नेहा त्रासून म्हणाली.

"आयुष्य सागरातून तरताना दुःखासोबत सुख आणि सुखासोबत दुःख हे येतेच, म्हणून दुःखाला कवटाळून न बसता सुखाची पायरी चढायची असते. तू मात्र यातील काहीच ऐकत नाहीस. नेहमी स्वतःचेच खरे करत असतेस. थोडातरी स्वतःच्या सुखाचा विचार कर. इतरांचा विचार करत मन मारुन जगण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा माझे ऐक. स्वतःचा विचार कर. स्वतःच्या भविष्याचा विचार कर आणि सुखात रहा." नेहा मेघनाला पुन्हा समजावत म्हणाली.

"कशी बरं स्वतःचा विचार करू? तुला तर माझी परिस्थिती माहित आहे ना? सगळं काही माहित असूनही तू अशी बोलत आहेस? मी माझे कर्तव्य बाजूला ठेवणार नाही. मी इतरांचा विचार सोडून माझ्या स्वतःचा विचार कधीच करणार नाही. मी माझ्या कर्तव्याला पहिल्यांदा महत्व देईन. मग स्वतःचा विचार करेन." मेघना ठामपणे म्हणत होती.

मेघना एमबीए झालेली मुलगी. ती शाळेत असतानाच तिचे वडील देवाघरी गेले आणि आईची, बहिणीची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली. कसेबसे शालेय शिक्षण घेऊन झाल्यानंतर शैक्षणिक कर्ज घेऊन तिने स्वतःचे पुढील शिक्षण पूर्ण केले. शिक्षण झाल्यानंतर चार वर्षे इकडे तिकडे जॉब करून ती आता राजनच्या ऑफिसमध्ये आली होती. इथे येऊनही तिला साधारण दोन वर्ष झाली होती. राजनचा स्वभाव तिला आता चांगलाच माहिती झाला होता. तिच्या आईची तब्येत सारखी बरी नसायची, तिचा बीपी कमी जास्त होत असायचा आणि अचानकच बीपी कमी झाला की ती चक्कर येऊन पडत होती. मेघना घरात असेल तर ती सारं काही करत होती; पण जेव्हा ती ऑफिसमध्ये असायची आणि अचानक तिला चक्कर यायची तेव्हा ऑफिस सोडून घरी तिला घरी जावे लागत होते. नंतर ती आईला दवाखान्यात घेऊन जायची. ती एक मुलगी म्हणून तिचे कर्तव्य अगदी व्यवस्थित पार पाडत होती. तिला एक लहान बहीण होती आणि ती कॉलेजला जात होती. बहिणीची काॅलेजची फी, घरात काय हवे काय नको ते, आईचे आजारपणातील औषधं हे सारे काही ती पाहत होती. हे सर्व काही करणं म्हणजे तिचे कर्तव्य होते असे समजून ती करत होती.

मेघनाचे लग्नाचे वय होऊन गेले तरीही ती लग्नाचा विचार करत नव्हती, कारण तिला स्वतःच्या सुखापेक्षा आपली कर्तव्ये जास्त महत्त्वाची वाटत होती. जेव्हा या कर्तव्यातून मुक्त होईल म्हणजेच आईचे आजारपण आणि बहिणीचे लग्न या दोन्ही कर्तव्यातून मोकळी होईन तेव्हा स्वतःचा विचार करेन तोपर्यंत फक्त कर्तव्यच करत राहायचे असा तिचा ध्यास होता.

मेघना राजनच्या ऑफिसमध्ये काम करत होती, तिचा पगारही तितकाच चांगला होता. इतर ठिकाणी ती काम करत होती त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक पगार होता, त्यामुळे तिच्या घरचे सारे काही यावर चालत होते. आईच्या औषध-पाण्याचा खर्च, बहिणीचे शिक्षण, घरखर्च, कपडालत्ता हे सगळे या पगारातून भागत होते त्यामुळे राजनची कितीही बोलणी ऐकायला लागली तरीही ती हे ऑफिस काही सोडणार नव्हती. आपल्या घरासाठी का होईना आपल्याला इथे रहावेच लागणार आहे हे तिने मनाशी पक्के ठरवले होते. राजन कितीही बोलला तरी आपण इथे काम करण्यास येत आहोत तेव्हा हे कर्तव्य पूर्ण केले की आपली पुढची कर्तव्यं आपोआप सुरळीत पार पडतील, त्यामुळे इथेच टिकून रहायचे याचा तिने मनाशी निर्धार केला होता. आपण इथे काम करतो म्हटल्यावर आपली ती जबाबदारी आहे. बॉस इज ऑलवेज राईट असे म्हणून आपण फक्त आपले काम करायचे असे तिने पहिल्या दिवसापासूनच ठरवले होते. ऑफिसमध्ये येण्याआधी बऱ्याच जणांकडून ऐकले होते की बॉस खूप खडूस आहे, खूप ओरडतो, प्रत्येक गोष्टीत चूक शोधतो त्यामुळे त्याच्यासमोर टिकाव धरणे खूपच अवघड आहे, त्यापेक्षा तू हा जॉब सोडून दुसरीकडे ट्राय कर; पण मेघनाने मात्र मनाशी पक्के ठरवले होते की जॉब करायचे तर फक्त इथेच. त्याला बरीच कारणे होती, पगारही चांगला मिळत होता, घर खर्च निघत होता त्यामुळे गेली दोन वर्षे ती या ऑफिसमध्ये टिकून होती.

मेघना बरोबरच आणखीन सात-आठ जण ऑफिसमध्ये टिकून होते. राजनच्याही ते लक्षात आले होते. तो ओरडत असला तरीही त्याच्या मनामध्ये आपुलकी होती. मेघना तिचे प्रत्येक काम वेळच्या वेळी करण्याचा प्रयत्न करत होती; पण अचानक आईची तब्येत बिघडली की तिचे काम अर्धवट राहत होते आणि त्यामुळे तिला बोलणी खावी लागत होती. आईसाठी आपण इतके सहन करू असे ती त्या त्या वेळी मनाची समजूत घालत होती.

●●●●●●●●

दुसऱ्या दिवशी मेघना तिचे नेहमीप्रमाणे सारे काही आवरून ऑफिसला जाण्याची तयारी करत होती. आज आईची तब्येत व्यवस्थित होती त्यामुळे ती निश्चिंत झाली होती. आई आणि तिची बहीण हेच तिचे जग होते. तिला फक्त त्या दोघींची काळजी लागली होती. मेघना स्वतःचा विचार कधीच करत नव्हती.

कितीही प्रयत्न केला तरी आज ऑफिसला जायला तिला उशीर झालाच. रात्री बराच वेळ काम करत बसल्यामुळे तिला सकाळी उठायला उशीर झाला होता आणि त्यामुळे साहजिकच ऑफिसला जायला उशीर झाला. तिने जाता जाता हातातील घड्याळामध्ये वेळ पाहिली तर दहा मिनिटं उशीर झाला होता.

'झालं. आता उशीर झालाच. कितीही प्रयत्न केले तरीही मला उशीर होतोच त्याला मी काय करणार? आज परत ओरडा खायचं. बापरे! रोज ओरडा खाऊन खाऊन माझे तर कान दुखू लागलेत; पण याला पर्याय काय? काहीही करून आपल्याला इथे टिकून राहायचं आहे कारण फक्त इथलाच पगार आपल्याला पुरेसा होतो. मी इतर ठिकाणी गेले की तो पगार अपुरा पडतो. आता काय कारण देऊ? काल तर आईची तब्येत बरी नव्हती हे खरे सांगितले. पण आज उशीर का झाला? याचे कारण काय सांगू.' असे मनातल्या मनात विचार करत मेघना ऑफिसला जात होती इतक्यात तिच्या मोबाईलची रिंग वाजली. तिने पाहिले तर राजनचा फोन होता.

'अरे बापरे! हा खडूस का फोन करतोय? नक्कीच उशीर झालाय म्हणूनच फोन करत असेल. उचलू की नको. उचलला तर बोलणी खावी लागतील आणि नाही उचलला तर दुप्पट बोलणी खावी लागतील, त्यापेक्षा उचललेलं बरं.' असे म्हणून तिने फोन उचलला.

"हॅलो, मिस मेघना. तुम्ही कुठे आहात?" राजन फोनवरून म्हणाला.

"हो सर, मी वाटेतच आहे. एक पाच मिनिटात येईन." मेघना घाईनेच बोलली.

"एक एक मिनिट. मला नक्की सांगा तुम्ही आता कोठे आहात?" राजन ओरडतच म्हणाला.

"सर, हे काय? मी येतच आहे." मेघना दबकतच म्हणाली.

"एक्साक्ट प्लेस सांगा मेघना." राजन तिच्यावर ओरडला. ते ऐकून मेघना घाबरली. 'याला कशाला हवंय?' मेघना मनातच म्हणाली.

"सर, मी राधाकृष्ण मंदिराजवळ आले आहे. पाच मिनिटात ऑफिसमध्ये येईन." मेघना घाबरतच म्हणाली.

"तिथून तुम्ही पाच मिनिटात याल! ओके, मी घड्याळाचे टायमिंग लावले आहे. पाहुया किती वेळ लागतोय?" राजनच्या या उत्तराने मेघनाने कपाळावर हात मारून घेतला. राधाकृष्ण मंदिरापासून ऑफिसला जायला साधारण पंधरा मिनिटं लागत होती.

"साॅरी सर." मेघना शरमेने म्हणाली.

"ठिक आहे. येता येता माझं एक कामं करा." राजन म्हणाला.

"हो सर, नक्कीच. काय काम आहे?" मेघना कुतूहलाने म्हणाली.

"माझ्या घरातून मोहिते कंपनीच्या प्रोजेक्टची फाईल घेऊन या. सध्या ड्रायव्हर वेगळ्या कामासाठी बाहेर गेला आहे आणि इथे कुणालाही पटकन जाता येणार नाही. सो, तुम्ही येताना ती फाईल घेऊन या." राजन म्हणाला.

"हो सर." मेघना म्हणाली.

"जरा लवकरच या. अर्ध्या तासात मिटिंगला सुरूवात होणार आहे. नाहीतर कालच्या सारखे होईल." राजन आवाज चढवत म्हणाला.

"नाही सर. मी लवकरच येईन." मेघना म्हणाली.

"ठिक आहे." असे म्हणून राजन फोन बंद करणार इतक्यात,

"सर सर, एक मिनिट." मेघना घाईनेच म्हणाली.

"आणि काय?" राजन वैतागून म्हणाला.

"तुमचे घर कोठे आहे? मला माहित नाही." मेघना हळूच म्हणाली.

राधाकृष्ण मंदिरापासून राजनचे घर अगदी हाकेच्या अंतरावर होते. त्याने लगेच मेघनाला पत्ता सांगितला. मेघना राजनने सांगितल्यानुसार त्या पत्यावर गेली आणि पाहते तर काय?

मेघना राजनच्या घरी गेल्यावर तिला काय दिसले? आजही ती वेळेवर मिटिंगला पोहोचेल का? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः 🎭 Series Post

View all