माझ्या शाळेतली मैत्रीण सरिता, काही दिवसांपूर्वी आमच्या बिल्डिंग मध्ये रहायला आली.जुनी मैत्रीण इतक्या वर्षांनी पुन्हा भेटली, तेव्हा आम्ही दोघी वारंवार एकमेकींन कडे जाऊन भेटत होतो. घरचं आवरून दुपारचा चहा आम्ही दोघी बऱ्याचदा एकत्र घेऊ लागलो.चहा बरोबर आमच्या पोटभर गप्पा होत होत्या.
त्या दिवशी मी सरिताकडे चहासाठी गेले. तिची मुलगी अनुजा घरातच, बेडरूम मध्ये अभ्यास करत होती. ऑनलाईन शाळा/ कॉलेज सुरू असल्याने मुलं सतत घरीच.अनुजा शाळेत आठवीत शिकत होती.
बाहेर हॉल मध्ये आम्ही दोघी मस्त भुर्के मारत चहा घेत बसलो आणि आमच्या गप्पांना तर उधाण आलं! तेवढ्यात अनुजा बाहेर येऊन सांगू लागली....
"आई, काल झालेल्या गणिताच्या ऑनलाईन टेस्टचा रिझल्ट आला, मला ४९ मार्क मिळाले ५० पैकी."
" वाह, अनुजा मस्त ग" मी लगेच तिचं अभिनंदन केलं.
"एक मार्क कुठे गेला? नक्की काही तरी धानरटपणा केला असशील.तुला मिळाले असते खरं पूर्ण मार्क!"
" अगं सरे, काय तू पण....एक मार्क साठी काय बोलतेस तिला"
अनुजा मार्क सांगून तिच्या आईचे शब्दिक वार ऐकुन निमूटपणे तिथून निघून गेली. तिच्या चेहेऱ्यावर थंड भाव, तिने काहीच प्रतिक्रीया दिली नाही! मला असं वाटतय की सरीताच हे नेहेमीच आहे की काय? म्हणजे अनुजा आपल्या आईच्या अश्या बोलण्याची आता सवय झाली असावी, त्यामुळे काही न बोलताच ती, आत खोलीत निघून गेली....
"सरे, एक मार्क गमावला त्यासाठी चार शब्द एककवलेस तू अनुजला. अगं दोन शब्दांच पण कौतुक केलं नाही तू ? तू काय गणितात शकुंतला देवी ( पहिली ह्यूमन कॉम्प्युटर म्हणून ओळखली जाणारी भारतीय महिला )होतीस, होय ग शाळेत असताना?? आपल्याला कधी असे एवढे मार्क पडलेले आठवतात तरी का?? आपल्या कश्या बऱ्याचदा दांड्या गुल होत!"
त्यावर सरिता कडे खरं तर बोलण्यासारखं काही नव्हतं. तिचे उगाच नुस्तं हसल्या सारखं केलं अन् विषय तिथेच संपवला.
किती मार्क गमावले ह्यावर त्यांना बोलण्यापेक्षा, आधी त्यांचं कौतुक करा, मेहेनत घेऊन, मुलांनी अभ्यास करून जेकाही मार्क मिळवले त्या बद्दलआधी बोलावं. सारखच त्यांना बोलतं राहिली, तर त्यांच्या मनात हीच भावना तयार होईल, की आपण काही केलं आणि कितीही चांगलं केलं तरी आई वडील कौतुक करणारच नाही!!
********************************************
काही दिवसांनी सरिता आणि अनुजा माझ्या घरी आल्या. आज चहा भाजी अन् गप्पांची बैठक माझ्या घरी जमली होती. खाऊ पिऊ आणि गप्पा टप्पा मस्त रंगल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने आज आम्ही सगळे निवांत होतो.आमच्या मुली पण आता एकमेकिंच्या छान मैत्रिणी झाल्या होत्या.
मी, सरिता, तिची अनुजा आणि माझी साक्षी, आम्हा माय लेकिंची अंताक्षरी चांगलीच रंगली होती. अनुजाचा आवाज खूप गोड होता, गाण्याची समज आहे तिला हे जाणवत होतं.....
मी : "अनुजा, तू गाण्याच्या क्लास ला जातेस का ग ?" मी न राहून विचारलं.
अनुजा : " नाही मावशी, मी भरतनाट्यम शिकते. गाणं मला खूप आवडत, पण मम्मी बोलली तू डान्स शिक, म्हणून मी डान्स क्लासला जाते"
मी : "सरे, तुला शाळेत असताना आवड होती ना ग डान्सची? तू का नाही शिकलीस ग भरतनाट्यम कधी ?"
सरिता : " हो ग, पण कसलं तेव्हा कुठलं परवडणार होतं! आणि आता शिकायच म्हटलं तर शरीराला झेपणार नाही! राहिलच बघ ते...."
मी : " बर, म्हणून तुझी अपूर्ण इच्छा, अनुजा पूर्ण करते आहे वाटतं?"
सरिता : "हो माझी इच्छा अपूर्ण राहिली. तेव्हाच ठरवलं आपल्या मुलीला डान्स क्लासला टाकायचं "
मी : " पण अनुजाला विचारलं का तिला काय आवडतं ? तिला डान्स क्लासला जायचं आहे की गाण्याच्या?? आपण उगाच आपल्या अपेक्षा, इच्छा मुलांवर लदण म्हणजे बरोबर नाही ग...."
सरिता : "आधी भरतनाट्यम पूर्ण होऊदे शिकेल नंतर गाणं, मग बघूया"
मला जरा खटकलच, का असं? मुलांना जे आवडत, जे त्यांना करायची इच्छा आहे ते त्यांना करू द्यावं. उगाच आपलं मत मुलांवर थोपवू नये. नुस्तं त्यांच्या कडून डोंगरा एवढ्या अपेक्षा करणं म्हणजे निव्वळ चूक आहे!
मुलांना त्यांचे निर्णय घेण्यास मदत करा. त्यांना समर्थ करा एखादा निर्णय घेण्यास. त्यांनाही मत मांडण्याचा अधिकार आहे!
********************************************
आज घरीच मुलांसोबत पाणी पुरी भेळ कार्यक्रम करायचा ठरला. बरेच दिवस चाललं होतं, आज अखेर ठरला बेत. मी आणि साक्षी पुऱ्या ,चिंचेचं पाणी, रगडा आणि तिखट पाणी सगळं घेऊन सरिताकडे पाच वाजता पोचलो. तिने भेळेची सगळी तयारी करून ठेवली होती. आमची पंगत हॉल मध्येच बसली.
सरिता : "अनुजा, किचन मधुन प्यायला पाणी आण सगळ्यांना, नीट आण नाहीतर सांडशिल तू! एक काम नीट जमेल तर!"
तेव्हढ्या बाहेर येताना अनुजाच्या हातून एक ग्लास पाण्याचा सांडला. झालं सरिताच्या तोंडाला कुठला आलाय आवर.... बोललीच ती फटकन लेकीला! एक ग्लास पाणी चुकून संडल, कुठे एवढं आभाळ कोसळलं का?? आता अनुजाच्या डोळ्यातून पाणी येतं की काय असं वाटू लागलं....पण नशीब नाही रडली पोर!
मस्त सगळ्यांचं भेळपुरी, पाणीपुरी हाणून झाली! मुली दोघी आत बेडरूम मध्ये बसून पेंटिंग करत होत्या अन् मी आणि सरिता बाहेर हॉल मध्ये मस्त गप्पा मारण्यात रमलो....
तहान लागली म्हणून हात लांब करून पाण्याचा ग्लास घेताना माझ्या हातून ग्लास सटकला आणि पाणी संडल! मनात आलं आता मी पण ओरडा खाते वाटतं सरिताचा....
मी : "आई ग..... आळशीपणा नडला, जरा मी उठून घ्यायला हवा होता ग्लास. बसल्या बसल्या घ्यायला गेले अन् सटकला तो! थांब मी पुस्ते सांडलेल पाणी...."
सरिता :" अगं, असूदे काय एवढं त्यात, सांडल पाणी, ठीके... जाऊदे होतं असं "
मी : "अ.... काय ग? बरी आहेस ना? "जाऊदे होतं असं" हे वाक्य मागाशी अनुजाला पण बोलली असतीस तर...??"
आता मात्र मला राहवलं नाही, सरिताने मला सल्ला विचारो अगर नको, मी बोलणार. जिथे चूक आहे वागणं तिथे मला उगाच मुलांना बोललेल अजिबात सहन होत नाही....
मी : मगाशी पाणी आणताना अनुजाच्या हातून पण असंच चुकून सांडल तर केव्हढ बोललीस तिला. आणि मला आत्ता, असुदे जाऊदे....?? का ग ? मी मोठी आहे तर मला मान देत, ठीके जाऊदे, माझी चूक लगेच माफ? आणि ती लहान आहे, तरी तिला कित्ती ऐकवलं तू? तिला काही मान नाही का? चार लोकात आई असं ओरडली मला, ती वयात आलेली पोर, तिला कसं वाटलं असेल ? तिच्या मनाचा विचारच नाही केलास तू!"
"आणि काय ग तू सारख्या सूचना देत रहाते तिला. नको करू असं, ती मोठी आहे आता, कळतं तिला, शिकेल ती. आणि खरं सांगू का मुलांना असं सारख्या सूचना दिलेल्या,असं बाहेरच्या लोकांसमोर वेड वाकड बोलेल नाही आवडत.कोणाला आवडेल विचार कर ना?तुला तरी आवडेल का असं कोणी तुझ्याशी बोललं तर?? मुलं लहान आहेत म्हणून का त्यांना अशी वागणूक ?"
" वयाने लहान असली मग काय झालं, त्यांना सुधा मन आहे आणि मान सुद्धा आहे!"
"सरिता तुझं मागील दोन तीन प्रसंगातील वागणं मला नाही पटलं! सॉरी, मी आज जरा स्पष्टच बोलत आहे. वरवर लहान वाटेल ही गोष्ट पण विचार केला तर आपल्याला बोलण्या वागण्याचा मुलांच्या मनावर खोल परिणाम होत असतो. आपल्या शब्दांची धार मुलांच्या कोवळ्या मनावर वार करतात ग!आपण त्यांना सारखं ओरडलो बोललो तर मुलं भित्री होऊ शकतात. किंवा,आई वडील काय सारखेच बोलतात ओरडतात म्हणून मग ते निगरगट्ट होतात. आई बाबा काय रोजच ओरडतात कशाला लक्ष द्यायचं!
"प्रत्येक वेळेस त्यांना सारख्या सूचना दिल्या नकारात्मक बोलल तर मुलांचा आत्मविश्वास ढासळू शकतो. अगं आजकाल लहान मुलांमध्ये देखील डायबेटिस, टेन्शन, स्ट्रेस आणि आंगझायटी ( anxiety) असे भयंकर आजार दिसून येतात!!"
" काहीवेळेस तर मुलांच्या मनात पलकांविषयी चीड, राग निर्माण होऊ शकतो. मुलं त्यांच्या मनातील घुसमट कोणाला नाही सांगू शकले, भावनांचा निचरा योग्य रित्या नाही झाला तर त्यांच्या मनावर दडपण येऊ शकतं."
" पालक म्हणून आपण सहज बोलून जातो की आजकालची मुलं कुठे ऐकतात, मोठे झाले म्हणजे आता मुलांना शिंग आली! पण ह्या सगळ्याला कुठे तरी पालक म्हणून आपणच जबाबदार आहोत, नाही का?"
माझी अखंड बडबड चालू होती....सरिता अवाक् होऊन माझ बोलणं ऐकत होती....
सरिता: " बापरे....काय सांगते !! अगं किती गंभीर आहे हे सगळं!! मी असा कधी विचार केला नाही! आपण लहानाचे मोठे कधी अन् कसे झालो कळलं तरी का??"
मी :" सरे, हा विचार करणं फार महत्त्वाचं आहे! कारण आपल्या वागण्या बोलण्यातून मुलं शिकतात ते आपलं अनुसरण करतात.आपणच जर त्यांच्याशी बोलताना भान विसरून, त्यांना कमी लेखलं, त्यांचा नकळत वारंवार अपमान केला तर त्यांचं मानसिक खच्चीकरण होईल आणि एक पालक म्हणून आपण " फेल" असू!!
आंबट गोड भेळ आणि चाट खाऊन झाल्यावर माझं हे सगळं बोलणं कदाचित सरिताला खूप तिखट वाटलं असेल....तिखट काय, झोंबलच असेल, पण आज मला शांत बसणं शक्यच नव्हतं.... आशा करते माझ्या ह्या बोलण्यावर सरीता विचार करेल आणि तिच्या वागणुकीत बदल करेल.....
©तेजल मनिष ताम्हणे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा