शब्दकोश सुखाचा

सुखाच्या शोधात असलेल्या प्रत्येकाची आपापला सुखाचा शब्दकश तयार करताना होणारी होरपळ वर्णित करणारी कविता.


राज्यस्तरीय करंडक कविता स्पर्धा

विषय : सुखाची परिभाषा

शीर्षक : शब्दकोश सुखाचा

हिरव्या गर्द वनराईची शीतल छाया....
अन् रणरणत्या उन्हात देखील सावलीची माया लाभलेल्या
प्रत्येकालाच या छायेची अन् मायेची
किंमत कळेल असं नाही...!

या सुखद सावलीला शब्दातित करण्यासाठी...
सोसावे लागतात कैक उन्हाळे...
झेलावे लागतात बिन मोसमी पावसाळे...!
कधी अंतरंगातली भळभळ...
तर कधी वैशाखातली होरपळ..!

माय-बाप नावाचा वटवृक्ष लेकरांवरची
सारी संकटं झेलून घेतो...
त्यांच्यां सहवासाचं खरं सुख कळतं...
जेव्हा माणूस या छत्रछायेपासून पोरका होतो...!

वाढवून नात्यातला दुरावा...
त्यागून हवासा विसावा...!
जमवली धन-दौलत... घर-बंगला...
गाडी-घोडा अन् जमीन-जुमला!
सुखाच्या शोधात माणूस खरंच किती हो दमला...!

आईच्या पदरातली ऊब असोत वा
घराला घरपण देणारं तान्हुल्याचं गोड रूप...!

कधीही परतून न येणारं
रम्य बालपण असोत
वा तारुण्यातला हवासा श्रावण...!

पहिल्या पावसाची पहिली सर...
अन् मन चिंब होताना सोबतीस प्रियकर...!

यातलं एखादं सुख सर्वार्थाने परिभाषित
करणारा एखादा शब्दकोश गवसेल का
कुणाला...?
की सुखाची परिभाषा करावी लागेल ज्याची त्याला...!

वरवरचं दिखाऊ सुख वाटलं कितीही
बरं...तरीही!
सुखाला परिभाषित करताना माणसाला
आर्त वेदनेतून जावं लागतं...
तर प्रसंगी होरपळावंही लागतं हेच खरं...!

©तृप्ती काळे
नागपूर टीम