शब्द!

एका वेगळ्या नात्याची छोटी गोष्ट

"कांदेss बटाटेss टमाटेss" रोज सकाळी नऊ वाजता दारावरून ओरडत जाणाऱ्या मनोज कडून साठेकाका भाजी घेत.

एकतर साठे दाम्पत्याचा फ्लॅट दुसऱ्या मजल्यावर अन् त्यात साठेकाकूंना गुडघ्यांचा त्रास! त्यामुळे काकू जिना चढूउतरू शकत नसत अन् भाजी खरेदी आपोआपच साठेकाकांकडे आली.

भाजी घेता घेता साठेकाका अन् काकूंचे भाजीविक्रेता मनोजशी ऋणानुबंध तयार झाले.

अचानक काका आजारी झाले अन् साठे दाम्पत्याची भाजी खरेदी देखील थांबलीच.

एक दिवस मनोज स्वतःच काकांची तब्येत बघायला त्यांच्या घरी गेला. त्यांची ढासळलेली प्रकृती बघून त्याचा जीव हळहळला.

"काकूला भाजी हवी असते.. पण आम्ही दोघंही जिना उतरू शकत नाही!" काकांनी अगतिकपणे सांगितलं.. "तुम्ही रोज तिला भाजी वर आणून द्याल का?" काकांनी विचारलं. मनोजनं शब्द दिला.

त्या दिवसापासून मनोज रोज काकूंना दुसऱ्या मजल्यावर भाजी नेऊन देऊ लागला.

महिन्याभरातच काका निवर्तले.. अन् पुढे काही दिवसांनी काकूंच्या दोन्ही गुडघ्यांवर शस्त्रक्रिया झाल्या. काकू पुन्हा हिंडू फिरू अन् जिने चढ उतार करू लागल्या.

मनोजचा मात्र त्यांना वर भाजी आणून देण्याचा शिरस्ता कायम आहे.. काकांना दिलेला शब्द पाळण्यासाठी!!