शब्द गुंतले सुर जुळले

चुलबुली, नटखट राखीताईची कहानी...
संबंध सेतू एक नवाच शब्द माझ्या पुढ्यात हळूच येऊन पडला तेव्हा खरंतर नक्की काय याचा उलगडा झाला नव्हता. स्पर्धेनिमित्त यावर लिहायचं आहे एवढंच माहिती होतं पण काय ? विचारलं तरी कोणाला माहित नव्हतं प्रत्येक जण लिहिण्यात व्यस्त होते. वेळ आली ती आत्मचरित्र लिहिण्याची आणि यावरूनच लिहायचं होतं एकमेकांबद्दल जाणून घेऊन लिहायचा होता संबंध सेतू.

आता मला याचा अर्थ उमगला पण मी अरेच्चा ! करून डोक्याला हात लावला कारण मी ज्यांना ओळखते त्यांच्या बद्दल बिंधास्त व्यक्त होऊ शकते पण अनोळखी आणि जास्त न बोलणं झालं असतानाही त्यांच्याबद्दल व्यक्त होणं जमणार आहे का मला याबद्दल विचार करून खूप घाबरून गेले आणि अनेक प्रश्न पडले की जमेल ना मला ? काही चुक तर होणार नाही ना ? अशातच संबंध सेतूसाठी आमच्या टीम लिडरने ते नाव पुढ्यात आणून ठेवलं.

माणसाने आपल्यातलं एक लहान मूल जिवंत कसं ठेवावं याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे राखीताई. "राखी भावसार - भांडेकर" आमच्या ग्रुप मधली सगळ्यात लहान मेंबर. आता हे सगळ्यात लहान मेंबरवालं स्टेटमेंट ऐकून स्वतः राखीताईलाही धक्का बसला असेल, पण हे खरं आहे मी पाहिले तिला नेहमी अगदी उत्साही असते. इथे वयाचा संबंध येतं नाही माणसाची प्रवृत्ती ठरवत असते की तो आयुष्याच्या कोणत्या फेजमध्ये आहे.

ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२३ निमित्त एका समूहात आमची निवड झाली त्या अगोदर राखीताईंचं नाव फक्त कधी कधी वाचलं होतं ईरावर. पण जेव्हा एका ग्रुपमध्ये सर्वांशी ओळख झाली तेव्हा त्यांच्याबद्दल हळूहळू कळायला लागलं. तसे तर ग्रुप मध्ये सर्वच मेंबर स्पर्धेसाठी आपापल्या पद्धतीने कार्य करत होते पण प्रत्येक वेळी मला राखीताईच्या स्वभावातून जाणवलं की ती प्रत्येक फेरीसाठी स्वतःहून समोर येते आणि जे पण करते ते आपलं शंभर टक्के देऊन. अगदी स्टँडअप कॉमेडीच्या नावावर सगळ्या ईरा कुटुंबात गोंधळ चालू असताना राखी ताईंने चक्क ह्याच विषयाला धरून कॉमेडी व्हिडिओ बनवला.

खरं सांगू प्रयत्न करूनही मला जमलं नाही आणि बनवलाही नाही त्या व्हिडिओमध्ये सुद्धा तिची एनर्जी एकदम भन्नाट होती.

आयुष्यात अडचणी कुणाच्या नसतात नक्कीचं तिच्याही असतील पण तरीसुद्धा लेखनात कधी ते जाणवत नाही आणि प्रत्येक वेळीच्या बोलण्यामधून कधी असं भासूही देत नाही. वैयक्तिक जीवनात अनेक प्रसंग येऊनही ती त्याला सामोरे जावून ती भक्कम रहायला शिकली. घरातलं शेंडेफळ असूनही लहान वयातच अनेक प्रसंगातून स्वतः ला घडवत गेली. सतत काहीतरी नवीन करण्याची तिची वृत्ती खरंच प्रशंसेस पात्र आहे.

राखी ताई कडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत तसेच तिची नवीन काही तरी शिकण्याची धडपड दिसून येते. प्रत्येक लेखातून आणि तिच्या बोलण्यातून ती वेगळी भासते. कुटुंबाच्या पाठी न खचून जाता खंबीर उभी राहिली आणि वेळोवेळी त्यांना सांभाळून घेणारी ही ताई एक वेगळीच भासते.

संबंध सेतूच्या निमित्ताने मला ताईबद्दल लिहिण्याची संधी मिळाली खरंतर मी स्वतःला भाग्यवान समजते कारण सध्या तिचा विचार करून सुद्धा मला खूप जास्त एनर्जेटिक फील होतं आहे एखाद्या व्यक्तीमध्ये नैसर्गिक रित्या सकारात्मकता असते आणि ती इतरांनाही सकारात्मक विचार करायला आणि वागायला शिकवते.

मैत्रीचा असा फारसा जवळून संबंध आला नसला तरी सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने तिला खूप जवळून पाहण्याची संधी मला मिळाली आणि एखाद्याच्या स्वभावावरून त्याच्याविषयी मनात जागा निर्माण होते तेव्हा ती जबरदस्ती नसते किंवा उगीच मैत्री करायची म्हणून नसते. तर तो असतो त्या माणसाचा चांगलेपणा त्याच्यातले सद्गुण आणि सतत काहीतरी नवीन करण्याची त्यांची वृत्ती.

या स्पर्धेच्या निमित्ताने खूप जणांना जवळून ओळखण्याची संधी मला मिळाली प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही शिकायला मिळालं. विशेष करून राखीताई बद्दल एक गोष्ट इथे आवर्जून सांगावीशी वाटेल की त्यांची कुठल्याही गोष्टीत खुशामत करण्याची गरज पडत नाही, मग ते स्पर्धेच्या कुठल्याही फेरीमध्ये भाग घेणे असो किंवा पुढे होऊन कोणाचीही मदत करणे असो ती नेहमी हजर असते.

"आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती येतात प्रत्येक व्यक्ती काही ना काही हेतूने आपल्या आयुष्यात येतो आणि आपण त्यांच्याकडून काहीतरी शिकत असतो."

खूप नटखट, अवखळ आणि मनमिळावू स्वभावाची शेंडेफळ, तितकीचं लाघवी अशी ही राखी ताई. नेहमी हसत खेळत रहा आणि लेखणीद्वारे अनेक लेख आणि उत्स्फूर्तपणे व्यक्त होतं रहा. तुला खूप शुभेच्छा आणि मला तुझ्याकडून नव्या गोष्टी शिकायला मिळो.

© प्रणाली कांचन कृष्णा शिंदे