शाप उत्तरार्ध.. अंतिम भाग

कथा एका वाड्याची


शाप.. उत्तरार्ध भाग ७


मागील भागात आपण पाहिले की आकाश सदाशिवरावांसारखा दिसत होता. त्यांच्याकडे कनिकाचा वाडा गहाण आहे. जो परत द्यायला तो नकार देतो. आता बघू पुढे काय होते ते.


"नाही.." आकाश बोलला.

" अहो पण ते आमच्या पूर्वजांचे आहे. तुमच्या आजोबांनी ते फसवून घेतले आहे." कनिका त्वेषाने बोलत होती.

" एक मिनिट.. साधारण पंचवीस तीस वर्षांपूर्वी काय झाले हे ना मला माहित ना तुम्हाला. मग तुम्ही हा आरोप कसा करू शकता? काल तो वाडा, ती जमीन मी बघितली. साधारण करोडोंच्या घरात असणारी ही संपत्ती तुम्ही म्हणता म्हणून मी सोडून द्यायची?" आकाश हाताची घडी घालत बोलला. कनिका आणि सुयश गप्प बसले. काय बोलावे त्यांना सुचेना. कारण कागदपत्र त्यांच्या नावावर होते.

" मग काय? बोलणेच खुंटले.. भेटूयात कोर्टात.." सुयश उठला. कनिकाला खूप काही बोलावेसे वाटले पण न बोलताच ती ही उठली. बाहेर आल्यावर तिने आत बघितले, आकाश कोणत्यातरी विचारात गढलेला दिसला. आपल्या हक्काचे असे कोणाच्यातरी घशात असे उगाचच घालणे तिला पटत नव्हते. रात्रभर ती आणि सुयश दोघेही तळमळत होते. एका माणसाच्या जीवावर चार नाही पाचजणांचा संसार चालेल? हातात काहीच नसेल तर घर वगैरे कसे घ्यायचे? हा विचार सुयशच्या डोक्यातून जात नव्हता. "जोपर्यंत तो इथे आहे, तुम्हाला यातून मुक्ती नाही." कमळाचे शब्द कनिकाच्या डोक्यात घुमत होते. सकाळ होईपर्यंत कनिकाने स्वतःशी एक निर्णय घेतला होता. फक्त तो बरोबर की नाही हे तिला ठरवायचे होते.


" आई, मी शेतावर जाऊन येते." सकाळी आवरून तयार झालेल्या कनिकाने मालतीताईंना सांगितले.

" कनिका, तुझे आणि सुयशचे काय सुरू आहे? सतत काय बाहेर जात आहात? काही अडचण आहे का?" मालतीताईंनी काळजीने विचारले.

" नाही आई.. आता सगळ्याच अडचणी संपणार आहेत." कनिका त्यांना धीर देत म्हणाली. कनिका समाधीजवळ आली. ते गृहस्थ तिथेच होते. आज त्यांच्या चेहर्‍यावर उदासी होती.

" काका.." कनिकाने त्यांना हाक मारली.

" बोल.."

" तुम्ही इथेच असता का?"

" म्हण तसे हवे तर.."

" तुमचे घर, तुमची मुलेबाळे?"

"सध्या फक्त हीच.." ते समाधीकडे बोट दाखवत म्हणाले.

"ही बोलते तुमच्याशी?" कनिकाने विचारले. ते जोरात हसले. कनिका ओशाळली.

" ती नाही बोलत.. पण मी तिला सगळं सांगतो. मग ती तिचे संदेश पाठवते."

" मग तिला एक गोष्ट विचारा ना?"

" काय?"

" मी जो विचार करते तो चूक की बरोबर?"

" चूक की बरोबर.. कोणतीही गोष्ट अशी नाही सांगता येत. आता तूच बघना सदाशिवसाठी बळी घेणे बरोबर होते कमळीसाठी चूक. एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, शाप संपवायचा फक्त तुझ्याच हातात आहे.." बोलता बोलता ते दिसेनासे झाले. कनिका त्यांच्या बोलण्याचा विचार करत घरी आली. तिने सुयशच्या मोबाईलमधून आकाशचा नंबर शोधून काढला. कनिका स्वतःच्या खोलीत गेली. तिने मनाशी प्रार्थना केली आणि आकाशला फोन लावला.

" हॅलो, मी कनिका बोलते आहे. हो. मला पटले तुमचे बोलणे. मी माझ्या घरातल्यांची समजूत काढते. असेही तुम्ही या जमिनीचे मालक आहात तर तुम्हाला आजच्या खास दिवशी करायचा विधी दाखवते. पुढच्या वर्षी आम्ही असूनसू? हो शेतावर या.. तिथेच बोलू.. हे माझ्या नवर्‍याला नका सांगू. मी बोलते सविस्तर भेटल्यावर."
दिवेलागणी झाल्यावर कनिका परत मागच्या दरवाजाने बाहेर पडली. ती शेतात गेली. तिने आकाशला परत फोन लावला.

" येताय ना?"

" हो.. नक्की कुठे येऊ?"

" शेताच्या मधोमध एक समाधी आहे. मी तिथेच आहे."

काही मिनिटातच आकाश तिथे पोहोचला. तो आल्या आल्या तिने त्याला सरबत प्यायला दिले.

" घ्या."

" हे काय?" त्याने आश्चर्याने विचारले.

" आजच्या विधीची सुरुवात याने."

" इथे तुम्ही एकट्याच?"

" हो. हा विधी एकट्यानेच करायचा असतो. म्हणून आमच्या घरातून मी आणि तुमच्याकडून तुम्ही." कनिकाच्या ओठांवर गूढ हसू होते. "याच्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, आमच्या घराण्याची." कनिकाने सांगायला सुरुवात केली. आकाश ऐकू लागला. कनिका समाधीकडे बघत सगळं सांगत होती. आकाशच्या चेहर्‍यावरचे भाव बदलत होते. कनिकाचे सांगून संपले.

" काय झाले मग त्या शापाचे? संपला का तो शाप?" आकाशने उत्सुकतेने विचारले.

" आता संपेल तो शाप.." कनिका एकटक समाधीकडे बघत होती.

" कसा? सदाशिव गेला इथून?"

" आता जाईल.."

" कसा?"

" तू संपलास की त्याचे अस्तित्व पण संपेल.."

" म्हणजे??" आकाश घाबरला होता.

" तुला माहित आहे, मी उमासारखी दिसते आणि तू सदाशिवसारखा.. मला जर आमच्या घराण्याला शापातून मुक्त करायचे असेल तर तुला संपवायलाच पाहिजे मला. त्याशिवाय कमळीचा शाप संपणार नाही.." आकाश खूपच घाबरला.

" तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे. मी जातो.." तो वळला. त्याला गरगरायला लागले. कनिका हसली.

" मी यात औषध टाकले होते. त्याचा परिणाम सुरू झाला आहे." कनिकाच्या बोलण्यात वेडसरपणाची झाक जाणवत होती. आकाश खाली पडला. कनिकाच्या अंगात ताकद आली होती. तिने आकाशला ओढत समाधीपाशी आणले. पदरातला चाकू काढला. ती तो त्याला मारणार तोच पाठून आवाज आला..

" कनिका..." ती दचकली. तिच्या हातातून चाकू खाली पडला. तो आकाशच्या हातावर पडला. त्याचे रक्त समाधीवर उडाले.

" कनिका.. काय करते आहेस ?" सुयश आणि त्याच्यासोबत एक बाई होती.

" मला आपले घराणे शापमुक्त करायचे आहे आणि हा वाडा पण परत मिळवायचा आहे." कनिकाच्या बोलण्यात अजूनही वेडसर झाक होती.

" तो वाडा तुम्हाला परत देणारच होता." ती बाई पहिल्यांदाच बोलली. कनिकाने तिच्याकडे बघितले.

" त्याचे काल त्याच्या बाबांशी बोलणे झाले. त्यांनी सांगितले. आकाशच्या आजोबांनी मरताना त्यांना सांगितले होते. त्यांनी तुमच्या बाबांना फसवून सगळे स्वतःकडे गहाण ठेवून घेतले होते. ते फक्त ताब्यात घेण्याची त्यांची हिंमत झाली नाही. त्यांना त्याचा पश्चाताप झाला होता. पण तोपर्यंत तुमच्या बाबांचाही मृत्यु झाला होता आणि याचे बाबा परदेशातून परत आलेच नाहीत. नंतर ही गोष्ट त्यांच्या स्मरणातून निघून गेली. काल जेव्हा आकाश बोलला तेव्हा त्यांनी हे सांगितले. त्याला हे पटले. तुमचा फोन आला तेव्हा फक्त तुमच्या घराण्याच्या इतिहासाची उत्सुकता होती म्हणून तो आला. पण मला मात्र सतत काहीतरी वाईट जाणीव होत होती म्हणून मी आले इथे.."

" पण तुम्हाला कसे कळले?"

"तो शेतावर येतो हे ऐकले होते.. मी काही बोलायच्या आत तो निघाला. नशिबाने मी सुयशचा नंबर घेऊन ठेवला होता. तो तुम्हाला तुमचे वैभव परत द्यायला आला होता आणि तुम्ही.." ती बाई रडत होती. रडताना तिचे पोट थरथरले. आता कुठे कनिकाचे तिच्याकडे लक्ष गेले. ती गरोदर आहे हे बघून कनिका गळपटून खाली बसली..


" मी मारले त्याला.. मी त्या पाण्यात कीटकनाशक टाकले होते. हा शाप कधीच संपणार नाही आता.." कनिका रडत बोलली.

" नाही आई.. मी ते सरबत बदलले होते. आता तो फक्त सदाशिवसारखा दिसत होता. आपल्या स्वार्थासाठी दुसर्‍याचा बळी द्यायची वृत्ती त्याची संपली होती. तू मात्र परत दाखवून दिलेस की या घरासाठी तू काहिही करायला तयार आहेस. तूच या घराची तारणहार आहेस."

" तुम्ही नक्की आहात तरी कोण?" कनिका हात जोडत बोलली.

"मीच त्या कमळीचा मुलगा. आईने मला वाढवले, सांभाळले म्हणून आता मी इथे थांबलो आहे तिची सेवा करत. जा तू समाधानाने.. खात्री बाळग शाप संपला याची."
कनिका कोणाशी बोलते आहे हे न समजल्यामुळे तिच्याकडे लक्ष न देता सुयश आणि आकाशच्या बायकोने आकाशला शुद्धीवर आणले.

" मला माफ करा.. तुमचा वाडा, जमीन परत घ्या पण मला सोडा. लवकरात लवकर मी कागदपत्रे पाठवतो." आकाश तिथून धडपडत बायकोच्या सहाय्याने निघाला. सुयशही कनिकाला घेऊन घरी आला. दोघे आपल्या खोलीत गेले. इतके दिवस समोर असलेले सदाशिवरावांचे चित्र खाली पडून फुटले होते.


खऱ्या अर्थाने त्यांचे वाड्यातले अस्तित्व संपून तो वाडा शापमुक्त झाला होता..


कथा कशी वाटली ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all