शाप.. उत्तरार्ध भाग ४

कथा एका वाड्याची


शाप.. उत्तरार्ध भाग ४

मागील भागात आपण पाहिले की उमा एका साधूपुरूषाकडे मार्गदर्शनासाठी जाते. आता बघू पुढे काय होते ते.


" उमा, तू हे बरोबर नाही केलेस?" विनायक चिडून बोलत होता.

" काय बरोबर नाही केले?" उमाने विचारले.

" का नाही सांगत आहेस, त्या गुहेत काय झाले ते?"

" अहो, पण काही झालेच नाही तर काय सांगू? तुमचा इतकाही विश्वास नाही का माझ्यावर?" उमाने विचारले. कारण ज्या पद्धतीने त्या महाराजांनी तिच्याशी संवाद साधला त्याने तिची खात्री पटली होती की हे गुपित फक्त तिच्यासाठीच आहे.

" तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही." विनायक हताश होत बोलला. दोघेही वाड्यावर परत यायला निघाले होते. उमाच्या माहेरचे खूप आग्रह करत होते राहण्यासाठी. पण उमाला लवकरात लवकर वाड्यावर जायचे होते. एक अनामिक हुरहुर तिच्या मनाला लागली होती. दोघे वाड्यावर आले. आत गोंधळ उडाला होता. या दोघांना पाहून सगळे शांत झाले.

" काय झाले?" विनायकने विचारले. कोणी काहीच बोलेना हे बघून ते आत गेले. आत केशव आणि बाळाला घेऊन सदाशिवरावाची बायको, जानकी सुन्नपणे बसली होती.

" जाऊबाई.. काय झाले? कमळा कुठे गेली बाळाला सोडून?" उमाने काळजीने विचारले.

" उमा.. बघ ना.. मला म्हणाली बाळाला बघा. मी आत्ता येते. हे गडी शेताच्या इथून पळत आले. आणि..."

" काय झाले नक्की?" विनायकने चिडून गड्याला विचारले.

" मालक.. कमळीने जीव दिला.." शिरप्या मान खाली घालून बोलला. उमा आणि विनायक दोघांनाही धक्का बसला. उमाला कळले ती फक्त बाळाच्या जन्माची वाट बघत होती. त्या बाळाला आपल्या पदरात टाकून ती निघून गेली.

कमळाच्या आत्महत्येने हादरलेला वाडा सावरू लागला. उमा कमळाच्या मुलाला आपल्या मुलासारखे वाढवू लागली. विनायकशी बोलून तिने त्याच्या नावाने काही जमीन ठेवली. दुसरीकडे महाराजांनी दिलेली साधना चालू होती. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिने ते सगळे भूर्जपत्रावर लिहून ठेवले. पण काहीही झाले तरी त्या शापाच्या पुढचा भाग काही लिहिला जात नव्हता. शेवटी महाराजांचे स्मरण करून तिने तो प्रसंग मनातल्यामनात कोरून ठेवला.
वर्षामागून वर्ष उलटली. शापाने घाबरलेले सदाशिवराव कमळीच्या मरणानंतर निर्धास्त झाले. पहिली काही वर्ष भयाने त्यांनी स्त्रीसंबंध बंदच ठेवले होते. आता ती वासना परत जागृत होऊ लागली होती. गरीब जानकीबाईंनी त्यांच्या इच्छेसमोर नेहमीप्रमाणे नमते घेतले. एके दिवशी सकाळीच वाडा जानकीबाईंच्या कोरड्या ओकारांच्या आवाजाने जागा झाला. सदाशिवरावांना जरी हा आपला पुरुषार्थ वाटत असला तरी उमाच्या मनात अपशकुनाची पाल चुकचुकायला लागली होती. सदाशिवराव परत आधीच्याच रूबाबात वावरू लागले होते. शेतावर फेरफटका न चुकता मारत होते. कमळा, दगडू, शाप हे जणू त्यांच्या आयुष्यात कधी घडलेच नव्हते असे वावरू लागले होते.
शेवटी एक दिवस ते घडलेच.. शेतावर गेलेले सदाशिवराव स्वतःच्या पावलांनी घरी आलेच नाही. सर्पदंश होऊन तिथेच रक्त ओकून ते मरण पावले. आणि घराण्याचा शाप खऱ्या अर्थाने सुरू झाला...


कनिकाने डोळे उघडले. तिच्या डोळ्यातून अश्रु निरंतर वहात होते. तिला त्या महाराजांचे शब्द आठवले. "तूच त्यांना शापमुक्त करशील.. या जन्मात नाहीतर पुढच्या.." डोळे पुसून निर्धाराने कनिका उठली. तिने समाधीला आणि त्या गृहस्थांना नमस्कार केला. काहिही न बोलता ती तिथून निघाली.. आपल्या कर्तव्याकडे..


कशी करेल कनिका या घराला शापमुक्त.. बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटतो ते नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all