शाप.. उत्तरार्ध भाग १

कथा एका वाड्याची


शाप.. उत्तरार्ध भाग १



" पदर पसरते तुझ्यापुढे.. शाप मागे घे बाई."

"वहिनीबाय, तो माझा शाप नाही.. तळतळाट आहे माझा, माझ्या धन्याचा, माझ्या लेकाचा.."

" अग पण एकाची शिक्षा अख्ख्या खानदानाला का? दया कर बाई माझे."

" त्याने कमावलेला पैसा, शेतीवाडी तुम्हाला चालतो. मग त्याच्या पापाचे पण वाटेदार व्हा.."

" नको ग अशी निष्ठुर होऊस.. "

" निष्ठुर तर तो होता.. जोपर्यंत तो इथे आहे, तुम्हाला यातून मुक्ती नाही.."


कनिकाच्या डोळ्यापुढे ती न बघितलेली पाने फिरू लागली. समोरच तो उभा होता. तिचे डोके चक्रावले. ती चक्कर येऊन खाली पडली. कनिका खाली पडताच वाड्यावर सगळे घाबरले. तिथे एकच हलकल्लोळ माजला. ते बघून "तो" तिथून निघून गेला. सुयशने पाणी आणले. ते बेशुद्ध कनिकाच्या तोंडावर मारले. ती हळूहळू शुद्धीवर येऊ लागली. सुयशच्या जीवात जीव आला.

" तो... ते..." कनिका बोलायचा प्रयत्न करत होती.

" कोण? काय झाले नक्की तुला?" सुयशने काळजीने विचारले.

" तिला ना खूप ताण आला असेल. सगळं तीच तर बघते आहे. " मधुरा बोलली.

" हो.. तिला खोलीत घेऊन जा बरं.." मालतीताईंनी सुयशला सांगितले. कनिकाला घेऊन सुयश त्यांच्या खोलीत आला. त्याने तिला पलंगावर बसवले. बसताच तिला समोर तेच चित्र दिसले. कनिकाला परत तेच सगळं आठवले.

" सुयश.." तिने त्याचा हात घट्ट धरून ठेवला.

" काय झाले? मी आहे इथेच.." तो तिला धीर देत बोलला.

" आपण तुझ्या जुन्या खोलीत जाऊ या ना प्लीज." कनिका आता सुयशला काहिच सांगायची इच्छा नव्हती. पण ते चित्रही तिला डोळ्यासमोर नको होते. सुयशने ही समजून घेत तिला आपल्या जुन्या खोलीत नेले. खाली लोकांची चाललेली गडबड दोघांना ऐकू येत होती.

" बरं वाटतय का आता?" सुयशने प्रेमाने विचारले.

"हो.."

" अशीकशी अचानक चक्कर आली? आपल्या बाळाला सांभाळताना तुला काही झालेलं मला चालणार नाही हां.." सुयशने बाळाचे नाव काढताच तिला तो शाप परत आठवला. तिने घाबरून सुयशला घट्ट मिठी मारली.

" काय ग, मगापासून अशी घाबरलेली का आहेस? कोणी काही बोललं का?"

" ते.." कनिकाने सुयशकडे बघितले. तो शाप संपला आहे असे वाटून घरातले सगळेच किती खुश झाले होते. त्यांना परत हे सांगायचे? उमासारखेच आपल्यालाच काहीतरी करायला लागणार.. परत.. तिने मनाशी निश्चय केला.

" काय झाले? सांगत होतीस ना?"

" काही नाही.. जीव घाबरला माझा. तू जातोस का खाली? आईंना एकट्यांना जमणार नाही सगळ्यांना निरोप देणे. माझे आईबाबा आणि स्मिता तिथे आहेच तरिही.." कनिका बोलत होती.

" तू बरी असशील तर मी जातो.."

" हो.. जा. मी आहे."


सुयश खाली जाताच कनिका विचार करू लागली. कोण असेल तो? चेहरा तर अगदीच सदाशिवरावांचा होता. कपडे मात्र आत्ताच्या काळातले होते. तो इथे कसा आला? की जशी मी उमासारखी दिसते आहे तसाच तोही? मग डोळ्यासमोर दिसणार्‍या त्या पानांचा अर्थ काय? याचा अर्थ अजून हे शापमुक्त झाले नाहीत? सुयशचा विरह होईल? नाही.. मी हे नाही होऊ देणार. कनिका उठून खिडकीत उभी राहिली. समोर पसरलेले शेत दिसत होते. मध्यभागी एक छोटासा मिणमिणता दिवा दिसत होता..

" माझ्या प्रश्नांची उत्तरे आता एकच व्यक्ती देऊ शकते.." कनिका स्वतःशीच बोलली.

समोर दिसत असलेल्या उमाच्या समाधीजवळचा दिवा अंधारात दिशा दाखवायचे काम करत होता..


कोण असेल ती व्यक्ती? मिळतील का कनिकाला स्वतःच्या प्रश्नांची उत्तरे? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all