शाप.. अंतिम भाग

कथा एका वाड्याची


शाप.. भाग ७


मागील भागात आपण पाहिले की कनिकाला शाप काय आहे ते समजतो पण शापमुक्त कसे व्हायचे ते समजत नाही. मधुराला दवाखान्यात दाखल केले असते आणि येणाऱ्या सुयशचा अपघात होतो. आता बघू पुढे काय होते ते..


" आता का दातखिळी बसली तुझी? सांग ना गरोदर आहेस का तू?" मालतीताई चिडल्या होत्या. कनिकाला आठवेना.

" या महिन्यात पाळी नाही आली बहुतेक."
ती कशीबशी बोलली.

" आणि म्हणे शिकली सवरलेली.. स्वतःची पाळी चुकलेलीही समजत नाही?"

" पण तेव्हा तुम्हीच बोलला होता ना हे शाप वगैरे काही नसते." कनिकाला समजत होते तिच्या बोलण्याला काहीच अर्थ नाहीये. सुयशशिवाय आयुष्याची तिला कल्पना सुद्धा करवत नव्हती. काही महिनेच तर झाले होते या सगळ्याला. ती रडायला लागली. तिला रडताना बघून मालतीताई अजूनच चिडल्या.

" बंद कर ही नाटके.. माझ्या सुयशला जर काही झाले ना, तर माफ करणार नाही बघ तुला.." त्या कडाडल्या. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आल्या.
" अभिनंदन.. एका छानशा मुलीला जन्म दिला आहे मधुराने." कनिकाला आनंद झाला. ती आत जाणार तोच मालतीताई परत बोलल्या.
" काही गरज नाही आत जायची. तुझी सावली सुद्धा पडायला नको तिच्यावर." आता मात्र कनिकाला सहन झाले नाही. ती तिथून निघाली आणि चालत चालत त्या समाधीपाशी आली. त्या समाधीच्या पायाशी डोके ठेवून रडायला लागली.

" का? का हे घडले माझ्यासोबत? मी तर घराला शापमुक्त करायचा प्रयत्न करत होते ना? तू आई आहेस ना या घराची. मग कशी बघू शकतेस आपल्या मुलांना मरताना? आपल्याच सुनांची अशी पांढरी कपाळं बघवतात तरी कशी तुला? मी पण हरणार नाही. माझा सुयश नाही वाचला तर मी ही इथेच डोकं आपटून जीव देईन. बघतेच कसा तो शाप पूर्ण होतो ते." कनिका तिचं डोकं आपटणार तोच ती व्यक्ती तिथे परत आली.

" तिच्यावर चिडून काय होणार? तिने तर तिच्याकडून सगळे प्रयत्न केले होते." त्याच धीरगंभीर आवाजात ती व्यक्ती बोलू लागली.

" याला प्रयत्न म्हणतात? त्या वहिनी तिथे भाऊजी गेल्यावर नैराश्यात गेल्या होत्या. मला इथे माहित नाही माझा नवरा कसा आहे?" कनिका खूप निराश झाली.

"तिने प्रयत्न केले म्हणून तर मी इथे तुझ्याशी बोलतो आहे. आणि एवढ्यातच तुझा तुझ्या देवीवरचा विश्वास संपला?"

" तुम्ही? तुम्हाला कसे समजले? तुम्ही आहात तरी कोण?"

" मी? मी त्या कमळाचा वंशज. या आईच्याच दयेने जगलो आहे." त्याने समाधीला हात जोडले. "वाड्यावरच्या सगळ्या बातम्यांची मला नोंद ठेवावी लागते. आईला सांगावे लागते.. तुला माहित नाही?" त्याने गूढ हसत विचारले.

" मला? मला कसे माहित असणार?"

" इथे ये.. मग तुला समजेल.." कनिका त्या गृहस्थाने दर्शविलेल्या जागेवर गेली. त्यांनी एका ठिकाणी बोट दाखविले. कनिका हादरली. तिला ती आरशात बघत असल्यासारखे वाटले. तोच चेहरा, तेच रूप.. पण फक्त जुन्या काळातले कपडे.. तैलरंगातले ते चित्र..


" हे.. हे माझे चित्र?" कनिकाने विचारले.

" नाही.. हे माझ्या आईचे आहे.. " त्या व्यक्तीच्या चेहर्‍यावर गूढ हास्य होते. कनिका डोक्याला हात लावून बसली.

" मला काहीच समजत नाही.. दया करा मला समजावून सांगा." ती व्यक्ती पुढे काही बोलणार तोच पाठून सुयशचा आवाज आला.

" कनिका.. कनिका.."

" सुयश.. सुयश मी इथे आहे.." कनिका पटकन उठली. ती उठेपर्यंत ती व्यक्ती परत गायब झाली. कनिका बाहेर गेली तर सुयश तिथे उभा होता. त्याच्या डोक्याला पट्टी लावली होती.

" तू.. तू बरा आहेस?"

" दिसते आहे ना? किती ती घाई आणि फोन ठेवायची?"

" म्हणजे?"

" तो उत्साही माणूस. माझी बाईक पडली. मला थोडेफार लागले. तोपर्यंत तो तुला उत्तर देऊन मोकळा झाला. तू मूर्ख लगेच फोन स्वीच ऑफ करून टाकलास. घरी फोन कोणी उचलत नाही. किती टेन्शन आले मला.. घरी आलो कसातरी. तिथून दवाखाना आणि तिथून इथे. छळा फक्त गरिबाला.." सुयश नाटकीपणे बोलला. ते बघून दिवसभरात पहिल्यांदाच कनिकाच्या चेहर्‍यावर हसू आले.

" फोन बंद केला नाही. चुकून झाला असेल.."


" मान्य.. पण तू इथे काय करत होतीस?" त्याने थोडे चिंतेने विचारले..

" ते मी.." तिने आजूबाजूला पाहिले. कोणीच नव्हते.

" ते मी? काय? जाऊ दे. वहिनी तुला विचारत होती. जायचे का बाळ बघायला?"

" आई??"

" ती मगाशी चिडली होती म्हणून बोलली. चल लवकर. बाळ वाट बघते आहे तुझी." सुयश कनिकाला घेऊन घरी आला. दोघेही जेवण घेऊन बाळ बघायला गेले. मालतीताईंचा राग शमला होता. कनिकाला बघून त्या काहीच बोलल्या नाहीत. दवाखान्यातून निघताना न विसरता कनिकाने प्रेगनन्सी कीट विकत घेतले. घरी आल्यावर तिने टेस्ट केली. ती खरेच गरोदर होती. हे सगळे कसे घ्यावे तिला समजेना. तिचा सुयश ती गरोदर असताना सुद्धा अपघातातून वाचला होता. तिने दोन नमस्कार केले. एक देवीला आणि दुसरा आईला.. तिने सुयशशी बोलायचे ठरवले.

" सुयश.. तू बदली करून घेणार होतास. त्याचे काय झाले?"

" बघू.. सांगितले तर आहे. झाली तर बरंच आहे. आता अचानक बरी तुला आठवण झाली?"

" मला असे वाटते तू आता सतत माझ्यासोबत रहावे."

" मला तर नेहमीच वाटते.." सुयश तिच्या जवळ येत बोलला.
" अंहं.. बाळाच्या बाबांना हे असे चावटपणे वागणे शोभत नाही."
" काय?? खरं??"

" अगदी.. म्हणून तर आई माझ्यावर चिडल्या होत्या."

" म्हणजे?"

" सुयश, मी जे बोलते आहे ते आता गंभीरपणे ऐक." कनिकाने बोलायला सुरुवात केली. तिने त्याला गुंडाळी, समाधी सगळे सांगितले.
" म्हणून मला आता असे वाटते तू इथेच रहावस.. नोकरी सोडायला लागली तरी सोड. इथे तुला करायला भरपूर काम आहे. मलाही काही दिवसांनी एवढे लक्ष द्यायला जमेल असं वाटत नाही.." कनिकाने बोलणे संपवले.

" हे एवढे आमच्या वाड्याचे गूढ असेल असे कधी वाटलेच नव्हते. लहानपणी आजूबाजूची लोक काहीतरी कुजबुजायची. पण मी आणि यशने कधी लक्षच नाही दिले. तू खरंच ग्रेट आहेस."

" ती तर मी आहेच.. मग मला असे वाटते की हा जर शाप संपला असेल तर आपण देवीचे जागरण गोंधळ करूया का? बाळाच्या बारशाच्या दिवशी?"

" तू म्हणशील तसे?" सुयश कनिकाला मिठीत घेत म्हणाला.

मधुरा घरी आली. सुयशने मालतीताईंशी बोलून जागरण गोंधळाचा घाट घातला. कनिका स्वतः नेवैद्याचे पान घेऊन समाधीस्थळी गेली. तृप्त मनाने ती तिथून निघाली. बाळाचे नाव कनिकाने "प्रिशा" ठेवले. शापमुक्त झाल्याचा आनंद मालतीताईंच्या चेहर्‍यावर दिसून येत होता. खूप दिवसांनी वाड्यावर खूप माणसे आली होती. कनिका प्रत्येकाला काय हवे नको ते विचारत होती. अचानक तिला तो दिसला..
तो एकटक वाड्याकडे बघत होता. तो तोच होता.. ज्याचे दालनात चित्र लावले होते.. सदाशिवराव.. या वाड्याचा मूळपुरूष.. कनिका बघतच राहिली.. अचानक तिच्या डोळ्यासमोर ती न वाचलेली पाने फिरू लागली..

" पदर पसरते तुझ्यापुढे.. शाप मागे घे बाई."

" वहिनीबाय, तो माझा शाप नाही.. तळतळाट आहे माझा , माझ्या धन्याचा, माझ्या लेकाचा."

"अग पण एकाची शिक्षा अख्ख्या खानदानाला का? दया कर बाई माझे."

" त्याने कमावलेला पैसा, शेतीवाडी तुम्हाला चालतो. मग त्याच्या पापाचे पण वाटेदार व्हा.."

" नको ग अशी निष्ठुर होऊस.."

" निष्ठुर तर तो होता.. जोपर्यंत तो इथे आहे.. तुम्हाला यातून मुक्ती नाही.."



शाप या कथेचे हे पर्व इथेच थांबवते.. आता नंतर भेटू पुढील पर्वात.. तुमच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे घेऊन. तोपर्यंत ही कथा कशी वाटली हे सांगायला विसरू नका.. आणि अजून एक या कथेला भरपूर प्रतिसाद दिलात, यावर जसे प्रेम केलेत ते असेच राहू दे..

खूप खूप धन्यवाद..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all