शाप.. भाग २

कथा एका वाड्याची


शाप.. भाग २

मागील भागात आपण पाहिले की सुयश आणि कनिकाचे लग्न ठरले आहे. सुयशच्या जुळ्या भावाचे नुकतेच निधन झाले आहे. कनिका त्यांच्या गावातल्या घरात सगळ्यांना भेटायला आली होती. सुयशची वहिनी या घराला शाप आहे असे सांगते. खरेच या घराला शाप आहे?


" हो.. बाळ त्याच्या बाबांना बघूच शकत नाही.. सुयश आणि यशने त्यांच्या बाबांना बघितले नाही.. आता माझेच बघ ना?" बोलता बोलता वहिनींनी आपल्या पुढे आलेल्या पोटावर हात ठेवला.
" असं काही नसतं." कनिका स्वतःशीच बोलली..

" तुला पण येईल अनुभव. " वहिनी कशातरी हसल्या.. ते बघून कनिका शहारली. तिला काही सुचेना. ती तशीच बाहेर आली. बाहेर सुयश आईला घेऊन आला होता. कनिकाने पटकन त्यांना वाकून नमस्कार केला. तिचा घाबरलेला चेहरा बघून मालतीताईंनी विचारले,
"काय ग काय झाले? एवढी घाबरलीस ते?"

" ते वहिनी शाप वगैरे बोलत होत्या." कनिका अजून घाबरलेलीच होती. मालतीताईंनी सूचक नजरेने सुयशकडे बघितले. सुयशने पटकन कनिकाला पाणी दिले. तिने एका घोटात पाणी संपवले.

" ते यश गेल्यापासून मधुराच्या डोक्यावर थोडा परिणाम झाला आहे." मालतीताई चाचरत बोलल्या.

" त्या म्हणाल्या की सुयशने त्याच्या बाबांना नाही बघितले, आता त्यांचे बाळ पण.."

" योगायोग ग फक्त योगायोग.. तू लक्ष नको देऊस. बरं लग्नाची तयारी झाली ना? ये हो लवकर या घरात." मालतीताई हसत म्हणाल्या. कनिका लाजून उठली. स्वयंपाकघरात मधुरा अजूनही तशीच उभी होती. कनिकाने तो गॅस आधी बंद केला. मधुराला हलवले.

" वहिनी, मला तुमच्या खोलीत घेऊन चला." तिने मधुराला ठणकावून सांगितले. यांत्रिकपणे चालत मधुरा कनिकाला तिच्या खोलीत घेऊन आली. कनिकाने मधुराचे तोंड धुतले. तिची वेणी घालून दिली. कपाळावर टिकली लावली. कपाटात शोधून तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले. आणि तिला बजावले,
" येणाऱ्या बाळासाठी हे असे छान रहायचे. रहाल ना?" मधुराने मान हलवली. ती आल्यापासून पहिल्यांदाच समंजस हसली. मग दोघींनी मिळून पटापट स्वयंपाक केला. कनिकाने तेवढ्यातल्या तेवढ्यात घर आवरून दिले. मालतीताई कौतुकाने सगळं बघत होत्या. शेवटी सुयश आणि कनिका जायला निघाले. ते बघून मधुराने तिचा हात घट्ट धरला.

" तू निघालीस? "

" येते लवकरच." कनिका हलकेच हात सोडवून घेत म्हणाली. " यायलाच पाहिजे ना बाळाची काळजी घ्यायला."

परतीच्या प्रवासात कनिका विचारात गुंतली होती. तसा तिचा या शाप वगैरे गोष्टींवर विश्वास नव्हता पण ती थोडी घाबरली होती हे मात्र नक्की. तरिही ती सुयशशी लग्न करणारच होती. ठरलेल्या मुहूर्तावर दोघांचे निवडक लोकांच्या उपस्थितीत लग्न लागले.. कनिका लग्न होऊन सुयशच्या घरी आली. मोजकीच माणसे गृहप्रवेशाच्या वेळेस होती. सुयशच्या दूरच्या बहिणीने, स्मिताने दोघांचं औक्षण केले. दार अडवले. कनिका माप ओलांडून घरात आली. वहिनी दाराआडून हे सगळं बघत होत्या. कनिका त्यांच्याकडे बघून हसल्यावर त्यांना हायसे वाटले. त्या दिवशी कनिका बाकीच्या बायकांसोबत मोठ्या दालनात झोपली. कितीतरी वेळ तिचा या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. या वाड्यात आपण आलो, या वाड्याच्या आपण आता धाकट्या सूनबाई की मालकीण? ती विचार करत होती.
दुसर्‍या दिवशी सत्यनारायणाची पूजा झाली. पहिल्या रात्रीसाठी कनिका आणि सुयश दोघेही अधिर झाले होते. स्मिता कनिकाला सजवत होती. तिची चेष्टा करत होती. दोघी हसत होत्या. तोच तिथे मालतीताई आल्या. कनिका पटकन उठली. त्यांनी स्मिताला खुणावले तशी ती बाहेर निघून गेली. मालतीताई कनिकाच्या जवळ आल्या. त्यांनी कनिकाच्या हातात गोळ्यांचे पाकीट ठेवले. ते बघून कनिका आश्चर्यचकित झाली.

" प्रत्येक सासू सुनेला गृहप्रवेशाच्या वेळेस काहीतरी देते. आता आहे ते सगळे तुझेच आहे. आम्ही अजून तुला वेगळे काय देणार? उलट आम्ही आज तुझ्याकडे काहीतरी मागणार आहोत. देशील ना?"
कनिका न कळत हो म्हणून गेली.

" तुम्ही शिकलेल्या पोरी. तुम्हाला काही वेगळे सांगायची गरज नाही. पण आमची इच्छा आहे की काही वर्ष तरी तुम्ही पाळणा लांबवावा. मधुराही गरोदर आहेच. त्यात लगेच अजून एक बाळंतपण नको." मालतीताई बोलून पटकन निघून गेल्या. खरेतर कनिकाला सासूबाईंच्या तोंडून हा विषय ऐकताना लाजच वाटली. त्यावर काही प्रतिक्रिया द्यायच्या आत त्या बाहेर गेल्या आणि स्मिता आत आली.

" काय मग, काय दिले आमच्या आत्याने? सोन्याचा हार की मोत्यांची माळ?" स्मिता मस्करी करत म्हणाली. कनिकाने हातातले गोळ्यांचे पाकीट घट्ट धरून ठेवले. कनिकाचा मगाचा उत्साह थोडा मावळला होता. स्मिता तिला घेऊन सुयशकडे जायला लागली. एका नवीनच खोलीबाहेर ती कनिकाला घेऊन आली.

" ही कोणती खोली? सुयशची खोली वेगळी आहे ना?" कनिकाने विचारले. या घरात तिला आश्चर्याचे एवढे धक्के बसत होते की आता आश्चर्य वाटणेच बंद झाले होते.

" अग, आत्याने सांगितले म्हणून आणले इथे.. ही म्हणे कर्त्या पुरूषाची खोली आहे. आता इथेच गप्पा मारणार की आतही जाणार?" कनिका लाजली. ते बघून स्मिताला चेव चढला.
" बरं ती आतली सगळी सजावट मी केली आहे. जर वेळ मिळाला तर उद्या नक्की सांग."

" काय?" कनिकाच्या तोंडून निघून गेले आणि ती परत स्वतःशीच लाजली.

" बाकी काही नाही. सजावट कशी होती ते सांगितले तरी चालेल.." स्मिता खिदळली आणि तिने कनिकाला आत ढकलले. कनिका हातातला दुधाचा पेला सांभाळत आत आली आणि बघतच राहिली.


काय असेल या खोलीत? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते सांगायला विसरू नका.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all