शाप.. भाग ३

कथा एका वाड्याची


शाप.. भाग ३


मागील भागात आपण पाहिले की कनिकाचे लग्न होऊन ती सासरी येते. पहिल्याच रात्री अप्रत्यक्षपणे तिच्या सासूबाई तिला मूल होऊ नको देऊस असे सुचवतात. आता बघू पुढे काय होते ते.


" काय एवढे बघते आहेस?" सुयशने हळूच जवळ येत विचारले.

" ही खोली.. खोली कसली मोठं दालन आहे." कनिका थक्क होऊन बघतच राहिली. खोलीतला तो जुन्या पद्धतीचा अवाढव्य लाकडी पलंग. पाठीमागच्या भिंतीवर असलेला मोठा आरसा. आजूबाजूला असलेली नक्षीदार कलाकुसरीची कपाटे. तिथेच असलेले एक तैलचित्र.

" आधी कधीच तू या खोलीबद्दल काही बोलला नाहीस." कनिका तक्रारीच्या स्वरात बोलली.

" बोलायला लक्षात तर राहिले पाहिजे. तसाही या खोलीत मी जास्त कधी आलो नाही. आता ही आपलीच खोली असणार आहे. त्यामुळे नंतर तुला भरपूर वेळ मिळेल प्रश्न विचारायला. आता तरी या खोलीचा सोडून माझा विचार करणार का?" सुयशने कनिकाच्या हातातला दुधाचा पेला बाजूला ठेवत अधीर स्वरात विचारले. कनिका त्या स्पर्शाने मोहरली. त्याला प्रतिसाद देताना तिच्या हातातले ते गोळीचे पाकीट खाली पडले. त्याच्याकडे लक्ष न देता दोघेही एकमेकांच्या प्रेमात डुंबून गेले.

" कनिका.." छातीवर डोकं ठेवून तृप्तपणे झोपलेल्या कनिकाला सुयशने आवाज दिला. काहीच न बोलता तिने फक्त हुंकार दिला.

" ऐकते आहेस ना?" उत्तरादाखल तिने फक्त त्याच्या छातीवर ओठ ठेवले.

"तू राहशील वाड्यावर काही दिवस?" कनिकाने डोळे उघडून सुयशकडे बघितले. तो थोडा टेन्शन मध्ये दिसत होता.

" काय झाले अचानक?"

" अचानक असे नाही ग. पण वहिनीचे दिवस भरलेले, आईचे कोणी गडी ऐकत नाही. मला इथे सतत राहणं शक्य नाही. म्हणून तुला विचारले. तू इथे राहिलीस तर सगळे मॅनेज करू शकशील. मी दर शनिवार रविवार येत जाईन." हे ऐकून कनिकाला आनंद झाला की वाईट वाटले तिला समजेना. काहीतरी बोलायचे म्हणून तिने विचारले ,
" वहिनी माहेरी नाही जाणार बाळंतपणासाठी?"

" तुला बोललो होतो ना मागे, वहिनीला आईबाबा नाहीत. तिचे मामामामी लग्न लावून मोकळे झालेत. तिथे गेली तर तिची हेळसांड होईल. आई म्हणून तिला पाठवेल असं वाटत नाही."

" मी राहते इथे. पण तू नक्की दर शनिवार रविवार येणार ना?"

"तुझ्याशिवाय ते पाच दिवस मी कसे काढणार हे माझे मलाच माहीत. जग इकडचे तिकडे झाले तरी मी येणारच." सुयश तिच्या गालावरून बोट फिरवत सूचकपणे बोलला..

" तुझं आपलं काहीतरीच.." लाजत कनिकाने तिचे तोंड सुयशच्या कुशीत लपवले. सकाळी उठल्यावर तिला खाली पडलेले गोळ्यांचे पाकीट दिसले आणि काल मालतीताईंनी सांगितलेले आठवले. लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी वाद नकोत म्हणून तिने पटकन त्यातली एक गोळी काढून सिंकमध्ये फेकून दिली. कनिकाने स्वतःचे आवरले आणि खाली गेली. सुयश अजूनही झोपला होता. ती खाली जाताच मालतीताई कारण काढून तिच्या खोलीत आल्या. पाकिटातील एक नसलेली गोळी बघून त्यांच्या चेहर्‍यावर समाधानाचे हास्य पसरले. त्या तिथून पटकन निघाल्या.

सुयशच्या सुट्टीचे दिवस बघता बघता संपून गेले. तो जायला निघाला, तेव्हा मात्र कनिका रडवेली झाली होती. घरातली परिस्थिती बघून दोघांनीही हनिमूनचा प्लॅन ठरवला नव्हता. त्यामुळे नव्या नवलाईचे हेच काही दिवस होते दोघांसाठीही, एकमेकांसोबत घालवायचे. नंतर मधुराच्या बाळंतपणासाठी सुट्टी लागेल म्हणून सुयशने आता कमी दिवसच सुट्टी घेतली होती. हा छोटासाच सहवास दोघांनाही चुटपूट लावत होता.
सुयश जाताना रडवेली झालेली कनिका नंतर मात्र पटकन सावरली. तिच्या सहवासाने नैराश्य आलेली मधुरा पण थोडी सावरायला लागली. घरची घडी बसल्यावर तिने बाहेरची घडी नीट करायचे ठरवले. एक दिवस सकाळी घरातली कामे आटोपल्यावर कनिकाने मालतीताईंची परवानगी घेऊन शेतावर जायचे ठरवले. तिथे काम कसे चालते हे तिला बघायचे होते. तारा या मालतीताईंच्या खास बाईला सोबत घेऊन कनिका निघाली.
नवीन मालकीण येणार याची कुणकुण लागल्यामुळे सगळेच आपापली कामे व्यवस्थित करत होते. कनिकाने तिकडची थोडीफार माहिती करून घेतली. आपले शेत बघण्यासाठी म्हणून ती फेरफटका मारायला निघाली. तारा कनिकाला हवी असलेली माहिती देत होती. फिरता फिरता तिला एका ठिकाणी एक समाधी दिसली. आपल्या शेतात ही समाधी बघून तिला आश्चर्य वाटले.

" तारामावशी, ही इथे मध्येच कोणाची समाधी?"

" सूनबाई, तुम्हाला सुयश काही बोलला नाही का?"

" नाही. त्याला वेळ कुठे होता मला काही सांगायला? का हो, काही खास आहे का?"

" खास म्हणजे?" बोलता बोलता तारामावशींनी हात जोडले, गालावर मारून घेतले. ही तुमच्या घराण्याच्या आईची समाधी आहे. खरेतर लगीन झालेल्या नवीन सुनेनं इथं येवून वटी भरायची असते, त्यांना मान द्यायचा असतो. वहिनीबाय कशा इसरल्या माहीत नाही. त्यांना आठवण करून द्यायला पाहिजे."

" मावशी, ओटी भरायला नंतर येऊ. आता आलोच आहोत तर नमस्कार करूया?" कनिकाने मावशींना विचारले. मावशी हो म्हणाल्या. दोघी तिथे गेल्यावर कनिकाला वेगळेच वाटले. तिने तिकडचे हळदीकुंकू उचलून समाधीला वाहिले आणि त्याच हाताने स्वतःलाही लावले. ते बघून तारामावशीने आ वासला..


तारामावशीला धक्का बसण्यासारखे कनिकाने नक्की काय केले असेल? ती समाधी नक्की कोणाची आहे, त्याचा या शापाशी काही संबंध आहे का? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all