सेक्स एज्युकेशन- काळाची गरज

किशोरवयीन मुला-मुलींना लग्ना नंतर येणाऱ्या शरीर संबंधांविषयी काहीच माहिती नसते किंवा अपुरी माहिती असते. त्यामुळे अभ्यासक्रमातून किंवा योग्य डॉक्टरांच्या समुपदेशनातून भावी तरुण पिढीला लग्ना नंतर येणाऱ्या अशा अडचणीं चा सामना करावा लागणार नाही व त्यांचे आयुष्य सुखी होईल हेच या ब्लॉग मधून सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे.
सेक्स एज्युकेशन - काळाची गरज
      
      कालच मला मैथिली भेटायला आली. नेहमीप्रमाणे आमच्या गप्पा वगैरेे उरकल्या व नाश्ताही उरकला. नंतर अचानक ती गंभीर झाली व मला म्हणाली " ताई तू मला जवळची आहेस, तू मला नेहमीच वेळोवेळी योग्य सल्ले दिले आहे त आणि त्यामुळे मला तुझ्या सोबत एका गंभीर विषयावर चर्चा करायची आहे." मी म्हणाले , " विचार की त्यात काय एवढेेे , तुला जे प्रश्न, शंका असतील त्या मनमोकळेपणाने विचार!" ती म्हणाली ," ताई तुला माहित आहेच की माझे लग्न ठरले आहे .पण लग्नानंतर  आमच्या दोघांमध्ये येणाऱ्या शरीर संबंधांविषयी मला खरंतर बायोलॉजीची  विद्यार्थिनी असल्याने माहिती आहे पण तरीही मनात एक विशिष्ट अशी भीती आहे."
        तशी मैथिली म्हणजे एकदम हुशार चुणचुणीत मुलगी. तिचे शिक्षण पूर्ण झाले  व आई-वडिलांनी तिच्या लग्नासाठी स्थळे पाहण्यास सुरुवात केली. मोहनचे स्थळ जेव्हा तिच्यासाठी चालून आले तेव्हा तर घरच्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. कारण तोही उच्चशिक्षित सुसंस्कृत व चांगला समजूतदार मुलगा . त्याच्याही घरी त्याचे आई-वडील एकदम सुशिक्षित व चांगले. त्यामुळे आपसूकच मैथिलीच्या आई-वडिलांनी व मैथिलीने या स्थळाला संमती दर्शवली. मात्र मैथिली लग्नानंतर येणाऱ्या या समस्यांना मात्र घाबरली होती. मीही मग तिला समजावत म्हटले की ,"अग मैथिली, मला माहित आहे की प्रत्येक मुलीला यासंदर्भात सुरुवातीला प्रचंड भीती वाटते. काही मुली आपल्या आईला, काही मैत्रिणींना यासंदर्भात विचारतात पण प्रत्येकाकडून मोकळेपणाने व सुस्पष्ट अशी माहिती मिळतेच असे नाही! अशा वेळी मी तुला केवळ एकच सुचवेन की प्रख्यात डॉक्टरांचे समुपदेशन तुला यात नक्कीच उपयोगी पडेल! त्यामुळे लग्नाआधी तुम्ही दोघांनीही अशा एखाद्या डॉक्टरांकडे जाऊन मनमोकळेपणाने मनातल्या शंका विचारा व त्यामुळे डॉक्टर तुम्हाला योग्य समुपदेशन करून तुमच्या मनातली भीती घालवतील."
         मैथिलीला माझे मत पटले, ती म्हणाली" हो तू म्हणतेस तसेच मी करते. उद्याच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन मी आणि मोहन डॉक्टरांकडे जाऊन सगळ्या शंकांना मोकळी वाट करून देऊ.ताई खरच तू मला मोलाचा सल्ला दिलास व माझ्या मनातली भीती घालवली.  थँक्यू!" "अगं वेडे थँक्यू काय त्यात! एकीकडे मला ताई म्हणतेस व एकीकडे  आभार मानतेस ?  " मी म्हणाले. त्यावर मैथिली म्हणाली," तसं नाही ताई, मला खरं तर याविषयी प्रचंड भीती होती व मी  या गोष्टीचा उगाचच खूप विचार करत होते. माझे कसे होईल ,काय होईल, फॅमिली प्लॅनिंग काय असते अशा नाना प्रकारच्या शंका मनात डोकावत होत्या, पण तुझ्याशी बोलून माझे मन हलके झाले." 
     त्यावर मी म्हणाले  "बर बाई ,तुझं मन झालं ना मोकळं . मग झालं तर. उद्या डॉक्टर तुला योग्यप्रकारे सारं काही व्यवस्थित समजावून सांगतील." " हो ताई, सुशांतला (मैथिलीचा भाऊ)क्लास वरून आणायला जायचे आहे.उद्या डॉक्टरांकडे जाऊन आल्यावर फोन करेल." असे मैथिली म्हणाली  "हो नक्की कर व आनंदी राहा. तुझे आता एक नवीन आयुष्य सुरू होणार आहे. तेव्हा आनंदी व समाधानी राहा !" "नक्कीच ताई !' असे म्हणून मैथिली आनंदात गेली.
     माझ्या मनात मात्र विचारमंथन सुरू झाले.हल्लीच्या सुशिक्षित मुली सुद्धा या बाबत इतक्या अनभिज्ञ कशा? तसा त्यात त्यांचाही काही दोष नाही ,कारण एखादं कुटुंब अडाणी असो किंवा सुशिक्षित दोन्ही ठिकाणी या विषयाची चर्चा करणे म्हणजे गौनच! आणि जरी विषय निघाला तरी टाळाटाळ करणे अटळच! मग अशा किशोरवयीन मुला-मुलींना, याबाबतची सुस्पष्ट व व्यवस्थित माहिती मिळणार तरी कशी ?मला वाटतं ,सेक्स एज्युकेशन हे सर्व पदवी अभ्यासक्रमांमध्ये अंतर्भूत केले तर काही प्रमाणात या तरुण मुलामुलींची मैथिली प्रमाणे होणारी घुसमट तरी नक्कीच थांबेल .शिक्षणमंत्र्यांनी ताबडतोब याविषयी सर्व स्तरांवर जागृकता निर्माण केली तर नक्कीच फायदा होईल. तसेच राज्यातील आरोग्य मंत्र्यांनी ही पुढाकार घेऊन निशुल्क दरात प्रत्येक हॉस्पिटल्समध्ये जर या विषयावर सुस्पष्ट माहिती देण्यासाठी  योग्य डॉक्टरांचे पथक नेमले तर या विषयाची भीती नाहीशी होईल व अनेक तरुण-तरुणींची लग्नानंतर येणाऱ्या अशा अडचणींपासून कायमची मुक्तता होईल , यात शंका नाही.