सेतूबंधन मन शुद्ध तुझं

Eka anokhya vaytkitchi auysh rekha man shuddh tuze

'पृथ्वीगोलात भेटलेला संतोष'.. . 
  आज मन सुन्न आहे. लेखणी पण नेहमीप्रमाणे सुसाट धावत नाही. का कोणास ठाऊक चार शब्दांपुढे वाक्यापर्यंत मजल जात नाही. का कोणास ठाउक लिखाण आज माझ्याकडून होतं नाही.

हो मी ऊज्वला राहणे. सेतूबंधन करत आहे संतोष उदमले यांच्या सोबत.

 थोडीशी प्रस्तावना आमची "टीम पाच" महेश गायकवाड सरांची. आम्ही म्हणजे मी ऊज्वला, संतोष, महेश, राखी, अश्विनी, नेहा, प्रणाली, भाग्यश्री, शगुफ्ता आणि सीमा या टीमचे सहप्रवासी. 

  अगदी हसत खेळत रोज प्रवास करतो अगदी एकमेकांची खेचतो देखील बरका ! आमच्या टीमचे वैशिष्ट्य म्हणजे कोणीही कोणावर रागवत नाही किंवा टोमणे, ताशेरे ओढत नाही हसत खेळत प्रवास करत म्हणूनचं हा स्पर्धेतील साहित्यिक प्रवास आम्ही हसत खेळत  करत आहोत हे निश्चित.

एकमेकांच्या सहकार्याने आम्ही आत्तापर्यंतचे सगळे टास्क पूर्ण पण केले आहेत .

आज फार वेगळा टास्क समोर आहे सेतूबंधन. फार कठीण टास्क आहे माझ्या समोर. एका आगळ्या व्यक्तीचं व्यक्तीमत्व मला माझ्या लेखणीतून दाखवायचे आहे.

  कदाचित कुठे कुठे माझी लेखणी थबकेल हे मला सांगता येणार नाही. पण मी प्रयत्न करेन हे निश्चित. संतोष उदमले या असामान्य व्यक्तीबद्दल लिहण्याचा माझा प्रयत्न . 

 मी खुपदा वाचायचे, ऐकायचे समलिंगी व्यक्तींबद्दल पण लिहायचे धाडस मात्र माझ्यात नव्हते. प्रत्यक्षात अश्या व्यक्तीबद्दल मला लिहायला लागेल असं कदापिही वाटलं देखील नाही.

  खरं सांगू काही काही व्यक्ती जन्माला घालताना देवाचे त्या मागे काही काही संकेत असतात हे नक्कीच. 

 कदाचित देवाची ती मर्जीच असते. कर्ता करविता तो असतो आपण फक्त त्या खेळातले प्यादे. तद्वतच संतोष उदमले.

 मी संतोषच म्हणेन त्याला. खुप लहान आहे तो माझ्यापेक्षा पण परिस्थितीने त्याला खुप प्रौढ बनवले.

त्याचे आत्मचरित्र जेव्हा मी वाचले तेव्हा मी अवाक् झाले. कधी कधी आपल्यातला कमकुवतपणा लोकं लपवतात पण संतोषने धाडसाने आपले आत्मचरित्र लिहिले आहे. नक्की त्याचा प्रवास अंगावर शहारे उभा करण्याजोगा. 

आयुष्य जगताना बऱ्याच नागमोडी वाटा त्याच्या आयुष्यात आल्या पण एक सांगू ? जी वाट कुठेच पोहचत नाही त्या वाटेने प्रवास करणे शेवटी वेळ वाया घालवणे असते हे त्याच्या बालिश मनाला पटले नसावे किंवा कदाचित त्याला योग्य मार्गदर्शन मिळाले नसावे असे एकंदरीत मला वाटते. 

मनाला सुन्न करणाऱ्या घटना संतोषच्या आयुष्यात घडल्या कारण तो गे आहे म्हणजेच समलिंगी. ज्याला आपला समाज कधीच मान्यता देणार नाही. 

 त्यामुळे त्याला समाजाकडून नेहमीच तिरस्कारच  सोसावा लागला.

शाळेमध्ये असताना अगदी नववी, दहावीत, एक सुधारित गॅगरींग  त्याच्यावर झाले. गे, छक्का, बायल्या अश्या कैक उपाध्या त्याच्या प्रतिमेला चिकटल्या. काय परिणाम झाला असेल या बालमनावर कल्पनाच करू शकत नाही. ज्याच्यामुळेचं त्याला शिक्षण देखील अर्थवट सोडावे लागले. 

  हुशार होते लेकरू पण समाज त्याला आपल्यातले मानत नव्हता. शेवटी काय तर समलिंगी असल्याने त्याच्या वाटेला कुचंबणाचं  जास्त आली. 
 
 समाजाची अवहेलना सहन करण्यापेक्षा त्यानं मग आपल्या जगण्याची दिशाच बदलली. चांगली चांगली पुस्तके वाचण्याचा छंद मनाला जडवून घेतला आणि पुस्तकांनाच मित्र बनवून जास्तीत जास्त वाचनात आपला काळ व्यतीत करू लागला. 

जगण्याला मग दिशा मिळाली. मग त्याला वाचनाबरोबर लिखाणाचा पण छंद लागला.
 
 सोशल मीडियाच्या संपर्कात आल्यामुळे त्याच्यातील लेखक जागा झाला. 

पण एक गे, समलिंगी म्हणून त्याला सगळ्यांनीच वाळीत टाकले. अगदी रक्ताच्या नात्यानं पण आपल्या नावाला कलंक नको म्हणून त्याला दूर लोटले. शेवटी किती ते दुर्दैव नशीबाला.

  एक तर माणूस एक वेळ अन्नपाण्यावाचून राहू शकेल पण आपल्या माणसांपासून वेगळे राहणे फार मुश्किल असते. 

लिखाणाची आवड होती सवड भरपूर होती. पण स्पर्धेच्या युगात टिकवून राहण्याची ताकद संतोष मध्ये नव्हती. सतत त्याला परिस्थिती मागे खेचत होती. 

 पण आतला आवाज त्याला शांत बसू देत नव्हता. पण समाज मात्र त्याच्याशी अंतर ठेवून वागत होता. 

खुप सहन केले आहे संतोषने त्यांचे आत्मचरित्र वाचले की मन हेलावून जाते. 

  समाज किती पुढारलेल्या विचारांच्या गोष्टी करत असला तरीही, अजूनही कोणाचे गे, समलिंगी असणे किंवा समलैंगिक संबंध अजून स्विकारायला मनाची तयारी हा समाज दाखवत नाही.

 यासाठी समाजात समलिंगी व्यक्तीला मानाचे स्थान मिळावे म्हणून संतोषने खुप लिखाण केले आहे. तसे प्रयत्नही केले. समाजात काय चालले आहे याची सुवाच्यता त्याच्या लिखाणात पदोपदी दिसून येते. 
  
  खुप परखड लिखाण आहे त्याचे नक्की त्याच्या पेजला भेट देऊन वाचायची इच्छा होते. 

 पण शेवटी माझी लेखणी संतोषला एकच सांगेल. 
' बाळा सगळे समाज सहन  करत नाही आणि ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाला धरून आपल्याला चालावेच  लागते.' 

  कारण संतोष, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो  म्हणून काही गोष्टी मनासाठी नाहीतर जणासाठी करायच्या असतात बाळा ! 

मला काय म्हणायचे आहे हे समजून घे. मार्ग बदल नवी दिशा तुलाच शोधत आहे." बघ प्रयत्न करून नक्कीच तुझ्यासारख्या धाडसी तरूणाला काहीही अशक्य नाही फक्त थोडा वेळ लागेल. 
 
 फक्त तुझ्यातला तू शोधण्याची गरज आहे. करशील एवढे तुझ्या ताईसाठी?..

 फक्त वाट बदल मार्ग सापडेल. नवी आशा नवी दिशा
 तुझ्या भरकटलेल्या मनाला खुणावत आहे. जा शोध घे. 
तुझ्यासाठी तुझ्या ताईकडून तुझ्या  रक्षणासाठी हीच राखी आणि रक्षाबंधनाची अमुल्य भेट! अरे शेवटी काय ना ?
    
 " मन शुद्ध तुझं ही गोष्ट आहे पृथ्वीमोलाची तू चाल पुढे तुला रं गड्या भीती कशाची, पर्वा रं कुणाची ,ही गोष्ट आहे पृथ्वी मोलाची."

  तुझ्या नवजीवनाला मनपूर्वक शुभेच्छा आणि आशीर्वाद.????????

  तळटीप :_संतोष मनापासून व्यक्त झाले आहे रागावू नकोस.

 ©️®️सौ ऊज्वला रवींद्र राहणे