आत्मसन्मान ( भाग 4 )

About Self-respect


आत्मसन्मान ( भाग 4 )

आपल्या एका चुकीच्या निर्णयाची शिक्षा आपल्या मुलाला का ? आपण आपल्या जीवाचे काही बरेवाईट केले तर, आपल्या मुलाला आईचे प्रेम कोण देणार ? आणि माहेरी गेलो तर , एकतर तो माझ्या कडे राहील किंवा वडिलांकडे. म्हणजे कोणा एकाचे तरी त्याला प्रेम मिळणार नाही. माझ्यावर जरी प्रेम करत नसले तरी, त्याच्यावर तर सर्वच प्रेम करतात. आणि त्यालाही या सर्वांचा लळा आहेच.
मला या सर्वांच्या वागणुकीचा का त्रास होतो आहे ? कारण मी आजपर्यंत सर्व सहन करत आले म्हणून. माझ्यापेक्षा इतरांच्या सुखाचा जास्त विचार करत गेली. एवढे चांगले वागूनही जर दुःखचं वाट्याला येत असतील तर ...प्रत्येकाशी आपण त्याच्याच पद्धतीने वागायला हवे. हर्षाने असे विचार मनात येताच काही तरी करून दाखवायचेचं असे ठरविले.

हर्षाने त्यानंतर आपल्या वागण्यात,बोलण्यात खूप बदल केला.
तिनेही स्वतः बाहेर पडून पार्ट टाइम जॉब शोधला. घरातील फक्त तिच्या वाटणीचीच कामे करू लागली.कोणी प्रेमाने बोलले तर प्रेमाने बोलू लागली आणि चुका नसताना जर कोणी तिला कोणी बोलू लागले तर आपल्या दुसऱ्या स्वभावाचेही दर्शन देवू लागली.नोकरी,मुलाची काळजी याबरोबरच ती आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये बिझी ठेवू लागली. तिचे जे छंद होते ,जे ती लग्न झाल्यापासून विसरली होती. त्यांना जोपासू लागली. चित्र काढणे, रांगोळी काढणे, वाचन, थोडेसे लेखन यात तिला आनंद मिळू लागला. तिला सामाजिक कार्याचीही आवड होती,त्यामुळे ती सामाजिक उपक्रमात भाग घेऊ लागली. तिच्या स्वभावाने, गुणांनी तिला तिच्या कार्यात यश मिळू लागले. लोक तिच्या गुणांचे , कार्याचे कौतुक करू लागले तेव्हा तिला खूप आनंद होऊ लागला. घरात आपल्याला मिळणारी अपमानास्पद वागणूक आणि बाहेरील लोकांकडून मिळणारे प्रेम पाहून सुख व दुःख अशा संमिश्र भावनांमुळे तिला रडू यायचे.
तिला कळून चुकले होते की, अन्याय सहन करणारा जोपर्यंत प्रतिकार करत नाही तोपर्यंत अन्याय होतचं राहणार. अन्याय सहन करत आपले आयुष्य वाया घालविण्यापेक्षा अन्यायाचा प्रतिकार करून प्रत्येकाने आपल्या आत्मसन्मानासाठी लढलेच पाहिजे.पुरूष वर्गाकडून तर स्त्रियांवर अत्याचार होतच असतो. पण स्त्रीचं जेव्हा मगं ती सासू असो, नणंद असो ,जाऊ असो की अजून कोणी,जी दुसऱ्या स्रीवर अन्याय करत असेल तर ती स्वतः तिच्यातील स्त्रीत्वाचाही अपमान करत असते. प्रत्येकाला आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार असतो. जसा पुरूषाला असतो तसाच स्त्रीलाही आत्मसन्मान असतो. जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या आत्मसन्मानाचा आदर करणार नाही तेव्हा पुरूषांकडून तरी काय अपेक्षा ठेवणार?
हर्षाच्या या वागण्याने घरातील सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. त्यामुळे ते ही आता तिच्याशी प्रेमाने,आदराने वागण्याचा प्रयत्न करत होते.पण हर्षाला या दुहेरी चेहऱ्याच्या लोकांवर विश्वास ठेवावा असे वाटत नव्हते. त्या सर्वांनी तिला जी वागणूक दिली होती , त्यामुळे तिच्या मनात त्या सर्वांबद्दल आपुलकीची भावनाच उरली नव्हती.. फक्त माणुसकीच्या नात्याने व आपल्या मुलावरील प्रेमासाठी, त्याच्या चांगल्या भविष्यासाठी त्यांच्याशी ती कामापुरते वागत होती.ती आपल्या घरा बाहेरच्या विश्वात आत्मविश्वासाने,
आत्मसन्मानाने जगत होती. व इतर स्त्रियानांही सन्मानाने जगण्यास शिकवित होती.

तिचे म्हणणे होते,

\"स्त्री, तुला जगी मिळेल तेव्हाच मान
जेव्हा तू राखशील स्वतःचा आत्मसन्मान.\"

🎭 Series Post

View all