आत्मसन्मान ( भाग 3 )

About Self-respect


आत्मसन्मान ( भाग 3 )

सुरूवातीला सगळी छान वाटणारी, भासणारी लोकं हर्षाला वेगळीचं जाणवायला लागली. प्रत्येकाचे दुसरे आणि खरे रूप कळायला लागले होते.
जाऊबाई तर तिच्या ओळखीतील, माहेरच्या नात्यातील होत्या. त्यांच्या वर विश्वास ठेवूनच लग्न झाले होते.त्यांच्या दृष्टीने सासर खरचं चांगले होते कारण आईप्रमाणे वागणारी सासू,जीव लावणारा नवरा आणि आपल्या प्रत्येक शब्दाचा मान ठेवणारा दीर ...सर्व काही त्यांच्या मनासारखेचं तर होते.
पण हर्षाच्या वाटेला तर यातले काहीचं नव्हते. एका सूनेला मुलीप्रमाणे जीव लावणारी सासू, हर्षाशी कडवडपणे वागत होती.
जाऊबाईही आपल्या साध्या,सरळ स्वभावाचा वापर करून घेतात. स्वतः सर्वांशी छान, गोड बोलून आपला स्वार्थ साधून घेतात. त्यांच्या गोड बोलण्यामागील त्यांचा खरा हेतू हर्षाच्या लक्षात येत होता. आणि त्यांना त्यांच्या नवऱ्याचीही साथ होती. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. दोघेही एकमेकाला विचारून निर्णय घेत होते. एकमेकांना सुखदुःखाच्या गोष्टी सांगायचे. हर्षाला हे सर्व दिसत होते आणि मनात वाईटही वाटत होते कारण याउलट तिचा नवरा होता. तो कोणतीही गोष्ट तिला कधी सांगत नव्हता. सर्व काही बहीण,भावाला विचारून करत होता. हर्षा शिकलेली होती,त्यामुळे तिलाही अनेक गोष्टींचे ज्ञान होते. पण नवऱ्याने कधी तिला काही विचारून किंवा कोणत्या गोष्टीत तिची मदत घेऊन तिच्या ज्ञानाचा, विचारांचा उपयोग करण्याची संधी दिली नाही.
त्याच्या दृष्टीने हर्षा म्हणजे फक्त घरकामाला आणलेली मोलकरीण व त्याच्या साठी उपभोगण्याची वस्तू!
हर्षाच्या मते, नवराबायकोचे नाते म्हणजे मैत्रीचे नाते! एकमेकांची सुखदुःख वाटून घेणारे, आणि तू फक्त माझा व मी फक्त तुझी अशी भावना असणारे एक हक्काचं ठिकाण!

आई- वडील, भाऊ- बहीण किंवा इतर नाते , या सर्वांवर प्रेम असावे. त्यांची सेवा करणे,त्यांना मदत करणे हे कर्तव्यच असते. पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. मर्यादेपेक्षा एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम करत असताना ,त्याच वेळी दुसऱ्या व्यक्तीवर तिच्या हक्काचे प्रेमही देवू नये. म्हणजेच त्या व्यक्तीवर केला जाणारा हा अन्यायचं ना !

हर्षाच्या बाबतीतही हेच होत होते. तिचा नवरा आईवडील,भाऊबहीण,
वहिनी ,पुतणे,भाचे या सर्वांवर खूप म्हणजे वाजवीपेक्षा जास्त प्रेम करत होता.आणि हर्षाला तिच्या हक्काचे प्रेमही देत नव्हता.
त्याला जर आपल्याबद्दल प्रेमाची भावनाच नव्हती तर लग्न तरी का केले ? हा प्रश्न हर्षाला नेहमी सतावत होता.

आईवडिलांना त्रास होऊ नये म्हणून तिने हे सर्व सहन केले.
पण जेव्हा जास्त त्रास व्हायला लागला. तिच्या साध्या,सरळ स्वभावाचा ते सर्व जास्त गैरफायदा घेऊ लागले.
ती कितीही चांगली वागली ,तिचे काही ही चुकत नसले तरी जाऊबाई तिला सर्वांसमोर मुद्दाम चुकीचे ठरवू लागल्या. सासूबाईंचे घरात केले जाणारे राजकारण,खेळले जाणारे डावपेच , नणंदबाईंचा आईला सपोर्ट, आणि मुख्य म्हणजे हे सर्व पाहूनही आपल्या बायकोची बाजू न घेता आपल्या घरातल्या व्यक्तिंवरचा आंधळा विश्वास. हे सर्व तिला असह्य होऊ लागले . तेव्हा तिला आपल्या हक्कासाठी बोलावेच लागले.... भांडावेच लागले. पण याचा परिणाम तिच्या दृष्टीने चांगला न होता उलट वाईटच झाला. त्या सर्वांच्या दृष्टीने ती वाईट ठरली.व ते सर्व एकत्र होऊन तिलाच बोलू लागले. इतरांच्या बोलण्याचा तिला एवढा राग आला नाही जेवढा तिच्या नवऱ्याचा आला. आपला नवरा आपली बाजू न घेता आणि तीही खरी असताना, आपल्या विरोधात बोलतो आहे. हे पाहून ती खचून गेली. ज्या व्यक्तीची पत्नी म्हणून या घरात आली होती,तोच आपला नाही तर बाकीच्या नात्यांकडून तरी काय अपेक्षा ठेवणार ? या विचाराने आपण कायमचे माहेरी जावे किंवा स्वतः चे काही तरी बरेवाईट करून घ्यावे असे तिला वाटू लागले.

🎭 Series Post

View all