आत्मसन्मान ( भाग 2 )

About Self-respect


आत्मसन्मान ( भाग 2 )


\"आईवडिलांनी दिली मला संस्कारांची शिदोरी
संदीपपंतांचे नाव घेऊन आले मी सासरी\"

असा छानसा उखाणा घेत हर्षाने सासरी गृहप्रवेश केला.
घरी नव्या जोडप्याचे छान स्वागत झाले. हर्षाला आईवडिलांच्या,माहेरच्या आठवणीने रडू येत होते.पण घरातले आनंदी वातावरण पाहून ती आपले दुःखी मन आनंदी करण्याचा प्रयत्न करू लागली.
लग्नानंतरचे सर्व विधी,कार्यक्रम 2,3 दिवसांत छान पार पडले.
या 2,3 दिवसांत हर्षाला माहेरची आठवण येत होती पण घरातील व्यक्तिच्या सहवासाने तिला बरेही वाटत होते.सर्वजण एकमेकांशी, तिच्याशी छान बोलत होते,वागत होते. छान गप्पागोष्टी करत मजा करत होते.हे सर्व पाहून तिलाही आनंद होत होता. सासूबाई जाऊबाईंशी खूप छान बोलत होत्या,वागत होत्या.सासू- सूनेपेक्षा त्या जणू मायलेकचं जास्त वाटत होत्या. नणंदबाईही भावाच्या लग्नामुळे खुप खूष होत्या. भावाच्या लग्नात त्यांनी भरपूर हौसमौज केली होती. त्यांच्या वागण्याबोलण्यातून त्या खुप हौशी आहेत. असे हर्षाला जाणवत होते.जाऊबाईंचे सर्वांशी गोड बोलणे,सर्वांना छान सांभाळून घेणे हे सर्व हर्षा आपल्या नजरेने टिपत होती.त्यामुळे जाऊबाईंबद्दल असलेला आदर अजून वाढत होता.
संदीपही आईवडिलांची खूप काळजी घेत होता. बहीणीशी,भावाशी छान मित्राप्रमाणेच बोलतो. त्यांच्या बरोबर अनेक विषयांवर सल्ला मसलत करतो. वहिनीशी आदराने ,प्रेमाने वागतो. भावाच्या, बहीणीच्या मुलांचे खूप लाड करतो.हे सर्व पाहून हर्षाला खूप छान वाटत होते.संदीपबद्दल आदर व प्रेम वाटायला लागले होते. ज्या प्रेमाने तिला संदीपला पाहताच हवा तसा कौल दिला नव्हता त्या मनात संदीपचे स्थान निर्माण होत होते.
घरातील असे छान खेळीमेळीचे वातावरण व सुखी सासर या सर्व गोष्टींचा आनंद घेऊन हर्षा लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी आली होती. आपल्या मुलीचा आनंदी चेहरा पाहूनच,आईवडिलांना खूप बरे वाटले. समाधान वाटले. आणि आपली हर्षा नेहमी अशीच आनंदी रहावी. यासाठी देवाला प्रार्थना केली.हर्षाने माहेरी आपल्या सासरच्या लोकांचे कौतुक केले,गुणगान केले. ते ऐकून आईवडिलांना ही आपल्याला हर्षाची काही काळजी नाही .याची खात्री झाली. माहेरपणाचे सुख,आनंद घेऊन हर्षा सासरी गेली.
सासर कितीही चांगले असले तरी माहेराची सर येत नाही.. त्यामुळे हर्षाने सासरचे कितीही कौतुक केले होते तरी माहेराहून सासरी जाताना ती खूप रडली होती.

🎭 Series Post

View all