Feb 26, 2024
नारीवादी

सीड मदर: संघर्ष तिचा भाग ४२ ( अंतिम भाग)

Read Later
सीड मदर: संघर्ष तिचा भाग ४२ ( अंतिम भाग)


सीडमदर : तिचा संघर्ष

टीप : खरं तर एरवी कथेच्या खाली टीप द्यायची पद्धत असते. पण लेखिका म्हणून मला जे मांडायचं आहे, ते मला आधीच सांगायची उर्मी स्वस्थ बसू देत नाहीये. ही कथा आहे एका जिद्दी स्त्रीच्या संघर्षाची. एक असा संघर्ष जो तिला थेट पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करून गेला. ही कथा सत्य घटना, गोष्टी ह्यांवर आधारित असली, तरी काही ठिकाणी लेखन स्वातंत्र्य आणि कल्पनाशक्ती ह्यांचा संगम घडविणे मला आवश्यक वाटले. त्यामुळेच काही नावे, काही प्रसंग आणि काही स्थळे काल्पनिक असली, तरी जिची ही कथा आहे, ती स्त्री मात्र सत्यात आहे. १९६४ साली जन्माला आलेल्या ह्या स्त्रीची कहाणी आपण जाणून घ्यायला हवीच.

कथा : भाग ४२

दुसऱ्या दिवशी परत तिला न्यायला सरकारी माणसं आली. त्याचं कारण होतं, तिचं संसदेतलं भाषण. तिला संसदेत लोकप्रतिनिधींसमोर भाषण करायची संधी दिली होती. पण सोमाला मात्र आमंत्रण नव्हते. त्याचं कारण सुरक्षा व्यवस्था! तिला मात्र आमंत्रण असल्याने मुलाला आणि नवऱ्याला ठेवूनच जावे लागले.

भारताच्या इतिहासात प्रथमच एक गावरान स्त्री संसदेत भाषण करणार होती. मीडियाचे कॅमेरे तयारच होते.

ती आली, तिनं पाहिलं, तिनं जिंकलं. ह्या तिच्या लाडक्या विषयावर तिनं त्या दिवशी भाषण केलं. सगळ्यांना प्रथेप्रमाणे तिनं प्रथम नमस्कार केला. तिची ओळख सांगितली. तिचं बालपण, तिची प्रेरणा असलेली तिची दुर्गामावशी, सगळं सगळं. सोमाच्या साथीबद्दल, गावातल्या लोकांबद्दल, तिच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक लोकांनी सुरू केलेल्या बीज बँकेबद्दल, ती अगदी भरभरून बोलली.

ह्याचबरोबर तिच्या भाषणात तिचा मुख्य मुद्दा होता की, बीज बँक सुरू करण्यात येणाऱ्या अडचणी, सरकारी उदासीनता, सरकारी दुर्लक्ष, तिच्या स्वतःच्या सरकारने बांधून दिलेल्या बँकेच्या इमारतीच्या पहिल्याच पावसात झालेल्या गळतीबद्दल सगळं सगळं ती बोलली.

तिच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा तिने सांगितल्या. त्याचबरोबर सरकारी बीज बँक असाव्यात हा ही विचार तिने मांडला. अखेरीस तिने सरकारचे आभार मानले. टाळ्यांच्या कडकडाटात ती खाली बसली. त्यानंतर अजून काही भाषणे झाली. आणि तिला सरकारी लोकांनी परत आणून सोडलं.

तिच्या ह्या पुरस्कारची, तिच्या त्या भाषणाची दखल अर्थातच मीडियाने घेतली. त्या दिवशी तर पुरस्कार वितरण सोहळा दूरदर्शनवर आणि इतर चॅनल्सवर प्रक्षेपित केला गेला होता.

ती जशी गावात परत आली, तसा एक सुखद धक्का तिला बसला. गावाच्या वेशीवर त्या तिघांना अडवलं गेलं. सजवलेल्या ट्रॅक्टरमधून तिघांची मिरवणूक काढण्यात आली. पुढे हलगी वाजत होती. ढोल, लेजीमची पथकं नाचत होती. गावातले वीर हलगीच्या तालावर काठ्या लाठ्या खेळत होते. गुलालाची नुसती उधळण चालली होती. त्यांच्यावर कोणी फुलं देखील उधळत होते. माणसं खुश होऊन नाचत होती. मोठा जमाव जमला होता. डोक्यावर असलेल्या उन्हाची तमा कोणालाच नव्हती. सारं गाव तिचं यश मनसोक्त साजरं करत होतं. मिरवणुकीत एका उत्साही गावकऱ्याने स्वतःचा घोडा नाचवायला आणला होता. गावातली पोरं त्याच्या भोवती नाचत होती. पोलीस पाटील सुद्धा कोणालाच आज अडवत नव्हते. गावाचं नाव उज्जवल करणाऱ्या ह्या महान स्त्रीची ही मिरवणूक म्हणजे स्त्रीत्व पोटातच नाकारत असणाऱ्या माणसांच्या वृत्तीला चांगलंच सडेतोड उत्तर होतं. एक स्त्री मनात आणलं तर काय करू शकते, ह्याचं राहीबाई हे जिवंत उदाहरण होतं. एका हरकाम्या नोकराच्या घरात जन्माला येऊन सुद्धा अत्यंत महान कार्य करणारी ही बीज माता मात्र आनंदाने रडत होती. सगळ्या मानापमानाची उजळणी तिच्या डोक्यात होत होती.

मिरवणूक ग्रामदेवतेच्या देवळाच्या चौकात आली, आणि एकच जल्लोष झाला. हलगी अधिक जोरात वाजू लागली. मुलं लेजीम खेळताना भान हरपून अधिक चेव येऊन खेळायला लागली. ढोल जोरात वाजायला लागले. सगळी माणसं, सगळा रस्ता गुलालाने भरून गेला. थोडा वेळ देवीसमोर हा खेळ झाल्यावर मग शांतता झाली. राहीबाई, सोमा आणि त्यांचा मुलगा खाली उतरले. त्यांनी देवीचं दर्शन घेऊन मग तिची ओटी भरली. नारीशक्तीचं सगुण रूप असलेली काळ्याभोर कातळात कोरली गेलेली देवीची शांत, तेजस्वी मूर्ती जणू तिचा अंश म्हणून समोर असलेल्या हाडामासाच्या स्त्रीला आशिर्वाद देत होती.

नंतर देवळाच्या बाहेरून परत मिरवणूक निघाली ती थेट गावच्या शाळेच्या मैदानावर.

तिथे मोठा मांडव घातला होता. तिथे आल्यावर तिचा मोठा सत्कार करण्यात आला. तिने सगळ्यांना वाकून नमस्कार केला. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट तिला आशिर्वाद देत होता. मग तिने एक छोटेखानी भाषण केले. अखेर तो कार्यक्रम संपला. पण सरपंचांनी त्या तिघांना तिथूनच स्वतःच्या घरी नेले. आणि तिची ओटी भरून त्यांना आग्रहाने जेवू घातलं.

अखेर रात्री तिघं घरी आले, ते खूप दमूनच. दुसऱ्या दिवशी सकाळपासुन त्यांच्या घराच्या बाहेर पत्रकार आणि मीडिया वाले जमले होते. कसंबसं तिघांनी खाऊन घेतलं आणि तिच्या अनेक जणांनी मुलाखती घेतल्या.

तसंच अनेक यू ट्यूबर देखील ह्यात होते. अनेकांनी आपल्या चॅनलवर तिच्या मुलाखती पोस्ट केल्या.

आता तिला उसंत नव्हती. पुढचे जवळजवळ पंधरा दिवस ही गडबड चालली होती.

सतत मुलाखती देऊन तिघं थकून गेले होते. पण त्यांना छान वाटत होतं. राहीबाई आता परत नव्या उत्साहाने कामाला लागली होती.

अनेक लोक येऊन तिचं मार्गदर्शन घेऊन जात होते. ती अनेक ठिकाणी जाऊन लोकांना बीज बँक, देशी बियाणं ह्यांची माहिती देत होती. अनेक चॅनल्सवर तिच्या माहितीचे कार्यक्रम प्रसारित होत होते.

काही दिवसात सरकारने तिच्या बीज बँकेला अनुदान देत असल्याची घोषणा केली आणि परत नव्याने बीज बँक बांधून देण्याची घोषणा सुद्धा.

अर्थात ती घोषणा अजून तरी कागदावरच आहे, पण तिने कसलीच अपेक्षा न करता कार्य पुढे चालू ठेवले आहे.

तिला अनेक हातांनी दृश्यादृश्यपणे मदत केली आहे. त्यांचेही ती आभार मानायला विसरत नाही. तिचे कार्य अनेक वर्षे असेच चालू राहो, हीच प्रार्थना करून अनेक शेतकरी आता देशी बियाणांकडे वळू लागले आहेत. हेच तिचं मोठं यश आहे, आणि हाच तिच्या स्त्रीत्वाचा, तिच्यातल्या नारीशक्तीचा समाजाच्या बुरसटलेल्या विचारांवर ओढलेला आसूड सुद्धा!

उपसंहार : ह्या अत्यंत वेगळ्या विषयावर कथा लिहिताना मला फार छान वाटत होते. काही अपरिहार्य बदल करावे लागले. परंतु आपण कोणीही ह्या स्त्रीला जाऊन भेटू शकतो. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे ह्या गावात ती रहाते. तिच्या ह्या कष्टाला आणि जिद्दीला मनापासून नमस्कार! आणि वाचकांचे आभार देखील.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//