Login

सीड मदर : संघर्ष तिचा भाग ४०

A Woman Is Honoured With Padmashree Award


सीडमदर : तिचा संघर्ष

टीप : खरं तर एरवी कथेच्या खाली टीप द्यायची पद्धत असते. पण लेखिका म्हणून मला जे मांडायचं आहे, ते मला आधीच सांगायची उर्मी स्वस्थ बसू देत नाहीये. ही कथा आहे एका जिद्दी स्त्रीच्या संघर्षाची. एक असा संघर्ष जो तिला थेट पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करून गेला. ही कथा सत्य घटना, गोष्टी ह्यांवर आधारित असली, तरी काही ठिकाणी लेखन स्वातंत्र्य आणि कल्पनाशक्ती ह्यांचा संगम घडविणे मला आवश्यक वाटले. त्यामुळेच काही नावे, काही प्रसंग आणि काही स्थळे काल्पनिक असली, तरी जिची ही कथा आहे, ती स्त्री मात्र सत्यात आहे. १९६४ साली जन्माला आलेल्या ह्या स्त्रीची कहाणी आपण जाणून घ्यायला हवीच.

कथा : भाग ४०

सगळ्यांनी अगदी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या. जमलेल्या सगळ्यांनीच तिचं, तिच्या कष्टाचं कौतुक केलं. BBC तर्फे आणलेल्या भेटवस्तू देऊन त्यांनी तिचा सत्कार केला.

त्या वर्षीच्या यादीत मोठ्या दिमाखात तिचं नाव BBC च्या यादीत झळकलं. तिच्या गावात सगळीकडे प्रचंड उत्साह होता. गावाने वर्गणी काढून तिचा जंगी सत्कार केला. अनेक वृत्तपत्रांचे वार्ताहर आले होते.

त्यांनी तिच्या अनेक मुलाखती घेतल्या. तिचा संघर्ष ह्या घटनेने सगळ्यांसमोर आणला. सगळीकडे तिचाच बोलबाला झाला होता. अनेक ठिकाणी तिचे जाहीर सत्कार झाले. ती भलतीच प्रसिद्ध झाली. म्हणजे मुळात प्रसिद्ध होतीच, पण आता तिला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली.

सोमाचा विश्वासच बसत नव्हता. एक खेडवळ, अशिक्षित बाई तिच्या अत्यंत प्रभावी ज्ञानामुळे जगभर प्रसिद्ध झाली. जगभरातील अनेक लोकांचे फोन तिला येऊ लागले. इंग्रजी बोलता येत नसल्याने तिची खूपच पंचाईत यायची. गावातली शिकलेली मुलं, मुली तिला ह्या कामी मदत करीत असत.

अनेक वृत्तपत्रात तिचा फोटो, माहिती, तिचा संघर्ष छापून आला
होता. तिचे आई बाबा आता अतिशय वृद्ध झाले होते. त्यांच्याकडे जाऊन तिने सगळं सगळं सांगितलं. त्यांना फार काही समजलं नाही. पण आपली मुलगी फार फार मोठी झाली हे मात्र कळलं आणि तिच्या जन्माच्या वेळचं भाकीत त्यांना आठवलं. त्या वृध्द डोळ्यांत आनंदाचे अश्रू आले आणि थरथरणारी मान, आणि थरथरणारे हात अजूनच आनंदाने थरथरू लागले.

काही दिवसांनी सोशल मीडिया वर अतिशय प्रसिद्ध असलेल्या यू ट्यूब वर अनेक व्हिडिओ करणाऱ्या अनेक लोकांनी तिचे व्हिडिओ, तिच्या मुलाखती त्यावर प्रसिद्ध केल्या. त्यांना हजारोंनी बघितलं. त्यावर टिप्पणी केल्या.

आता हळूहळू २०१९ साल उजाडलं. हे वर्ष सुद्धा तिच्यासाठी अत्यंत खास असणार होतं. एकतर ह्या सगळ्यांमुळे तिचा देशी वाणांचा प्रचार, प्रसार गे उद्दिष्ट साध्य व्हायला मदत होत होती. त्यातून बियाणांचा खप वाढल्याने तिची आर्थिक स्थिती देखील छान सुधारली होती. तिच्या कष्टाला आता फळ यायला लागलं होतं.

२०१९ साली परत एकदा हेच सगळं घडलं. तिला नारी शक्ती पुरस्कार मिळाल्याची घोषणा झाली आणि पुन्हा एकदा गावात जल्लोष झाला.

( सदर लेख पूर्वपसिद्ध आहे, आवश्यक त्या नियमांचे पालन करूनच इथे उद्धृत केले आहे. )

तिच्यापासून प्रेरणा घेऊन सुरू झालेला हा देशी वाणांचा प्रवास तिच्या नारी शक्ती पुरस्कारास कारणीभूत ठरला.

तिच्या ह्या कार्याने प्रभावित होऊन अनेक ठिकाणी पूर्वीपासूनच अनेक जणांनी बियाणे बँक सुरू केल्या होत्याच. अनेक बायकांनी एकत्र येऊन, तिच्यापासून प्रेरणा घेऊन बियाणे बँक सुरू केल्या होत्या. त्यातलीच एक कृषिसखीं’ची देशी बियाणे बँक.

सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या कडधान्ये आणि भाजीपाल्याच्या देशी बियाण्यांच्या विक्रीतून मसला खुर्द (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) येथील कृषिसखी मंडळ या महिला बचत गटाने देशी बियाणे बँक तयार केली आहे. देशी बियाण्यांच्या संवर्धन आणि प्रसाराबरोबरच त्यांनी बियाण्यांच्या उत्पादनात चांगलाच हातखंडा निर्माण केला आहे.

सोलापूर-तुळजापूर महामार्गावर सांगवी (मार्डी) गावापासून आतमध्ये चार किलोमीटरवर मसला खुर्द हे पाच हजार लोकसंख्येचे गाव. या परिसराला तीन गाव तलावाचे कार्यक्षेत्र लाभले आहे. त्यामुळे गावात पाण्याची स्थिती बऱ्यापैकी आहे. शिवाय तुळजापूर, उस्मानाबाद, सोलापूरसारख्या बाजारपेठा नजीक असल्याने या गावातील शेतकऱ्यांचा भाजीपाला आणि फळपिकांकडे कल आहे. विशेषतः भेंडी, सिमला मिरची, हिरवी मिरची यासह खरबूज, कलिंगड, द्राक्ष लागवड या भागांत दिसते.

साधारण २००९ मध्ये गावामध्ये स्वयंम शिक्षण प्रयोग या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षण्यासह अन्य उपक्रम सुरू झाले. गावातील महिला शेतकरी सौ. शैलजा नरवडे यांनी काही उपक्रमशील महिलांना एकत्रित करत यात सहभाग घेतला. त्यातूनच सौ. नरवडे यांनी कृषी सखी मंडळ हा वीस महिलांचा बचत गट तयार केला. सध्या गटाच्या अध्यक्षा सौ. शैलजा नरवडे आणि पार्वती नरवडे सचिव असून, अनेक महिलांचा ह्यात समावेश आहे. पहिल्यांदा महिलांना गटाचा उपक्रम नवीन होता. पुढील टप्यांत बचत आणि छोटे-छोटे व्यवसाय करत महिला सदस्यांची प्रगती सुरू झाली. २०१० च्या दरम्यान तुळजापूरच्या कृषी विज्ञान केंद्राशी गटाचा संपर्क आला. तसेच शासनाच्या कृषी व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि उमेद अभियानाशी गट जोडला गेला. गेल्या काही वर्षांत उपक्रमशील आणि लौकिकप्राप्त असा बचत गट म्हणून ओळख तयार झाली आहे.

दहा वर्षांपूर्वी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून कोल्हापूरच्या कणेरी मठामध्ये एका कार्यक्रमाला जाण्याचा योग या गटातील महिलांना आला. तेथे सदस्यांनी देशी गाईवर आधारित सेंद्रिय पद्धतीच्या शेतीची माहिती घेतली. त्यातूनच पुढे सखी अन्नसुरक्षा शेतीपद्धतीचा उपक्रम सुरू झाला. त्यानंतर केंद्र शासनाने नीती आयोगांतर्गत पोषणमूल्य आधारित शेती असा उपक्रम सुरू केला. यामध्ये परसबाग आणि सेंद्रिय पद्धतीच्या शेतीला प्रोत्साहन देण्यात येते. पण त्यासाठी देशी बियाण्यांच्या उपलब्धतेची अडचण होती. यातूनच गटाला देशी बियाणे उत्पादनाची संकल्पना सुचली आणि देशी बियाण्यांच्या संवर्धनात महिला उतरल्या. कृषी विज्ञान केंद्राने तांत्रिक मार्गदर्शन आणि ‘उमेद\"\"ने बाजारपेठेसाठी साहाय्य केले. कृषी विज्ञान केंद्राच्या वर्षा मरीवाळीकर, उमेद अभियानच्या प्रांजल शिंदे, अभिजित पांढरे, गुरू भांगे, कृषी विभागाचे महेश तीर्थकर, श्री. शिंदे, स्वयम शिक्षण प्रयोगच्या नसीम शेख यांची गटाला चांगली मदत मिळत आहे. आज दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण देशी बियाणे उत्पादक म्हणून कृषिसखीचा ब्रॅण्ड तयार झाला आहे.

बियाणे उत्पादनासाठी गटातील प्रत्येक महिलेला काही पिके ठरवून दिलेली आहेत. त्याप्रमाणे वर्षभर त्यांनी बियाणे तयार करायचे असे नियोजन आहे. त्यामुळे जास्ती किंवा कमी बियाणे मिळेल, असा प्रश्न राहत नाही. बियाण्यांची गटाकडून एकत्रित खरेदी केली जाते. बाजारातील दरानुसार त्याला रक्कम दिली जाते. पुढे सर्व बियाण्यांचे पॅकिंग, ब्रॅण्डिंग सर्व महिला मिळून करतात. गटामार्फत त्याची विक्री झाल्यानंतर त्यातील नफाही पुन्हा याच महिलांमध्ये वाटून घेतला जातो.

बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी देखील केली जाते. ह्या गटातील महिलांकडून बियाण्यांची थेट खरेदी होत नाही, त्या आधी त्याची उगवणक्षमता तपासली जाते. त्यासाठी महिला सदस्यांकडून बियाणे आल्यानंतर कोकोपीट भरलेल्या ट्रेमध्ये बियाणे टाकले जाते. पुढच्या सात-आठ दिवसात हे बियाणे ट्रेमध्ये किती टक्क्यापर्यंत उगवले आहे, हे तपासले जाते. त्यात किमान ९० टक्क्यांपर्यंत ते उगवल्यास संपूर्ण बियाणे खरेदी होते. अन्यथा ते बियाणे नाकारले जाते.

केंद्र शासनाच्या नीती आयोगांतर्गत असलेल्या उपक्रमामुळे प्रत्येक जिल्ह्यात परसबाग आणि पोषण मूल्याधारित शेती प्रयोगासाठी देशी बियाण्यांची मागणी आहे. त्याशिवाय वैयक्तिक शेतकरीही त्यांची खरेदी करतात. त्यात कृषिसखीच्या बियाणे बँकेला पहिली पसंती मिळते. आतापर्यंत उस्मानाबादसह सोलापूर, यवतमाळ, वाशीम, अकोला, नगर जिल्ह्यांत बियाण्यांची विक्री झाली आहे. कृषी प्रदर्शने, महोत्सवातूनही विक्री केली जाते. २०१९ मध्ये ५७ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली आहे. अगदी काही क्विंटलमध्ये सुरू झालेली विक्री टनांत पोहोचली आहे.

३३ प्रकारचे देशी बियाणे
प्रामुख्याने सेंद्रिय पद्धतीने देशी बियाणे संवर्धन हा या पूर्ण संकल्पनेचा उद्देश असल्याने गटातील सर्व महिलांनी त्याचा विचार करूनच काम सुरू केले. कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत न वापरता प्रत्येकीने आपल्याकडील अर्धा गुंठा ते एक एकर या पद्धतीने, तर कोणी आंतरपीक म्हणून बियाण्यांचे उत्पादन घेतात. तूर, उडीद, मूग, भगर, राळे यासह धने, पालक, चुका, मेथी, करडई, भेंडी, वांगी, टोमॅटो, शेवगा, दोडका, घेवडा, भोपळा या सारख्या ३३ प्रकारच्या देशी बियाण्यांचा संग्रह गटाच्या बँकेकडे तयार झाला आहे.

बियाण्यांचे पॅकिंग, ब्रॅण्डिंग
बियाणे एकत्रित केल्यानंतर सर्व सदस्या स्वतःच सगळ्या बियाण्यांचे पॅकिंग करतात. मागणीनुसार हवे त्या बियाण्यांची स्वतंत्रपणे विक्री केले जाते. बियाण्याचे पॅकिंग आणि ब्रॅण्डिंगही चांगल्या पद्धतीने केले आहे.

‘‘सर्व महिला सदस्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही देशी बियाण्यांमध्ये काम करू शकलो. शेतीसोबत चांगला जोडव्यवसाय म्हणून आम्हाला हा व्यवसाय फायद्याचा ठरला आहे.’’


सौ. शैलजा नरवडे म्हणतात,‘‘परसबागा आणि पोषणमूल्य आधारित शेतीपद्धतीसाठी देशी बियाण्यांची उपलब्धता महत्त्वाची आहे. पण बाजारपेठेत भाजीपाल्याचे देशी बियाणे छोट्या पाकिटामध्ये सहसा मिळत नाही, हे लक्षात घेऊनच आम्ही ही संकल्पना राबवली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.’’

आता पुढे ह्याहून अधिक महत्वाच्या घडामोडी घडणार होत्या. एक अत्यंत अनोखी घटना, जी भारतात प्रथमच घडणार होती, ती देखील तिच्या बाबतीत. काय असेल ती? उत्तरं पुढच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all