सीड मदर : संघर्ष तिचा भाग ३९

A Woman Is Honoured With Padmashree Award


सीडमदर : तिचा संघर्ष

टीप : खरं तर एरवी कथेच्या खाली टीप द्यायची पद्धत असते. पण लेखिका म्हणून मला जे मांडायचं आहे, ते मला आधीच सांगायची उर्मी स्वस्थ बसू देत नाहीये. ही कथा आहे एका जिद्दी स्त्रीच्या संघर्षाची. एक असा संघर्ष जो तिला थेट पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करून गेला. ही कथा सत्य घटना, गोष्टी ह्यांवर आधारित असली, तरी काही ठिकाणी लेखन स्वातंत्र्य आणि कल्पनाशक्ती ह्यांचा संगम घडविणे मला आवश्यक वाटले. त्यामुळेच काही नावे, काही प्रसंग आणि काही स्थळे काल्पनिक असली, तरी जिची ही कथा आहे, ती स्त्री मात्र सत्यात आहे. १९६४ साली जन्माला आलेल्या ह्या स्त्रीची कहाणी आपण जाणून घ्यायला हवीच.

कथा : भाग ३९

ह्यां मंडळींनी त्यांना वाड्यात घेतले. पाणी दिले आणि येण्याचे कारण विचारले. ती माणसे त्यांच्या येण्याचे कारण सांगत होती आणि राहीबाईचा स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. ती माणसं बाजारभावाने त्यांना ती जमीन परत द्यायला तयार होती. राहीबाईच्या प्रसिद्धीने एका रात्रीत काम केलं होतं. त्यांच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की, त्यांनी बहुतेक तिची माहिती एका रात्रीतून काढली असावी. तिच्या ओळखी तर त्यांनी पाहिल्याच होत्या.

त्या दिवशी रविवार असल्याने खरेदीखत दुसऱ्या दिवशी करायचे ठरले. सोमाने त्यांना विसार दिला आणि दुसऱ्या दिवशी तिथल्या तालुक्याच्या जमीन नोंदणी विभागात भेटायचे ठरले.

मंडळींना चहा पाणी झालं आणि ती निघून गेली. इकडे राहीबाईच्या मनाची अवस्था अगदी हळवी झाली होती. दुर्गाची आठवण आणि तिचा त्याग, तिचं प्रेम सतत तिच्याबरोबर होतं. लहानपणी तिने दिलेले शेतीचे संस्कारच तिला इतकं मोठं करून गेले होते. तिच्या जन्मदेत्या आईपेक्षा जास्त ती दुर्गाकडेच असायची. तिचा मऊ पदर कायमच तिला संकटांपासून वाचवत राहिला. स्वतःच्या मुलांची पर्वा न करता तिने तिची जमीन हिच्या लग्नाकरिता विकली होती. आज ती जमीन परत मिळवून राहीबाई तिच्या ह्या यशोदेला जणू परत मिळवत होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी सगळा व्यवहार पार पडला आणि राहीबाईचा जीव भांड्यात पडला.जमिनीची कागदपत्रे स्वतःच्या हातात घेताना तिला विलक्षण भरून आलं होतं. तिला नजरेसमोर सतत तिची दुर्गामावशी दिसत होती. व्यवहार झाल्यावर मंडळी ती जमीन बघायला गेली. कापूस आणि बाजरी डोलत होती. डोळे भरून ती ते दृष्य बघत होती.

सोमाने लगेच त्या जमिनीला कुंपण घालणारा शोधला आणि जमीन कसणारा देखील. फक्त आधीच्या मालकाने त्या जमीनीतले पीक सोडले नव्हते. त्याचे उत्पन्न त्याने घ्यावे हे व्यवहारात ठरले होते. सगळी व्यवस्था लावून मंडळी गावी परतली.

काही वर्षे गेली. २०१८ साल उजाडलं. राहीबाईला ठाऊक नव्हतं की हे वर्ष तिच्यासाठी काय घेऊन येणार आहे. आत्तापर्यंत इंटरनेटने धुमाकूळ घातला होता. संपर्काची साधनं प्रचंड वाढली होती. राहीबाईला ठाऊक नव्हतं, पण तिची माहिती, तिचं कार्य कोणीतरी इंटरनेट वर टाकलं होतं. तिची बरीचशी भाषणं, श्री श्री रविशंकर ह्यांच्या देशी बीज मेळाव्यात असलेली तिची दरवर्षीच्या उपस्थितीची नोंद देखील त्यावर होती. आणि मुख्य म्हणजे तिचे नथ घातलेले काही फोटो देखील होते.

डॉ. रघुनाथ माशेलकर ह्यांनी दिलेलं नाव *बीज माता* अर्थात *सीड मदर* हे सुंदर आणि सार्थ नाव देखील.

अचानक एक दिवस पुन्हा काही माणसं तिला भेटायला आली. हल्ली तिला सूट बूट घालणारी माणसं भेटायला येणं हे तिलाही वेगळं वाटत नव्हतं नि गावालाही. त्यांच्या चकचकीत कार्सचं आणि त्यांच्या फाड फाड इंग्रजीचंही नवल नव्हतं आणि त्यांच्या कॅमेराचं आणि शूटिंगचं देखील.

या माणसांनी आधी सोमाकडून वेळ घेतली होती. ती होती सर्वात प्रसिद्ध आणि जुन्या न्यूज चॅनल *बीबीसी ( BBC )* ची.

ते दरवर्षी संपूर्ण जगातल्या अत्यंत सक्षम आणि आणि प्रभावी स्त्रियांची यादी जाहीर करीत असत आणि तेही केवळ शंभर. त्यासाठीच ते तिचा इंटरव्ह्यू घ्यायला आले होते. तिची गणना संपूर्ण जगातल्या सर्वात यशस्वी, प्रभावी आणि सक्षम अशा शंभर महिलांमध्ये होणार होती.

म्हणून ते तिची मुलाखत घ्यायला आले होते. तिच्यासाठी, तिच्या नवऱ्यासाठी, तिच्या सासरच्या इतर नातेवाईक मंडळींसाठी, तिच्या लाडक्या आईबाबांसाठी, तिच्या गावासाठी हा अत्यंत अभिमान वाटावा असा क्षण होता. तिच्या मुलाखतीची तयारी पूर्ण झाली. कॅमेरे सेट करून झाले. आवाज आणि इतर तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या आणि मग त्यांनी तिची मुलाखत रेकॉर्ड केली. ( प्रसिद्धीचे काही संकेत आणि नियम पाळून ती मुलाखत इथे तशीच देत आहे. ऋण : BBC )

पारंपरिक पिकांचे शेकडो देशी वाण जतन करण्यासाठी मी माझे योगदान देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. मी BAIF या संस्थेच्या मदतीने बियाणे बँक वाढवली आणि देशी वाण बिकरी मोठ्या प्रमाणावर सुरू केली. त्यामुळे शाश्वत शेतीला मोठं वरदान मिळतंय.

माझ्या बँकेत आदिवासी परंपरेने जपलेल्या ५३ पिकांचे ११४ गावरान वाण आहेत. आजूबाजूला असणाऱ्या गावात जवळपास पन्नास टक्के शेतकरी देशी वाण वापरतात.

ती पुढे म्हणाली," बॅंकेबाबत आपली जशी कल्पना असते तशी ही बॅंक नाही. मातीच्या घरावर काही पत्रं टाकून मी आपली ही बॅंक उभी केली. या बॅंकेत पैसे ठेवलेले नाहीत पण त्याहून अधिक अशी मूल्यवान बियाणं जतन करून ठेवली आहेत".

इतकं बोलून तिने त्यांना तिच्या बीज बँकेत नेलं.

आत गेल्यावर ती त्यांना उत्साहाने त्या बियाण्यांबद्दल माहिती देऊ लागली. हे सफेद वांगं आहे, हे गावठी हिरवं वांगं आहे, ही सफेद तूर आहे अशी कित्येक नावं ती एकामागून एक घेत होती. तुम्ही ज्या भाज्यांबद्दल कधी ऐकलंही नाही त्या भाज्यांचं वाण मी पारंपरिक पद्धतीनं जतन करून ठेवलं आहे.

ती पुढे सांगत होती, आपण जे खातो त्यानेच आपलं शरीर बनतं आणि मनही बनतं. शरीर सदृढ असेल तर मनही सदृढ राहील असा त्यांचा विश्वास आहे.

गावात आजारी लोकांचं प्रमाण मी पाहिलं आणि मला वाटलं की आधी बाळं कधी कुपोषित दिसत नव्हती. पण आता जी बालकं जन्माला येत आहेत त्यांचं वजन कमी असतं. याचं कारण काय असावं यावर मी विचार केला.

हायब्रीड किंवा संकरित वाणांमुळे तर आपली रोग प्रतिकारक क्षमता तर कमी होत नाही ना असा विचार माझ्या मनात आला आणि मी ह्यावर काहीतरी उपाय शोधण्याची खूणगाठ मनाशी पक्की बांधली.

आजकालच्या भाज्या आणि पिकं हे रासायनिक खतामुळे येतात. पण देशी बियाणं मात्र नुसत्या हवेवर आणि पाण्यावर येऊ शकतं असं माझं संशोधन सांगतं. पण हायब्रीड बियाणं रासायनिक खतांशिवाय येतच नाही असं माझं निरीक्षण आहे.

\"जुनं ते सोनं\" ह्या न्यायाने नाचणी, वरई, राळा आणि जुन्या वाणाचे भात आता वापरातच नाहीत याची खंत मला वाटते.

माझ्या घराशेजारील बागेतच मी चारशे ते पाचशे झाडे लावली आहेत. कुठलंही औपचारिक शिक्षण न झालेली मी बियाण्यांबद्दल भरभरून आणि कितीही बोलू शकते. मला माझ्या वडिलांची शिकवण लक्षात आली. ते म्हणायचे जुनं ते सोनं. त्यानुसारच मी वागत गेले.

आज मला अनेक लोक भेटत असतात. माझं कौतुक होत आहे. वेगवेगळे मानसन्मान मिळत आहेत. त्याचेही कौतुक होत आहे, पण सुरुवातीला मी जेव्हा हे काम हाती घेतलं तेव्हा लोक मला वेड्यात काढायचे. मी काय काम करायचे हेच बहुतेकांना कळत नव्हतं. हळुहळू लोकांना मी दिलेल्या बियाणांचं महत्त्व पटलं.

त्यानंतर माझ्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी मला बोलवलं जाऊ लागलं. जर लोकांची बोलणी ऐकून हे काम मी सोडून दिलं असतं तर आज जे देशी बियाणं इथं दिसतंय ते तुम्हाला दिसलं नसतं.

इतकं बोलून ती थांबली.

सगळ्यांनी अगदी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या. जमलेल्या सगळ्यांनीच तिचं, तिच्या कष्टाचं कौतुक केलं. BBC तर्फे आणलेल्या भेटवस्तू देऊन त्यांनी तिचा सत्कार केला.

हे सगळं इथेच थांबणार नव्हतं. अजून काही अतिशय वेगळं आणि अत्यंत सुंदर असं तिच्या आयुष्यात घडणं बाकी होतं. काय असेल ते? उत्तरं पुढच्या भागात.

क्रमशः

तळटीप : BBC ची २०१८ ची ही १०० स्त्रियांची यादी संपूर्ण खरी असून त्यात राहीबाई सोमा पोपेरे हे नाव अगदी सहज दिसेल. आणि ती मुलाखत देखील खरी आहे.

🎭 Series Post

View all