सीड मदर : संघर्ष तिचा भाग ३७

A Woman Is Honoured With Padamshree Award


सीडमदर : तिचा संघर्ष

टीप : खरं तर एरवी कथेच्या खाली टीप द्यायची पद्धत असते. पण लेखिका म्हणून मला जे मांडायचं आहे, ते मला आधीच सांगायची उर्मी स्वस्थ बसू देत नाहीये. ही कथा आहे एका जिद्दी स्त्रीच्या संघर्षाची. एक असा संघर्ष जो तिला थेट पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करून गेला. ही कथा सत्य घटना, गोष्टी ह्यांवर आधारित असली, तरी काही ठिकाणी लेखन स्वातंत्र्य आणि कल्पनाशक्ती ह्यांचा संगम घडविणे मला आवश्यक वाटले. त्यामुळेच काही नावे, काही प्रसंग आणि काही स्थळे काल्पनिक असली, तरी जिची ही कथा आहे, ती स्त्री मात्र सत्यात आहे. १९६४ साली जन्माला आलेल्या ह्या स्त्रीची कहाणी आपण जाणून घ्यायला हवीच .

कथा : भाग ३७

तिला आश्चर्य वाटले. इकडे परमुलुखात मराठी बोलणारी मुलगी बघून तिला आनंद देखील झाला.

त्या मुलीने स्वतःची ओळख करून दिली. तिचं नाव अनन्या होतं. ती पुण्यातून तिकडे दुभाषी म्हणून नोकरी करण्यासाठी आली होती. तिला मराठी, हिंदी, इंग्रजी, जापनीज, आणि जर्मन एवढ्या भाषा येत होत्या. बंगळुरू येथे येणाऱ्या देशी, परदेशी पाहुण्यांकरिता ती खास तेच काम करत होती. ज्यांना कानडी समजत नाही, परंतु ह्या भाषा समजतात त्यांच्याशी ती त्यांच्या भाषेत बोलून संवाद साधत असे.

राहीबाई जरा मोकळी झाली. तिने त्या मुलीशी गप्पा मारायला सुरुवात केली. अनन्याने सांगितले की, तिला संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत राहीबाईच्या जवळच थांबायचे होते. म्हणजे तिला तसे त्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितले होते. आता तर राहीबाईला अजूनच बरे वाटले. आता तिची भाषेची अडचण सुटली होती. एवढ्या मोठ्या कार्यक्रमात कसे बोलावे, कसे वागावे, हे सगळे तिचे प्रश्न सुटले होते.

प्रत्यक्ष कार्यक्रम दुसऱ्या दिवशी होता. साधारण अकरा वाजता त्याच शहरातल्या मोठ्या कॉलेजच्या मैदानावर हा कार्यक्रम होता. अनन्या तिच्याकडे सकाळी नऊ वाजता आली. राहीबाईने न्याहरी केली. कालपासून ती खात असलेले जवळजवळ नव्वद टक्के पदार्थ तिच्या ओळखीचे नव्हते. पण अनन्या तिला ते काय काय आहे, हे सांगत होती.


राहीबाईला ते सगळं नवल होतं, पण आवडत देखील होतं. दहा वाजता दोघींना न्यायला आयोजकांनी गाडी पाठवली. राहीबाई नेहमीच्या पद्धतीने आवरून निघाली. पायात चप्पल तिने घातलीच नाही. अनन्या तिला खूप आग्रह करत होती की, चप्पल घाला. तिथे मोठेमोठे लोक येतील, तर ते वाईट दिसेल. पण राहीबाईने ते मुळीच ऐकले नाही. तिचा साधेपणा, लोक काय म्हणतील, ह्या अत्यंत वायफळ प्रश्नामुळे ती सोडायला तयार नव्हती.

त्या अत्यंत आलिशान कारमध्ये बसताना राहीबाई बिचारी अवघडून गेली. कसल्याच दिमाखाची, वैभवाच्या प्रदर्शनाची सवय नसलेली ती! अनन्याला मनातून तिचा साधेपणा फार भावला होता.

कार्यक्रम स्थळी पोहोचल्यावर एक माणूस पुढे आला आणि त्याने बाहेरून कारचे दार उघडले. राहीबाई बाहेर आली.

तिथला थाट बघून ती चकित झाली. असंख्य कार्स येऊन थांबत होत्या. त्यातून सूट बूट घातलेली माणसं उतरत होती. सगळीकडे लाल रंगाचा गालिचा पसरला होता. भव्य मांडव होता. तिला कळेना की हा नक्की कसला कार्यक्रम आहे? शेतकऱ्यांना देशी बीज ह्या संदर्भात मार्गदर्शन आहे की, श्रीमंत लोकांचं प्रदर्शन आहे? तिला एकदम ते सगळं बघून त्या थाटामाटाचा उबग आला. ती जेव्हा गावोगावी सभा घेत होती, तेव्हा हे असले काहीही थाट, चोचले नसायचे. साधा ऊन लागू नये म्हणून मांडव असायचा कधी तरी. नाहीतर कित्येक वेळी तो देखील नसायचा. तिच्या चेहऱ्यावर नाराजीच्या आठ्या बघून अनन्या चटकन म्हणाली, "मॅम अहो, ही सगळी आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये काम करणारी माणसं आहेत. हे शेतकरी नाहीत. मुख्य कार्यक्रम शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठीच आहे. तुम्ही नाराज होऊ नका. चला आपण मुख्य मांडवात जाऊ". असे म्हणून ती राहीबाईला घेऊन सजवलेल्या पॅसेजमधून मुख्य मैदानात घेऊन गेली. तिथे देखील मोठा झकास मांडव घातला होता. ठिकठिकाणी मोठाले पंखे लावले होते. खाली लाल रंगाचे मोठे गालिचे होते. तीन प्रकारची आसनव्यवस्था तिथे होती. सगळ्यात पुढे, जिथे प्रतिष्ठित व्यक्ती बसणार होत्या. त्यात राहीबाई देखील होती. सगळे निमंत्रित पाहुणे तिथे बसणार होते. तिथे मोठे सोफासेट लावले होते. प्रत्येकाच्या बसण्याच्या जागी पांढऱ्या कागदावर त्या निमंत्रिताचे नाव छापण्यात आले होते.

मध्ये रेलिंग टाकून दुसऱ्या प्रकारची व्यवस्था होती. ती सर्व सामान्य जनतेकरिता होती. त्या फक्त लाल रंगाच्या खुर्च्या होत्या.

परत एक रेलिंग टाकून तिसरी व्यवस्था होती. जिथे गर्भवती, वयस्कर, दिव्यांग ह्यांच्याकरिता सोय होती. त्यांना जाता येता कमी चालायला लागावे ह्यासाठी ही सोय असल्याचे अनन्याने सांगितले. अनन्या तिला घेऊन तिच्या खुर्चीवर बसवून तिथून निघाली. तिने सांगितले की, ती थोड्याच वेळात तिथे परत येईल.

आता राहीबाई एकटीच होती. हळूहळू सगळ्या जागा भरत होत्या. ती सगळ्यांचं निरीक्षण करण्यात गढली होती. अनेक जण पांढरी लुंगी नेसलेले आणि झब्बा अशा कपड्यात तिथे आलेले होते. थोडा वेळ गेला आणि अचानक गडबड उडाली. कोणीतरी मोठी व्यक्ती आली असावी, असं एकंदर हालचाल आणि गडबडीवरून दिसत होतं. राहीबाई दुसऱ्या रांगेत होती. पहिल्या रांगेतले सोफासेट अजून बरेच मोकळे होते.

अचानक बरीच माणसं गर्दी करून येताना दिसली. राहीबाई बघत होती. एक कोणीतरी व्यक्ती चालत होती आणि त्या व्यक्तीच्या भोवती हा गराडा होता. अनेक पोलीस, सुरक्षारक्षक त्यांच्या भोवती कडं करून चालत होते. ती व्यक्ती आली आणि पहिल्या रांगेतल्या सोफासेटवर बसली. आजूबाजूला अजून काही व्यक्ती बसल्या. ती त्यांना ओळखत नव्हती. हे इतकं महत्व असणारे कोण असावेत असा विचार ती करतच होती की, तेवढ्यात तिलाच आठवलं. तिने इंटरनेटवर पाहिलं होतं. हेच ते, आर्ट ऑफ लिव्हिंग चे संस्थापक! श्री श्री रविशंकर जी.

तितक्यात अनन्या तिथे आली आणि तिने राहीबाईच्या शेजारच्या खुर्चीवर बसून तिला सगळी माहिती दिली. राहीबाईचा अंदाज खरा ठरला. ते तेच होते.

इतक्यात कार्यक्रम सुरू होत असल्याची घोषणा झाली. आणि एकदम शांतता पसरली. सूत्रसंचालन करणारा अस्खलित इंग्लिश मध्ये बोलत होता. त्याने काही वाक्य बोलल्यावर एक सुंदर दिसणारी, साडी नेसलेली स्त्री पुढे आली. तिने सगळं परत हिंदीतून सांगितलं. अनन्या दवखील राहीबाईला सगळं समजावत होतीच.

आर्ट ऑफ लिव्हिंग चे मुख्य सचिव उठले आणि त्यांनी त्या संघटनेबद्दल बरीच माहिती दिली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांना व्यासपीठावर बोलवले गेले. त्यात अर्थात श्री श्री रविशंकर जी, अजून काही राजकीय माणसे, आणि राहीबाईचा समावेश होता. अजूनही शेती क्षेत्रातली काही माणसं होती. जवळजवळ आठ माणसे व्यासपीठावर होती.

त्या सगळ्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारात त्यांना एक शाल, श्रीफळ, आणि एक रोप दिले होते. आता सूत्रसंचालक परत आला आणि त्याने श्री श्री रविशंकर ह्यांना बोलायची विनंती केली. ते उठले तसा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. ते त्यांच्या शांत आणि संथ लयीत बोलू लागले. त्यांचं भाषण अत्यंत प्रभावित करणारं होतं. अनेकांना प्रेरणा देणारं होतं. बराच वेळ ते बोलत होते. त्यानंतर अजून दोघं बोलले आणि मग राहीबाईला बोलण्यास आमंत्रित करण्यात आले.

ती बोलायला उठली आणि अनन्या लगेच तिच्याबरोबर माईक जवळ आली. नेहमीप्रमाणे तिने आधी भर सभेला वाकून नमस्कार केला आणि अत्यंत आत्मविश्वासाने बोलायला सुरुवात केली. देशी बीज आणि त्यांचं संवर्धन, सेंद्रिय शेती, सेंद्रिय खतं, त्यांचा वापर, त्यांचं नियोजन, त्यांचा प्रभाव, तिने केलेले प्रयोग, तिची बीज बँक, BIAF संस्था, त्या संस्थेने देशी वाण विक्रीचं विणलेलं उत्तम जाळं ह्या सगळ्यांबद्दल ती भरभरून बोलली. डॉ. रघुनाथ माशेलकर ह्यांनी तिला का गौरवले हे ही तिने सांगितले. तिच्या जीवनाचा उद्देश तिने लोकांपर्यंत पोहोचवला. तिचं भाषण अनन्या हिंदी आणि इंग्रजीतून भाषांतरित करून सांगत होती.

तिचं भाषण संपल्यावर किती तरी वेळ टाळ्या वाजत होत्या. त्या संपल्यावर स्वतः श्री श्री रविशंकर जी उठले आणि त्यांनी माईक हातात घेतला.

काय म्हणणार ते? तिचं कौतुक करणार की अजून काही? तिथे जमलेल्या दोन हजार शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार? उत्तरं उद्याच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all