सीड मदर : संघर्ष तिचा भाग ३६

A Woman Is Honoured With Padmashree Award


सीडमदर : तिचा संघर्ष

टीप : खरं तर एरवी कथेच्या खाली टीप द्यायची पद्धत असते. पण लेखिका म्हणून मला जे मांडायचं आहे, ते मला आधीच सांगायची उर्मी स्वस्थ बसू देत नाहीये. ही कथा आहे एका जिद्दी स्त्रीच्या संघर्षाची. एक असा संघर्ष जो तिला थेट पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करून गेला. ही कथा सत्य घटना, गोष्टी ह्यांवर आधारित असली, तरी काही ठिकाणी लेखन स्वातंत्र्य आणि कल्पनाशक्ती ह्यांचा संगम घडविणे मला आवश्यक वाटले. त्यामुळेच काही नावे, काही प्रसंग आणि काही स्थळे काल्पनिक असली, तरी जिची ही कथा आहे, ती स्त्री मात्र सत्यात आहे. १९६४ साली जन्माला आलेल्या ह्या स्त्रीची कहाणी आपण जाणून घ्यायला हवीच .

कथा : भाग ३६

राहीबाई त्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेली. जाताना गावातील अजून काही माणसे तिच्याबरोबर होती. सोमा देखील होता. जाताना वाटेत एके ठिकाणी रस्ता अतिशय खराब होता. ह्या मंडळींनी जीप केली होती, ती अचानक एका खड्ड्यातून उलटली. बराच मोठा खड्डा होता.

त्या रस्त्याला खड्डेच प्रचंड होते. आजूबाजूला सगळी बोडकी खोडं दिसत होती. प्रचंड मोठे आणि जुने वृक्ष कापल्याच्या खुणा जागोजागी दिसत होत्या. अर्धवट कापलेली ती खोडं आता वाळत चालली होती. रस्ता मोठा करायच्या नावाखाली हा विकासाचा भस्मासूर झाडांचा बळी घेत चालला होता.

कशीबशी इतरांच्या मदतीने जीपमधली माणसं बाहेर आली. सगळ्यांनाच लागलं होतं. पण नशीब असं की कोणालाही प्राणघातक जखमा किंवा गंभीर काही लागलं नव्हतं. जिथे अपघात झाला, तिथे तिला ओळखणारी माणसं होती. त्यांनी तातडीने तिथेच गावातला डॉक्टर बोलावला. त्यांनी जुजबी जखमा बांधून घरी जाऊन विश्रांतीचा सल्ला दिला.

पण तिने ऐकलं नाही. तिने जायचा निश्चय केलाच होता. आता तर तिला बोलायला अजून एक मुद्दा मिळाला होता. वृक्षतोड हा! सगळ्यांनी समजूत घालून सुद्धा न ऐकता ती कार्यक्रम स्थळी पोहोचलीच.

तिच्या हाताला आणि डोक्याला बँडेज बघून आधी माणसं धावली. काय झालं हे विचारल्यावर त्यांना सगळा अपघाताचा किस्सा समजला. बाकीच्यांना पण कुठेकुठे लागलं होतं. पण राहीबाईकडे बघून सगळ्यांना उत्साह होता. माणसं किती कर्तव्यनिष्ठ असतात त्याचं साक्षात उदाहरण म्हणजे राहीबाई. ती खरेच एक आदर्श उदाहरण होती ह्या समाजापुढे!

सभा सुरू झाली. पुढच्या रांगेत अतिमहत्त्वाच्या व्यक्ती बसल्या होत्या. त्याच रांगेत तिला देखील स्थान होतं. तिची भाषणाची वेळ जशी आली, तशी ती स्टेजवर गेली. नेहमीप्रमाणे तिने सगळ्यांना वाकून नमस्कार केला. आणि आपल्या ओघवत्या वाणीत तिने बोलायला सुरुवात केली. बराच वेळ ती तिच्या नेहमीच्या सगळ्या विषयांवर बोलत होती. त्यानंतर तिने तिच्या अपघाताचा किस्सा उपस्थित मंडळींना सांगितला. सगळेच आतून हेलावले.

तिने त्यानंतर देशी झाडांचं महत्व सांगायला सुरुवात केली. त्यांच्या तोडणीतून होणारं नुकसान खरे तर सगळ्यांनाच ठाऊक होतं

पण तिच्या शब्दांतून ते सगळ्यांच्या मनात खोलवर रुतलं. तिने देशी झाडांच्या बिया जपण्याचा वसा सगळ्यांनी घ्यावा
असं सांगितल्यावर सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

आंबा, वड, पिंपळ, चिंच, बहावा, बोर, जांभूळ, बूच, कांचन, आपटा इ. झाडं लावणे कसे फायदेशीर आहे, हे तिने सांगितले. तिचं बोलणं संपल्यावर सगळे तिचं कौतुक करत होते.

त्यानंतर वृक्षारोपण साजरं झालं आणि तिने सगळ्यांना एक सुंदर आवाहन केलं. नुसती झाडं लावून उपयोग नसतो तर, ती जगवावी लागतात. ती झाडं जगवावी ह्याची शपथ घेण्यासाठी ती आग्रही होती. त्याचबरोबर ती दर दोन तीन महिन्यांच्या अंतराने ही झाडं बघायला ती येणार असल्याचं तिने सांगितलं.

ती बोलून निघणार इतक्यात तिला एका व्यतीने थांबवलं. त्या व्यक्तीने स्वतःची ओळख मिस्टर. सुब्रह्मण्यम अशी करून दिली. तिच्याशी ते हिंदीत बोलत होते. परंतु त्यांचं हिंदी जरा तोडकंमोडकं होतं. ते समजावून सांगायला तिथे काही माणसं मदतीला आली.

त्यांचं म्हणणं तिने ऐकून घेतलं आणि ती भारावली.

*आर्ट ऑफ लिव्हिंग* चे संस्थापक श्री. श्री. रविशंकर जी ह्यांच्या अध्यक्षतेखाली बंगळुरू येथे एक भव्य बीज महोत्सव होणार होता. त्या संदर्भात ते माहिती देत होते.

देशी वाण आणि त्यांचं महत्व, त्यांची आपसात होणारी देवाण घेवाण, आणि त्यासंदर्भात एक चर्चासत्र तिथे आयोजित केलं जाणार होतं.

आणि हे दरवर्षी होत होतं. आत्ता ते तिचं भाषण ऐकून इतके प्रभावित झाले की त्यांनी तिला त्या कार्यक्रमाचे आमंत्रण तिथल्यातिथे दिले. तिला हर्षवायू व्हायचा बाकी होता. आता महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्रा बाहेर देखील तिची दखल घेतली जात होती. तिला ह्याचा प्रचंड आनंद तर वाटलाच होता, पण तिला आता तिचे विचार सगळीकडे पसरवायला मदतच होणार होती.

पण तो कार्यक्रम व्हायला अजून चार महिने बाकी होते. ती त्या आमंत्रणाचा स्वीकार करून घरी आली. ती घरी आली त्या वेळी तिच्यासाठी एक बक्षीस तयार होते. हे बक्षीस होते तिच्या लाडक्या गुरूंनी म्हणजे डॉ. रघुनाथ माशेलकर ह्यांनी पाठवलेले! काय होते ते? तर तो एक संगणक होता. त्याची सर्व जोडणी ही इंटरनेट सकट होती. ते कसे वापरायचे, ह्याचे तिचे प्रशिक्षण साधारण पंधरा दिवस चालले. ते शिकवणारा माणूस देखील त्यांनीच पाठवला होता. तिला फार थोड्या गोष्टी कळल्या. पण सोमाने मात्र सगळे जाणून घेतले.

मग हळूहळू आता तो तिला त्यावरचे देशी बीजांचे फोटो, आर्टिकल्स, सगळं दाखवू लागला. तिला तर जणू अलिबाबाची गुहाच सापडली. त्यावरच्या एका आर्टिकलने सोमाचे लक्ष वेधून घेतले. त्याने ते तिला पूर्ण वाचून दाखवले.

अशी अनेक आर्टिकल्स, लेख, फोटो हे सगळं रोज सोमाकडून जाणून घेऊन त्याचा विचार करण्याचा तिला छंदच लागला. करता करता चार महिने कसे गेले तिला कळलंच नाही.

तिने बंगळुरू येथे जाण्याची तयारी केली. ह्या वेळेस सोमा येऊ शकणार नव्हता. ती एकटीच तिकडे जायला निघाली. मनात थोडी भीती , थोडी धडधड होती, पण तिचा तिच्या श्रद्धेवर, देवावर विश्वास असल्याने हा आयुष्यात प्रथमच करत असलेला इतक्या लांबचा प्रवास ती सहज करेल अशी तिला खात्री होती.

ती विमानाने प्रथमच प्रवास करत होती. आर्ट ऑफ लिव्हिंग कडून तिला विमानाचं तिकीट मिळालं होतं. तिकडे ती पोहोचल्यावर तिला घ्यायला माणसं आली होती. त्यांच्याबरोबर तो तिकडे गेली. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तिच्या राहण्याची सोय केली होती. ती प्रथमच हे असलं काहीतरी बघत होती. फाडफाड इंगजी बोलणाऱ्या, छोट्या स्कर्ट मधल्या चेहरा रंगवलेल्या मुली, त्यांचं चटपटीत बोलणं, वागणं, अदब सगळं बघून ती बुजली होती. चकचकीत इमारती, गुळगुळीत रस्ते, वेगळीच भाषा, असंख्य वाहनं, रस्त्यांवर असलेली प्रचंड गर्दी, हॉटेलचा थाट, बघून तिला तिचं पिटुकलं खेडं आठवत होतं. इथं कोणालाच बोलायला वेळ नव्हता. जो तो आपल्या स्वतंत्र घाईत! गावाकडे कसं, कोणी ना कोणी बोलणार, बसणार, चौकशी करणार! इकडे तिला तिच्या रूममध्ये सोडून एक मुलगी निघून गेली. ती प्रचंड सजवलेली रूम, चकचकीत फर्निचर, मोठाला पलंग, वातानुकूलन संच, तिला हे सगळं बघून नवल वाटत होतं. इतक्यात बेल वाजली आणि तिनं दार उघडलं. समोर हॉटेलचा एक माणूस होता. त्याच्या हातात एक चाक असलेली ट्रॉली होती. त्यात बरेच खाण्याचे पदार्थ होते. इतक्यात एक वीस बावीस वर्षांची मुलगी तिथे आली. तिने त्या माणसाला जायला सांगून ती ट्रॉली आत घेतली, आणि शुद्ध मराठीत तिने राहीबाईला खाऊन घ्यायला सांगितले.

तिला आश्चर्य वाटले. इकडे परमुलुखात मराठी बोलणारी मुलगी बघून तिला आनंद देखील झाला.

कोण होती ती मुलगी? मराठी कसं काय बोलत होती ती? काय होणार पुढे? त्या वातावरणाचा तिच्या बोलण्यावर काही परिणाम होणार का? तिला श्री श्री रविशंकर भेटणार का? उत्तरं पुढच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all