सीड मदर : संघर्ष तिचा भाग २३

A Woman Is Honoured With Padamshree Award


सीडमदर : तिचा संघर्ष

टीप : खरं तर एरवी कथेच्या खाली टीप द्यायची पद्धत असते. पण लेखिका म्हणून मला जे मांडायचं आहे, ते मला आधीच सांगायची उर्मी स्वस्थ बसू देत नाहीये. ही कथा आहे एका जिद्दी स्त्रीच्या संघर्षाची. एक असा संघर्ष जो तिला थेट पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करून गेला. ही कथा सत्य घटना, गोष्टी ह्यांवर आधारित असली, तरी काही ठिकाणी लेखन स्वातंत्र्य आणि कल्पनाशक्ती ह्यांचा संगम घडविणे मला आवश्यक वाटले. त्यामुळेच काही नावे, काही प्रसंग आणि काही स्थळे काल्पनिक असली, तरी जिची ही कथा आहे, ती स्त्री मात्र सत्यात आहे. १९६४ साली जन्माला आलेल्या ह्या स्त्रीची कहाणी आपण जाणून घ्यायला हवीच .

कथा : भाग २३

तिने शेवटी मुलाची शाळा सांभाळून सगळीकडे फिरायचं ठरवलं. त्याला सुट्टी असेल तेव्हा ती जवळच्या गावांना भेटी देऊ लागली आणि बीज बँक ह्याबद्दल माहिती देऊ लागली.

तशी ती जवळजवळ आसपास फिरली होतीच.

आता तिला अजून एक पर्व गाठायचं होतं.

तिला अनेक आदिवासी भेटून जात होते. हे खरे निसर्ग रक्षक होते. आदिवासी हे सगळ्या समाजाचे मूळ निवासी. खरं शेतीचं ज्ञान त्यांनाच काय ते आहे. परंपरा जपलेली त्यांची शेती ही खऱ्या अर्थाने समाजाला उपयोगी आहे. ते कधीच संकरित बियाणं वापरत नाहीत. ह्या मूळ मातीशी त्यांची नाळ पक्की जोडली गेली आहे.

आदिवासी लोकांमध्ये अनेक जमाती आहेत. आणि त्या जमाती अनेक प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करीत असतात. कित्येक प्रकारच्या भाज्या शहरी लोकांना ठाऊक देखील नसतात.

मुळात आदिवासी लोक हे पूर्णपणे पावसावर अवलंबून अशी शेती करतात. त्यामुळे बेसुमार खतं घालून, सतत पाणी देऊन बळेनी पिकवलेलं असं काहीही ते खात नाहीत. त्यामुळे आदिवासी लोकांकडे देशी बियाणं अजूनही शाबूत असतं.

आदिवासींची शेती बद्दलची भावना अतिशय रंजक आहे. आणि काही आदिवासी राहीबाईला भेटल्यानंतर तिला त्यांचा एक अतिशय वेगळा दृष्टिकोन कळला. त्यांनी तिला एक अतिशय वेगळी, सुंदर आणि धर्म आणि शेती ह्यांना जोडणारी कथा सांगितली. तिला ती कथा फार आवडली. तिने निश्चय केला की, जेव्हा जेव्हा ती बाहेर सभेसाठी जाईल, तेव्हा तेव्हा ती ही कथा सगळ्यांना नक्की सांगेल.

तसेच तीला हे ही ठाऊक होते की, आदिवासी लोक शेतीशी संबंधित काही सण साजरे करतात. अनेक जमातींची उदाहरणं तिला ठाऊक होती. महाराष्ट्रातल्या कोंकणा, पावरा, भिल्ल या जमातीदेखील असे पिकाशी संबंधित सण साजरे करतात. काकडी नवाय म्हणजे काकडीचं नवंडणं, भात नवाय म्हणजे भाताचं नवंडणं असे सण ते साजरे करतात. शिवाय डोंगर्‍या देवाचा उत्सव, कणसरी मातेचा उत्सवही असेच साजरे होतात.

त्याच्याशी संबंधित अशी ही कथा तिला त्या आदीवासी लोकांनी सांगितली.

कुंकणा आदिवासींच्या कुंकणा भाषेतील कन्सरीची कथा म्हणून ही कथा अतिशय प्रसिद्ध आहे. ती फारच सुंदर आहे. ती त्यांच्याच भाषेत इथे मुद्दाम देत आहे.

महादेवाने पृथ्वीची रचना केली. एक दिवस महादेव व पार्वती पृथ्वीवासीयांची हालहवाल पाहण्यास आले. त्यावेळी साळीच्या दाण्यांमध्ये तांदूळ नसे. निव्वळ फोलपटेच असत. पार्वतीने एका माणसाला विचारले, " तू इतका दुबळा का"?

तो माणूस उत्तरला, " काय करू माय? अशी फोलपटे खाऊन दिवस कंठतो".

पार्वतीला दया आली. तिने एका रोपावरील फोलपटात आपले स्वत:चे दूध भरले आणि म्हणाली, " हे सांभाळून राख. यात दाणे भरून येतील ते पुन्हा पेर. त्यातून पुन्हा दाणे येतील. दाण्यातून प्रथम माझे दूध भरले जाईल. प्रत्येक दाण्यामध्ये मी असेन. कणसरीमाता म्हणून तू माझी पूजा करीत जा."

ही कथा खरोखरच त्यांची शेतीबद्दलची भावना दर्शवते. त्यामुळेच देशी वाण जपून ठेवणं त्यांना जमलं. त्या मागे त्यांची अत्यंत पवित्र अशी धार्मिक भावना आहे.

सांगितलेल्या दिवशी डॉ. रघुनाथ माशेलकर तिला भेटायला आले. त्यांना नमस्कार करून ती अवघडून उभी राहिली. त्यांनी तिच्या सगळ्या कामाची विचारपूस केली. स्वतःबद्दल सांगीतलं. त्यांनी काय काम केलं हे तिला सोमाने सांगितलं होतंच. पण त्यांच्या तोंडून ऐकताना तिला त्याचं महत्व अजून जास्त कळू लागलं.

तिने त्यांचा पाहुणचार करून मग तिची शेती दाखवायला नेली. संपूर्ण सेंद्रिय आणि देशी वाणांची शेती बघून त्यांनी तिचं फार कौतुक केलं. सगळ्या गावाची सभा त्यांच्यासाठी बोलावली होती. भर सभेत देखील त्यांनी तिचं कौतुक केलं.

ते म्हणाले, " राहीबाई तुम्हांला तुमचं नाव शोभून दिसतंच. पण मी आजपासून तुम्हांला नवीन नाव देणार आहे. तुमचं देशी वाण जपण्याचं कार्य अत्यंत बहुमूल्य आहे. मी त्यासाठी आजपासून *सीड मदर* म्हणजे देशी वाणांची आई असे संबोधन करणार आहे. तुमचं काम खरोखरच एखाद्या आईसारखे आहे. आई जशी आपल्या मुलांना जपते, प्रेम देते, वाढवते, तसंच तुम्हीही त्या देशी वाणांच्या बाबतीत करताय. म्हणून हे खास नाव तुम्हांला".

हे ऐकून ती धन्य झाली. भर सभेत तिने त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि हे कार्य असंच चालू ठेवण्याचं वचन देखील दिलं.

ह्यानंतर राहीबाई तिचं कार्य अजून जोमाने करू लागली. आता राहीबाई एप्रिलच्या सुट्टीत लेकाला घेऊन इकडे तिकडे फिरायला लागली. त्याला सुट्टी असल्याने लांबच्या गावी जाऊ लागली. प्रत्येक गावी गेल्यावर ती देशी वाणांची गुणवत्ता आणि त्यांचं महत्व सांगायची.

तिचा सांगण्याचा क्रम कधीच चुकत नव्हता. आधी ती कोण, ती काय काम करते, त्यामागचा तिचा उद्देश काय हे सगळं सांगत असे. मग ती सांगत असे ते, देशी वाणांचं महत्व, त्यांची उपयुक्तता. त्यानंतर ती सांग असे ते सेंद्रिय खतांचं महत्व. ते सांगून झालं की ती संकरित बियाणांमुळे होणारे तोटे सांगत असे. त्यामुळे येणारी आजारपणं, त्यामुळे येणारी जीवनसत्त्वांची कमतरता, गर्भार स्त्रियांना होणारा त्रास, माता मृत्यू, बालक मृत्यू उद्दे सगळे तोटे सांगून झाल्यावर ती देशी वाण जपण्याचा आग्रह तिथल्या शेतकऱ्यांना करत असे. त्यासाठी तिने बीज बँक स्थापन करण्याची चळवळ सुरू केली हेही ती आवर्जून सांगत असे.

आता तिने तिच्या चळवळीत असलेल्या अनेक बायकांची उदाहरणं देखील द्यायला सुरुवात केली होती.

आता अनेक बियाणांच्या कम्पन्या तिला गाठू लागल्या होत्या. मागे तिला लाच आणि धमकी द्यायचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर पोलिसात तक्रार केल्यावर हे प्रकार बंद झाले होते. देशी बियाणं उत्पादनासाठी आता ह्या कंपन्या तिला गाठू लागल्या होत्या.

तसेच आता अनेक शेतकी महाविद्यालयात देखील तिला मार्गदर्शन देण्यासाठी बोलवण्यात येई. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तिला विशेष आनंद होत असे. कारण ती पुढची पिढी असते. ती घडली तर समाज घडेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना ती मार्गदर्शन करायला नेहमीच उत्सुक असे.

एकदा तिला एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला की, बियाणं संकरित करताना तर देशी बियाणंच घेतली जातात. मग त्या देशी बियांणापासून तयार झालेलं संकरित बियाणं त्रासदायक कसं? ह्यावर तिने जे उत्तम उत्तर दिलं, ते ऐकून कोणाचाही विश्वास बसला नसता की, ही बाई शाळेत गेली नाही. तरीही हिला विज्ञान पूर्ण समजलं होतं.

काय उत्तर दिलं असेल तिने? बीज बँक झाली का स्थापन ? उत्तरं पुढच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all