सीड मदर : संघर्ष तिचा भाग २०

A Woman Is Honoured With Padmashree Award


सीडमदर : तिचा संघर्ष

टीप : खरं तर एरवी कथेच्या खाली टीप द्यायची पद्धत असते. पण लेखिका म्हणून मला जे मांडायचं आहे, ते मला आधीच सांगायची उर्मी स्वस्थ बसू देत नाहीये. ही कथा आहे एका जिद्दी स्त्रीच्या संघर्षाची. एक असा संघर्ष जो तिला थेट पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करून गेला. ही कथा सत्य घटना, गोष्टी ह्यांवर आधारित असली, तरी काही ठिकाणी लेखन स्वातंत्र्य आणि कल्पनाशक्ती ह्यांचा संगम घडविणे मला आवश्यक वाटले. त्यामुळेच काही नावे, काही प्रसंग आणि काही स्थळे काल्पनिक असली, तरी जिची ही कथा आहे, ती स्त्री मात्र सत्यात आहे. १९६४ साली जन्माला आलेल्या ह्या स्त्रीची कहाणी आपण जाणून घ्यायला हवीच .

कथा : भाग २०

आता तिने सुंदरच्या बायकोला भेटायचं ठरवलं. ती त्या गावात गेली. सुंदरच्या घरी जाण्याआधी ती तिथल्या ग्राम पंचायतीत गेली. तिला बघून काही माणसे पुढे आली. कारण आता ती जवळजवळ सगळ्यांना माहिती होती.

तिने तिथल्या अधिकारी मंडळींना त्या गावातल्या शेतकऱ्यांची माहिती द्यायला सांगितली. त्यांची यादी घेऊन त्यांची बाकीची देखील माहिती तिने घेतली. तिथल्या ग्रामसेवकाला तिने त्याच संध्याकाळी एक सभा आयोजित करायला सांगितली. आणि तिनं हे ही सांगितलं की, बायका मंडळींना पण त्या सभेला यायला सांगा.

ग्रामसेवकाने त्याप्रमाणे केले. छोटंसं गाव ते. त्यामुळे संध्याकाळच्या सभेची बातमी लगेच गावभर झाली. संध्याकाळी साधारण साडेसहा वाजता सभा ठरली होती. त्यासुमारास ठरलेल्या जागी गावकरी जमले. आणि खरोखरच बायकांचं प्रमाण लक्षणीय होतं.

तिने नेहमीच्या पद्धतीने वाकून नमस्कार केला आणि सुंदरच्या बायकोला तिच्याजवळ बोलावले. ती आधी तयारच नव्हती, पण राहीबाईच्या आग्रहाने कशीबशी ती शेवटी स्टेजवर आली.

राहीबाई बोलू लागली. बराच वेळ तो बोलत होती. तिने आधी सगळ्यांना परत एकदा देशी वाण आणि देशी प्रकारची सेंद्रिय शेती ह्यांचं महत्व समजावून सांगितलं. तेवढ्यात एक जण उठला आणि मोठयाने बोलला की ," किती वेळा तुम्ही तेच तेच सांगणार? गेल्या वेळी तुम्ही गावात आला होतात, तेव्हा हे सगळं ऐकलंय आम्ही. वेगळं काही असेल तर बोला. नाहीतर जातो आम्ही. तेच तेच परत ऐकून काय होणार"?

असं त्याने म्हणताच, ती बोलू लागली. तिने आधी त्याला खाली बसायला सांगितले. आणि मग तिने सुंदरच्या अवस्थेचे वर्णन केले. सुंदरची बायको स्टेजवर उभी राहून अश्रू ढाळत होती. सुंदर नेमका कसा कर्जाच्या जाळ्यात अडकत गेला, हे तिने सविस्तर सांगितलं.

तिच्या बोलण्याचा मतितार्थ असा होता की, आधी तुम्ही शेतकरी मंडळी उत्पादन वाढावे म्हणून कर्ज घेता, पण ते संकरित बियाणे असल्याने त्याच्यातून मिळणाऱ्या बियाणांची पुढच्या वर्षी पुनर्लागवड करता येत नाही. त्यामुळे तुम्ही पुन्हा कर्ज घेता. कधी दुष्काळ किंवा इतर काही संकटं येतात. त्यामुळे नापिकी होते. त्याचबरोबर तुम्ही भरमसाठ रासायनिक खतांचा वापर करता. त्यामुळे दर दोन वर्षांनी जमीन क्षारयुक्त होते. मग तुम्ही ती जमीन एक वर्ष पडीक ठेवता. तुमचं उत्पन्न बुडतं. उत्पन्न नसेल तर कर्ज फेडता येत नाही. मग बँकेचं कर्ज चुकविण्यासाठी तुम्ही खासगी सावकारांच्या नादी लागता. दुप्पट, तिप्पट व्याजदराने त्यांच्याकडून कर्ज घेता. मग ते कर्ज फेडता येत नाही. मग त्यांची दमदाटी सुरू होते. सोन्यासारखी जमीन त्यांच्या घशात जाते. तुम्ही अजून खचत जाता.

मग एके दिवशी तुम्ही सुंदरने घेतला तसा अविचारी निर्णय घेता. तुम्ही जाता हो! पण मागे राहिलेल्या तुमच्या बायकोने काय करायचं? तिनं तुमचं दुःख उरात दडवून जगत बसायचं.

तुम्ही गेलात म्हणून कोणी कर्ज माफ करत नाही. ते तुमच्या माघारी तुमच्या बायकोला फेडावं लागतंच. शिवाय तुमचे म्हातारे आईवडील, लग्न न झालेले भाऊ, बहीण, तुमची लहान लेकरं, तुमची शिल्लक शेती, हे सगळं तिनं एकटीनं बघायचं.

का असं? तुम्ही बेजबाबदार व्हायचं आणि तिने जन्मभर तुमची जबाबदारी घ्यायची. शेतकऱ्यांच्या बायकांनी आत्महत्या केल्याचं ऐकलं का कधी कोणी?

त्या उभ्या राहतात, जिद्दीने उभ्या राहतात. सुंदरच्या बायकोचं उदाहरण घ्या. जिद्दीने उभी राहिली परत. तिच्या एकटीवर सगळा भार असून सुद्धा तिने नाही असा निर्णय घेतला.

मी माहिती मागवली तुमच्या गावातल्या शेतकऱ्यांची. ती बघून लक्षात येतंय की गेल्या पाच वर्षात ह्या गावात एकूण सव्वीस आत्महत्या झाल्या. त्यातल्या बावीस आत्महत्या ह्या केवळ शेतकऱ्यांच्या होत्या. आणि कारणं बघा तुम्ही. कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या, हेच एकमेव कारण. बावीस परिवार उघड्यावर पडले. कोण जबाबदार ह्याला. तुमचा परिवार असा उघड्यावर टाकून जायचा अधिकार दिला कोणी तुम्हांला?

तिच्या ह्या बोलण्याने सगळ्यांनी माना खाली घातल्या. सगळ्यांना तिचं हे बोलणं पटत होतं. ज्याने मगाशी आगाऊपणा केला होता, त्याच्याच भावाने गेल्या वर्षी ह्याच कारणाने आत्महत्या केली होती. जवळजवळ सगळे शेतकरी कर्जबाजारी होते.

शेवटी एक जण उठला आणि त्याने ह्यावर काय उपाय करता येईल ते विचारले.

त्यावर तिने मोठ्या खणखणीत आवाजात त्या गावातल्या बायकांची साथ मागितली. तिने तिचे मनसुबे बोलून दाखवले. तिला बायकांची साथ हवी होती. कारण तिला बीज बँक स्थापन करायची होती. त्या कामी जर तिला ह्या सगळ्या बायकांची साथ मिळाली तर ती हे अशक्य काम शक्य करू शकणार होती.

कोणी तरी स्त्री उठली आणि तिने बीज बँक म्हणजे काय असे विचारले.

ह्यावर राहीबाईने बीज बँक ह्या संकल्पनेचा अर्थ सांगायला सुरुवात केली.

तिने सांगितले की, जिथून शक्य आहे तिथून आपण देशी बीज जमा करूयात. त्याची संपूर्ण माहिती आपण जमा करायची. त्या देशी वाणांची जात कोणती, त्याला लागणारी जमीन कोणती, त्याला लागणारा पाऊस किती असावा, हवामान कसं असावं ही सगळी माहिती गोळा करायची. त्याची नीट नोंद ठेवायची. त्याची पेरणी करायची. त्याला संपूर्ण सेंद्रिय खत घालायचं. त्यामुळे त्यातूनच पुढे त्याला आलेली फळं किंवा धान्य हेही देशी वाण असणार. तेही संपूर्ण सेंद्रिय खतांवर पोसलेलं. त्यातलं थोडं विकायचं आणि थोडं परत पुढच्या वर्षीची बेगमी म्हणून ठेवायचं. असं करून आपल्याला कधीच देशी वाणांची कमतरता भासणार नाही. खऱ्या अर्थाने पोषणमूल्य असलेलं अन्न आपली पुढची पिढी खाईल. आणि निरोगी राहील.

हे सगळ्यांना फार पटलं. आता धाडसाने बायका उठून उभं राहून तिला साथ द्यायचं वचन देऊ लागल्या. सभा संपली असं घोषित करायची वेळच आली नाही. भर सभेत उठून बायका तिला भेटायला स्टेजवर येऊ लागल्या. तिची मतं मान्य असल्याचं सांगू लागल्या.

तिला फार धन्य वाटू लागलं. आता हे लोण इतर गावात पसरू लागलं. बायका एकत्र येऊ लागल्या. तिला येऊन भेटू लागल्या.

तिला तिच्या एका परिचयाच्या वकिलाने ह्या स्त्रियांची नोंदणी करण्याचा सल्ला दिला. तिने सुंदरच्या बायकोला हाताशी धरलं. कारण ती दहावी शिकलेली होती. भेटायला येणाऱ्या बायकांचं नाव, गावाचं नाव, पत्ता ह्यांची नोंदणी तो करू लागली. ह्या कामी राहीबाई तिला थोडे पैसे देई. तिलाही उत्पन्न मिळू लागले. ती देखील ह्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार करू लागली. बायका आपल्या माहेरच्या गावांत देखील हे सांगू लागल्या. कधी नव्हे ते बायका संघटित होऊ लागल्या. काहीतरी विधायक घडणार असले की समाजात तळापासून बदल व्हायला लागतात.

असे करत करत जवळजवळ साडेतीन हजार बायकांची नोंद तिच्या रजिस्टर मध्ये झाली. आता राहीबाईने पुढचं पाऊल उचलायचं ठरवलं. तिचं हे कार्य एका अत्यंत दिग्गज व्यक्तीला ठाऊक झालं? ती व्यक्ती तिला लवकरच भेटणार होती.

काय असेल पुढचं पाऊल? होणार का बीज बँक स्थापन? कोण असेल ती दिग्गज व्यक्ती? उत्तरं पुढच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all