सीड मदर ' संघर्ष तिचा भाग १८

A Woman Is Honoured With Padmashree Award


सीडमदर : तिचा संघर्ष

टीप : खरं तर एरवी कथेच्या खाली टीप द्यायची पद्धत असते. पण लेखिका म्हणून मला जे मांडायचं आहे, ते मला आधीच सांगायची उर्मी स्वस्थ बसू देत नाहीये. ही कथा आहे एका जिद्दी स्त्रीच्या संघर्षाची. एक असा संघर्ष जो तिला थेट पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करून गेला. ही कथा सत्य घटना, गोष्टी ह्यांवर आधारित असली, तरी काही ठिकाणी लेखन स्वातंत्र्य आणि कल्पनाशक्ती ह्यांचा संगम घडविणे मला आवश्यक वाटले. त्यामुळेच काही नावे, काही प्रसंग आणि काही स्थळे काल्पनिक असली, तरी जिची ही कथा आहे, ती स्त्री मात्र सत्यात आहे. १९६४ साली जन्माला आलेल्या ह्या स्त्रीची कहाणी आपण जाणून घ्यायला हवीच .

कथा : भाग १८

तिच्या डोक्यात बीज बँकेचा विचार अतिशय घट्ट रुजला. अगदी देशी बियाणासारखा. तिला आता दुसरं काही सुचत नव्हतं. त्याच्या जोडीला आता तिला अनेक ठिकाणी सल्ला घ्यायला माणसं बोलावत होती. तिच्या नावाचा बोलबाला होऊ लागला होता. मागे काही ठिकाणी जेव्हा ती आपण होऊन जात असे, तर तिचा अपमान देखील झाला होता. आता तीच माणसं तिला बोलावत होती.

ती आता गावोगावी जात होती. तिला अनेक सभांमध्ये उभं राहून आत्मविश्वासाने बोलताना पाहून तिच्या नवऱ्याला खूप छान वाटत होतं. तिचे सासरे किंवा तिचा नवरा कोणी ना कोणी तिच्या बरोबर असे. तिला शक्य तेवढं प्रोत्साहन तिच्या घरातले देतच होते. तिच्या सासूबाई तिचं बाळ आणि घर छान सांभाळत होत्या. थोडीफार कुरबुर त्यांची चालत असे, पण सुनेचं कौतुक देखील त्यांना फार होतं.

तिने अनेक ठिकाणी बीज बँकेविषयी चौकशी केली होती. मुळात बीज बँक काय असते, त्यासाठी काय करावं लागतं, काय कागदपत्रे लागतात, ती कशी जमवायची, त्याला पैसे किती लागतात, सहकारी बँकेत अकाउंट असावं लागतं का, त्याचं काही कायदेशीर नोंदपत्र असतं का, त्याचा फायदा कोणाकोणाला होतो, त्यात कोण सहभागी होऊ शकतं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ती मिळवायच्या प्रयत्नांत होती.

त्या कामी अनेक ठिकाणी तिला जावं लागत होतं. त्यामुळे आपसूकच तिचं धैर्य वाढलं होतं. तिची भाषा सुधारली होती. अनेक गोष्टी तिला ठाऊक झाल्या होत्या. अनेक गावांना तिच्या भेटी वाढल्या होत्या. ओळखी वाढल्या होत्या.

त्याचा देखील फायदा तिला होत होता. तिच्या गावाच्या आसपासचा बराच परिसर तिचा फिरून झाला होता. जवळची अनेक गावं तिची फिरून झाली होती. तिची भाषणं गाजू लागली होती.

अशातच तिला लक्षात आलं की, फक्त गावांमध्ये नाही तर आदिवासी पाड्यांमध्येही आजारपण खूप जास्त आहे. तिचा विचारांचा आवाका खूप वाढला होता. ती आता पूर्वीची खेडवळ राहीबाई राहिली नव्हती. शाळेत गेली नसली, तरी ती फार परिपक्व झाली होती. कोणाला सांगून खरं वाटलं नसतं की, ती अशिक्षित आहे ते. तिचा आत्मविश्वास, तिचं ज्ञान, तिचा आवाका सगळंच फार देखणं होतं. तिची तळमळ तिच्या शब्दांतून डोकावत असे

ती जेव्हा सभेला उभं राही, तेव्हा पदर सावरून शालीनतेने सगळ्यांना वाकून नमस्कार करीत असे. अर्धी सभा तिथेच जिंकली जात असे. उरलेली अर्धी तिच्या बोलण्याने काबीज होत असे.

त्याचाच परिणाम म्हणून तिला काही माणसं डोळ्यावर धरू लागली होती. विशेषतः कंपन्यांचे एजंट्स तर तिला गाठायचा विचार करीत होते.

अशीच एकदा अंगणात ती तांदूळ निवडीत बसली असताना दोन माणसं आली. तिने चटकन पदर सावरून आतली वाट धरली. आणि सासरेबुवांना बाहेर पाठवले. ते बाहेर गेले.

बाहेर दोन अनोळखी माणसे बघून त्यांनी त्यांना बसायला सांगितले. गूळ पाणी झाल्यावर त्या माणसांना त्यांनी येण्याचे कारण विचारले.

लोचट हसत ती माणसं म्हणाली, " साहेब, ते तुमच्या सूनबाई, जरा त्यांच्याकडे काम होतं. जरा बाहेर येतील का त्या"?

" काय काम आहे , मला सांगा. मी सांगतो त्यांना", त्या माणसाचं हसणं न आवडून ते म्हणाले.

🎭 Series Post

View all