सीड मदर : संघर्ष तिचा भाग १३

A Woman Who Is awarded With Padmashree


सीडमदर : तिचा संघर्ष

टीप : खरं तर एरवी कथेच्या खाली टीप द्यायची पद्धत असते. पण लेखिका म्हणून मला जे मांडायचं आहे, ते मला आधीच सांगायची उर्मी स्वस्थ बसू देत नाहीये. ही कथा आहे एका जिद्दी स्त्रीच्या संघर्षाची. एक असा संघर्ष जो तिला थेट पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करून गेला. ही कथा सत्य घटना, गोष्टी ह्यांवर आधारित असली, तरी काही ठिकाणी लेखन स्वातंत्र्य आणि कल्पनाशक्ती ह्यांचा संगम घडविणे मला आवश्यक वाटले. त्यामुळेच काही नावे, काही प्रसंग आणि काही स्थळे काल्पनिक असली, तरी जिची ही कथा आहे, ती स्त्री मात्र सत्यात आहे. १९६४ साली जन्माला आलेल्या ह्या स्त्रीची कहाणी आपण जाणून घ्यायला हवीच .

कथा : भाग १३

तिने रात्र झाल्यावर सखू, दुर्गामावशी ह्यांच्याशी गप्पांचा फडच ठोकला. सासरबद्दल भरभरून बोलत होती ती. सासूबाई थोड्या कडक होत्या. पण तेवढ्याच मायाळू पण होत्या. त्यांना सगळं वेळच्यावेळी शिस्तीत लागत असे. त्यात चूक झाली तर त्या त्यांच्या नवऱ्याला देखील ओरडत असत. हे सांगताना तिला खूप हसू येत होतं. तिने असं नवऱ्याला ओरडणं कुठेच पाहिलं नव्हतं. त्यामुळे सांगताना पण तिला कमालीचं हसू येत होतं.

सरतेशेवटी सगळ्या गप्पा झाल्यावर तिने तिचं हे सगळं निरीक्षण सांगितलं. आणि तिने त्यावर काही प्रश्न देखील विचारले.

सगळं नीट ऐकून दुर्गा म्हणाली, " पोरी अगं, तुजं अगदी खरं हाये बग. ह्या मातीशी आपली नाळ जोडलेली असते गं. आपुन तिला पिरेम दिलं, की ती त्येच हजार हातांनी परत देती. अन आपुन तिला तरास दिला, की तो बी ती हजार हातांनी परत देती. हा निसर्गाचा नियम हाये पोरी. पूर्वी समदं शेणखत अन गांडूळ खत ह्यावर चालायचं बग. शेतात शेळ्या, मेंढ्या बी बसवायचे लोक. त्यांची विष्ठा म्हनजी झाडास्नी, पिकास्नी अमृत व्हतं बग. शेन, मेलेले प्रानी, ह्ये मातीत कुजतंया. अन त्येचं जे खत व्हतं, त्ये लै ब्येस असतंय. त्यातून ही आपली काळी आई लै समृद व्हतीया. तिच्या पोटातून आलेलं समदं पीक मंग लै ग्वाड असतंय. त्ये खाऊन कंदीबी, कोन बी आजारी पडनार न्हाई. तू लहाणपनी ह्येच करायचीस. गोठ्यातून शेन घेऊन मंग तू ते तुज्या शेतात मातीत कालवायचीस. म्या बी हेच करते की. पन आता पूर्वीचं दिस न्हाई ऱ्हाइलं. आता समदी येगळी खतं असत्यात. ती त्या मोठ्या मोठ्या पोत्यात येत्यात. पानी बी लै लागतंय त्येला. तिकडं आटपाडीला कसं असंल कोनास ठाऊक? आताशा पोरं बी येत न्हाईत. लै जावंसं वाटतं बग. पन कोन नेनार"? एक उदास सुस्कारा सोडून दुर्गा बोटाने डोळ्यातलं पाणी टिपित बोलली. सखूच्या डोळ्यातून खळकन अश्रू ओघळले.

" का रडतीस आये? मावशी बी रडतीया. काय झालं? मला कोन सांगेल का"? राहीबाई म्हणाली.

" काही न्हाई, तू पुढं बोल. आता ह्ये समदं तू बोललीस त्येचा काय उपेग न्हाई. आपलं सरकार शानं न्हाई हुनार". दुर्गा म्हणाली.

" म्या येक प्रयोग करायचा ठरीवला हाये". असं म्हणून राहीबाईने तिच्या मनातलं सगळं ह्या दोघींना सांगितलं. ते ऐकून दोघींना फार आनंद झाला. दोघींनी तिची अलाबला घेऊन कानशीलावर कडकडा बोटं मोडली.

तेवढ्यात सखूने तिला तो प्रश्न विचारलाच. तिची कूस कधी उजवणार, हे तिला आता सगळेच विचारत होते. लग्नाला आता सहा महिने झाले होते. त्यावर राहीबाईकडे उत्तर नव्हते. अजून थोडा वेळ गप्पा मारून तिघी झोपायला गेल्या.

राहीबाईच्या डोक्यात एक छान योजना आकार घेत होती. त्याचाच विचार करत ती झोपी गेली. पहाटे लवकर उठून सगळं आवरून ती तिच्या शेतात गेली. ती नव्हती तरी, तिच्या दुर्गामावशीने तिच्या छोट्याशा शेताची चांगली निगा राखली होती. ज्वारीची कणसं डुलत होती. त्यावर पाखरं बसून झुलत होती. गार वारा सुटला होता. सुंदर वातावरण होतं. ती पाटलांच्या मोठ्या शेतात गेली. पाटील एका झाडाखाली खुर्चीवर बसले होते. रेडिओ वर बातम्या ऐकत होते. तिला आलेलं बघून ते चटकन उठले.

त्यांचा उदास चेहरा बघून तिच्या काळजात गलबलून आलं. तिच्या आईने तिला पाटील आणि बायजा ह्यांच्या बद्दल सगळं सांगितलं होतं. पाटलांनी तिला अगदी बापाची माया दिली होती. त्यामुळे तिला त्यांची फार माया होती. जे घडलं त्यात ना पाटलांची चूक होती, ना बायजाची. होती फक्त काळाची चूक. जुने विचार, स्त्रीला कमी लेखण्याची परंपरा, तिचं समाजातलं दुय्यम स्थान, मुलगा असणं म्हणजे तिच्या आयुष्याची इतिकर्तव्यता, चूल आणि मूल ह्यापलीकडे तिचं समाजानेच नाकारलेलं अस्तित्व, आणि ह्यावर कडी म्हणजे स्त्रीनेच स्त्रीला कमी लेखणं हे त्याकाळी सर्रास होतं. सरकारी कायदे बायकांच्या बाजूने होत होते. पण लोकांची मानसिकता मात्र बदलत नव्हती. तरी शहरात जरा तरी बरी स्थिती होती. गाव खेड्यात अजून तशीच बिकट अवस्था उशाशी घेऊन समस्त स्त्री वर्ग झोपत होता. गंमत अशी की स्त्रीला स्वतःलाच तिच्यावर अन्याय झालेला कळत नव्हता. अज्ञान असणं चूक नाही पण अज्ञानी असण्याची जाणीव नसणं ही मोठी चूक असते.

राहीबाई क्षणात पाटलांच्या पाया पडली. तिच्या नाकातली नथ बघून पाटलांच्या डोळ्यात एक भकास भाव चमकून गेला. बायजाच्या काळजात पुन्हा गलबलून आलं. बायजाची नथ बघून पाटील फार अस्वस्थ झाले होते. पण तिच्यासमोर त्यांनी स्वतःला सांभाळलं. त्यांच्याशी थोडं बोलून ती परत वाड्यात आली. चार दिवस आराम करून पुन्हा घरी गेली. तेव्हा तिच्या डोक्यात विचारांची, कृतीची एक पक्की सांगड बसली होती. काहीही करून तिला विषमुक्त शेती ही लोकांना शिकवायचीच होती.

दुसऱ्या दिवशी तिने तिच्या नवऱ्याशी तिच्या मनातलं सगळं बोलून टाकलं. एकीकडे घरातले तिला तिच्या मनासारखं करायला, तिने ठरवलेले प्रयोग करायला नाही म्हणतील, असं तिला वाटत होतं. तिची भीती सार्थ ठरणार असं तिला तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्याकडे बघून वाटत होतं. तो त्यावर आधी काहीच बोलला नाही.

आईबाबांशी बोलून सांगतो असं तो म्हणाला आणि तिची निराशा झाली. तिला वाटलं होतं की निदान तो तिचं ह्या निरीक्षणाबद्दल कौतुक करेल, तिला प्रोत्साहन देईल, पण त्याचा चेहरा बघून तिला काही बोलता आलं नाही.

दुसऱ्या दिवशी तिच्या सासूबाईंनी तिला त्यांच्या खोलीत बोलावलं. तिचे सासरे सुद्धा तिथेच होते. नवराही होता. तिला एकदम भीती वाटली. बहुतेक आता तिला सगळे ओरडणार असं तिला वाटून गेलं. आणि काहीही ऐकायच्या आधीच तिची मान खाली गेली. डोक्यावरचा पदर सावरून डोळ्यांत आलेलं पाणी निग्रहाने माघारी लावून ती उभी राहिली. तिचे सासरे तिला म्हणाले, " सोमा बोलला माझ्याशी. तुला काही बोलायचं हाये का त्या बाबतीत? आत्ताच बोल. नंतर तुला इथं बोलता येणार नाही". \"इथं\" वर जोर देऊन तिचे सासरे म्हणाले.

तिला आता पक्की खात्री पटली की, बहुतेक तिला माघारी घरी लावून देणार. तसं झालं तर आई काय म्हणेल? बाबा काय म्हणतील? घरातले बाकीचे काय म्हणतील? हा समाज काय म्हणेल? तिकडे कित्ती ओरडतील सगळे? परत इथे बोलवतील ना? की कायमचं तिकडे पाठवतील? असे अनेक प्रश्न तिच्या डोळ्यांच्या कडा ओलांडू बघत होते.

तितक्यात तिचे सासरेच म्हणाले, " म्या येक काम करतो. चावडीवर जातो आणि समद्या लोकास्नी सांगतो की, ह्या पुनवंला समदे लोक माह्या शेतात जमा. माझी सूनबाई तुमच्याशी बोलनार हाये. पन बोलाल ना नीट? घाबरनार न्हाई ना इतक्या लोकांम्होरं? अन समदं ईस्कटून सांगा बैजवार. तवाच कळल ह्या अडाण्यास्नी".

तिचा तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. तिनं चटकन पुढे होऊन त्यांचे आणि सासूबाईंचे पाय शिवले. तिला तोंड भरून आशिर्वाद देऊन दोघं उठले. तिच्या सासूबाईंनी तिला जवळ घेतलं. तिची अलाबला घेऊन त्यांनी आपली बोटं कडाकडा कानशिलावर मोडली. आणि न राहवून ती एकदम त्यांच्या गळ्यात पडली.

काय बोलणार राहीबाई? कळेल का सगळ्यांना? सासरची मंडळी तिची अशीच साथ देणार का? उत्तरं उद्याच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all