सीड मदर : संघर्ष तिचा भाग १२

A Woman Is Honoured With Padmaahree Award

सीडमदर : तिचा संघर्ष

टीप : खरं तर एरवी कथेच्या खाली टीप द्यायची पद्धत असते. पण लेखिका म्हणून मला जे मांडायचं आहे, ते मला आधीच सांगायची उर्मी स्वस्थ बसू देत नाहीये. ही कथा आहे एका जिद्दी स्त्रीच्या संघर्षाची. एक असा संघर्ष जो तिला थेट पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करून गेला. ही कथा सत्य घटना, गोष्टी ह्यांवर आधारित असली, तरी काही ठिकाणी लेखन स्वातंत्र्य आणि कल्पनाशक्ती ह्यांचा संगम घडविणे मला आवश्यक वाटले. त्यामुळेच काही नावे, काही प्रसंग आणि काही स्थळे काल्पनिक असली, तरी जिची ही कथा आहे, ती स्त्री मात्र सत्यात आहे. १९६४ साली जन्माला आलेल्या ह्या स्त्रीची कहाणी आपण जाणून घ्यायला हवीच .

कथा : भाग १२

सोमा घरी परत आला, आणि बराच वेळ पाटलांच्या बोलण्याचा विचार करत बसला. त्याला हवं सगळं फार नवीन होतं. संसाराचं सगळं मर्म त्याला समजलं असं त्याला वाटत होतं. त्याने घरात आल्यावर राहीबाईला हाक मारली. ती आली तशी त्याने तिला बसवलं आणि विचारलं, " तुला काय आवडतं"?

" म्या समजले न्हाई जी धनी". राहीबाई म्हणाली. ती फारशी बोलत नसे. तिच्या शेतीच्या आवडीबद्दल सोमाला ठाऊक होतं खरं तर. पण लग्न होऊन ती ह्या घरात आल्यापासून फक्त चुलीशी असे. तिने अजून एकदाही घरचं शेत बघितलं नव्हतं. 

तो म्हणाला, " तुला शेत बघाया न्हेऊ का आपलं? येशीला का माझ्यासंग"?

" खरंच? नेशीला का धनी मला? मला लै आवडतंय बगा. अक्षी म्या रोज माह्या शेतात जायची. मला याडच हाय त्याचं. कवा नेशीला"?  एवढं एका दमात बोलून झाल्यावर तिला लक्षात आलं, की आईने सांगितलं होतं. जास्त तोंड उघडायचं नाही. एकदम वरमून तिने मान खाली घातली. सोमा मोठयाने हसला.

" म्या बाबांचा इच्चार घेतो अन तुला सांगतो. तवर जरा च्या पाज". सोमा असे म्ह्णून उठला आणि बाबांच्या खोलीत गेला. 

बाबा म्हणाले, " अरं, पाटील कुटं हायेत? म्या वाट बगतुया त्यांची. जरा बोलायचं होतं". 

" त्ये लगीच ग्येले. जरा घाई होती त्यांस्नी. म्या एक बोलू का"? सोमाने विचारले. बाबांनी मान हलवताच तो पुढे म्हणाला, " म्या कारभारनीला शेतात न्हेऊ का? न्हाई मंजी तिला लै कळतं त्यातलं. घरातलं समदं उरकल्यावर नेतो. चालंल का"?

बाबांनी होकार देताच तो पटकन माजघरात आला. बायकोने आणलेला चहा पीत पीत त्याने आईला पण तेच विचारलं. बाबांनी होकार दिला म्हटल्यावर आईने पण होकार दिला. तसं सगळं आवरून दोघं दुपारचे शेतात आले. एवढं मोठं शेत बघून राहीबाई हरखली. फुलपाखरासारखी ती इकडून तिकडे नुसती शेतभर बागडत होती. माती उचलून त्याचा वास घेत होती. तिने संपूर्ण शेत फिरून पाहिलं. शेतात कितीतरी प्रकारच्या भाज्या लावल्या होत्या. भरघोस पीक आलेलं दिसत होतं.

" आपन खत कोणतं वापरतो जी? अन बियानं कुठून आणतो? अन इकतो कुटं"? तिचे प्रश्न संपायचं नाव घेत नव्हते.

तिच्या अनेक प्रश्नांची उत्तरं देता देता सोमा आणि इतर मजूर दमून गेले. तिचा उत्साह अवर्णनीय होता. 

सगळं बघून झालं आणि ते घरी आले. घरी आल्यावर पण ती सासूशी तेच बोलत होती. जशी जास्त बोलायला लागली, तशी सासूने डोळे वटारले. ती एकदम गप्प बसली.

आता ती रोज शेतात जाऊ लागली होती. निरीक्षण हा तिचा अत्यंत महत्वाचा गुण होता. प्रत्येक गोष्टीत तिला रस होता. सकाळी सगळं चटचट उरकून भाकरतुकडा घेऊन दोघं शेतात जात असत. सोमा तिला घेऊन बाजाराला पण जात असे. हेतू हाच की, तिला भाजीपाला, इतर गोष्टी कशा विकल्या जातात ते दाखवावे.

ती मन लावून शिकत होती. भारत देश हरित क्रांतीच्या हिरव्या रंगात रंगत चालला होता. वाढत्या लोकसंख्येला पोट भरण्यासाठी शेतीत सुरू केलेले अनेक प्रयोग यशस्वी होत होते. पंचवार्षिक योजना आकार घेत होत्या. गावोगावच्या सहकारी बँका शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यासाठी नवीन योजना आणत होत्या. शेतात विहीर खणण्यासाठी कर्ज, बैलांसाठी कर्ज, शेतीच्या अवजारांसाठी कर्ज, ट्रॅक्टरसाठी कर्ज मिळत होती. सावकारांच्या जाचातून शेतकरी मुक्त व्हायला लागले होते.

राहीबाईच्या एक लक्षात आलं होतं की, बियाणं दरवर्षी विकत घ्यावं लागतं. फक्त त्यांनाच नाही, तर इतर अनेक शेतकऱ्यांना देखील बियाणं, रासायनिक खतांच्या खरेदीसाठी बँकेत धाव घ्यावी लागत होती.

दूधदुभत्याला ऊत आला होता देशात. देशी वाणाच्या गायी कमी झाल्या होत्या. जर्सी गायींचं प्रमाण वाढलं होतं. शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी बेसुमार खतं वापरण्याची सवय लागायला लागली होती. 

निरीक्षण करताना तिच्या अजून एक गोष्ट लक्षात आली होती. जी फारच त्रासदायक होती. 

कुठली गोष्ट होती ती? तर आजारपणाचं वाढलेलं प्रमाण. तिच्या आजूबाजूला ती बघत होती. पूर्वी ज्या आजारांची नावं देखील कधी ऐकली नव्हती, ती देखील आता कानावर पडत होती. लहान मुलांच्या कुपोषणाचा टक्का प्रचंड वाढला होता. अपुऱ्या दिवसांची बाळं जन्माला येण्याचं प्रमाण फार वाढलं होतं. माता मृत्यू हा सुद्धा एक चर्चेचा विषय झाला होता. 

एकदा बियाणं पेरलं की, ते निसर्ग नियमानुसार उगवायला हवं. पण त्या बियाणांची उगवण क्षमता कमी असे. पेरलेल्या सगळ्या बिया उगवत नसत. तसंच त्यातून मिळणारं उत्पादन जरी भरघोस असलं तरी त्यातून येणारी फळं, त्यातून येणाऱ्या बिया परत जपून ठेवल्या तर पुढच्या वर्षी उगवत नसत. त्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी नवीन बियाणे घ्यावे लागत असे. त्यामुळे त्यांचा खर्च अफाट वाढला होता.

सतत रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीचा पोत देखील बिघडत चालला होता. त्या खतांच्या अती वापराने येणारी पिकं ही त्यांचा अंश घेऊनच येत होती. ते अन्न पोटात जाऊन जाऊन कमी कसदार अन्न माणसांच्या तब्बेतीवर परिणाम करू लागलं होतं. तिच्या लहानपणी जसं वातावरण होतं, तसं आता तिला दिसेना. तिने ही सगळी चर्चा दुर्गामावशी बरोबर करायची ठरवली.

एकदा ती घरात तांदूळ निवडत असताना तिला थोडं मळमळू लागलं. ती पटकन उठली. घराच्या मागे जाऊन तिने उलटी केली. विहिरीवर तोंड धुवून घरी आल्यावर तिने हे सासूबाईंना सांगितलं. त्यांना फार आनंद झाला. त्यांची एकडम गडबड सुरू झाली. तिला त्यांनी बसवलं, पाणी दिलं. आणि गड्याहाती वैद्यबुवाना बोलावणं धाडलं. ते आले आणि त्यांनी तिची नाडी परीक्षा केली आणि तालुक्याच्या ठिकाणी सरकारी हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितलं. मग मात्र सगळे घाबरले. सोमाने पटकन बैलगाडी जुंपली आणि तिला घेऊन तालुक्याच्या गावी घेऊन गेला. तिथे तिची तपासणी झाल्यावर असं लक्षात आलं की, तिला अन्नातून विषबाधा झाली होती. तिच्या सासूबाईंना वाटलं होतं तसं काहीही नव्हतं. 

घरी येऊन तिला झालेला त्रास सोमाने सांगितला. तिच्या सासूबाई नाराज झाल्या. पण बोलल्या मात्र काहीच नाहीत. तिला आराम करायला सांगून त्या आत निघून गेल्या. दोन दिवसांनी तिला बरं वाटू लागलं. ती परत पूर्वीसारखी शेतात जाऊ लागली. तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिने विषारी किटकनाशक मारलेल्या झाडाचं अंजीर तोडून तिथेच खाल्लं होतं. 

आता तिच्या विचारांना परत चालना मिळाली. म्हणजे संकरित बियाणं, रासायनिक खतं, आणि कीटकनाशकं हे तीन शेतीचे मित्र होण्याऐवजी शत्रू झाले होते. तिला ह्यातून मार्ग शोधणे आवश्यक वाटू लागले.

तिने घरी येऊन दोन दिवस माहेरी जाण्याची परवानगी मिळवली आणि ती माहेरी आली. सगळ्यांना भेटून झाल्यावर तिने दुर्गामावशीला हळूच सांगितलं की रात्री आपण थोडं बोलू म्हणून. दुर्गा हो म्हणाली. पण तिला काही अंदाज येईना. तिने आपलं मनात देवाला सगळं नीट असू दे म्हणून साकडं घातलं. आणि रात्र होण्याची वाट बघू लागली.

तिने हे सगळं निरीक्षण तिच्या डोक्यात पक्कं करून ठेवलं होतं. ह्याचं कारण विचार करून करून तिच्या लक्षात आलं होतं. रासायनिक खतांचा बेसुमार वापर, आणि संकरित बियाणं हाच खरे तर सगळ्या त्रासाचा मूळ उगम होता. एकदा तिने बोलता बोलता तिच्या नवऱ्याला हे निरीक्षण ऐकवलं. अर्थातच प्रथम त्याने ही गोष्ट उडवून लावली. त्याला हे पटलंच नाही. तिने त्याला समजावण्याचा एक वेगळा मार्ग निवडायचा 
ठरवला. 

इकडे पाटलांच्या घरी देखील आता वेगळी परिस्थिती नव्हती. धो धो पीक येत होतं. दरवर्षी बियाणं विकत घेतलं जातं होतं. त्याचा परिणाम म्हणून खूप पैसा घरात येऊ लागला होता. राहीबाई जेव्हा जेव्हा माहेरी जाई, तेव्हा तेव्हा ती शेतात जात असे. तिने तिचं हे निरीक्षण तिच्या लाडक्या दुर्गामावशीला ऐकवलं. 

काय होतं त्यावर तिचं उत्तर? सोमाला समजावं म्हणून काय युक्ती करणार राहीबाई? तिच्या संसारात चिमुकलं फूल कधी फुलणार? ह्या सगळ्याची उत्तरं उद्याच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all