सीड मदर : संघर्ष तिचा भाग ११

A Woman Is Honoured With Padmashree Award


सीडमदर : तिचा संघर्ष

टीप : खरं तर एरवी कथेच्या खाली टीप द्यायची पद्धत असते. पण लेखिका म्हणून मला जे मांडायचं आहे, ते मला आधीच सांगायची उर्मी स्वस्थ बसू देत नाहीये. ही कथा आहे एका जिद्दी स्त्रीच्या संघर्षाची. एक असा संघर्ष जो तिला थेट पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करून गेला. ही कथा सत्य घटना, गोष्टी ह्यांवर आधारित असली, तरी काही ठिकाणी लेखन स्वातंत्र्य आणि कल्पनाशक्ती ह्यांचा संगम घडविणे मला आवश्यक वाटले. त्यामुळेच काही नावे, काही प्रसंग आणि काही स्थळे काल्पनिक असली, तरी जिची ही कथा आहे, ती स्त्री मात्र सत्यात आहे. १९६४ साली जन्माला आलेल्या ह्या स्त्रीची कहाणी आपण जाणून घ्यायला हवीच .

कथा : भाग ११

आता घरात हळूहळू लग्नाची तयारी सुरू झाली. इतक्यात दुर्गाचा मुलगा आला आणि त्याने दुर्गाकडे एक पुडकं दिलं. तिने चटकन ते पुडकं पदराखाली लपवलं आणि मुलाला माघारी धाडून ती मागच्या अंगणातल्या खोपट्यात गेली.

रात्र झाली. सखू झोपायला खोपट्यात आली. राहीबाई झोपली होती. बाकीच्या बायका पण झोपायच्या तयारीत होत्या. दुर्गाने हळूच कोणाच्याही नकळत सखूला बाहेर यायची खूण केली. सखूला काही कळेना. पण ती हळूच बाहेर आली. दुर्गा देखील बाहेर आली. दुर्गाने हातातलं पुडकं सखूच्या स्वाधीन केलं. सखूने विचारलं, " काय हाये गं ह्यात? जड लागतंया हाताला".

" ह्यात पैकं हायेत. पोरीच्या लग्नाला व्हतील. जपून ठिवा दोगं बी". दुर्गाने असं म्हणताच सखूने आश्चर्याने विचारलं, " कसलं पैकं गं? आन तुज्याकडे कुठून आलं इतकं"?

" तुला कशाला पंचाईत पडली? म्या सांगतीया त्येवडं कर फकस्त". दुर्गाने असं म्हणायचा अवकाश की, सखूने तिचा हात धरला. आणि पुढे म्हणाली, " ताई खरं खरं सांग बगू. मला नगं नाहीतर ह्ये. बगीन म्या पैकं कुटून आनायचं त्ये. तू माह्या मोठ्या बहिनीवानी हायेस. ह्ये बी तुला ताईच म्हनत्यात. सांग अदुगर".

दुर्गा सांगेचना. सखू हट्टाला पेटली, तिला राहीबाईची शप्पथ घातली. ही मात्रा मात्र लागू पडली. दुर्गाने राहीबाईच्या लग्नासाठी स्वतःची जमीन विकल्याचं सांगितलं. हे ऐकून सखूच्या डोळ्यात पाणी आलं. ती धन्य झाली. दोघींचा रक्ताचा संबंध नसताना दुर्गाने राहीबाईसाठी केलेला त्याग, तिच्यासाठी लहानपणी घेतलेले श्रम, दोघींचं असलेलं खास नातं, सगळं सगळं सखूच्या डोळयांत अश्रूंच्या रूपाने गोळा झालं.

" न्हाई गं ताई, नगं मला ह्ये पैकं. तुज्या पोरांस्नी हुईल ती जमीन. तुज्या पोरांच्या तोंडचा घास काडून कशापायी देतीस"? सखू असं म्हणाताच दुर्गा चिडली.

" का माझी कोनी बी न्हाई का तुजी पोर? लै शानपना करू नगंस. आली मोटी मला शिकीवनारी". दुर्गा रडत रडत म्हणाली. सखूने पटकन तिला मिठी मारली. आणि दोघींच्या डोळ्यातून राहीबाईच्या प्रेमाचे आणि त्याच्या गोड बंधाचे मोती ओघळू लागले.

बघता बघता तिच्या लग्नाची तयारी झाली देखील. पाटलांनी भरपूर मदत केली. दुर्गाने दिलेले पैसे होतेच. त्यामुळे राहीबाईचं लग्न रीतीने पार पडलं. आणि सौ. राहीबाई सोमा पोपेरे अशा नावाने तिने गृहप्रवेश केला.

पोर सासरी गेली, आणि सगळ्यांनाच घर सुनं वाटायला लागलं. तिचा लळा सगळ्यांनाच होता. त्या रात्री बायजा, पाटील, दुर्गा, सखू, बिरजू कोणीच जेवण केलं नाही. तिचं सगळं लहानपण, तिच्या खोड्या, तिचं मातीचं प्रेम, तिच्या शेतीच्या गप्पा, छोटंसं तिचं शेत, तिचा लडिवाळपणा, गोड बोलणं, आणि त्यावर कडी म्हणजे तिचं अत्यंत गोड हसणं, सगळं सगळं आठवत तिचा बाप, बिरजू मुख्य चौकात एका कोपऱ्यात शांत बसून होता.

बायका रडून मोकळ्या झाल्या, पण पुरुष कसे रडणार? समाजाने पुरुषांवर हजारो वर्षे केलेला हा अन्याय कधीच कोणाला जाणवत नाही.

राहीबाई जेव्हा निघत होती, तेव्हा तिच्या हातात बायजाने काहीतरी दिलं. सखूने विचारलं सुद्धा," काय दिलं मालकीन बाई"? तेव्हा बायजाने काहीच सांगितलं नाही. घरी आल्यावर सखूने सगळं आवराआवर झाल्यावर पुन्हा विचारलं. तेव्हा बायजाने स्वतःची सोन्याची मोठी नथ तिला दिल्याचं सांगितलं. सखूला आता मात्र फार भरून आलं. सगळ्यांच्या प्रेमाने भारावलेली सखू ओले डोळे घेऊन रात्रभर बसून राहिली.

असेच काही दिवस गेले. मुलीचं पहिलं माहेरपण झालं. पाटलांकडून घसघशीत आहेर झाला. सगळे परत गेले. त्या रात्री बायजाला पाटील परत म्हणाले, " माफी द्या हो! मला खरंच तुला तरास द्यायचा नव्हता. आईम्होरं माझं काय बी चालत नव्हतं. म्या तुला मनातून कंदी बी अंतर दिलं न्हाई. द्येवाची आन".

त्यावर बायजा कोरड्या डोळ्यांनी म्हणाली, " धनी, म्या कोन माफी देनारी? आनी आता माझं गेलेलं समदं दीस कोन परत करनार न्हाई. ना तुमी, ना सासूबाई. आता म्या ना तुमची बाईल, ना कोनाची सून. म्या म्हंजी येक मढं हाय जित्त. ज्या बाईपाई तुमी माझा छळ क्येला, ती बी एक बाईच व्हती. तरीबी तिला येवढा बाईचा राग. जाऊ द्ये. संपलं समदं. जेवा तुमी माझ्या बाजूनं बोलायला हवं व्हतं, तवा तुमी माघार घेतलीसा. म्या माझं घरदार, माझं आईबाप समदं सोडून तुमच्या हाताला धरून माप वलंडलं व्हतं. त्ये माप कंदीच माझ्या पदरात पडलं न्हाई. आता तर त्यो पदर इतक्या ठिकानी फाटला हाये, की त्यात आता काय बी उरायचं न्हाई. येक दिवस असा येईल धनी, की तुमाला लै पस्तावा हुईल. तिकडं ऱ्हात व्हतो, तर जरा तरी सुख व्हतं. माझी पोरगी बी जवळ व्हती. आता तर ती बी येत न्हाई. जाऊ द्ये, जाते म्या".

एवढं बोलून बायजा निघून गेली. पाटील भकास डोळ्यांनी तिच्या पाठमोऱ्या कृश आकृतीकडे बघत बसले. त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हतं.

दुसऱ्या दिवशी सखू नेहमीप्रमाणे पहाटे उठली. स्वतःचं आवरून तिने माजघरात येऊन बायजाला उठवलं. पण बायजा शांत झोपली होती. तिच्याकडून कसलाच प्रतिसाद आला नाही. अंग थंडगार लागत होतं तिचं. सखू घाबरली आणि तिने बिरजूला, आणि पाटलांना बोलावलं. पाटील आले आणि सगळा रागरंग बघून बिरजूला डॉक्टरला आणायला पाठवलं. मनातून ते अतिशय घाबरले होते. राहून राहून त्यांना रात्रीचं तिचं बोलणं आठवत होतं.


डॉक्टर आले. त्यांनी नाडी पाहिली. सगळं संपलं होतं. झोपेतच कधीतरी बायजा तिला छळणारं हे जग सोडून गेली होती. पाटील डोक्याला हात लावून मटकन खाली बसले. त्यांच्या डोळ्यांत पाणी नव्हतं. होता फक्त पश्चात्ताप. मरेपर्यंत असणारा अपराधी भाव आणि तिची वेळेवर साथ न दिल्याची तीव्र टोकदार जाणीव. सगळं घरदार तिथे जमलं. बायजाच्या जावा धाय मोकलून रडत होत्या. त्यांची मोठी बहीण गेल्यासारखा त्यांचा हा आक्रोश बघून सगळ्याच माणसांचे डोळे ओले झाले. सखू आणि दुर्गाची तर अवस्था बघवत नव्हती.

थोड्या वेळात राहीबाईकडे निरोप गेला. रुक्मिणीला निरोप गेला. सगळे आल्यावर तिचं दिवस कार्य पार पडलं. पंधरा दिवस झाले. मुली परत आपल्या घरी गेल्या. वाडा शांत होता. पाटलांची झोप उडाली होती, अन्नावरची वासना उडाली होती.

तिकडे राहीबाईच्या मनाची अवस्था फार वाईट होती. जणू काही तिचं लग्न होईपर्यंत बायजा जीव धरून होती. बायजाने तिच्या मुठीत दिलेली नथ ती पुन्हा पुन्हा बघत होती. असेच आठ दहा दिवस गेले. आता राहीबाई सासरी रमली होती. तितक्यात एके सकाळी तिच्या घरी कसलीही पूर्वसूचना न देता पाटील आले. तिने, आणि तिच्या सासरच्यांनी त्यांचं चांगलं स्वागत केलं.

पाटलांनी आणलेला माहेरचा वाणवळा तिला दिला. सगळ्यांसाठी आणलेल्या भेटवस्तू दिल्या. दुपारची जेवणं झाली. पाटलांनी तिच्या सासरेबुवांकडे जावयाबरोबर शेतात फेरफटका मारायची परवानगी मागितली. त्यांनीही आनंदाने ती दिली.

दोघं शेतात गेले आणि पाटील सोमाशी बोलू लागले. ते म्हणाले, जावईबापू, थोडं बोलायचं हुतं. म्हंजी अगदी मनातलं. बोलू का"?

" बोला की मामा. त्यात काय इच्चारायचं"? सोमा म्हणाला. तसं पाटलांनी त्यांची आणि बायजाची सगळी कर्मकथा त्याला ऐकवली. त्याला हे ऐकून फार वाईट वाटलं. पाटील म्हणाले, तुम्हांस्नी इच्चार पडला असेल ना! की मी इतकं आतलं का सांगतुया? मला फकस्त येक वचन हवं हाये. की काय बी हुदे, कोन बी काय बी सांगू दे, पन आपल्या बायलीला कंदी बी दूर करू नगासा. कुनाचं बी काय बी ऐकू नगा. तिला जलमभर साथ द्या. येकली कंदी बी टाकू नगा. म्या जलमभर ही जळती जखम घेऊनशान फिरनार आता. तुमच्या वाट्याला हे दुःख नगं. हे दुःख नगं". इतकं बोलून पाटील तिथूनच घरी निघाले.

त्यांना थांबवणं सोमाला शक्य झालं नाही. पाटलांच्या एकेक शब्दाचा तो विचार करत बसला.

आता सोमा देईल का राहीबाईला साथ? पुढे राहीबाई काय करणार? उत्तरं उद्याच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all