सीड मदर : संघर्ष तिचा भाग ८

A Woman Who Is Honoured With Padmashree Award

क्रमशःसीडमदर : तिचा संघर्ष

टीप : खरं तर एरवी कथेच्या खाली टीप द्यायची पद्धत असते. पण लेखिका म्हणून मला जे मांडायचं आहे, ते मला आधीच सांगायची उर्मी स्वस्थ बसू देत नाहीये. ही कथा आहे एका जिद्दी स्त्रीच्या संघर्षाची. एक असा संघर्ष जो तिला थेट पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करून गेला. ही कथा सत्य घटना, गोष्टी ह्यांवर आधारित असली, तरी काही ठिकाणी लेखन स्वातंत्र्य आणि कल्पनाशक्ती ह्यांचा संगम घडविणे मला आवश्यक वाटले. त्यामुळेच काही नावे, काही प्रसंग आणि काही स्थळे काल्पनिक असली, तरी जिची ही कथा आहे, ती स्त्री मात्र सत्यात आहे. १९६४ साली जन्माला आलेल्या ह्या स्त्रीची कहाणी आपण जाणून घ्यायला हवीच .

कथा : भाग ८

सगळ्यांनी बाहेरच्या मोरीवर हातपाय धुतले. आत जाणार तेवढ्यात बायजाच्या सासूबाई म्हणाल्या, " मोठ्या सूनबाई, आत जा आणि संध्याकाळच्या जेवणाचं बघा". दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी त्या बरीच वर्षे पुण्यात होत्या आणि दहावी शिकलेल्या सुद्धा. त्यामुळे त्यांची भाषा शुद्ध होती. पाटील आणि शिक्षण ह्यांचं काही फार जमलं नसल्याने त्यांची बायको म्हणजे बायजा देखील अशिक्षितच होती.

बायजाने यंत्रवत मान डोलावली आणि ती आत निघाली. जाताना तिनं पाटलांकडे पहिलं. त्यांच्या नजरेत कोणतेच भाव नव्हते. खरं तर तिकडे सगळं सामान बांधणं, हा एवढा बैलगाडीचा प्रवास, बायजाचं अंग मोडून आलं होतं. तहान लागली होती. कोणी हातात पाणी देईल तर बरं, असं वाटत होतं. पण तिला ठाऊक होतं, आता तिच्या त्रासाला सुरुवात झाली होती. आणि तो निमूट भोगण्याची मानसिक तयारी तिची झाली होती.

घरात ही एवढी माणसं! सगळ्यांचा स्वयंपाक म्हणजे आता तिचं हाड आणि हाड दुखून जाणार होतं. " म्या लुगडं बदलून येते जी, अन मंग करते समदं". बायजा कशीबशी म्हणाली.

सासूबाईंनी मान डोलावली आणि बायजा जिथे जोडप्यांच्या झोपण्याच्या खोल्या होत्या तिकडे कपड्यांची पिशवी घेऊन निघाल्या. पाटील मात्र बाहेरच्या चौकातल्या बाजल्यावर भावंडांशी गप्पा मारण्यात गुंतले. बिरजू, सखू आणि दुर्गाने सगळं सामान पाटलांच्या आईला विचारून जागेवर लावायला घेतलं. तेवढ्यात सखू म्हणाली, " मोठ्या मालकीन बाई, म्या आत जाऊ का? धाकल्या मालकीन बाईंच्या मदतीला? दुर्गा अन ह्ये दोगंबी लावत्याल समदं सामान".

बायजाच्या सासूबाई हो म्हणाल्या, तसं बायजाला आणि सखूला दोघींनाही हुश्श झालं.

सखू झरदिशी आत आली. तिनं स्वयंपाक घराचा ताबा घेतला. तिच्यासाठी हे घर नवं नव्हतं. त्यामुळेच असेल कदाचित त्यांनी परवानगी दिली.

तेवढयात बायजा कपडे बदलून आली. सासूबाईंना म्हणजेच दिपाबाईना विचारून काय करायचं ते ठरवावं लागणार होतं. बायजा सखूला म्हणाली, " इच्चार आत्यास्नी, काय करायचं त्ये".

त्यांचं बोलणं पूर्ण होण्याच्या आतच दिपाबाई आत आल्या. आज कोंबडं करा आणि भाकरी. रस्सा आणि भाकरी खातील सगळी. आणि हो! भात पण करा थोडा. मोजकं करा, उरेल तर दोघींना इथेच बसून खायला लावेन".

दोघींची नजरानजर झाली आणि खाली मान घालून दोघी हो म्हणाल्या. सखूने तरी धीर करून विचारलंच, " दोगी धाकल्या मालकीनी कुटं हायेत? त्या बी येनार हायेत का हिकडं मदतीला? न्हाई म्हंजी आम्हांस्नी लगीच अंदाज न्हाई यायचा न्हवं! मनूनशान इच्चारलं".

बायजा सखूच्या धाडसाकडे बघतच राहिली. तिला हल्ली सखूच्या वागण्यात फार धाडस आणि रोखटोखपणा जाणवू लागला होता. दिपाबाई पण बघतच राहिल्या. त्यांना ते पटलं असावं बहुतेक! त्या म्हणाल्या, त्या दोघींनाही पाठवते आणि यमीला पण पाठवते. यमी म्हणजे त्यांची हरकामी. म्हणजेच यमुना. तिला सगळे यमीच म्हणायचे. घरातलं लहान थोर सगळेच. लहान मुलं सुद्धा कधी तिला आदराने संबोधित नव्हती, की त्यांना कधी कोणी हे शिकवलं नव्हतं.

इतक्यात छुमछुम करीत छोटी राहीबाई तिथे आली. आणि थोडी बोबडी असलेली ही पिटुकली एकदम दिपाबाईना म्हणाली, " आजी, तू माज्याची बोललीच नाईश. मला तू आवल्लीश. मी तुज्याशी खेलू"?

राहीबाईकडे पाहून दिपाबाईनी नाक मुरडलं आणि त्या बाहेर निघून गेल्या. सखूने पटकन तिला उचललं आणि बाहेर दुर्गाकडे देऊन आली. आणि तिला सांभाळायला सांगितलं. आत येऊ देऊ नको, असंही सांगितलं. बायजा थकून बसली होती. तिकडे सगळी कामं भरभर करणारी बायजा इकडे मात्र मरगळून बसली होती. ती शारीरिक पेक्षा मानसिक दृष्टीने जास्त दमली होती. तिला आता तिचा भविष्यकाळ इथल्या चुलीत गेल्याचं स्पष्ट दिसत होतं. तिला कुठूनही आता तिकडे निदान दुपारी मिळणारा शांतपणा मिळणार नव्हता. फक्त कामाला जुंपून घ्यावं लागणार होतं. सखू आत आली आणि तिने बायजाला पाणी दिलं. बायजाच्या डोळ्यातलं पाणी सखूच्या दृष्टीस पडल्यावाचून राहिलं नव्हतं. ती काही बोलणार तेवढ्यात उरलेल्या दोघी सुना तिथे आल्या.

आल्या आल्या त्यातल्या मधलीने पटकन बायजापाशी बसून तिला गोड आवाजात सांगितलं, " मोठया जाऊबाई, तुम्ही काळजी करू नका. मी आहे तुमच्या मदतीला. सासूबाई नसतील तेव्हा मी करत जाईन मदत. त्या काही इकडं सतत फिरकत नाहीत. रोज आम्ही दोघीच करतो सगळं. तुम्ही दमला आहात. मी पटकन चहा करते तुम्हां सगळ्यांना".

धाकटी म्हणाली, " मी करते भाकरी भरभर. तुम्ही नका करू. चला गंगाताई, उठा पटकन. तुम्ही चहा करा, मी भाकरी करते".

गंगाताई म्हणाल्या, " ही बघ उठलेच. आणि सखू तू पटकन मसाल्याची तयारी कर. आणि ही यमी कुठं कडमडली? सुशीला, बाहेर लक्ष ठेव. ,सासूबाई दिसल्या तर सांग पटकन".

बायजा, गंगा आणि सुशीला ह्या तिघी जावा, त्यांच्यात नातं चांगलं होतं. पण सासूबाईंना ह्या तिघी एकत्र आलेल्या आवडत नसे. कारण एकच, बायजाला मुलगा नसल्याने तिने ह्या दोघींच्यात जाऊ नये असे त्यांना वाटायचे. बायजाचा त्या कमालीचा रागराग करीत. पण बाकीच्या दोघींना बायजाबद्दल प्रेम होते.

ह्या सगळ्या इकडे काम करीत असताना छोटी राहीबाई पुढच्या चौकात आली. अर्थात दुर्गाची नजर चुकवून. इकडे तिकडे खेळताना तिला बियाणं ठेवलेली खोली दिसली. फक्त ह्याच खोलीला कडी नव्हती. बाकीच्या खोल्या बंद होत्या सगळ्या. तिने बिनदिक्कत त्या खोलीचं दार उघडून आत पाऊल टाकलं. थोडा अंधार होता, पण ही धिटुकली सरळ आत गेली आणि वेगवेगळी पोती बघून त्यावर हात फिरवायला लागली. तिला आठवलं की दुर्गामावशी असं हे काहीतरी हातात घेते आणि मातीत घालून ठेवते. मग त्या मातीतून काहीतरी बाहेर येतं, जे हाताला मऊ मऊ लागतं. तिने तिच्या बाळमुठीत त्यातल्या एका पोत्यातलं बियाणं घेतलं आणि ती बाहेर आली. इकडे तिकडे माती शोधू लागली, पण तिला इथे माती दिसेना. ती परत दुर्गाकडे गेली आणि तिला भूर चल, भूर चल असं म्हणू लागली.

बिरजू म्हणाला, " जा बघा ताई तुमी तिला. कुटं जायाचं हाय तिकडं न्या, म्हंजी मला काम करता यील. न्हाईतर तरास द्येत बसंल उगी".

दुर्गाने तिला उचललं आणि मागच्या अंगणात आणलं. इकडे पण गाई, बैल बघून राहीबाई हरखली. ती दुर्गाच्या कडेवरून खाली उतरली आणि अंगणाच्या एका कडेला जाऊन छोट्याश्या बोटांनी माती उकरायला लागली. दुर्गाला कळेना ही काय करतेय? ती पुढे गेली तर तिला दिसलं की तिने मातीत हातातलं काहीतरी टाकलं. दुर्गा बघतेय म्हटल्यावर राहीबाईने पटकन त्यावर माती टाकली. दुर्गाला हसायला आलं. तिला ठाऊक होतं की ह्या मुलीला मातीचं प्रेम फार आहे. म्हणून तिने तिला अडवलं नाही. तिने जवळ येऊन राहीबाईला विचारलं, " काय करतीयास गं?
मला बी सांग की! हातात काय हाय तुज्या"?

राहीबाई म्हणाली, " मावशी, म्या शेत शेत खेळतीया". तिच्या ह्या बोलण्याचं दुर्गाला इतकं कौतुक वाटलं की, तिने पटकन तिला जवळ घेतलं. तेवढयात मागे चाहूल लागली म्हणून दुर्गाने वळून बघितलं तर एक उघडाबंब पहिलवान गडी तिच्याकडेच बघत होता. त्याची नजर तिला एकदम घाणेरडी वाटली. तिनं चटकन राहीबाईला उचललं आणि घरात घेऊन आली.

घरातल्या पुरुष माणसांची रात्रीची जेवणं पार पडली आणि सगळी पुरुष नोकर मंडळी मागच्या अंगणात जेवायला बसली. सखू, यमी, दुर्गा आणि दोन घरकामाच्या बायका अशा सगळ्या जणी घरातल्या स्त्रियांना वाढायला लागल्या तसं सासूबाई म्हणाल्या, " बायजा, तू मागनं बस, सखू आणि यमी बरोबर. मी गंगा आणि सुशीला आधी जेवतो. वाढ गं यमे मला".

सगळ्यांनाच ते खटकलं पण बोलणार कोण? दुर्गाने आधीच राहीबाईला जेवायला घातलं होतं आणि तिला दिलेल्या जागी झोपवलं होतं. सगळ्या कामकरी बायका रात्री मधल्या चौकात झोपत. आणि पाऊस असेल तेव्हा कोठीच्या खोलीत. आता त्यात सखू, दुर्गा आणि राहीबाईची पण भर पडली होती. तिघींची जेवणं झाली आणि ह्या बाकीच्या सगळ्या जेवायला बसल्या. बायजाला अपमान, दुःख आणि दमणूक ह्याने जेवण जाईना. कसेबसे दोन घास चिवडून ती उठली आणि स्वयंपाकघर आवरू लागली. पटकन बाकीच्या म्हणाल्या, "राहू दे, आमी आवरतु त्ये. तुमी जावा अन पडा आता.

बायजा उठली आणि माजघरात आली. चटई घालून हात उशाशी घेऊन पडली. इथे फार उकडत होतं, पण इलाज नव्हता. पाटलांच्या खोलीत तिला जाता येत नव्हतं. पडल्या पडल्या श्रमाने तिचा डोळा लागला.

असेच दिवस पुढे जात राहिले. दरम्यान पाटलांच्या वडिलांनी मागच्या अंगणात कामकरी बायकांसाठी एक मोठी खोली बांधली आणि राहीबाईच्या हाती जादूचा दिवाच लागला.

कसला दिवा? राहीबाईच्या शाळेचं काय? तिला असलेल्या शेतीच्या आवडीचं काय? ह्याची उत्तरं उद्याच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all