सीड मदर : संघर्ष तिचा भाग ६

A Story Of a Woman Who Is Honoured With Padmashree

सीडमदर : तिचा संघर्ष

टीप : खरं तर एरवी कथेच्या खाली टीप द्यायची पद्धत असते. पण लेखिका म्हणून मला जे मांडायचं आहे, ते मला आधीच सांगायची उर्मी स्वस्थ बसू देत नाहीये. ही कथा आहे एका जिद्दी स्त्रीच्या संघर्षाची. एक असा संघर्ष जो तिला थेट पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करून गेला. ही कथा सत्य घटना, गोष्टी ह्यांवर आधारित असली, तरी काही ठिकाणी लेखन स्वातंत्र्य आणि कल्पनाशक्ती ह्यांचा संगम घडविणे मला आवश्यक वाटले. त्यामुळेच काही नावे, काही प्रसंग आणि काही स्थळे काल्पनिक असली, तरी जिची ही कथा आहे, ती स्त्री मात्र सत्यात आहे. १९६४ साली जन्माला आलेल्या ह्या स्त्रीची कहाणी आपण जाणून घ्यायला हवीच .

कथा : भाग ६

राहीबाई साधारण सव्वा वर्षाची झाली, आणि दुर्गा तिला रोज थोडा वेळ शेतात न्यायला लागली. सर्जाची आठवण म्हणून, तिला पाटलांनी हे शेत दिलं होतं. ह्या शेतात ती कापूस लावायची. आणि कडधान्य. एक ओळ कापसाची आणि एक ओळ कडधान्याची. त्या मागचं शास्त्र तिला ठाऊक होतं. कडधान्य लावताना ती एक ओळ उडीद, एक ओळ कापूस, तर परत एक ओळ सोयाबीन आणि एक ओळ कापूस अशी लावायची. कडधान्य जमिनीला नत्र देतात आणि कापसाला नत्र फार आवश्यक असते. दुर्गाला हे ज्ञान तिच्या आईकडून मिळालं होतं. खरं तर शेतीची आवड तिला आधीपासूनच होती. पण लहाणपणीच सर्जाशी लग्न झालं आणि ती सर्जाच्या तंत्र मंत्र आणि गुप्तधन ह्या चक्रात अडकली. तिला मन मारून हे काम करावं लागतं होतं. तिची इच्छा नसताना ती ह्या गोष्टी करून करून खूप त्रासली होती. त्यात तिला तिन्ही मुलंच. मुलगी नाहीच. तिची मुलीची हौस आता राहीबाई पूर्ण करीत होती. तशी दुर्गा करारी, खमकी, पण नवऱ्याला घाबरून असायची. नवरा गेल्यावर तिला जेव्हा ही शेतजमीन मिळाली तेव्हा तिला आनंद झाला होता. तिची शेतीची राहिलेली सगळी हौस, तिचं पारंपरिक ज्ञान, तिचं कौशल्य आजमावण्याची संधी तिला पुरेपूर मिळाली होती. आणि त्या संधीचं सोनंही तिने गेल्या वर्षात केलं होतं.

गेल्या वर्षी झालेला पाऊस तिला सुखावून गेला होता. राहीबाईच्या पायगुणाने हा पाऊस पडला अशी तिची धारणा असल्याने, तिने राहीबाईला फार जीव लावला होता. दुर्गा खरं तर असेल चाळीशीच्या आसपास. पण जन्मभराच्या कष्टाच्या कामामुळे काटक होती. सडपातळ तरीही कामाचा प्रचंड उरक असणारी ही स्त्री खरोखर ग्रामीण कष्टाच्या जीवनाचं एक बोलकं प्रतिबिंब होतं. ती शेतात काम करून शिवाय पाटलांची घरची कामं देखील करीत असे. आणि जशी राहीबाई चालायला लागली, तशी ती सतत दुर्गाबरोबरच असे. जणू मातीच्या प्रेमाचं बाळकडू तिला दुर्गाकडून मिळालं होतं.

त्या दिवशी देखील दुर्गा नेहमीप्रमाणे राहीबाईला घेऊन शेतात गेली. शेतातल्या खोपटातल्या झोळीत तिने दुर्गाला खायला घालून झोपवलं आणि मशागत करायला ती बाहेर आली.

दोन तास झाले असतील साधारण, ऊन मी म्हणत होतं. आता लवकरच मृग येणार होता. त्याआधी जमीन भाजणं, तण काढणं, माती भुसभुशीत करणं, बियाणं जमवण्यासाठी धावपळ करणं, खतांचा साठा करण्यासाठी खोपटं शाकारणं, शेतीची अवजारं स्वतःच स्वच्छ करून त्याला तेलपाणी देणं, ही सगळी कामं दुर्गाला सहज अवगत होती. ती बाहेर काम करीत असताना तिच्या लक्षात आलं की राहीबाई उठली असेल. तिनं पटकन हात धुतले, पदराला पुसले आणि धावत धावत आत आली. झोळीत बाळ नव्हतं.....

क्षणभर तिचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. काळजाचा ठोकाच चुकला तिच्या. इवलुसं बाळ कुठे जाईल? तिला ब्रह्मांड आठवलं. एकदम पालथी मूठ तोंडावर ठेवून ती ओरडून बाहेर आली. सगळीकडे बघतेय तर तिला हे पिल्लू बांधावरच्या एका मोठ्या झाडाखाली मातीत मनसोक्त खेळताना दिसलं.

तिला क्षणभर काहीच सुचलं नाही. एवढ्या प्रखर उन्हात हा इवलासा जीव मातीत पूर्ण रंगून गेला होता. त्या बाळाला ना उन्हाची जाण होती, ना गरम झळांची! मातीनं पूर्ण भरलेलं बाळ तिला कृष्णासारखंच भासलं. सुटकेचा निःश्वास सोडत ती तशीच धावली, आणि तिला पटकन उचलून घेतलं. तिच्या मातीने भरलेल्या कपाळाचे पटापट मुके घेऊन तिने तिला छातीशी धरलं. तसं राहीबाईने बोळकं पसरून तिला गोड हसून दाखवलं. सगळा ताण एका क्षणात विसरून दुर्गा देखील नितळ हसली.

दुर्गाने तिला परत खोपटात आणलं आणि स्वच्छ केलं. हातातली कामं तशीच टाकून तिला घेऊन ती घरी आली. घर जवळ आलं तशी दुर्गाच्या छातीत धडधड सुरू झाली. इतकं लहान बाळ झोळीतून बाहेर आलंच कसं, हा विचार तिला आता घेरू लागला.

तशी खरं तर राहीबाई चालायला लागली होती. तिने झोळीत उभं राहून बाहेर उडी मारली असणार, ह्याविषयी आता दुर्गाला शंका नव्हती. पण घरी गेल्यावर बाळ बघून सगळयांना ही गोष्ट कळणारच होती. आपलं दुर्लक्ष झालं ह्या भावनेने दुर्गाला अतिशय अपराधी वाटू लागलं. त्याचबरोबर सखू तिला काय म्हणेल, पाटील ओरडतील आणि त्याहीपेक्षा जर तिच्याकडे बाळाला दिलंच नाही तर? राहीबाई आता तिचा श्वास झाली होती. जणू काही लेकच तिची. ह्या विचाराने तिने बाळाला छातीशी अजूनच घट्ट धरलं. तिला कुठे लागलं नसेल ना, हा विचार तिला सतावू लागला होता. पण बाळ स्वच्छ करताना, आणि आत्ता सुद्धा खूप गोड हसत होतं. हसण्यावरून तर बाळाला कुठे लागलंय असं अजिबात वाटत नव्हतं.

दुर्गा विचारांच्या नादात घरी आली. तिच्या हातात थोडं मळलेलं बाळ आणि तिच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे बघून बायजा म्हणाली, " काय गो दुर्गे? बिगीनं आलीस एवढ्या? अन पोरगी बी लै भरलीय मातीनं! पडली का काय? अन तुझं त्वांड काऊन उतरलं?

दुर्गा काहीच बोलली नाही. खाली मान घालून एखाद्या अपराध्यासारखी उभी राहिली. बायजाला काहीच समजेना. ती परत काही विचारणार इतक्यात सखू तिकडून आली, आणि आईला बघून राहीबाईने दुर्गाच्या कडेवरून एकदम तिच्याकडे झेप घेतली. बोबड्या बोबड्या आवाजात आईला काहीतरी सांगू लागली. सखू पण तेच म्हणाली. "का वो दुर्गाताई\" ह्ये बेनं कुटं मातीत लोळलं? अन बया बया, तिच्या केसात बी माती दिस्तीया".

" म्या त्येच इच्चारून राहिली , ही काही बोलंचना". बायजा म्हणाली.

दोघी दुर्गाकडे उत्तराच्या अपेक्षेने बघू लागल्या. तसं दुर्गाने घाबरत घाबरत सगळं खरं खरं सांगितलं. आपल्याला आता राहीबाईला परत हात लावू देणार नाहीत, ह्याची खात्री होती तिला. पण तिच्या मनाची तयारी होत नव्हती. एक अपराधी भावना त्या क्षणी खळकन तिच्या डोळ्यांतून तिच्या गालांवर ओघळली.

क्षणभर शांतता पसरली आणि बायजा, सखू दोघीही एकदम हसल्या. दुर्गाला काही कळेना की, ह्या का हसतायत. ती डोळे पुसत त्यांच्याकडे बघू लागली.

बायजा म्हणाली, " अगं खुळी का गं तू? ह्येच्यात रडन्यासारकं काय हाये? लहान प्वार हाये त्ये. त्ये कसं बसंल येका जाग्याला? उलट ह्ये लै ब्येस झालं की, ही पोरगी लै चपळ हाय अन त्यीला माती बी आवडतीया. अगं आपुन मातीची ल्येकरं हाये, आपली पोरं अशीच करायची". सखूने पण जेव्हा बायजाला दुजोरा दिला, तेव्हा कुठे दुर्गाचं रडू थांबलं.

सखू दुर्गाला चिडवत म्हणाली, " मालकीन बाई, ह्ये लै अवघड झालं. इटुकली पोरगी रडंना, अन ह्यी येवडी मोठी बाई रडतीया. उगी उगी माह्या ल्येकरा, रडू नगं, गप ऱ्हा हो. आपन तुला बाहुली आनू हां"!

तिनं असं म्हणताच तिघी जोरात हसायला लागल्या. एवढ्यात राहीबाई आईच्या कडेवरून उतरून गोठ्यात लुटुलुटू चालत गेली सुद्धा. तिच्या पाठमोऱ्या छबीची कानशीलावरून कडकडा बोटं मोडत दृष्ट काढून दुर्गा तिच्या मागे पळाली सुद्धा.

तिघींचं हे निकोप नातं राहीबाई नावाच्या इवल्या रोपट्याला कसं फुलवतं ते उद्याच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all