Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

सेकंड ऑप्शन..

Read Later
सेकंड ऑप्शन..

 कथेचं नाव :- सेकंड ऑप्शन

विषय :- ....आणि ती हसली.

फेरी:- राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा. 


          तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. टेबलवर ठेवलेल्या डायरीची पानं तिच्या अश्रूंनी भिजत होती. पेन धरलेला हात थरथरत होता. अचानक गाडीचा आवाज आल्यामुळे डायरी मिटत तिने वह्या-पुस्तकांमध्ये लपवली. ती पटकन बेसिनच्या दिशेने धावत गेली. चेहऱ्यावर थंड पाणी मारून तिने आरशात पाहिले. रडून लाल झालेले डोळे थंड पाण्याच्या हबक्यामुळे थोडेसे नॉर्मल वाटत होते. कपाटातून टॉवेल काढत तिने चेहरा पुसला. तोवर तिला दरवाजावर नॉक ऐकू आला होता. हॉलमध्ये येत तिने दरवाजा उघडला. 


"काय गं सोनू, कुठे होतीस ? " आई. 


"चेहरा धुवत होते गं. झोप येत होती न खूप म्हणून. " अक्षरा. 


"बरं. जरा चहा टाकतेस का ? " आई सोफ्यावर बसत म्हणाली. 


"हा टाकते. आलं आणलं होतंस ना ग कुठे ठेवलंस ? " अक्षरा. 


"फ्रीजमध्ये नाही आहे का ? मग भाज्यांच्या पिशवीतच राहिलं का बघ ? " आई. 


अक्षरा किचनमध्ये निघून गेली. आई सोफ्यावर बसली. 


"सोनू भेटलं का गं ? " आई. 


"हो गं. टाकलाय चहा. " अक्षरा किचनमधूनच म्हणाली. 


           ट्रे मधून पाण्याचा ग्लास आणि चहाचा कप घेऊन अक्षरा बाहेर आली. आईसमोर टीपॉयवर ट्रे ठेवत ती शेजारी खुर्चीवर बसली. 


"काय झालं सोनू ? अस्वस्थ वाटते आहेस. " आई चहा पित म्हणाली. 


"काही नाही गं जराशी कणकण जाणवतेय. बाबा कुठे राहिले ? " अक्षरा. 


"अग बाबा मला सोडून त्यांच्या मित्राकडे गेलेत राहायला. उद्या तिथूनच कंपनीच्या कामासाठी बाहेर जाणार आहेत. " आई. 


"अच्छा. किती दिवस लागतील त्यांना यायला ? " अक्षरा. 


"दोन- तीन दिवस लागतील. का गं ? आई. 


"सहज विचारलं गं. मी आयुष्यात पहिल्यांदाच विचारतेय अशी काय पाहत्येस माझ्याकडे. " अक्षरा. 


"हं. राघव कुठे राहिला ? सात वाजून गेले ना गं ? " आई. 


"हो. मी कॉल केलेला एक तासापूर्वी. यायला उशीर होईल म्हणालाय. " अक्षरा. 


"ह्या मुलाला ना खेळाच्या सरावामध्ये घरची आठवण राहत नाही. दिवाबत्तीची वेळ झाली तरी हा बाहेरच उनाडक्या करत फिरतोय. " आई. 


"उनाडक्या कुठे गं आई ? फुटबॉल टीममध्ये सिलेक्शन झालंय त्याचं. सराव नाही केला तर टीम कशी जिंकणार. " अक्षरा हसत म्हणाली. 


            रात्री उशिरा आलं की आई लगेच राघवाच्या खेळाला उनाडक्या करून टाकते हे तिला चांगलं माहित होतं. ट्रे उचलून परत किचनमध्ये ठेवत अक्षरा आपल्या रूममध्ये निघून गेली. आई देवासमोर दिवा लावत रूमकडे पाहत होती. अक्षराचं वागणं काहीसं विचित्र जाणवत होतं. पण काहीतरी बिनसलं असेल म्हणून तिने दुर्लक्ष केलं. 


           अक्षरा परांजपे. एका मध्यवर्गीय कुटुंबात वाढलेली गोड मुलगी. मध्यम उंची, गव्हाळ वर्ण, तीक्ष्ण नजर आणि स्पष्टवक्तेपणा यामुळे तिचं व्यक्तिमत्व फारच उत्तम होतं. लहानपणासुनच हुशार असल्यामुळे मित्र मैत्रिणीही फार होते. अर्थात तशी ती फार अबोल होती. फारसं बोलायला आवडायचं नाही तिला. पण मित्र परिवार वाढायला लागल्यावर ती हळूहळू त्यांच्यात मिसळत गेली होती. सध्या अक्षरा फर्स्ट इअरला होती. कायमच टॉपर स्टुडंट असल्यामुळे तिच्या अभ्यासाचं घरी काही टेन्शन नसायचं. बाहेर कितीही अबोल आणि शांत असली तरी घरात नुसती बडबड चालायची. आज तिला शांत शांत पाहून म्हणूनच आईच्या मनात कालवाकालव होत होती. इतक्यात डोअरबेल वाजली. 


"ह्यावेळेला कोण आलं गं ? " आई. 


"अग राघवच असेल. थांब मी पाहते. " अक्षराने पुढे जात दार उघडलं. 


राघव आणि त्याच्यासोबत मीना उभी होती. 


"मिने काय गं तू कशी आलीस ह्याच्यासोबत ? " अक्षरा दोघांनाही आत घेत म्हणाली. 


"अग स्कुटी बंद पडली माझी. चालत येत होते तुझ्याकडेच असाईनमेंट्स सॉल्व्ह करायला. तेव्हा रस्त्यात राघव भेटला. " मीना. 


"दीदी, तू आज जरा विचित्र नाही दिसत आहेस ? " राघव अक्षराकडे पाहत म्हणाला. 


"म..मी..? मी कुठे वेगळी दिसतेय ? तूच विचित्र वागत आहेस आजकाल. जा चल, फ्रेश हो आणि रूममध्ये येऊ नकोस. मी आणि मीना काही असाईनमेंट्स सॉल्व्ह करणार आहोत. तुझी मध्ये लुडबुड नकोय. " अक्षरा जवळजवळ त्याला दटावत म्हणाली. 


"ओके. फाईन. " राघव. 


"तू इकडे ये रे जरा. तुला बघतेच मी आज.." आईने राघवला हाक मारली. 


           तसा तो धावत आई जवळ गेला आणि मीना व अक्षरा हसत रूममध्ये आल्या. छोटंसं मध्यमवर्गीय कुटुंब असल्यामुळे छोटंसंचं घर होतं. अक्षरा आणि राघव एकाच रूममध्ये राहत होते. त्यामुळे त्याला दटावून ती आत आली होती. कडी घालत त्या आत आल्या. 


"मिने, राघवच्या बेडवर बस तू. माझ्या बेडवर पसारा बघ किती आहे ! " अक्षरा. 


"अक्षु.. इकडे बघ.. माझ्याकडे बघ. काय झालंय ? " मीना आपल्या हाताने तिचा चेहरा आपल्याकडे फिरवत म्हणाली. 


"कुठे काय ? " अक्षरा. 


"अक्षु, माझ्यापासून लपवणार आहेस ? मला माहित आहे काहीतरी झालं आहे. काहीतरी छळतयं तुला हो ना ? " मीनाने काळजीने विचारलं. 


           अक्षराचे डोळे अश्रूंनी डबडबले. पण तिने निकराने अश्रू  पुसले. 


"मी तुला उद्या सांगेन मीना. आता नाही. आई घरी आहे. " अक्षरा. 


"नाही मला आता सांग अक्षु. " मीना. 


"अग खरंच काही नाही झालं आहे. " अक्षरा. 


" मग हे काय आहे ? " मीना आपल्या सॅकमधून एक चिठ्ठी काढून अक्षराकडे फेकत म्हणाली. 


अक्षराने ती चिठ्ठी उघडली व ती वाचू लागली. "आय अम सॉरी अक्षु. मला माहित आहे मी चुकलो असेन. पण तू समजून घ्यायला हवं. माझं आणि अर्चनाचं नातं फार पुढे गेलं आहे. आम्ही घरच्यांच्या संमतीने साखरपुडा पण करणार आहोत. मला खरंच आपलं रिलेशन कन्टीन्यू नाही करायचं. " 


"उज्वलने ही चिट्ठी माझ्याकडे का दिली ? तुझं आणि उज्वलचं काय झालं ? " मीना. 


"मिने.. गधडे..हळू बोल. अख्ख्या वस्तीला सांगायचं आहे का ? "अक्षरा. 


"सॉरी. पण आता सांग मला. "मीना. 


"त..ते.. आमचं ब्रेकअप झालं. त्याला ती अर्चना माझ्यापेक्षा जास्त आवडते आणि ते लवकरच साखरपुडा करणार आहेत. " अक्षरा किंचितसं हसत म्हणाली. 


"अक्षु...sss तुला माहित होतं ना हे ? मी सांगितलं होतं ना तुला की उज्वल आणि अर्चना ऑलरेडी डेट करत आहेत ? मग का नाही ऐकलं तू माझं ? का तुला स्वतःला त्रास करून घ्यायचा आहे ? " मीना. 


"कारण मला नाही राहता येणार. " अक्षरा ढसाढसा रडू लागली. 


मीनाने पुढे सरसावत तिला मिठी मारली. 


"मीना, मी सहा वर्ष प्रेम करते गं त्याच्यावर. अगदी मनापासून. त्याच्यासाठी मी किती क्लासेस चुकवले, किती कारणं देऊन त्याच्यासोबत फिरायचं, त्याला हवं तेव्हा तिथे असण्याचा प्रयत्न केला. एक वर्ष झालं आम्हांला डेट करताना.. मला वाटलं की सुखाचं माप माझ्या पदरात पडतंय.. तोवर ही अर्चना मध्ये आली. माझ्या सहा वर्षांच्या प्रेमाला तो एक महिन्यात कसं विसरला मीना..तो कसं विसरला.. ? " अक्षरा खूप रडत होती. 


"प्रेमापेक्षा पैसा महत्वाचा होता त्याला अक्षु. ही डोन्ट डिसर्व्ह यु." मीना अक्षराला समजावत होती. 


इतक्यात दारावर थाप पडली. 


"अं..कोण ? एक मिनिट हं आले. " मीनाने अक्षराचे डोळे पुसत म्हटलं. 


"मीना, अग बाळा काही खायला आणू का तुला ? आता बोलला राघव मला की तू ही आली आहेस. " आई बाहेरून म्हणाली. 


"काही नको काकू. ह्या असाईनमेंट्स पूर्ण करायच्या आहेत. " मीनाने आतूनच उत्तर दिलं. 


"बरं बरं करा. मी नाही डिस्टर्ब करत. " आई पुन्हा किचनकडे जात म्हणाली. 


           पण आईच ती..! मुलीच्या वेदनांचं कारण समजून घ्यायला आली होती आणि तिला ते कारण समजलं होतं. अक्षराने जर प्रेम केलं होतं तर ते किती मनापासून आणि उत्कटतेने केलं असेल याची तिला कल्पना होती. इकडे मीनाने अक्षराला पाणी प्यायला दिलं. 


"अक्षु, विसर तू त्याला आता. मला माहितीय हे कठीण आहे. पण अशक्य नाही आहे. अग साखरपुडा करतोय तो. तो परत नाही येणार आणि तुला असं हताश आम्ही कोणीच पाहू शकणार नाही. येतंय का लक्षात ? अक्षु..अक्षु ...अग तुझ्याशी बोलतेय मी. " मीना. 


"हं. तू काळजी करू नकोस मीना. मी ठीक आहे. फक्त माझं एक काम करशील ? " अक्षरा. 


"हा बोल ना. " मीना. 


             अक्षरा उठली व पुस्तकांच्या गठ्ठ्यातून तिने एक डायरी बाहेर काढली. तिने ती डायरी मीनाच्या हातात दिली. 


"मीना, या डायरीत त्याच्या आठवणी आहेत. अगदी त्या दिवसापासूनच्या जेव्हा मला प्रेम म्हणजे काय हे हे माहित नव्हतं. पण त्याला विसरायचं असेल तर मला ह्या आठवणी मिटवाव्या लागतील आणि माझ्या हातांनी मी हे नाही करू शकत. " अक्षरा अश्रूपूर्ण डोळ्यांनी म्हणाली. 


"मी नाही घेणार ही. तुला ही तुझ्या हातांनीच मिटवावी लागेल. नाहीतर तू त्याला कधीच विसरणार नाहीस अक्षु. " मीना. 


"नाही ना मीना. प्लिज ना. तुला विश्वास नाही का माझ्यावर ? ज्याक्षणी तो मला म्हणाला की तो माझा कधी नव्हताच त्याचक्षणी मी त्याला विसरण्याचा प्रयत्न करतेय गं. मला माहित नाही किती दिवस लागतील.. पण...मी त्याला विसरणार हे नक्की.. " अक्षरा आपले अश्रू रागाने पुसत म्हणाली. 


             शेवटी नाईलाजाने मीनाने होकार दिला. त्यानंतर असाईनमेंट्स पूर्ण करून मीना निघून गेली. सर्व सामसूम झाल्यावर रात्री अक्षरा बेडरूमचा दरवाजा उघडून किचनमध्ये आली. किचनमध्ये पाण्याचा ग्लास भरून घेत असताना तिला मागे चाहूल जाणवली. ती सर्रकन मागे वळली. 


"आई..  तू झोपली नाहीस अजून ? तुला अस्वस्थ वाटत आहे का ? तब्येत बरी आहे ना तुझी ? " अक्षराने पाण्याचा ग्लास बाजूला ठेवत विचारलं. 


"अक्षु, तुला माहितीय लहानपणी अगदी लहानगी मुंगी चावली ना तर रडत मला सांगायला यायचीस तू. आपल्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आईकडे आहे या विश्वासाने. आईकडे गेल्यावर दुखणं कमी होईल म्हणून. पण जशी मोठी होत गेलीस तशी अबोल बनत गेलीस. कदाचित मनाने दुरावलीस माझ्यापासून हो ना ? "आई. 


"नाही गं आई. असं का म्हणत्येस ? " अक्षरा हसत आईला मिठी मारून घेत म्हणाली. 


"इतका त्रास होऊनही एकदा आईला सांगावंसं नाही वाटलं बाळा ? आईबद्दल विश्वास नाही वाटला ? " आईने अक्षराकडे पाहत म्हटलं. 


             अक्षराने चमकून वर पाहिलं. आईने सर्व ऐकलं आहे हे एव्हाना तिच्या लक्षात आलं होतं. 


"ऐकलंस ना सगळं आई ? " अक्षराने पाणावल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिलं. 


"हो. ऐकावं लागत गं. पिलाला वेदना होत असतील तर आईला झोप कशी लागणार बाळा ? " आई अक्षराला थोपटत म्हणाली. 


"आई खूप त्रास दिला का गं मी ? पण न मला पटलंय. मीनाही म्हणाली ना ही डोन्ट डिसर्व्ह मी. मी विसरेन त्याला. मे बी लवकरात लवकर. " अक्षरा पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाली. 


"लवकरात लवकर नाही...आता. " आई. 


"आई एवढं सोपं आहे का गं ? " अक्षरा आईकडे पाहत म्हणाली. 


"मला सगळं काही सांग. काय म्हणतात ते त्याला..? हा तुमची काय ती लव्हस्टोरी..  मग मी तुला सांगते काय करायचं. विश्वास आहे ना आईवर ? " आईने अक्षराकडे पाहत म्हटलं. 


"स्वतःपेक्षा जास्त. " अक्षराची आईला मिठी मारत म्हणाली. 


काही वेळाने ती आईपासून दूर झाली. 


"सहा वर्षांपूर्वी आमच्या शाळेत एक मुलगा होता. फारसा हुशार नव्हता पण क्रिक्रेटपटू होता. मस्त खेळायचा. शाळेच्या संघासाठी चिअर करायला जायचो ना आम्ही तेव्हा माझी आणि त्याची ओळख झाली. सातवी आठवीत होते असेन मी. तो ही माझ्याच वयाचा होता पण तुकडी वेगळी होती. मला माहित नव्हतं तेव्हा प्रेम काय होतं. पण तो आवडायचा. म्हणजे त्याचं ते हसणं, स्वतःहून येऊन हाय म्हणणं, कधीकधी चॉकलेट किंवा कॅडबरी आणून देणं. अख्ख्या शाळेत तो सर्वात जास्त माझ्यासोबत बोलायला लागला होता. हळूहळू मोठे होते गेलो आणि कळत गेलं की आकर्षण प्रेमात बदलतंय. माझ्या आवडी त्याच्या आवडीनुसार बदलू लागल्या आहेत. कधीही न आवडणाऱ्या गुलाबी रंगाचा केवळ त्याला आवडतो म्हणून टॉप घालून जाणं, फिरायला फारसं आवडत नसेल तरी फक्त तो ही जाणार म्हणून ट्रिपवर जाणं, जास्त आईसक्रीम खाऊन आजारी पडते तरी त्याच्यासोबत चक्क सहा सात आईस्क्रीमचे कोन संपवणं माझ्या अंगवळणी पडलं होतं. पाच वर्षांनंतर मागच्या वर्षी शेवटी तो क्षण आला आणि त्याने मला व्हॅलेंटाईन डेला प्रपोज केलं. " अक्षरा अगदी समरस होऊन सांगत होती. 


आईचं लक्ष फक्त तिच्या चेहऱ्यावर होतं. 


"मग ना... एक्स्ट्रा क्लासेसच्या नावाखाली त्याला अनेकदा भेटलेय. आम्ही अनेकदा भेळ खायला ही गेलोय. कधी कधी मीनासोबत त्याला भेटायला जायचे. अख्ख्या ग्रुपमध्ये जेव्हा आम्हांला कपल म्हणून चिडवायचे तेव्हा जाम भारी वाटायचं. " अक्षरा. 


अचानक तिचा आनंदी चेहरा उतरला होता. 


"आणि गेल्या महिन्यात कॉलेजमध्ये अर्चना आली. न्यू ऍडमिशन. तिचे बाबा खूप मोठे बिजनेसमन आहे. थोडक्यात जाम पैसेवाली. सगळे तिच्या मागेपुढे घुटमळत असायचे. हळूहळू माझ्याही उज्वलशी भेटीगाठी कमी होऊ लागल्या. तो वेगळ्या डिपार्टमेंट मध्ये आणि मी वेगळ्या. ती नेमकी त्याच्याच डिपार्टमेंट मध्ये होती. मीनाने बऱ्याचदा त्यांना एकमेकांशी बोलताना पाहिलं आणि मला सांगितलंही. पण मला कधी विश्वास नाही बसला आणि काल..." अक्षरा. 


पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा तिने पुन्हा रागाने पुसल्या. 


"काल त्याने मला भेटायला बोलवलं आणि काल आम्ही ग्राउंडवर भेटलो. " अक्षरा तो प्रसंग जसाच्या तसा सांगत होती. 


कालच्या दिवशी...

"हाय उज्वल. काय रे किती वेळ वाट पाहतेय ? " अक्षरा. 


"सो व्हॉट ? कामं काय आहेत तुला ? एकतर त्या पुस्तकांत डोकं खुपसून राहायचं. नाहीतर त्या लायब्ररीत बसून तप करायचे."  उज्वल थोडं माजातच म्हणाला. 


"अरे हो. चिडू नकोस. मी सहज म्हणाले. किती दिवसानी भेटतो आहेस ! " अक्षरा. 


"हेय, डोन्ट टच मी. "  त्याने अक्षराचा हात झटकला. 


"काय झालंय तुला उज्वल ? का असा वागतो आहेस ? " अक्षरा. 


"असा म्हणजे काय ? ऐक मी इथे तुला महत्वाचं सांगायला बोलवलं आहे. लेट्स ब्रेकअप...! " उज्वल अतिशय थंडपणे म्हणाला. 


"अं..? काय म्हणालास तू ? ब्रेकअप ? अरे का पण ? काही चुकलं का माझं ? " अक्षराचे डोळे पाणावले होते. 


"नाही. पण.." उज्वल. 


"पण काय उज्वल ? मी काही मूर्ख आहे का सहा वर्षे तुझ्यावर प्रेम करायला ? इतक्या सहज ब्रेकअप करायला तयार झाला आहेस तू ? " अक्षराला हतबल वाटत होतं. 


"गप यार. नको ड्रामा करू. एवढंही काही सिरिअस नव्हतं आपलं. जस्ट लिव्ह..! मी तुझा कधी नव्हतोच असं समज. *यु वॉज जस्ट अ सेकंड ऑप्शन फॉर मी.* " उज्वल. 


"आय वॉज सेकंड ऑप्शन ? " अक्षराला अजूनही त्या शब्दांवर विश्वास बसत नव्हता. 


पुन्हा वर्तमानात..


             माझ्या डोक्यात सणक गेली आणि मी त्याच्या सणकन कानाखाली मारली आणि तडक निघून आले. तो का ब्रेकअप करतो आहे हे ऐकायला मी थांबले नाही. त्याचं तोंडचं बघावंस वाटत नव्हतं. पण त्याला विसरलही जात नव्हतं.  आज मीनाकडे चिट्ठी पाठवून त्याने तो अर्चनासोबत एंगेज होणार आहे लवकरच हे कळवलं. बस एवढंच. " अक्षरा आईकडे बघत थांबली. 


"हे एवढंच नव्हतं बाळा. एवढं सगळं मनात साठवून जगणं मुश्किल होतं. अशा गोष्टी शेअर करायला शिकलं पाहिजेस तू. " आई. 


"डोन्ट वरी आई आणि थँक यु. तुझ्याशी बोलून खूप रिलॅक्स वाटतंय गं मला. " अक्षराने आईला घट्ट मिठी मारत म्हटलं. 


             फक्त आईशी बोलण्याने तिच्या मनातलं वादळ शमलं होतं. डोक्यावरचा खूप मोठा भर हलका झालेला तिला जाणवला होता. तो मायेचा आधार तिच्या जगण्याचा आधार होता. ती निवांतपणे झोपी गेली. 


______________________


तीन वर्षानंतर...


"आई मी निघतेय हा. आज लवकर येते घरी, डोन्ट वरी. " अक्षरा सँडल घालत म्हणाली. 


"सावकाश जा. उगाच धावपळ करत राहू नकोस. " आईनेही सूचना दिलीच. 


                अक्षराने ऍक्टिव्हा सुरू केली आणि ती ऑफिसच्या दिशेने निघाली. ग्रॅज्युएशन पूर्ण होताच अक्षराला एका कंपनीत चांगला जॉब मिळाला होता. पॅकेजही चांगलं होतं आणि भेटलेली माणसंही चांगली व हार्ड वर्कींग होती. आठच्या ठोक्याला अक्षरा ऑफिसमध्ये आली. तिचं शार्प टायमिंग वर येणं तिथे सर्वांनाच खूप कौतुकाचं वाटायचं. 


"गुड मॉर्निंग अक्षरा. " रिसेप्शनिस्ट. 


"गुड मॉर्निंग सानिका. हॅव अ नाईस डे. " अक्षरा स्माईल देत म्हणाली. 


"अक्षरा, डायरेक्टर सरांनी तुला बोलवलं आहे. " सानिका गालात हसत म्हणाली. 


              अक्षराने हातातील फाईलने तिच्या डोक्यावर टपली मारली. 


"हसतेस काय ? काम असेल काहीतरी. उगीच आपली हसत रहा तू. " अक्षराही हसत थेट डायरेक्टरच्या केबिनकडे गेली. 


"मे आय कम इन सर ? " अक्षरा. 


"कम इन डार्लिंग. यु आर लुकिंग सो ब्युटीफुल टूडे. " अजित तिच्याकडे पाहून स्माईल देत म्हणाला. 


"हं. पुरे. काम काय आहे ते सांग." अक्षरा. 


"बस ना गं जरा निवांत. आल्या आल्या काय काम आहे ? " अजित वैतागत म्हणाला. 


"माझे रिपोर्ट्स पण पेंडिंग आहेत अजून अजित. सकाळ सकाळ माझा मूड स्पॉईल करू नकोस. " अक्षरा. 


"हे बरंय. आपल्या फियांसीला भेटणं मूड ठीक करतं. तुझा कसा स्पॉईल होईल ? " अजित चेअरवरून उठत म्हणाला. 


"अजित, बस तिथे गप्प. अजिबात काही नौटंकी नाही. काम काय होतं सांगणार आहेस की मी जाऊ ? " अक्षरा. 


"काय वेळ आली आहे, एका डिपार्टमेंटची हेड डायरेक्टरला धमकी देतेय. " अजित चेअरवर बसत मस्करीच्या सुरात बोलत होता. 


"अजित.." अक्षराने खोट्या रागाने त्याच्याकडे पाहिलं. 


" अजित काय ? ते तुमच्यासाठी 'सर' असं आहे मिस. अक्षरा. आय अम सॉरी, सून टू बी मिसेस पटवर्धन. साडेनऊ वाजता मार्केटिंग डिपार्टमेंटसाठी काही न्यू इंटर्न येणार आहेत. त्यांचा इंटरव्ह्यू मला घ्यायचा आहे. त्यापूर्वी त्या कँडिडेट्स डिटेल्स, डिग्रीज आणि एक्सपर्टीजम चेक करून फायनल इंटर्न लिस्ट तयार करून ठेवा. " अजित एकदम बॉसच्या भूमिकेत शिरला होता. 


"शुअर सर. " अक्षरा हसू आवरत बोलत होती. 


              'ड्रामेबाज..' असं  पुटपुटत अक्षरा बाहेर निघून गेली. अजितही हसू लागला. अक्षराने बाहेर येत पटापट पॉईंट्स काढले आणि ते सोबत घेऊन ती एका वेगळ्या केबिनमध्ये आली. तिथे अनेक कँडिडेट्स बसलेले होते. काही एकदम नवीन वाटत होते तर काहींना काहीतरी एक्सपिरिएन्स आहे असं वाटत होतं. सर्वांना न्याहाळत असताना तिचं लक्ष त्याच्यावर गेलं. तो ही तिच्याकडे एकटक पाहत होता. तिला मनात कालवाकालव जाणवली. पण क्षणांत ती पुन्हा स्टेबल झाली. 


"हॅलो. आय अम मार्केटिंग डिपार्टमेंट हेड अक्षरा परांजपे. " अक्षराने स्वतःचा इन्ट्रो देत म्हटलं. 


           त्यांनंतर तिने सर्वांना निवडक प्रश्न विचारले. त्यांची उत्तरं व्यवस्थित ऐकत ती काही नोटडाऊन करत होती. तिने तीस जणांमधील सहा नावं फायनल केली आणि ती नावं रिसेप्शनिस्टकडून अजितकडे दिली. काही वेळात अजित तिथे आला. अजितला तिथे जवळजवळ सर्वजण ओळखत होते. सहा फायनल जणांची नाव सोडून इतरांना त्यांनी जायला सांगितलं. इतर सहा जणांचे इंटरव्ह्यू घेतानाही अक्षरा तिथेच होती. शेवटी सिलेक्ट झालेले कँडिडेट्स तिच्या ऑर्डर्सखाली काम करणार होते आणि त्यांच्या तीन महिन्यानंतरच्या फायनल रिपोर्ट्स वरून त्यांच्या कंपनीतल्या एम्प्लॉयमेंटबद्दल ठरणार होतं. सहाच्या सहा जणांना अजितने सिलेक्ट केलं. त्यांना उद्यापासून ऑफिस जॉईन करण्याचं सांगून अजित अक्षराकडे वळला. 


"मानलं तुला. परफेक्ट निवड आहे. " तिने निवडलेले सहा फायनल टेस्ट पण पास झालेले पाहून अजित अभिमानाने अक्षराकडे पाहत म्हणाला. 


"थँक यु सर. " अक्षराही हसत म्हणाली. 


              अजित निघून गेला. अक्षराही फाईल्स गोळा करून निघणार इतक्यात त्याची हाक तिच्या कानावर पडली. त्याने तिला काहीतरी विचारलं होतं. तिनेही होकारार्थी मान डोलावली. ते दोघेही ऑफिसमधून बाहेर एका कॅफेमध्ये आले होते. 


"थँक्स. मी बोलवलं आणि तू आलीस. " उज्वल. 


"या, इट्स ओके. डोन्ट मेंशन इट. " अक्षराही भुवया उडवत म्हणाली. 


त्याने त्या दोघांसाठीही कॉफी मागवली. 


"कशी आहेस ? बऱ्याच दिवसांनी पाहतो आहे तुला. " उज्वल. 


"मी मस्त. तू कसा आहेस आणि अर्चना कशी आहे ? " अक्षराने कॉफीचा सीप घेत म्हटलं. 


"मी ही ठीक. ती कशी आहे माहित नाही मला. " उज्वल. 


"म्हणजे ? " अक्षराने अजिबात इंटरेस्टेड नसूनही विचारायचं म्हणून विचारलं. 


"म्हणजे आमचं पुढे काही झालं नाही. आपलं ब्रेकअप झालं त्यानंतर दीड वर्षाने तिला तिच्यासारखा श्रीमंत मुलगा भेटला. त्यांनी लग्नही केलं मागच्या महिन्यात. " उज्वल. 


"ओह. सॉरी. " अक्षरा. 


"तू काय म्हणत्येस ? तू अजून सिंगलच आहेस का ? " उज्वल. 


              अक्षराने उज्वलकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांतले भाव तिला कळले होते. पण त्या भावनांनी आता तिच्या मनाला पाझर फुटणार नव्हता. 


"नाही. माझी एंगेजमेंट झाली आहे. लग्न पुढच्या वर्षी मार्चमध्ये करणार आहोत. " अक्षरा. 


"मस्करी करत आहेस माझी ? " उज्वलला अजूनही ती मस्करीच वाटत होती. 


"नाही. एकदा सेकंड ऑप्शन ठरल्यावर मी मस्करी करणंच सोडून दिलं. आपल्याच आयुष्याची मस्करी झालेली अनुभवत होते. त्यामुळे मस्करी करणं सोडलं आणि खरंच मी एंगेजमेंट केली आहे. " अक्षरा हातातील रिंग दाखवत म्हणाली. 


"ओह.. कोणासोबत ? " उज्वलच्या स्वरातील निराशा तिला जाणवत होती. 


"मि. अजित पटवर्धन. " अक्षराला ते नाव घेताना अभिमान वाटत होता. 


             का वाटू नये ? तिने आज जे मिळवलं होतं ते तिच्या कर्तृत्वच्या सहाय्याने ! 


"अजित पटवर्धन ? कंपनीचे डायरेक्टर ? म्हणजे आता भेटलो...अजित सर ? " उज्वलने आश्चर्याने विचारलं. 


"का ? माझ्यासाठी एवढं चांगलं फ्युचर एक्सपेक्ट केलं नव्हतंस ?" अक्षरा. 


"न..नाही असं नाही. लव्ह की अरेंज ? " उज्वल. 


"फर्स्ट अरेंज देन लव्ह.." अक्षरा फार कॉन्फिडन्टली बोलत होती. 


               त्यांनंतर त्यांच्यातील कोणीच बोललं नाही. थोड्या वेळाने अक्षरा उठली. ती जायला  निघाली आहे हे उज्वलने पाहिलं. 


"अक्षु...मला लास्टचं एक विचारायचं आहे. जर आज अजित नसता तर तू मला पुन्हा चान्स दिला असतास का ? " उज्वल. 


              अक्षराची सहनशक्ती संपली होती. एवढं करून त्याने हे विचारणं तिला आवडलं नव्हतं. तिने टेबलावर दोन्ही हात टेकवले. 


"यु नो मिस्टर उज्वल, मी तुला पुन्हा कधीच चान्स दिला नसता. अजित असता तरी आणि नसता तरी. कारण मला कोणाच्या आयुष्यातला सेकंड ऑप्शन नाही बनायचं. आय वॉन्ट टू बी फर्स्ट प्रायोरिटी. आणि तुझ्यासाठी.. मी अक्षु नाही आहे. इट्स मिसेस अक्षरा अजित पटवर्धन. " अक्षरा. 


"अक्षु... जर तुला माझी अजूनही आठवण येत नव्हती तर तू मला येणारे प्रश्न विचारून मला सिलेक्ट का केलं ? " उज्वल. 


अक्षरा हसू लागली. 


"मूर्ख आहेस का तू ? तीस कँडिडेट्ससाठी तीस वेगवेगळे क्वेशन्स सेट होते ते. तुला तेच विचारले जे २४ नंबरसाठी होते आणि बरं झालं तुझ्या लक्षात आलंय. लक्षात ठेव हे. तु ज्या डिपार्टमेंटसाठी इंटरव्ह्यू दिला आहेस त्या डिपार्टमेंटची हेड मी आहे. तुझं या डिपार्टमेंटमधलं आणि या कंपनीतलं भवितव्य माझ्या हातात आहे. सो बिहेव..! " अक्षरा उज्वलकडे शेवटचं न पाहताच ऑफिसमध्ये आली. 


"अक्षु...कुठे होतीस ? " सानिका. 


"बोल ना काय झालं ? " अक्षरा. 


"डायरेक्टर सर डिपार्टमेंटमध्ये आणि इथे पण येऊन विचारून गेले तुझ्याबद्दल. तू आल्यावर लगेच तुला इंफॉर्म करायला सांगितलं आहे. " सानिका. 


"अरे देवा. मी इंफॉर्म न करताच गेलेले. " अक्षरा स्वतःच्याच डोक्यावर हात मारत डायरेक्टरच्या केबिनमध्ये आली. 


"आय अम सॉरी सर.. एक्च्युअली मी ते.. "  अक्षरा. 


"आय नो तू कुठे गेलेलीस अक्षरा. कँडिडेट्समध्ये उज्वलला पाहिलं तेव्हाच कळलं. तू एक्स बॉयफ्रेंड म्हणून सांगितलेलं नाव मला लिस्टमध्ये दिसल्यावर मी चमकलो होतो थोडा.. पण मग तो खरोखर पात्र आहे आणि तु त्याला कोणतीही पार्सिलिटी न करताच सिलेक्ट केलं आहेस हे समजल्यावर रिलॅक्स झालो. " अजित. 


"तू रागावला नाही आहेस राईट ? " अक्षरा. 


"नाही. डोन्ट वरी. ह्या दोन फाईल्स मला वर्कींग अवर्स संपायच्या आत पूर्ण करून दे. यासाठी बोलवत होतो. " अजित तिच्या हातात फाईल्स देत म्हणाला. 


"शुअर. " अक्षरा. 


               अक्षरा आपल्या केबिनमध्ये आली. एक दीर्घ श्वास सोडत तिने कामाला सुरुवात करण्यासाठी फाईल उघडली. आत एक स्टिकी नोट होती. 


' त्याच्याबद्दलचं सगळं आता विसरूया. तु आता आयुष्यभरासाठी माझी आहेस.. आणि मी तुला कधीच सेकंड ऑप्शन सारखं ट्रीट करणार नाही. तु कायम माझी पहिली प्रायोरिटी आहेस आणि राहशील. बी हॅप्पी स्वीटहार्ट. लव्ह यु सो मच. '

- अजित. 

                अक्षराने तिचे अश्रू पुसले आणि ती हसली. तिच्या नव्या आयुष्याला छान सुरुवात जी झाली होती ! 

_________________

© तनुजा प्रभुदेसाई

जिल्हा - रायगड - रत्नागिरी. (वाचक मित्र मैत्रिणींनो, 

ही कथा मी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी लिहिली आहे. माझ्या इतर कथांप्रमाणे तुम्ही या ही कथेला सपोर्ट कराल हिच अपेक्षा..! नक्की कळवा कथा कशी वाटतेय.. )

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

T

.

.

//