सेकंड इनिंग भाग-19

Beautiful relation between husband and wife

सेकंड इनिंग भाग-19

 आश्रमातून घरी आल्यावर, भक्ती आणि शक्तीने चार खुर्च्या घराबाहेर ठेवल्या. प्रथमेश आणि तन्वीला त्याच्यावर बसायला सांगितले ,आई-बाबा आल्यावर त्यांना तिथेच बसव ,असेही सांगितले.

 त्या दोघी आत तयारी करायला निघून गेल्या, काकूच्या मदतीने, त्यांनी ओवाळण्याचे ताट बनवलं, उंबऱ्यात ठेवायचं माप तांदळाने भरलं. माप दरवाजात ठेवलं, काकू आरतीचे ताट घेऊन उभी राहिली, पहिल्यांदा विश्वास आणि सुलभाला बोलवण्यात आलं .दोघांना ओवाळल्यावर, सुलभाने हळूच माप लवंडला, पुढे कुंकवाचं पाणी ठेवलेलं ताट होतं, त्यात पाय ठेवत, नंतर जमिनीवर पाय ठेवत ,ती दोघे देवघराकडे गेली, देवाच्या पाया पडले आणि परत दरवाजात येऊन उभे राहिले. आता प्रथमेश आणि तन्वीला बोलवले, काकुने आणि सुलभाने दोघांना ओवाळले , तन्वीचा ही गृहप्रवेश झाला ते दोघेही देवघरात जाऊन नमस्कार केला, नंतर सगळ्या मोठ्या मंडळींच्या पाया पडले. आता दोन्ही जोडप्यांना समोरासमोर बसवले. त्यांच्यासमोर कुंकवाचे पाणी ठेवून, त्यात सोन्याची आणि चांदीची अंगठी टाकली गेली, त्यांना शोधायला सांगितले. पहिल्यावेळी सोन्याची अंगठी विश्वास आणि तन्वीला मिळाली ,दुसऱ्या वेळी सोन्याची अंगठी विश्वास आणि प्रथमेश ला मिळाली ,तिसऱ्या वेळेला भक्ती शक्ती म्हणाल्या ,आता यावेळी तुम्ही दोघी मिळवा आणि झालंही तसंच सोन्याची अंगठी सुलभा आणि तन्वीला मिळाली. त्यानंतर तांदळात अंगठ्या लपवून ठेवून, त्यांना शोधायला सांगितल्या, त्यानंतर सगळ्यांनी आग्रह केला , आता चौघेही  नाव घ्या.  तसं प्रथमेश म्हणाला, पहिलं बाबा आणि आई, त्यानंतर आम्ही .

काकू - विश्वास भावजी आणि सुलभाताई तुम्ही घ्या बरं नाव .

विश्वास- पहिलं सुलभा , नंतर मी 

सुलभा -आयुष्य जगण्यासाठी ,घ्यावा लागतो श्वास , माझ्या मनावर राज्य करतो ,फक्त विश्वास.

 तसे सगळे टाळ्या वाजवतात .

काकू -आता विश्वास भावजी तुम्ही.

 विश्वास- नाव नाव करता काय ,

माझ्या आयुष्यात फक्त सुलभा हाय .

प्रथमेश -बाबा ,काय नाव घेतलं ,माझी गोची होईल रे आता मला काही नाव येत नाही .

विश्वास -ये इकडे, मी तुला कानात सांगतो .प्रथमेश विश्वास जवळ जातो, विश्वास त्याला कानात काहीतरी सांगतो.

 काकू- तन्वी, तू घे बर पहिलं नाव.

 तन्वी - बघताक्षणी पडले प्रथमेशच्या प्रेमात 

आज देवा ब्राह्मणांच्या साक्षीने त्याच्या नावाचे मंगळसूत्र घातले गळ्यात .

सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.

 काकू - आता प्रथमेश, तू घे.

 प्रथमेश -गृहस्थाश्रमात प्रवेश कर असे यौवन मला खुनवी ,

आणि  गृहस्थाश्रमीची माझी साथी आहे तनवी.

 विश्वास- अरे, मी हे नव्हतं सांगितलं तुला, पण छान नाव घेतलं .

प्रथमेश- सुचलं तर घेतलं.

 सुलभा- आता आमचा लग्न सोहळा पार पडलेला आहे , आता मी सासूच्या रोलमध्ये जाणार आहे ,असं म्हणत ती मुंडावळ्या काढून ठेवते.

 काकू -मग ,आता सूनमुख बघायचं की आपल्याला 

सुलभा- हो हो, तू बस खाली ,चला रे मुलांनो ,बसा काकूच्या मांडीवर .

काकू खाली बसल्यावर ,हे दोघं अलगद, तिच्या मांडीवर बसतात .

काकू  -कशी आहे सूनबाई .

प्रथमेश- छान आहे .

काकू तन्वीची हनुवटी, हातात  घेत म्हणतात ,छान आहे हो सुनबाई आणि मग सून मुख म्हणून तिला पाचशे रुपयाची नोट देतात .आता दोघेही उठतात आणि सुलभाच्या मांडीवर अलगद बसतात, सुलभा सूनमुख म्हणून तन्वीला हातातलं ब्रेसलेट मंगळसूत्र देते, ते पाहून तन्वी खुश होते .

तन्वी- थँक्यू आई.

 सुलभा- आई पण म्हणते आणि थँक्यू पण म्हणते, आईला कुणी थँक्यू म्हणतात का?

 तन्वी- बरं बरं, सॉरी.

 भक्ती आणि शक्ती -आवडलं का तुला, आईला आम्ही आयडिया दिली होती.

 तन्वी -तुम्ही आयडिया दिली, म्हणजे छानच.

 भक्ती -आजकाल सगळे ऑफिसला जाताना, हेच घालतात ,गळ्यात खूप कमी लोक घालतात.

 तन्वी -मला दोन्ही घालायला आवडेल, गळ्यात किंवा हातात आलटून-पालटून वापरता येईल.

 सुलभा- हे घे ,हे गळ्यातलं छोटे मंगळसूत्र.

 तन्वी- आत्ताच तर तुम्ही एक दिलं ना, मग हे काय परत

 सुलभा- ताई जर असती, तर तिने तुला हेच दिलं असतं, हे तिची आठवण म्हणून ,असं म्हणत ,डोळ्यात आलेलं पाणी ती पटकन पुसते .प्रथमेशचे ही डोळे भरून येतात.

 विश्वास- या दोघांना तर काही कारणच लागत नाही , इमोशनल व्हायला ,मग तुम्ही दोघांनी कुठे जायचे ठरवले आहे फिरायला ,विषय बदलण्यासाठी, विश्वास बोलतो. 

प्रथमेश -अजून पंधरा दिवस सुट्टी आहे, बघू जाऊ इथेच कुठेतरी जवळ.

 विश्वास- आमच्याजवळ ,तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे.

 भक्ती -काय सरप्राईज आहे ,आम्हाला नाही सांगितलं . 

विश्वास -सांगितलं असतं, तर सरप्राईज राहिलं असते का?

 शक्ती -बरं ,ते जाऊ द्या ना ,काय सरप्राईज आहे ते सांगा. विश्वास डोळ्याने सुलभाला खुणावतो, सुलभा आत जाते आणि हातात एक पाकीट घेऊन येते. ते पाकीट दोघे मिळून तन्वी आणि प्रथमेश च्या हातात देतात, त्यांना सांगतात,उघडून पहा, आवडलं का?

 दोघे मिळून पाकीट उघडतात, तर त्यात दोन तिकिटे असतात ,तिकिटावर स्विझरलँड लिहिलेलं असतं.

 प्रथमेश- एवढे पैसे खर्च करायची ,काय गरज होती का ?सुलभा- अरे असू दे ,तुमच्यासाठी नाही तर कोणासाठी?

 विश्वास- आम्ही फक्त तिकीट काढून दिला आहे, बाकी खर्च तुम्हाला करायचा आहे.

 प्रथमेश- हो हो ,मोठं काम तर तुम्ही केलं, बाकी आम्ही करू .

तन्वी -पण एवढं करायची काहीच गरज नव्हती ,आम्ही ठरवलं होतं की ,सहा महिन्यांनी आम्ही फिरायला जाणार.

 विश्वास -हो मला माहिती आहे, त्यादिवशी तुम्ही दोघे एकमेकांशी बोलत होतात, तेव्हा मी ऐकले, आम्ही किती प्रथमेशला म्हणालो, लग्नासाठी आमच्या कडून पैसे घे, पण त्याने घेतले नाही आणि लग्न आश्रमात केलं त्यामुळे तुम्हा दोघांचे अपेक्षेपेक्षा जास्त पैसे संपले, म्हणून तुम्ही जायचं कॅन्सल केलेला ना? आम्हाला तुमच्या आनंदाशिवाय दुसरं काही नको, तुम्ही सगळ्यांना एवढा आनंद दिलात  ,तर तुम्हीही आनंदाने जगण्यासाठी पात्र आहात, असे आम्हाला वाटले आणि आमच्या दोघांकडून ही छोटीशी भेट दिली. 

विश्वास- चला ,आता सगळ्यांनी आपापल्या रूममध्ये झोपायला जा.

 सुलभा- तन्वी, आज तू भक्ती शक्तीच्या रूम मध्ये झोप, उद्या परत सकाळी लवकर उठायला लागेल . सत्यनारायणाच्या पूजेसाठी ,भटजी नऊ वाजता येणार आहे ,सगळे आपापल्या रूममध्ये झोपायला जातात, दमलेले असल्यामुळे सगळ्यांना पटकन झोप लागते. दुसऱ्या दिवशी सकाळी ,पूजेची तयारी सगळे मिळून करतात .भटजी बरोबर नऊला येतात, तेव्हाच आश्रमातील सगळी गॅंग बस मधून उतरते .सगळ्यांचा गोंधळ सुरू होतो, पूजा सुरू झाल्यावर, सगळे सतरंजीवर बसतात ,पूजेची कथा वाचून झाल्यावर , आरती मात्र  खूपच जोशात होते .प्रथमेश आणि तन्वी सगळ्या मोठ्या माणसांचे आशीर्वाद घेतात. तन्वीच्या घरचे आलेले असतात ,जेव्हा दोघे महेश आणि सुवर्णाच्या पाया पडायला लागतात ,तेव्हा ते दोघे पाया पडल्यावर, त्यांच्या हातात एक पाकीट देतात .

तन्वी- हे काय आहे ,बाबा .

सुवर्णा -आमच्याकडून ,तुम्हा दोघांना आशीर्वाद.

 तन्वी -आशीर्वाद दिला ना तुम्ही ,मग या पाकिटात काय आहे ?

महेश  -तुमच्यासाठी सरप्राईज आहे, उघडून बघा. प्रथमेश - कालपासून  सगळेच आम्हाला सरप्राईज देत आहे .तन्वी  पाकीट उघडून बघते तर त्यात हॉटेलचे बुकिंग असतात आणि फिरण्यासाठी गाडीचे बुकिंग पण असते. 

तन्वी -या सगळ्याची ,खरंच काही गरज नव्हती.

 महेश- तुम्ही दोघांनीही आम्हाला लग्नात काहीच खर्च करून दिला नाही ,म्हणून विश्वास आणि मी मिळून , तुम्हाला हे सरप्राईज द्यायचे ठरवले आणि आम्हाला खरंच तुमचा अभिमान वाटतो ,तुम्ही तुमचे लग्न ज्या पद्धतीने केले, ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. 

  स्वतःचा विचार न करता, दुसऱ्यांना आनंद देण्यात तुम्ही तुमचा आनंद मानला, तर आम्ही तुमच्यासाठी तुमचे आई-वडील म्हणून ,एवढे करू शकतो ,तेवढा अधिकार आहे ना आम्हाला.

 तन्वी -बाबा, अहो काहीपण काय बोलताय, आहे ना. महेश-  मग झालं तर , दोन दिवसांनी तुमची फ्लाइट आहे,  तर तुम्ही जायची तयारी सुरू करा.

 सगळ्यांना पूजेचा प्रसाद दोन मुले वाटतात, बाहेर अंगणात मंडप घातलेला असतो आणि त्यात बुफे जेवण असते. सगळे मिळून, जेवणाचा आस्वाद घेतात , आश्रमातील बस जेवण झाल्यानंतर परत जाते.

 विश्वास -आता सगळ्यांनी थोडा वेळ आराम करा, परत पाच वाजल्यापासून पाहुणे यायला सुरुवात होईल.

 सगळे थोडावेळ आराम करतात आणि चार वाजता तयारीला सुरुवात करतात, सगळ्यांची तयारी होते, सगळे चहा घेतात ,तितक्यात पाहुणे यायला सुरुवात होते, मग कुणी जेवणाचे नियोजन बघत होतं, तर येणाऱ्या पाहुण्यांच स्वागत करत होत ,अशाप्रकारे सत्यनारायणाच्या पूजेचा सोहळा संपन्न झाला. दुसऱ्या दिवशी, सकाळी आलेले बहुतेक पाहुणे,आपापल्या घरी गेले.दुपारी रूममध्ये आराम करायला गेल्यावर,  प्रथमेश आणि तन्वी एकमेकांबरोबर बोलतात आणि काहीतरी ठरवतात. काय ठरवलं असेल, त्यांनी हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा, हसत रहा, आनंदात रहा .

भाग आवडला असेल तर, नावासहित शेअर करू शकता  आणि अभिप्राय मात्र अवश्य द्या.

 क्रमशः 

रूपाली थोरात

🎭 Series Post

View all