सेकंड इनिंग-भाग 3
आज सकाळी तिला जाग आली,तर त्याचा हात तिच्या अंगावर होता ,तो तिने हळूच बाजुला केला ,एकदा त्याच्याकडे वळून पाहिले,तर त्याच्या चेह-यावर स्माईल होते आणि तिला त्याचे कालचे वागणे आठवले ,तिच्या चेह-यावर लज्जा आली आणि नंतर परत तिचा चेहरा गंभीर झाला,ती टेबलवर बसली आणि कागदावर लिहायला सुरुवात केली ,लिहिताना विचार केला,या वयात नको त्यापेक्षा आयुष्याच्या या वळणावर ठिक आहे ,तिला त्याची काळजी होती म्हणून परत एक पत्र ,झाले एकदाचे लिहून ,असं म्हणत ते तिने त्याच्या ऑफिसच्या बैग मध्ये ठेवलं आणि नेहमीप्रमाणे रोजच्या कामाला लागली.
शक्ती-आई डबा तयार आहे का ?
सुलभा -हो ,घे इथं ठेवला आहे.
शक्ती- आई ,मी तुझ्यासाठी खूप खुश आहे,असं नातं तुमच्यात असावं,असं मला खूप वाटत होतं ,पण तुम्ही दोघे ऑफिसचं काम ,घरात काय हवं नको आणि आम्हाला काय हवयं याचाच विचार करायचे ,कधी कधी तर मला प्रश्न पडतो,आम्ही कसे झालो.
सुलभा-तू जरा जास्तच चावट झाली आहेस
शक्ती -अगं आम्हाला ,सायन्स मध्ये आहे सगळं, पण इथून पुढे मात्र ,तुम्ही एकमेकांसाठी नक्की वेळ देत जा ,आता आम्ही आमची काम स्वत: करु शकतो.
सुलभा -हो,बाई हो ,आता तुला उशीर नाही होत आहे का कॉलेजला ?
शक्ती - बाय ममा ,लव्ह यू डियर
भक्ती - आई ,मी आज थोडी उशिरा जाणार आहे कॉलेजला ,तुला काही मदत करु का
सुलभा -का ग ,काय झालं
भक्ती - काही नाही गं,जे पहिलं लेक्चर आहे ,ते सर आज सुट्टीवर आहेत
सुलभा- हे डबे भर आणि नाश्त्याची तयारी करुन ठेव,तोवर मी आवरून येते .
असं म्हणून ,ती तिच्या रूममध्ये जाते .पाहते तर विश्वास ऑफिस साठी तयार झालेला असतो ,ती त्याला पाहते ,थोडासा डोक्यावर टक्कल पडलाय ,थोडसं पोट सुटलय,नाहीतर बाकी अजून तसा हँडसम वाटतो आणि हसते.
नेमकं विश्वास बघतो आणि विचारतो -काय झालं
सुलभा -काही नाही ,बोलू संध्याकाळी ,नाही तर मला लेट मार्क लागायचा ,असं म्हणत ती पटकन आंघोळीला पळाली .
त्याला वाटतं होतं की,तिला थांबवून विचारावं,पण त्यालाही माहित होतं की,तिला उशीर होईल,म्हणून तो हॉल मध्ये गेला .
भक्ती-बाबा, तुमचा डबा बैगेत ठेवलाय आणि नाश्ता घ्या.
विश्वास-हे काय ,अजून तू रेडी नाही झालीस आणि प्रथमेश नाही आला अजून,उठला की नाही.
भक्ती-मला आज थोडं उशिरा जायचं आहे आणि दादा उठलाय,येईल तो आवरून
प्रथमेश- मी इथं आहे आणि रेडी आहे
भक्ती-तुझा नाश्ता आणि डबा
प्रथमेश डबा बैगेत टाकतो ,नाश्ता करतो आणि हेल्मेट घेऊन बाय करतो .
विश्वास- गाडी हळू चालव रे
प्रथमेश-हो बाबा
भक्ती- रोज तुम्ही सांगता आणि तो हो म्हणतो
विश्वास- अगं ,काळजी असते तुमच्याबद्दल ,तुम्हाला तुम्ही आईवडील झाल्याशिवाय नाही कळायचं.
तितक्यात सुलभा येते - अहो आवरा ,शूज नाही घातले का अजून,उशीर होईल मला परत.
भक्ती -आई ,तुझी डब्याची बैग,त्यात नाश्त्याचा डबा पण ठेवलाय .
सुलभा -थैंक यू बेटा ,चल आम्ही येतो आणि व्यवस्थित सगळं बंद करून जा.
भक्ती-हो ग आई,तसही कमल येईल तो पर्यंत कामाला,ती आली की मी जाईन,तिला तर सवय आहे सगळं व्यवस्थित बंद करायची .
चार वाजता सुलभा विश्वासला मेसेज करते ,बैग मध्ये चिठ्ठी आहे ,ती वाच.
तो पाच वाजता मेसेज बघतो ,लगेच बैगेतून चिठ्ठी काढतो आणि अधीरतेने उघडतो ,विचार करत असतो ,काय लिहिलं असेल ,उत्सुकता असते ,त्याला जाणून घेण्याची ,तो वाचायला सुरुवात करतो .
प्रिय अहो ,
आज पत्र लिहिले आहे,त्याला कारण कालचे तुमचे वागणे,साहजिक आहे ,तुम्ही जेव्हा माझं पहिलं पत्र वाचलं असेल ,तेव्हा हादरून गेला असाल ,तुम्ही विचारही केला नसेल की,माझ्या मनात एवढं काही आहे ,त्यामुळे तुम्ही दुखावला ही गेला असाल ,पण आता पर्यंतच आपलं आयुष्य हे इतर जोडप्यांप्रमाणे गेलं ,मुलं झाली की ,आपलं आयुष्य त्यांच्यावर केंद्रित केले,यात आपण काहीही चूक नाही केली,आपण आई वडिलांच्या कसोटीवर खरे उतरलो ,या गोष्टीचा मला अभिमान वाटतो,पण आपल्यात एक दुरावा निर्माण झाला,आपण एका बेडवर झोपून सुध्दा आपल्यात विचारांची दरी मात्र कायम राहिली ,मुलांच्या जबाबदारीच्या ओझ्याखाली आपण कधी यंत्रासारख्ं वागायला लागलो ,हे कळलच नाही . पण कालच्या तुमच्या वागण्यावरून,तुम्ही वेगळाच अर्थ घेतला असं वाटलं.
तुमचं रोमँटीक होणं मला आवडलं नाही,असं नाही,पण त्या बरोबर मला तुमची काळजी सुध्दा आहे,जे मी कवितेतून व्यक्त केले आहे,मला आशा आहे की ,माझ्या भावना तुमच्या पर्यंत पोहोचतील.
आयुष्याच्या या वळणावर,
अपेक्षा आहे ,ती फक्त तुझ्या साथीची ,
इतकं पुढं आलोय की,नाही गरज आता प्रणयाची,
माझ्यावरच्ं प्रेम व्यक्त करण्यासाठी,नाही गरज पौरुषत्व सिध्द करण्याची,
पण गरज मात्र आहे,तुझ्या हाताच्या उशीची,
गरज आहे ,तुझ्या आश्वासक मिठीची ,
ज्यात भावना असते ,प्रेमाच्या ओलाव्याची,
रोज सकाळी उमेद भेटते,नव्याने जगण्याची,
ज्याला झालर असते ,सूर्यास्ताच्या लालीची,
जी ग्वाही देते जगताना,नव्या सूर्योदयाची,
आस आहे तुझ्याबरोबर,नव्याने आयुष्य पाहण्याची,
त्यात समरस होताना,आनंद अनुभवण्याची,
जे काही हातातून निसटलं,ते मिळवण्याची ,
मला सवय झाली आहे,तू सोबत असण्याची,
मजा नव्याने चाखायची आहे,तुझ्या सोबतीची,
मी तुझीच होते,आहे आणि राहणार,ही ग्वाही माझ्या प्रेमाची,
भरभरुन जगूया ,आणि मजा लुटुया आयुष्याची,
छोटी मोठी भांडण ,जाणीव करुन देतात तुझ्यावरच्या हक्काची,
त्यातून एकमेकांना मनवणं, ही तर निशाणी आहे एकमेकांवरच्या प्रेमाची,
त्यात उधळण करूया,आपल्या हाताने सप्तरंगाची,
आपलं आयुष्य पाहून,नजर लाजेल इंद्रधनुची,
मला आस आहे,ती तुझ्या सोबतीची,
ज्याला जोड असेल,अविस्मरणीय क्षणांची,
चढू दे तुझ्या साथीने , नशा तारुण्याची ,
नव्याने उमगलेल्या प्रेमातून,बहरलेल्या प्रणयाची,
पण त्या आधी गरज आहे ,स्वत:ला जाणून घेण्याची,
एकमेकांसाठी जगताना,स्वत:ला आरोग्यदायी ठेवण्याची,
आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत,तू बरोबर असावास ही इच्छा आहे तुझ्या अर्धांगिनीची .
फक्त तुझीच.
हे वाचून त्याला असं वाटलं की,मी खरचं वेगळा अर्थ काढला का,ती म्हणते ते ही काही चुकीचं नाही ,ऑफिसच्या कामामुळे आपण व्यायामासाठी वेळच देत नाही ,खरच आता नव्याने सुरुवात करतच आहोत ,तर अजून एक सुरुवात ,घरी जाता जाता तो त्याला आणि तिला ट्रैक पँट आणि टी शर्ट,स्पोर्ट शूज खरेदी करतो .घरी पोहोचला,तेव्हा मुलंही आली होती.
शक्ती-मग बापू,आज गजरा नाही आणला का ?
विश्वास - नाही वेळ मिळाला
शक्ती -पिशवीत काय आणलं आहे बघू
ती पिशवी हातातून घेत बघते ,वाह ट्रैक पँट आणि टी शर्ट,कुणासाठी?
विश्वास-माझ्यासाठी आणि आईसाठी ,आई आली नाही का अजून
शक्ती-आज तिला थोडा उशीर होईल म्हणाली ,तुम्हाला सांगितलं नाही तिने
भक्ती-बाबा, तिने तुम्हाला फोन लावला होता ,पण तुम्ही उचलला नाही ,मग मला करून सांगितलं ,तुम्हाला चहा करते ,तोवर फ्रेश होऊन या.
विश्वास फोन चेक करतो ,तर सुलभाचे तीन मिस्ड कॉल होते .
मग त्याला आठवतं,ऑफिस मधून निघाल्यावर त्याने फोन सायलेंट मोड मधून काढला नव्हता.
तो फ्रेश होऊन पुन्हा हॉलमध्ये येतो आणि टिव्ही लावतो.तितक्यात ती घरात येते ,का गं आज उशीर झाला,मिटींग चालू होती ,असं म्हणत ती डब्याची बैग किचनमध्ये ठेवते आणि फ्रेश व्हायला रूम मध्ये जाते .
आता हा पत्राला कसा घेईल माहित नाही.
ती असा विचार करत हॉल मध्ये येते.
शक्ती-आई ,तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे .
आई-काय गं,आता अजून काय केलं बाबाने
शक्ती -किती ओळखता,तुम्ही एकमेकांना,तुला कसं कळलं की बाबाने काहीतरी केलंय
विश्वास- तुम्ही दोघी अशा बोलत आहात ,जसा मी काही गुन्हा केला आहे
शक्ती- आम्ही काही बोललो का,चोराच्या मनात चांदणे,काही नाही गं,उद्या सकाळी लवकर उठून,तू आणि बाबा मॉर्निंग वॉकला जाणार आहात .
आई -चांगली गोष्ट आहे ,मी तर किती दिवसापासून म्हणते,मला एवढ्या पहाटे सोबतीला कुणी नसतं,म्हणून मी जाऊ शकत नव्हती .
शक्ती- म्हणजे त्यात अजून एक मजा म्हणजे ,त्यांनी मॉर्निंग वॉक साठी ड्रेस आणलेत,स्पोर्ट शूज पण
आई-तुला एवढा खर्च करायची काय गरज होती
विश्वास-ते सगळं घातल्या शिवाय फिरायला जावस्ं नाही वाटत
आई-हो ,मी विसरलेच की ,तुला कोणत्याही गोष्टीसाठी वातावरण निर्मिती करायला आवडते.
विश्वास- हो ,मग आहे मी तेवढा रोमँटीक,रसिक ,जे काही करायचं ते व्यवस्थित.
आई - हो का
शक्ती -आई ,बाबा खरचं रोमँटीक होते का गं
आई-तू तर प्रश्नांची सरबत्ती सुरु करते ,दिल ना उत्तर त्याने
शक्ती -म्हणजे,खरचं ,ये बाबा पण आता ,तू फक्त ऑफिस आणि ऑफिस करत असतो ,पण आता तू जे करतोस ना ,त्यामुळे मला खूप कुल वाटतय ,म्हणजे छान वाटत आहे,कीप ईट अप .
विश्वास -जशी आपली इच्छा
मग दुस-या दिवशी सकाळी मॉर्निंग वॉकला जी गंमत जंमत येते ती वाचायला विसरु नका .
कथा आवडली असेल तर नावासहित शेअर करू शकता आणि अभिप्राय अवश्य द्या.
क्रमशः
रुपाली थोरात
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा