सेकंड इनिंग भाग-18

Beautiful relation between husband and wife

सेकंड इनिंग भाग-18

अर्ध्या तासात ,दुसरा लग्न सोहळा चालू होणार होता.भक्ती आणि शक्ती ने सुलभाला बोलावले , तिला रूम मध्ये घेऊन गेल्या. तिला काहीच कळत नव्हते की, हे काय चालले आहे.तिकडे महेश विश्वासला घेऊन , गणपतीच्या मंदीरात गेले .

विश्वासलाही समजत नव्हते कि ,त्याला गणपती मंदिराकडे का घेऊन चालले आहे? तिथे गेल्यावर, त्याला प्रथमेश ने मुंडावळ्या बांधल्या आणि गणपतीच्या पाया पडायला सांगितले .

विश्वास- हे सर्व कशासाठी, प्रथमेश.

 प्रथमेश -आमची इच्छा होती की ,तुमच्या पंचविसाव्या लग्नाच्या निमित्ताने ,तुमचं परत एकदा लग्न लावून द्यायचं ,काल तुम्ही आईला हळद लावली, तेव्हा शक्तीने आम्हाला ही आयडिया दिली आणि आम्हालाही ती पटली .असेही तुमच्या लग्नात ,आम्ही काही नाचलो नव्हतो ,आता नाचू ,काय मग नवरदेव ?छान वाटतंय ना? विश्वास -कालच माझ्या मनात विचार चमकून गेला होता की ,ज्या मुलांनी आई-वडिलांना सरप्राइज द्यायचं ठरवलं, ते किती लकी आहे ,ती लकी व्यक्ती मीच आहे, हे ऐकल्यावर खूप बरं वाटलं.

 महेश -चला मग .आता वरात सुरू करायची ना ,पोरांनो ,वाजवा रे.

 तसंच मुलांनी ढोल ताशा वाजवायला सुरुवात केली, मग काय प्रथमेशने त्याच्या, मुंडावळ्या वगैरे सोडून ठेवल्या. तिकडे तन्वीनेही साडी चेंज केली आणि ते आता या लग्नात वऱ्हाडी म्हणून उपस्थित राहिले, दोघंही वरातीत डान्स करत होते.

 सुलभा -अगं पण, हे सगळं तुम्ही कधी प्लान केलं.

 भक्ती -काल तुम्ही एकमेकांना हळद लावले ना, त्यानंतर शक्ती आम्हाला म्हणाली की, आपण असं करू शकतो, मग त्यानंतर आम्ही पटकन ही सगळी तयारी केली . तसंही लग्नाला उपस्थित राहणारे लोक तीच होती. 

सुलभा -अगं, पण आता हे मेक-अप वगैरे परत करायची गरज आहे का?

शक्ती- आई, तू शांत बस ,बर जरा ,आता तु नवरी आहेस 

सुलभा- हे बरे आहे बाई, मी तुम्हाला नवरी झालेला बघायचं सोडून ,तुम्हीच मला नवरी करत आहात .

शक्ती -अजून आम्हाला वेळ आहे आणि तसेही आम्ही तुमचं लग्न कुठे अटेंड केलं ,आता आम्हाला चान्स मिळतोय, तर एन्जॉय करू द्या ना.

 सुलभा- बर बाई ,मी काही नाही बोलणार ,तुम्हाला काय करायचे ते करा .पार्लरवालीने परत तिचा थोडासा मेकअप केला, त्यांनी एक शाल आणली होती, ती तिच्या अंगावर टाकली ,मुंडावळ्या बांधल्या .वरातीचा आवाज येत होता, तसं भक्ती-शक्ती म्हणाल्या ,काकू ,तू आईला घेऊन नंतर ये ,आम्हाला वरातीत नाचायचं आहे ,आम्ही जातो ,आम्ही दोन्हीकडून ना.

 काकू -बरं बरं जा, मुल तुमच्यासाठी हे करत आहे, हे पाहून खूप छान वाटलं.

 सुलभा- काही डोक्यात घेऊन बसतात.

 काकू- असं कसं काहीही, त्यांच तुमच्यावर प्रेम आहे, हे त्या प्रेमाखातर, ते सारे करतात .

सुलभा -तू म्हणते, तेही बरोबर आहे आणि त्यांच्यासाठी हे सगळं करत आहे, पण काहीही म्हण, आता मला माझ्या लग्नाच्या वेळचे क्षण आठवत आहेत.

 काकू- मग लग्न झाल्यावर, हनिमूनला पण जाणार का ?सुलभा- हे काय ग, तू पण चिडवायला लागलीस का आम्हाला?

 काकू -अहो, जा की , त्यात काय एवढं? 

 सुलभा- आता मुलांनी हनिमूनला जायचं ,आम्ही काय करणार?

 काकू -जरी आपलं वय झालं ,तरी एकमेकांबरोबर निवांत वेळ तर घालवू शकतो ना? माझी तर खूप इच्छा आहे ,पण हे काही माझं ऐकत नाही, त्यांना ही सगळी थेरं वाटतात.

 सुलभा -हा, तसं विश्वास तर एका पायावर तयार होईल, बघू ,पुढचं पुढे ,आता या धक्क्यातून तर सावरू दे.

 तन्वी येते आणि म्हणते ,चला आई ,मी तुम्हाला न्यायला आली आहे ,तसं काकू ,सुलभा तिच्याबरोबर जातात. तिथे गेल्यावर ,सुलभा आणि विश्वास एकमेकांकडे पाहतात ,विश्वास तर सुलभा कडे पाहतच राहतो ,ती हळूच डोळा मारते , तसा तो एकदम भानावर येतो.

 महेश -काय झालं ?

विश्वास - काही नाही .

शक्ती -आमची नवरी थोडी खट्याळ आहे , हो ना रे बाबा. तसे सगळे हसतात .

प्रथमेश- चला आता ,आम्ही पण काही कमी नाही.

 सनईवाला  पुढे चालत असतो, त्यामागून मुले नाचत असतात  आणि त्यांच्या मागे सुलभा आणि विश्वास चालत जात असतात ,चालताना एकमेकांकडे पाहत हसत असतात. खुर्च्यांवर बसलेले सगळे नातेवाईक मंडळी ,कुतुहलाने बघत असतात, की नक्की कुणाचं लग्न आहे. विश्वास आणि सुलभाला बघितल्यानंतर, उठून टाळ्या वाजवतात, हे पाहून काकाचा मात्र जळफळाट होत असतो .मुले स्टेज पर्यंत नाचत-नाचत जातात ,स्टेजवर गेल्यावर, दोघांमध्ये अंतरपाट धरला जातो, मंगलाष्टके सुरु होतात .शेवटच्या मंगलाष्टकानंतर , सुलभा विश्वासला हार घालणार ,इतक्यात महेश, प्रथमेश, सर्वेश विश्वासला उचलून घेतात, मग सुलभा फक्त विश्वास कडे पाहते .विश्वास सगळ्यांना म्हणतो ,अरे ,मला खाली उतरवा ,नाहीतर, आज घरी गेल्यानंतर माझं काही खरं नाही ,तसे सगळे हसायला लागतात आणि त्याला खाली उतरवतात .सुलभा हार घालण्यासाठी हात वर करते, तसा विश्वास त्याची मान खाली वाकवतो.

 महेश- काही खरं नाही आता तुमचं, आता आयुष्यभर अशीच मान वाकवत रहावे लागेल .

विश्वास- प्रेमाखातर काही ही, असं म्हणत तोही सुलभाच्या गळ्यात हार घालतो .दोघे एकमेकांना गुच्छ देतात आणि जागा बदलतात. तितक्यात गुरुजी येतात आणि म्हणतात, चला कन्या दानासाठी, नवरीच्या आई-वडिलांना बोलवा, तसं प्रथमेश पटकन मामा मामीला घेऊन येतो .सप्तपदी ,कन्यादान पूर्ण होते ,त्यानंतर प्रथमेशचा मामा,  सुलभाचा हात हातात घेऊन , विश्वासच्या हातात देत म्हणतो ,आतापर्यंत तुम्ही माझ्या ताईला खूप छान सांभाळलं ,इथून पुढेही सांभाळाल , दोघांना पुढील आयुष्यासाठी आरोग्यदायी शुभेच्छा. 

आता सगळ्यांचे एकमेकांसोबत फोटोसेशन होते , आश्रमातील सगळ्या मुलांसोबत ,आजी-आजोबांसोबत, नातेवाईकांसोबत  .विश्वास आणि सुलभाच दोघांचं स्वतंत्र फोटोसेशन होतं .दोघांचे फोटोसेशन करताना, फोटोग्राफर वेगवेगळ्या पोज सांगत असतो ,त्यावेळी विश्वास म्हणतो ,अरे पंचवीस वर्षांपूर्वी जे केलं नाही, ते सगळं तू मला आता करायला लावणार आहेस का ?

फोटोग्राफर -काय हरकत आहे काका, असही काही वेळापूर्वी कुणीतरी म्हणालं होतं की ,अभी तो हम जवां है, तो ले लो आनंद ,कुणी अडवलं आहे तुम्हाला?

 सगळे त्यावर खळखळून हसतात ,त्यानंतर विश्वास , सुलभा सगळ्या आश्रमातील वृद्धांचा आशीर्वाद घेतात, त्यांच्याबरोबर तन्वी आणि प्रथमेश सुद्धा असतात . एकीकडे फोटोसेशन चालू होते आणि दुसरीकडे सगळे जेवणाचा आस्वाद घेत होते. जेवणामध्ये नाही म्हटलं तरी, वीस-पंचवीस पदार्थ होते ,मुलांसाठी तर खूप पर्वणीच  होती .दुपारचे आता दोन अडीच वाजले होते , सगळे पाहुणे मंडळी जेवून आपापल्या घरी गेले होते. आता घरातले सगळे सुद्धा जेवून खुर्च्यांवर शांत बसले होते .

सोनावणे यांनी ,त्यांच्याकडून चहा आणि नाश्त्याची चार वाजता सोय केली होती ,चहा नाश्ता झाल्यावर सगळे आपापल्या घरी जाणार होते. महेश आणि सुवर्णा थोडेसे इमोशनल झाले होते ,आपली लेक आता जाताना आपल्या बरोबर नसेल, हे त्यांना जाणवत असतं ,त्यामुळे डोळ्याच्या कडा ओल्या होतात ,हे पाहून तिथे दोन आजीबाई असतात ,त्या म्हणतात, तुम्हाला जर काही प्रोब्लेम नसेल तर ,आम्ही गाणे म्हणू का ?

तर सगळे हो म्हणतात

विहीणबाई, विहीणबाई, राग मनातला सोडा

गोरी गोरी वरमाय

तिचे नाजुक पिवळे पाय

गव्हा तांदळान भरल्या कोठया

खोबर्या नारळान मी भरीते ओटया

खणा नारळान मी भरीते ओटया

विहीणबाई राग मनातला सोडा

जेवण झाल्यावर हात चोळते साखरीन

दात कोरते लवंगान

घंगाळी रुपये तुम्ही घाला

विहीणबाई राग मनातला सोडा

रेशमी पायघडयावरुन मिरवा

विहीणबाई राग मनातला सोडा

मोठया लोकांचा नवरदेव सासरी रुसला

कंठी गोफासाठी जानोसी बसला

नवरदेवाच्या जोरावर सवाष्णी मागती जानोसा

चिरेबंदी वाडा त्यात जोडीनी हो बसा

विहीणबाई, विहीणबाई, राग मनातला सोडा

गोरी गोरी वरमाय

पूर्वीच्या काळी ,अशी गाणी पण म्हटली जायची लग्नात , आठवलं म्हणून बोललो आम्ही.

 शक्ती -खूप छान, म्हटल आजी, मी तर रेकॉर्ड करून ठेवल आहे

आजी -तुम्ही आजकालच्या मुलांनी कौतुक केलं ,हेच खूप मोठा आहे, नाहीतर काही मुलांना गावंढळ वाटतं,असं बोलत असताना , त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं.

 शक्ती -नाही हो आजी, खरच छान होतं आणि आपण आपली परंपरा जपली पाहिजे .

आजी -खरं म्हणतेस ग तु पोरी ,पण असंच आठवण आली, माझ्या नातवांची .

शक्ती -आम्ही पण, तुमची नातवंडे आहोत ना ? मग कशाला रडता ? तुम्हाला काही बोलायचं असेल तर,  आमच्याशी बोला. 

आजी- हो गं ,ते तर मी हक्काने बोलणारच आहे, या आश्रमात आल्यापासून, पहिल्यांदा असं आम्हाला, त्यांच्या कुटुंबाप्रमाणे वागवले आहे ,आमचे सगळ्यांचेेे तुम्हाला भरभरून आशीर्वाद . 

भक्ती -कुटुंब आहे असेही म्हणता ,असं का बोलता, दोन्ही हातांनी आम्हाला आशीर्वाद द्या आणि अशीच तुमची सेवा आमच्याकडून घडू द्या .

विश्वास आणि सुलभा दोघांनाही ,आपल्या मुलांवर आपण चांगले संस्कार केले ,याचा आनंद होतो .चार वाजता नाश्ता झाल्यावर, सगळे जायची तयारी सुरू करतात ,महेश आणि सुवर्णा, प्रथमेशच्या घरच्यांना ,सगळ्यांना हातात साखर देतात. सगळ्यात शेवटी ,तन्वीला साखर देताना मात्र, दोघांचाही बांध फुटतो आणि चौघेही  एकमेकांच्या गळ्यात पडून रडतात. विश्वास आणि सुलभा ,थोड्यावेळाने जवळ जातात आणि त्यांना सांगतात, आज पासून , तन्वी आमची मुलगी आहे, तिची काळजी करू नका .

महेश -हो ,आम्हाला माहित आहे ,तुम्ही तिची खूप काळजी घ्याल, म्हणून आम्ही बिनधास्त आहोत ,असं म्हटल्यावर सगळे आपापले डोळे पुसतात. प्रथमेश आणि तन्वी एका गाडीत बसतात, त्यांच्याबरोबर भक्ती आणि शक्ती ही जाते .महेश आणि सुवर्णाचा निरोप घेऊन, विश्वास आणि सुलभा गाडीत बसतात. आश्रमातली सगळी मुले आणि वृद्ध त्यांना, निरोप द्यायला आलेले असतात.

 पुढच्या भागात काय काय गंमत होते, हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा, हसत रहा आणि आनंदात राहा .

तुम्हाला जर हा भाग आवडला असेल तर ,नावासहित शेअर करू शकता आणि अभिप्राय अवश्य द्या .

क्रमशः 

रूपाली थोरात

🎭 Series Post

View all