करियरची सेकंड इनिंग

मातृत्व आणि करिअर यांचे संतुलन कुठल्याही स्त्रीला जरा कठीणच असते पण अशक्य नसते. पण ते पहिले पहिले मातृत्वाचे क्षण अनुभवण्याची मजा काही औरच असते आणि हेच रेश्माला हवे आहे. रेश्मा विषयी वाचा माझ्या या कथेतून.


          "रेश्मा, अग आज तुझे ऑफिस मध्ये एक महत्त्वाचे प्रेझेंटेशन आहे ना? झाली का तुझी तयारी? मी काय विचारणार बाबा तुला? तू तर कॉर्पोरेट क्षेत्रातील नावाजलेली प्रोफेशनल आहेस.आजच्या प्रेझेंटेशनची तयारी तर तू तीन दिवस आधीच केली असशील! हो ना? बाय द वे बेस्ट ऑफ लक डियर बायको!"बायकोचे असे मन भरून कौतुक करून प्रसाद आपल्या ऑफिसला जाण्यासाठी घरातून निघाला.

          रेश्मा खरंच कौतुक करण्यासारखी तरुणी होती. Beauty with brain ही संकल्पना तंतोतंत लागू होण्यासारखीच ती होती. तजेलदार चेहरा, काळेभोर केस ,उंच बांधा, सरळ नाक अगदी एक मॉडेल शोभेल असेच तिचे राहणीमान. तिची पर्सनॅलिटी, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, घरातील पाककलेतील तसेच इतर आणि कामांमधील चपळाई पाहून तिच्या सहवासातील प्रत्येक जण तिचे तोंड भरून कौतुक करत असे. प्रत्येक नवीन गोष्ट शिकणे हा जणू तिचा छंद होता. अगदी महाविद्यालयीन जीवनापासून ती क्विक लर्नर होती . ती एक हुशार, गुणवंत विद्यार्थिनी होती. महाविद्यालयीन शिक्षण संपण्याच्या आतच तीन कंपन्यांची ऑफर तिच्या हातात होती .तिचा शैक्षणिक आलेख तर उत्तम होताच सोबतच एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजचा आलेखही अगदी उत्तम होता. एका नावाजलेल्या सॉफ्टवेअर कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून लगेचच ती रुजू झाली होती. 

           प्रसादचे स्थळ जेव्हा तिला चालून आले तेव्हा तिने व तिच्या आई-वडिलांनी क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला .कारण दोघांनीही पहिल्याच भेटीत लव्ह अट फर्स्ट साईट चा अनुभव घेतला व रेशीम लग्नगाठ बांधली .एकंदर तिच्या आयुष्यात सर्व व्यवस्थित व तिच्या मनाप्रमाणे घडत असल्याने ती व तिच्या घरचे सर्वच आनंदित होते. प्रसादही आपल्याला इतकी हुशार होतकरू बायको मिळाली म्हणून खूप खुश होता .अशातच रेश्माला दिवस राहिले. नऊ महिने घरून काम करून तिला मॅटर्निटी लिव्ह ही मिळाली होती आणि सुंदर गोंडस मुलाला तिने जन्म दिल. 

        एक दिवस अचानक तिने करियर मधून ब्रेक घेण्याचे ठरवले .प्रसादसह घरातील सर्व सदस्य मात्र तिचा हा निर्णय ऐकून अवाकच झाले. कारण ती अगदी लहानपणापासूनच खूप महत्त्वाकांक्षी मुलगी होती. काही तरी करून दाखवणार हा नेहमीच तिचा अट्टाहास असायचा व त्यानुसार ती उच्च पदावर विराजमान अशी कॉर्पोरेट प्रोफेशनल बनलीही. पण करिअरमध्ये इतक्या उंचीवर पोचल्यावर अचानक तिचा हा निर्णय ऐकून सर्वच अचंबित झाले .

       प्रसादने जेव्हा तिला याविषयी विचारले तेव्हा ती एकदम शांततेत म्हणाली ,"प्रसाद, आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी या पहिल्यांदाच घडतात. ते अनुभव, ते सुखद क्षण आपण घाई मध्ये किंवा कामांमध्ये अनुभवायचे विसरून जातो व नंतर पश्चाताप करत बसतो .मला ना आपल्या मुलाचं पहिलं पाऊल, पहिले बोबडे बोल असे सर्व पहिलेवहिले क्षण अनुभवायचे आहेत. माझ्यातल्या आईला मला योग्य न्याय देऊन मला माझं पहिलं वहिलं मातृत्व अनुभवायच आहे . मला सर्व लहानसहान गोष्टी त्याला स्वतः शिकवायच्या आहेत. माझं मूल जेव्हा माझ्याशिवाय व्यवस्थित राहू शकेल तेव्हाच मी माझ्या करिअरची सेकंड इनिंग सुरू करेल म्हणूनच मी हा निर्णय घेतलाय . म्हणून डोन्ट वरी हबी! मी काही कायमची घरी बसणार नाही, आणि माझी महत्त्वाकांक्षाही मी सोडलेली नाही." 

       रेश्माचा हा विचार ऐकून प्रसाद मनोमन सुखावला. सुखी संसाराला एकमेकांच्या भावना तसेच संवेदनशीलतेची जोड असली की तो वयानुरूप बहरतो हे त्याला माहीत होते . त्यानेही तिच्या या निर्णयाचे स्वागत केले. अशा तऱ्हेने रेश्मा व प्रसादच्या सुखी संसाराला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात झाली.


तर मग मित्रमैत्रिणींनो आवडली ना ही कथा!

अशा अनेक कथांचा आस्वाद घ्या माझ्या लेखणीतून!!

 धन्यवाद!!