सेकंड इनिंग भाग-20

Beautiful relation between husband and wife

सेकंड इनिंग भाग-20

प्रथमेश आणि तन्वी दोघांना, दोन दिवसांनी फिरायला जायचे असते, म्हणून ते शॉपिंगला जातात आणि जाताना भक्ती-शक्तीलाही घेऊन जातात .तिकडे गेल्यावर ,ते सुलभा आणि विश्वाससाठीपण शॉपिंग करतात. घरी आल्यावर , सगळ्यांना त्यांनी काय काय शॉपिंग केली, ते दाखवतात .सुलभा आणि विश्‍वास यांच्यासाठीही, जे घेतलेले असते ,ते दाखवतात .

सुलभा -अरे तुम्ही फिरायला चालले,आमच्यासाठी हे सगळं आणायचे काय गरज होती.

 तन्वी- आई ,तुम्ही दोघे सुद्धा फिरायला जाणार आहात , आमच्याकडे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, प्रथमेश बोलत होता की, तुम्हाला लग्नानंतर लोणावळ्याला थांबायचे होते, पण काही कारणामुळे,  थांबता आले नाही म्हणून ,आम्ही दोघांनी तुमच्यासाठी एका रिसॉर्टचे बुकिंग केलेले आहे ,तुम्ही दोघे जाऊन, तेथे निवांत रहा ,एन्जॉय करा.

विश्वास -अरे ,तुम्हाला एवढे पैसे खर्च करायची काही गरज नव्हती आणि तुम्ही आल्यावर आम्ही जायचा प्लॅन केला होता. सुलभा विश्वासकडे आश्चर्याने बघते.

 प्रथमेश- हो बाबा, तू मला बोलला होतास, पण तुम्ही आम्हाला एवढे मोठे सरप्राइज दिले, त्याबदल्यात हे काहीच नाही आणि भक्ती-शक्ती पण बोलल्या, त्या ऍडजस्ट करतील आणि तसंही तन्वीचे आई-बाबा इथंच आहेत ,त्यांना काही मदत लागली तर ते करतील आणि काय तीन चार दिवसाचा प्रश्न आहे, एन्जॉय युवर  सेकंड इनिंग .

सुलभा -तुम्हा मुलांचा, तर मला काही कळतच नाही, मला न विचारता सगळं ठरवून मोकळे झालात.

 विश्वास -तू खुश नाही आहेस का?

 सुलभा -अरे असं नाही, पण हे दोघेही जात होते ,मग ते आल्यावर आपण गेलो असतो.

 भक्ती- अगं आई ,आता आम्ही मोठे झालो आहोत, आम्ही आमची सगळी काम करू शकतो आणि शिवाय दादा म्हटल्याप्रमाणे, तन्वीचे आई-बाबा आहेतच की, जर आम्हाला तसं काही वाटलं ,तर आम्ही फोन करू त्यांना , असंही लोणावळा एवढे काही लांब नाही आणि मला माहित आहे, तू सकाळ संध्याकाळ आम्हाला फोन करशीलच.

 विश्वास -नाहीतर ,तुम्ही दोघीही चला आमच्याबरोबर

शक्ती- आलो असतो रे बाबा ,पण आम्ही कशाला कबाब मे हड्डी .

सुलभा- आम्हाला काही तुमचा त्रास होणार नाही , तुम्हाला असं वाटत असेल.

 भक्ती -अगं आई ,मजा केली ,तसंही कुठेही जाताना आपण सगळे बरोबर जातो, एकदा तुम्ही दोघं जाऊन बघा फक्त ,आम्हालाही बरे वाटेल.

विश्वास- बरं ,तुम्ही सगळे म्हणत आहात तर ठीक आहे. उद्या तुम्हाला फ्लाईटमध्ये बसून दिल्यानंतर ,आम्ही परवा सकाळी जाऊ, ठीक आहे.

 तन्वी -थँक्यू बाबा ,माझं ऐकल्याबद्दल .

विश्वास -उलट ,आम्ही थँक्यू म्हटलं पाहिजे, तू आमच्या घरात नवीन असतानासुद्धा, तू आमचा एवढा विचार केला ,हेच आमच्यासाठी खूप आहे, अशीच आनंदात रहा. चला जा, आता तुम्ही तुमच्या रूममध्ये आणि बॅगा पॅक करा.

 सुलभा- अरे, मी थोडासा चिवडा, लाडू ,चकली, शंकरपाळी केली आहे ,ती पॅक करून देते, ती पण ठेव.

प्रथमेश- अगं, तिकडे आम्ही काही दिवाळी सेलिब्रेट करायला नाही चाललो आहे ,तिकडे सगळं मिळतं.

 तन्वी- अरे ,त्यांनी इतक्या प्रेमाने बनवला आहे ,तर द्याहो आई थोडं थोडं ,त्याने नाही खाल्ला तर मी खाईन आणि याने मागितलं ना, तिकडे गेल्यावर, तर बिलकुल सुद्धा याला देणार नाही ,यावर मात्र सगळेच हसतात .

प्रथमेश- बाबा ,मी आता तुझ्या कॅटेगरीत आलो .

विश्वास -म्हणून तर म्हणतात ,शादी करे वो भी पछताए , ना करे वो भी पछताए .

शक्ती -बाबा, तू तर काही पण बोलतो, ते तसं नाही आहे, शादी ऐसा लड्डू है, जो खाये वो पछताए, ना खाये वो भी पछताए .

सुलभा- प्रथमेश आणि तन्वी  तुम्ही जा आणि पॅकिंग करा ,भक्ती ,त्यांना मी पॅक करून देते ,तेवढ्या वस्तू नेऊन दे.

सुलभा जेवण बनवते ,मग सगळे रात्रीचे जेवण करतात.

जेवताना शक्ती -तन्वी, तू आज काहीच गोड बनवलं नाहीस ,तुझा पहिला दिवस आहे ना रसोईतला.

सुलभा -ही पोरगी जास्त सिरीयल बघते, त्याचा हा परिणाम आहे, आपल्याकडे असं काही नसतं ,तन्वी तुला जेव्हा इच्छा होईल, तेव्हा तू आम्हाला बनवून देऊ शकतेस .

तन्वी -मला आवडतो स्वयंपाक करायला आणि वेगवेगळे पदार्थ बनवायला येतात ,पण लग्न झाल्यापासून निवांत असा वेळच मिळाला नाही.

 विश्वास- आता हे तुमचे एन्जॉय करण्याचे दिवस आहेत, मग काय एकदा संसार सुरू झाला की, काही फुरसत मिळत नाही ,दिवस कसे निघून जातात, कळतही नाही , आता आमचं बघ ना ,आमच्या लग्नाला पंचवीस वर्षे कशी झाली ,हे कळले देखील नाही .

तन्वी -हो ,तुमच्याकडे पाहून बिलकुल असं वाटत नाही. भक्ती -काही दिवसांपूर्वी ,हे चित्र खूप वेगळं होतं, माहित नाही ,बाबाला अचानक काय झालं आणि त्याने व्यायाम वगैरे करणं सुरू केलं ,आता दोघेही छान फिट आणि फाईन आहेत ,तसं विश्वास सुलभाला डोळा मारतो आणि नेमकं शक्ति बघते.

शक्ती-  हा बदल कसा झाला , यामागे नक्कीच काहीतरी गुपित आहे  ,पण तुम्ही आम्हाला सांगत नाही.

 सुलभा- बदल चांगला आहे ना ,मग झालं तर ,बरं ते जाऊ दे ,तन्वी,  सगळी कपडे व्यवस्थित भरलीस ना?

तन्वी- हो आई.

विश्वास- पासपोर्ट ,तिकीट, दोघेही व्यवस्थित सांभाळा आणि एकमेकांची काळजी घ्या .

भक्ती -हे सगळं ,तुम्ही त्यांना उद्या जाताना सांगा ,आजच काय सांगताय.

 विश्वास -उद्या तर सांगेलच ,पण आज लक्षात आलं , म्हणून आजही सांगतोय, ते दुसऱ्या देशात चाललेत ना. शक्ती- दोघेही तसे स्मार्ट आहेत, तुम्ही नका काळजी करू.

 प्रथमेश- सांगू दे ग, मला नाही काही वाटत, ते आपल्या काळजीपोटी बोलत असतात .

विश्वास- तुम्हा मुलांना असं वाटतं, आई वडील नुसते इन्स्ट्रक्शन देत असतात ,पण काळजी असते ,म्हणूनच देतो रे .तुम्हाला कधी कधी बोर होत असेल, की सारखी एकच गोष्ट सांगतात ,पण हे सगळं तुम्ही जेव्हा आईबाप व्हाल ना, तेव्हा तुम्हाला आमचं मन कळेल.

 शक्ती- मी नक्की आई झाल्यानंतर, तुम्हाला माझा अनुभव सांगते .

भक्ती -एक नंबरची निर्लज्ज आहे तू ,कधीतरी एखादी गोष्ट सिरियसली घेत जा .

शक्ती -मला तरी एखादी गोष्ट सिरियसली घ्यायला सांगितली, एवढं माझं नशीब ,नाही तर स्वतः प्रत्येक गोष्ट सीरियसली घेते.

 भक्ती- म्हणजे ,तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे .

शक्ती -तू जरा आयुष्याचा आनंद लुटायला शिक.

 भक्ती -तू लुटतेस ना, मग बस झालं .

सुलभा- बस झाल , दोघींचं नेहमी बघावं तेव्हा भांडण करत असता.

 भक्ती -तू सांग बरं बाबा ,कोणी सुरुवात केली होती आधी.

 विश्वास- जाऊ दे ,लहान आहे ती .

भक्ती- नेहमी लहान आहे ,या नावाखाली ,तिच्या सगळ्या चुका मान्य असतात, मला मात्र प्रत्येक वेळी ओरडा बसतो.

 सुलभा- आता बस झालं, तुमच्या दोघींचं ,तन्वी काय विचार करेल.

 तन्वी -अहो ,काही नाही विचार करणार, त्या भांडणातूनही त्या दोघींचं एकमेकांवर प्रेम दिसतं,  मला बहिण नाही ,त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी खूप मिस केल्यात.

 शक्ती -आता, आम्ही दोघी तुला खूप त्रास देऊ आणि तुझी ती उणीव भरून काढू ,पण तुला राग नाही येणार ना .

तन्वी- अगं ,राग कसला त्यात मला आवडेल तुमच्याबरोबर तसं रिलेशन मेंटेन करायला

 प्रथमेश- आता ,माझं काही खरं नाही ,या ननंद भावजय एकत्र झाल्या, मी बिचारा एकटा पडलो ,तसेच सगळे जोरात हसतात .

आपापल्या रूममध्ये सगळे आवरल्यावर झोपायला जातात .

तन्वी -मला तुमच्या घरातलं वातावरण खूप आवडलं, सगळे किती फ्री आहेत ना आणि विशेष म्हणजे आई-बाबा.

 प्रथमेश- हो ,त्यांनी आम्हाला नेहमी फ्रीडम दिलं आहे, पण त्याबरोबर काय चांगले आणि काय वाईट याचीही  जाणीव करून दिली, त्यामुळे कुणीही त्याचा गैरफायदा घेत नाही.

 दुसऱ्या दिवशी महेश, सुवर्णा ,विश्वास, सुलभा, भक्ती, शक्ती, सर्वेश सगळेच त्यांना एअरपोर्टवर सोडवायला जातात .सगळे त्यांना आपापल्या परीने इन्स्ट्रक्शन देत असतात ,जशी त्यांची आत जायची वेळ होते ,तसे सगळे त्यांना हॅपी जर्नी बोलतात. भक्ती-शक्ती सर्वेश त्यांना जोरात ओरडून बोलतात, एन्जॉय युवर डेज. ते गेल्यानंतर महेश - आज ,आपण सगळे ही बाहेर जेवून जाऊ.

 सुलभा -नको नको ,परत आम्हाला चार दिवस बाहेर जेवायचं आहे, त्यापेक्षा मी पटकन आमच्या मावशींना पोळ्या करायला सांगते आणि गेल्यावर पटकन मी भाजी टाकते आणि आता तसंही लग्न पूजा यामुळे खूप बाहेरचं खाण्यात आलं आहे ,थोडसं साधं जेवलं तर नाही चालणार का?

 महेश -अहो ताई ,तुम्हाला त्रास नको म्हणून मी म्हणालो. सुवर्णा -चालेल चालेल ,आम्ही दोघी मिळून करू पण घरीच जाऊया, सगळे घरी जातात .

महेश आणि विश्वास दोघे गप्पा मारत बसतात .सुवर्णा आणि सुलभा मिळून पटकन भाजी करतात, वीस मिनिटात जेवायला सगळ्यांना हाक मारतात.

 महेश- खुपच पटकन बनवलं जेवण, तुम्ही ताई.

 सुलभा -अहो भाज्या निवडलेल्या होत्या, मग पटकन बनवून झाल्या, सुवर्णाने तोपर्यंत पापड तळले आणि सलाड बनवले.

 विश्वास- पण काही म्हणा, घरचे जेवण ते घरचे जेवण, तृप्त झाला आत्मा ,धन्यवाद मॅडम.

महेशही धन्यवाद मॅडम बोलतो ,ते पाहून भक्ती-शक्ती हसतात, महेश त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघतो.

 भक्ती -अहो काका ,बाबांना रोजची सवय आहे, जेवण झालं की ,ते आईला असच बोलतात .

सुवर्णा -बघा ,तुम्ही पण शिका काहीतरी यांच्याकडून. सुलभा- अगं काही नाही सुवर्णा, असं म्हटलं म्हणजे , बायकोला रोजच घरातलं जेवण बनवावं लागतं ,खुश करण्यासाठी बोलतो ,दुसरं काय ?

विश्वास -असं काही नाही ,मी मनापासून बोलतो ,कारण तू स्वतः जेवण बनवतेस आणि तुझ्या हातचं जेवण मला आवडतं.

 सुवर्णा -म्हणजे ,यांना माझ्या हातचं जेवण कदाचित आवडत नसेल.

 महेश- अगं बाई आवडतं, तू कुठली गोष्ट कुठे न्यायला लागलीस .

सुवर्णा -मग तुम्ही, असं कधी कौतुक करत नाही .

सुलभा- अगं प्रत्येक व्यक्तीला कौतुक करायची सवय असते ,असं काही नाही, प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते.

 महेश -अगदी खरं बोललात ताई, मला नाही तेवढं व्यक्त होता येत, पण मलाही सुवर्णाच्या हातचा स्वयंपाक आवडतो, तिला विचारा, शक्यतो मी ही घरीच जेवतो , क्वचित कधीतरी आम्ही कारणास्तव बाहेर जेवतो.

 सुवर्णा -हे मात्र अगदी खरं आहे .

विश्वास -पण तुम्हाला आवडलं, तर ते बोलून दाखवलं, पुढच्या व्यक्तीला बरं वाटतं ,प्रयत्न करून पहा, मीही माझ्या स्वतःमध्ये बरेच बदल केले आहेत.

 महेश -नक्की करेन, बरं, तुम्ही उद्या सकाळी कधी निघणार आहात, मुलींची काही काळजी करू नका, मी सुवर्णाला हवं तर, दोन-तीन दिवस इकडे झोपायला पाठवतो .दोघे छान एन्जॉय करा, तुमचे अनुभव आम्हाला सांगा.

 सुवर्णा- कशासाठी ,आपण जाणार आहोत का नंतर? सुलभा -तुम्हा दोघांना यायचं असेल तर चला आमच्याबरोबर, आम्हाला कंपनी होईल.

 महेश -नाही, आता तुम्ही जाऊन या ,आपण सगळेच एकदा पिकनिकला जाऊया .

सुवर्णा -हो ताई ,आपण नंतर जाऊ सगळे.

 महेश -चला, आता आम्ही येतो ,उद्या रात्री सुवर्णा येईल मुलींच्या सोबतीला.

 भक्ती -अहो काकू ,तसं येण्याची काही गरज नाही , आम्ही दोघी आहोत ना?

 सुवर्णा- का ग ,तुम्हाला एकांत हवाय का माझ्याबरोबर राहायला आवडणार नाही का?

 भक्ती- नाही ,असं काही नाही ,पण उगाच तुम्हाला आमच्यामुळे त्रास.

 सुवर्णा -अगं, जशी माझी तन्वी,  तशा तुम्ही दोघी, मुलांचा कधी आई-वडिलांना त्रास होत नाही .

भक्ती- बरं बरं, काकू चालेल, या तुम्ही उद्या ,आपण खूप मजा करू .त्यानंतर महेश, सुवर्णा, सर्वेश त्यांच्या घरी जातात .

भक्ती -आई ,मी आवरते आता सगळं ,तू जाऊन तुमची पॅकिंग कर .

सुलभा- बरं बरं, असं म्हणत, सुलभा आणि विश्वास त्यांच्या रूममध्ये जातात .

सुलभा- तू बोललास का ,प्रथमेशला काही की , आपल्याला लोणावळ्याला  जायचे आहे ,त्याला कसं कळलं .

विश्वास- अगं ,असंच विषय निघालेला, म्हणून मी त्याला म्हणालो ,आत्ताच हनिमूनला जाऊन ये ,परत एकदा जायचं राहिलं, की राहूनच जातं ,म्हणून मी त्याला आपली गोष्ट सांगितली ,दुसरं काही नाही .

सुलभा -बरं बरं, ठीक आहे ,चल आता,  बॅग पॅक करू लाग.

 लोणावळ्याला गेल्यावर ,काय काय गंमत जंमत होते आणि ते दोघे एन्जॉय करतात की, अजून दुसरं काही होतं , जाणून घेण्यासाठी वाचत रहा, हसत रहा , आनंदात रहा .

भाग आवडला असेल तर, नावासहित शेअर करू शकता आणि अभिप्राय अवश्य द्या.

क्रमशः 

रूपाली थोरात

🎭 Series Post

View all