Login

सेकंड इनिंग भाग-15

Beautiful relation between husband and wife

सेकंड इनिंग भाग-15

सकाळी उठल्यावर ,विश्वास सुलभाला म्हणाला ,बघू तुझा हात.

सुलभा -काय रे ,आज सकाळी सकाळी हे काय?

विश्वास -अगं मला बघायचं आहे की ,माझं तुझ्यावर किती प्रेम आहे .

सुलभा -का, तुला शंका आहे का काही

विश्वास -नाही ग ,मला काही शंका नाही ,म्हणून तर मला फक्त बघायचं आहे .

सुलभा तिचे दोन्ही हात पुढे करते ,तिची मेहंदी छान रंगलेली असते  ,ते पाहून विश्वास म्हणतो ,बघ आता तरी तुला पटलं ना, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे .

सुलभा -मला माहित आहे ,तुझं माझ्यावर किती प्रेम आहे , त्याच्यासाठी मेहंदी रंगण्याची काहीच गरज नाही, तुलाही माहीत आहे ,मेहंदी रंगण्याचे शास्त्रीय कारण काय असते ,ज्याच्या शरीरात उष्णता जास्त, त्याची मेहंदी रंगते .आपल्या एकमेकांवरील प्रेमाच्या ग्वाहीसाठी, मेहंदी रंगण्याची ,मला तरी काही गरज वाटत नाही .

विश्वास -अगं ,मी अशीच मजा केली ,किती सिरीयसली घेते तू , पण काही म्हणा ,तुझी मेहंदी रंगलेली पाहून, मला तरी खूप बरं वाटलं.

सुलभा लटक्या रागाने त्याच्याकडे पाहते आणि म्हणते ,हो का , आज जास्त रोमँटिक मूड आहे तुझा .असं म्हणताच, विश्वास तिच्या जवळ यायला लागतो ,तशी ती मागं मागं सरकत जाते आणि भिंतीला टेकते .तो एक हात वर करून तिच्या समोर उभा राहतो ,तशी ती लाजते.

विश्वास -आपकी इसी अदा पे तो हम फिदा है ,असं म्हणत तो तिच्या डोक्यावर आपले ओठ टेकवतो. ती डोळे मिटून तशीच उभी राहते ,विश्वास बाजूला होतो आणि तिच्या डोळ्यात खट्याळपणे पाहत विचारतो ,अजून काही हवं आहे का .तसं ती डोळे उघडत म्हणते ,अरे, इतकी काम पडलीयेत आणि तुला काय सुचतं

विश्वास- अगं मी कुठे काय केलं ,तू तुझी कामं करायला जाऊ शकतेस .

सुलभा जरा रागातच बोलते, हो हो ,चालली आहे मी.

विश्वास -हो का ,मग राग का आला आहे .

सुलभा -काही नाही ,असं म्हणत ती निघून जाते.

आता आश्रमातल्या मुलांना सुद्धा हळद आणि संगीत कधी एकदा होतं, त्याची ओढ लागली होती. सकाळी नऊ वाजता सगळेजण आश्रमात पोहोचले . सोनावणे यांनी त्यांना चार रुमची व्यवस्था  करून दिली होती ,मुलीसाठी वेगळा रूम ,मुलासाठी वेगळा आणि त्यांच्या घरच्यांसाठी दोन रूम. भक्ती आणि शक्ती तन्वीला म्हणाल्या ,बघू तुझी मेहंदी रंगली का ?

तन्वीने तिचा हात समोर केला.

  प्रथमेशची काकी म्हणाली ,जास्त नाही रंग चढला .

भक्ती -बऱ्याच जणांची मेहंदी लग्नाच्या वेळेस रंगते , पण याचा अर्थ असा नाही की, त्यांचा संसार सुखाचा होतो .कधीकधी मेहंदी रंगून सुद्धा ,घटस्फोट होतात . माझा तर या गोष्टीवर विश्वास नाही.

त्यावर प्रथमेशची काकू गप्प बसते हे पाहून तन्वी शक्तीकडे बघून हसते.

काकू गेल्यावर, तन्वी भक्तीला थँक्यू बोलते ,मी नवीन असल्यामुळे मी जर काही बोलले असते, तर त्यांना आवडले नसते ,बरं झालं तू बोलली.

भक्ती -थँक्यू काय बोलते, जे खरं आहे तेच मी बोलले आणि आला आहे छान कलर, फक्त काळी झाली, म्हणजे खूप रंगली,असा अर्थ होतो का?

शक्ती -खूप छान कलर आला आहे ,काळी झाली की उलट, ती चांगली दिसत नाही.

हळदीचा कार्यक्रम अकरा वाजता सुरू होणार होता ,सकाळी सगळ्यांसाठी नाष्टा अरेंज केलेला होता .दहा वाजता सगळ्यांनी जात्यावर हळद दळायला सुरुवात केली, तेव्हा तिथे एक आजीबाई होत्या, त्या म्हणाल्या मी हळदीची गाणं म्हणते. त्यांनी गाणं म्हणायला सुरुवात केली, तसं कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा आली ,त्यांच्या हातात माईक दिला गेला, त्यांनी म्हटलेले गाणे खालील प्रमाणे

घाणा जी घातिला खंडीभर भाताचा

घाणा जी घातिला खंडीभर भाताचा

मांडव गोताचा दणका भारी

घाणा जी घातिला खंडीभर भाताचा

आधी मान देती कुंकवाला

आधी मान देती हळदीला

घाणा भरीला । सवाखंडी सुपारी

मांडवी व्यापारी । गणराज

घाणा भरीला । सवा खंडी गहू

नवर्या मुलीला गोत बहू । गणराज

घाणा भरीला । सवा खंडी भाताचा

नवरा मुलगा गोताचा । गणराज

मांडवाच्या दारी । उभा गणपती

नवर्या मुलाला गोत किती । गणराया

मांडवाच्या दारी हळदीचे वाळवण

नवर्या मुलाला केळवण । गणरायाला

मांडवाच्या दारी । रोविल्या ग मेढी

मूळ ग वर्हाडी । आंबाबाई

मांडवाच्या दारी । कोण उभ्यान घास घेतो

चहूकडे चित्त देतो । गणराज

मांडवाच्या दारी । इथ तिथ रोवा

लोडाला जागा ठेवा । माणसांच्या

घाणा भरीला । सवा खंडी कणिक

मांडवी माणीक । आंबाबाई

हळद दळून झाल्यावर, सगळी हळद गोळा करून ,ती एका ताटात, गुलाबाच्या पाकळ्यांनी छान सजवली.आता सगळे हळद लावण्यासाठी सज्ज झाले होते, प्रथमेश आणि तन्वी सुद्धा छान तयार झाले होते, दोघांची एका आजीबाई ने नजर काढली, प्रथमेश म्हणत होता,हे कशासाठी? तर आजी बाई म्हणाल्या, शांतपणे मी जे करते ,ते करून घे. त्यावर प्रथमेशने शांत बसणं पसंत केलं.

प्रथमेश ने व्हाईट कलरचा कुर्ता घातला होता , तन्वीने छान पिवळ्या कलरची साडी घातली होती आणि त्यावर फुलांचे दागिने घातले होते. फोटोग्राफरने त्या दोघांचा फोटो सेशन केलं ,त्यानंतर दोन पाट ठेवण्यात आले. आश्रमातल्या मुलांना हे सगळे बघताना खूप मजा वाटत होती, तेे सगळे पहिल्यांदाच, हे सगळ अनुभवत होते .सगळ्यांनी भोवताली गर्दी केली होती.आजच्या कार्यक्रमात प्रथमेश चेे काका काकूू पण आले होते, काकांना काल मेहंदी च्या कार्यक्रमाला बोलावले नाही, म्हणून थोडासा राग आला होता. मग काय काकांनी , त्या मुलांना ओरडायला सुरुवात केली .ते म्हणाले, काय बेशिस्त आहात रे तुम्ही सारे, बरोबर आहे म्हणा ,आई-बापाविना ची तुम्ही पोरं, तुम्हाला कोण संस्कार देणार?

 मुलांना उत्तर द्यावेसे वाटत होते ,पण सोनावणे यांनी डोळ्यानेेेे शांत बसायला सांगितले.

 प्रथमेश - अरे काका ,माहित आहे ती अनाथ मुले आहेत ,तसं पाहायला गेलं तर मीही अनाथच आहे ,पण माझं नशिब चांगलं  म्हणून, मला  आई बाबा मिळाले.

काका -म्हणजे आम्ही तुझ्यासाठी काहीच महत्वाचे नाही

 प्रथमेश -तुम्ही माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ लावत आहे ,पण तु जेे त्या मुलांना बोलला ते खूप चुकीचे आहे ,उलट या सगळ्यांना ना आई-वडिलांचे आपल्या आयुष्यातल्या स्थानाबद्दल खूप चांगली माहिती आहे? कारण ते जे आयुष्य जगतात, ते कुणाच्याही वाट्याला येऊ नये हीच माझी देवाजवळ प्रार्थना.

विश्वास- अरे काय झालं रमेश, काय एवढा चिडतोस 

काका -मी या मुलांना मागे सरका,म्हणून म्हणतोय ,तर ती सरकतच नाही, बघ ना.

 विश्वास- मुलांनो ,तुम्ही सगळे इथे खाली बसा, म्हणजे सगळ्यांना दिसेल. त्यातली एक मुलगी ,काका ,आम्हाला पण ताई आणि दादा ला हळद लावायची आहे आणि आमच्याकडे त्या दोघांसाठी एक सरप्राईज पण आहे.

 सुलभा -हो हो ,सगळ्यांनी लावा पण एकदम गोंधळ करू नका.

 आश्रमातल्या सगळ्या वृद्धांसाठी बसायला खुर्च्या टाकल्या होत्या आणि त्यासमोर एक सतरंजी अंथरली होती ,त्यावर सगळ्यांना बसायला सांगितले . हळदीच्या कार्यक्रमाला आता सुरुवात झाली ,पहिलं प्रथमेशला हळद लावून  नंतर  त्याची उष्टी हळद  सगळे तन्वीला लावत होते , आश्रमातील ज्या मुलांना  हौस होती, त्यांनीही लावली 

सुलभा आज खूपच छान तयार झालेली असते, प्रथमेश आणि तन्वीला  हळद लावत होती ,तेव्हा विश्वास तिच्याकडे एकटक पाहत होता, हे शक्तीने पाहिले. ती त्याच्याजवळ जाऊन उभी राहिली आणि म्हणाली ,बाबा कुणाकडे पाहतोय. तसं तो थोडासा  लाजला. तशी शक्ती त्याच्याकडे हसत म्हणते, एवढे काय घाबरत आहे, तुमची तर बायको आहे.

विश्वास -हो का, मला माहिती नव्हते.

शक्ती- तुम्हाला जर आईला हळद लावायची असेल ,तर मी तुमची मदत करू शकते .

विश्वास -पण तू का माझी मदत करणार आहे ,तुला नक्की त्याच्या बद्दल ,काहीतरी हवं असेल .

शक्ती -चांगलं ओळखतो ,तू मला बाबा .

विश्वास -असंच नाही ,तुला मी लहानाचा मोठा केलं, बोल तुला काय पाहिजे ?

शक्ती -म्हणजे माझा अंदाज खरा ठरला, तर तुला आईला हळद लावायची आहे, काही नाही , मला माझा फोन चेंज करून दे . विश्वास -बरं बरं ,लग्न झाल्यावर ,पण तू कशी मदत करणार. शक्ती -ते मी बघते ना ,तू कशाला टेन्शन घेतो, मी तुला हळद आणून देते आणि आईला काहीतरी कामानिमित्त रूम मध्ये पाठवते ,पुढचं तू ऍडजेस्ट करशील ,असं बोलून शक्ती तिथून निघून जाते. ती गुपचूप ताटातून ,हातात थोडी हळद घेते , विश्वासला नेऊन देते आणि त्याला सांगते ,तू तिकडे जाऊन थांब .शक्ती सुलभा जवळ जात म्हणते ,आई, दादाच्या मुंडवळ्या आणायच्या राहिल्यात ,घेऊन येते का जरा ,हळद लागल्यावर बांधाव्या लागतील ना .

सुलभा मुंडवळ्या आणायला रूम मध्ये जाते ,ती आत जाते ,तसे दार अचानक बंद होते ,ती घाबरून मागे वळून पाहते, तर विश्वास असतो .ती त्याला डोळ्यानेच विचारते ,काय ,तिला काही कळायच्या आतच, तो तिच्या जवळ जातो आणि तिला हळद लावतो.

सुलभा -अरे, हा काय पोरकटपणा.

विश्वास -हा पोरकटपणा थोडी आहे, मी माझ्या बायकोला हळद लावतोय ,आपल्या लग्नाच्या वेळेस पण लावायची होती पण  सगळ्यांसमोर कशी लावणार म्हणून शांत होतो ,आता इच्छा पूर्ण केली एवढच .आपल्या लग्नाच्या वेळी ,आपण एकमेकांशी बोलू पण शकत नव्हतो .

सुलभा- हे मात्र खरं, तन्वी कशी प्रथमेशकडे बिनधास्त पाहते, तसं तुझ्याकडे पाहताना ,मला दहा वेळा तरी विचार करावा लागत होता, तेही चोरून ,मलाही तुला हळदी लावायची आहे, पण माझ्याकडे नाही आहे. विश्वास तिच्याजवळ जातो आणि तिच्या गालाला आपला गाल घासतो तशी ती लाजते ,परत दुसऱ्या गालाला ही तसेच करतो .

विश्वास- झाली तुझी इच्छा पूर्ण ,इतक्यात दार वाजते .

विश्वास दार उघडतो तर ,शक्ती असते ,दोघांच्याही गालाला हळद लागलेली पाहून, मिशन सक्सेसफुल बोलते .

शक्ती -अगं, तू मुंडावळ्या आणायला आलेली ना .

सुलभा -हो ,पण तू ,त्या आधी काय बोलली

शक्ती -कुठे काय ?

सुलभा- म्हणजे, तू पण यात सामील होती तर, असं म्हणताच शक्ती तिथून गायब होते .आता दोघे तिच्याकडे पाहत हसतात आणि बाहेर जातात. सगळे त्यांच्याकडे पाहून हसत असतात. विश्वास -काय झालं, तुम्हाला सगळ्यांना हसायला .

प्रथमेश -तुमच्या दोघांच्या गालाला, हळद कशी लागली ?विश्वास -ते काय झालं ,तिच्या हातात हळदीचे ताट होतं, मी धडपडलो आणि मला लागलं .

प्रथमेश -बरं ,गालालाच कसं लागल आणि ते पण दोघांच्या . प्रथमेश असं बोलताच ,ते दोघे एकमेकांकडे बघतात .

महेश -तुमच्या दोघांच्या लग्नाबरोबर ,ते त्यांचे दिवस पण एन्जॉय करत आहेत ,तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का ?प्रथमेश -नाही नाही ,तुम्ही दोघे पण त्यांच्यासारखं एन्जॉय करा.

सुलभा हळद हातात घेत, सुवर्णाच्या हातात देते ,विश्वास महेशला पकडतो ,सगळे मिळून सुवर्णाला महेशला हळद लावायला लावतात .महेशच्या हातात हळद देतात आणि सुवर्णाला लावायला लावतात ,असं झाल्यावर ,सगळी मुलं आणि वृद्ध मंडळी टाळ्या वाजवतात .वृद्धांमध्ये एक खट्याळ आजीबाई असतात, त्या पुढे येतात ,हळदीच्या ताटातून हळद उचलतात आणि म्हणतात ,मी पण माझ्या म्हाताऱ्याला लावते ,बघा पोरांनो ,तसे सगळेच खूप हसायला लागतात .प्रथमेश आणि तन्वीला मुंडावळ्या बांधतात.

मग सोनावणे यांनी माईक हातात घेतला आणि बोलले, प्रथमेश आणि तन्वी साठी आश्रमातील मुलं एक सरप्राईज डान्स,

 हळदीच्या निमित्ताने करणार आहेत ,मुले पुढे आली आणि त्यांनी डान्स करायला सुरुवात केली, त्यांच्या तालावर ताल धरत भक्ती, शक्ती आणि सर्वेश त्यांच्यात सामील झाले .

गुलाबाची कली बघा हलदीनं माखली

आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली

नटून थटून लाजते जनू चांदनी

नटून थटून लाजते जनू चांदनी

गुलाबाची कली बघा हलदीनं माखली

आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली…

कुणासाठी कुठे, कशी, कधी कधी कळेना

कुणासाठी कुठे, कशी, कधी कधी कळेना

कुण हळुवार गाठ रेशमाची बांधतो

कुण हलकेच तार काळजाची छेडतो

कधीकधी कधीकधी,कधीकधी देतो कुणी नजरेचा इशारा

कुणी हरपून देह भान त्यात गुंतातो

कुणी हरपून देह भान त्यात गुंतातो

गुलाबाची कली बघा हलदीनं माखली

आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली…

चढते भिडते जादू नजरेची अशी

चढते भिडते जादू नजरेची अशी

नकळत वेड बावऱ्या जीवाला लावते

मन विसरून वाट सैरवैर धावते

अरे गुलाबाची कली कशी हलदीनं माखली

आली आली लाली लाली उतू उतू चालली…

कुणासाठी कुठे, कशी, कधी कधी कळेना

कुण हळुवार गाठ रेशमाची बांधतो

कधीकधी कधीकधी,कधीकधी देतो कुणी नजरेचा इशारा

कुणी हरपून देह भान त्यात गुंतातो

गुलाबाची कली बघा हलदीनं माखली

आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली

नटून थटून लाजते जनू चांदनी

नटून थटून लाजते जनू चांदनी

गुलाबाची कली बघा हलदीनं माखली

आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली…

मुलांनी खरच खूप छान डान्स केला ,त्यांनी छान डान्स केला म्हणून, भक्ती ,शक्ती ने त्यांना सगळ्यांना चॉकलेट वाटले त्याबरोबर तिने सगळ्या वृद्धांना ही दिले. हे सगळ होईस्तोवर दुपारचे एक वाजले होते ,महेश यांनी हातात माईक घेतला, सांगितले ,जेवणाची वेळ झाली आहे , जेवण तयार आहे, तर सगळ्यांनी जेवण करून घ्या . वृद्धांना बसण्यासाठी टेबल खुर्ची ची व्यवस्था केली होती आणि त्यांना तिथेच वाढले जात होते .मुलांना मात्र बुफे पद्धतीने जेवण घेऊन , त्यांचे ते जेवत होते .जेवणात जास्त प्रकार नव्हते , पण जे होते ते खूप सुंदर होते . मुलांनीही जेवणाचा खूप छान आस्वाद घेतला .आता सगळ्यांचे लक्ष संध्याकाळच्या संगीतच्या कार्यक्रमाकडे लागले होते ,मुलंही डान्स करणार होती, म्हणूूूून त्यांचा मेकअप करण्यासाठीसुद्धा , मेकअपमनला बोलावलं होतं.

संगीताच्या कार्यक्रमात काय काय मजा होणार ,हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा, हसत राहा आणि अभिप्राय अवश्य द्या. जर भाग आवडला असेल तर नावासहित शेअर करू शकता.