सेकंड इनिंग भाग-13
काका- हॅलो ,प्रथमेश, मी काका बोलतोय
प्रथमेश- हा बोला काका , काय म्हणताय
काका - मी जे ऐकलं ,ते खरं आहे का? तू आश्रमात लग्न करतोय ,अरे ,मी जिवंत असताना ,तुला असं काही करण्याची गरज नाही, तुझ्याकडे पैसे नसतील तर मी खर्च करतो .
प्रथमेश -अहो ,असं काही नाही ,की माझ्याकडे पैसे नाही, तन्वी ची इच्छा होती म्हणून, आम्ही आश्रमात लग्न करतोय आणि मलाही ते योग्य वाटलं आणि त्यात वाईट काय आहे ,आपण नेहमीच लग्नात नातेवाईकांना जेवायला घालतो,त्यांना सगळ्यांना घरी जेवायला मिळत नाही ,असं काही नाही , ज्यांना कोणी नाही अशा बरोबर जर आपण आनंद साजरा केला तर त्यांना किती आनंद मिळेल आणि त्यांना आनंदी पाहून ,आपल्याला जे समाधान मिळेल ते अतुलनीय असेल ,प्रत्येक गोष्ट आपण पैशाने तोलू शकत नाही, मी का तुला सांगतोय तू तर माझ्यापेक्षा मोठा आहे ,तुला माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे ,हो, ना, काका तुझा माझ्यावर विश्वास आहे ना आणि खर्च आपणच करणार आहोत, आश्रमातल्या मुलांसाठी वस्तूही घेणार आहे ,तू जेव्हा लग्न अटेंड करशील तेव्हा तुला माझा अभिमान वाटेल.
काका -अरे ,एवढे पैसे खर्च करायची काय गरज आहे, त्यांना लग्नानिमित्त जेवण दिले ,तरी पुष्कळ, एवढं कोणी काही करत नसतं.
प्रथमेश -तेच तर ना इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न आणि पैसे खर्च करायचा म्हणशील, तर सगळ्या पाहुण्यांना बोलवले, तरी आपला तितकाच खर्च होणार कदाचित यापेक्षा जास्त.
काका- ठीक आहे बाबा ,आता तू ठरवलंच आहे तर ,तू माझं थोडीच ऐकणार आहे, मी थोडी तुझा कोणी लागतो, प्रत्येक गोष्ट तू विश्वासला मात्र सांगून करतो.
प्रथमेश- तू ना ,डोक्यात काही घालून घेतो ,असं काही नाहीये, तू सांग, तूू आणि काकी दोघांना घेऊन कधी तुमच्या खरेदीसाठी येता.
काका -अरे ,त्याची काही गरज नाही
प्रथमेश -असं कसं नाही ,आता, तूच मला पोरकं करत आहे ,मला तरी तुमच्या शिवाय दुसरं कोणी आहे का? समजा तुमचं जाऊ दे , पण माझ्या भावाला आणि बहिणीला तरी, त्यांच्या भावाच्या लग्नात मजा करायची असेलच ना, मला काही माहिती नाही, तुम्ही दोन दिवसांनी मॉलमध्ये या ,आपण भेटू ,मी फोन करतो.
काका -आता तू एवढेच म्हणत आहे ,तर ठीक आहे ,येऊ आम्ही. असं म्हणत काका फोन ठेवतो.
प्रथमेश मनातल्या मनात म्हणतो ,मला माहित आहे की,तुला कसं समजवायचं ते ,तुला कुणाशी काही घेणंदेणं नाही ,तुला काय हवं ते मला चांगलं कळतं.
सगळ्यांचे डान्स प्रॅक्टिस चालू असते, त्याबरोबरच खरेदी सुद्धा चालू आहे, भक्ती-शक्ती रोज आश्रमात जाऊन मुलांची प्रॅक्टिस घेत असतात ,इकडे सुलभा आणि विश्वास, सुवर्णा आणि महेश यांचाही ,प्रथमेश आणि तन्वी साठी ,एक सरप्राईज डान्स असतो. काका आणि काकीला, प्रथमेश डान्स बद्दल सांगतो, त्याची बहीण आणि भाऊ डान्स करणार असतात, पण काका म्हणतो,आम्ही अशी काही थेरं करत नाही, यावर प्रथमेश काहीच बोलला नाही. त्याला कळालं की , काका कुणाला उद्देशून म्हणत आहे, पण त्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं.
रविवारी सगळे मुलांच्या कपडे सिलेक्शन साठी आश्रमात जातात. मुलांना तर हे सगळं नवीनच असतं, नेहमी त्याच व्यापाऱ्याकडून कपडे घेत असल्यामुळे,त्याला सगळ्या मुलांची साईज माहित असते. त्यानुसार तो वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घेऊन येतो ,सोनावणे यांनी त्याला सांगितलेलं असतं की, लग्नात घालण्यासाठी कपडे हवी आहेत ,त्यामुळे चांगली असली पाहिजे .व्यापाऱ्याने त्याच्याबरोबर दोन तीन मदतनिसांना आणले असते ,आता वयोगटानुसार मुलांना बोलावले जाते आणि त्यांना जशी आवडतील तशी कपडे दिली जातात. हळदी आणि संगीत या दिवशी घालण्यासाठी एक ड्रेस आणि लग्नाच्या दिवशी घालण्यासाठी एक ड्रेस असे प्रत्येकाला दोन नवीन ड्रेस मिळतात , तर मुलं खूपच खुश होऊन जातात. त्यांच्या चेहर्यावरचा आनंद बघून तन्वी आणि प्रथमेश सुद्धा खुश होतात,त्यांना खुश बघून विश्वास आणि सुलभा ही खुश होतात. सगळे दुसऱ्यांना देण्यात जो आनंद असतो तो मिळवण्यात गर्क असतात. हे सगळं पाहताना सोनावणे यांचेही डोळे पाणावतात ,त्यांना विश्वास विचारतो काय झालं ,तर त्यावर म्हणतात ,काही नाही, या आधी असं कुणी कधीच केलं नाही.
विश्वास -हे सगळे आम्ही आमच्या मुलांमुळे करू शकलो,आम्हाला आमच्या दोन्ही मुलांचा अभिमान वाटतो की ,ते त्यांच सुख दुसऱ्याच्या सुखात मानतात, कधी कधी आपलीच मुले आपल्याला बरंच काही शिकवून जातात.
सोनावणे- अगदी खरं बोललात तुम्ही, तुम्हाला असा तुमच्या मुलांचा अभिमान वाटतो ,तसा मलाही इथल्या मुलांचा वाटतो.
विश्वास- तुमचं करावं तितकं कौतुक कमीच आहे, कारण दुसऱ्यांच्या मुलाला आपली मुलं समजून ,त्यांचं सगळं करणं यासाठी मन खूप मोठं असावे लागते.
सोनावणे- या कार्यात तुमच्यासारखी लोकं, आमच्या बरोबर असतात म्हणून आम्हाला शक्य होतं .
आता सर्व मुलांची कपडे घेऊन झालेली असतात , वृद्धांच्या कपड्यांचे सिलेक्शन राहिलेले असते ,तन्वी सांगते, सगळ्या आजींसाठी साडीचे गाऊन आणि सगळ्या आजोबांसाठी कुर्ता आणि पायजमा हा ड्रेस हळदीच्या आणि संगीत या दिवसासाठी, लग्नासाठी सगळ्या आजोबांना त्या कुर्त्यावर जॅकेट आणि आजी लोकांना कॉटनच्या साड्या, ज्यांना चालता येत नाही किंवा व्हीलचेअरवर आहेत त्यांना कॉटनच्या साड्यांचे गाऊन ,म्हणजे नंतर ही कोणत्या कार्यक्रमाला त्यांना घालता येतील. सगळ्यांनाच तन्वीची आयडीया आवडली, त्यानुसार सगळ्यांना मापाप्रमाणे कुर्ते आणि पायजमे दिले गेले ,आजी लोकांची मापे घेऊन त्यानुसार त्यांना गाऊन आणि साडीवर ब्लाऊज शिवण्यासाठी देण्यात आली. साड्यांचे सिलेक्शन भक्ती,शक्ती ,सुलभा,सुवर्णा आणि तन्वीने केले .सगळ्या आजी-आजोबांना अगदी भरून आले ,कारण त्यांच्या घरच्यांनीही कधी त्यांची अशी विचारपूस केली नव्हती, की त्यांचा विचार केला नव्हता. ज्यांची मापे घेतली होती,त्यांची कपडे चार-पाच दिवसांनी मिळणार होते ,आता सगळेजण उत्सुकतेने हळद ,संगीत आणि लग्नाच्या दिवसाची वाट पाहत होते ,जवळच्या नातेवाईकांना आमंत्रण दिले गेले होते.
घरातल्यांची ही सगळ्यांची मनाप्रमाणे खरेदी झाली होती. डान्सच्या तयारीसाठी मुलांना तयार करण्यात मेकअपमनची मदत घेण्यात येणार होती. मुलांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता, त्यांना हळद, संगीत, लग्नाची खूप उत्सुकता लागून राहिली होती , असं वाटत होतं, कधी एकदा तो दिवस उजाडतो.
सगळे मिळून हळद, संगीत यामध्ये काय धमाल करणार,हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा ,हसत रहा, आणि जर भाग आवडला असेल तर नावासहित शेअर करू शकता आणि अभिप्राय मात्र अवश्य द्या.
क्रमशः
रूपाली थोरात
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा