शाळेचा होमवर्क – एक मनोरंजक आठवण.
माझी मुलगी त्यावेळी पाचवीत होती. एक दिवस सकाळी सकाळी, शाळेत जायच्या वेळी, शाळेची डायरी घेऊन आली. मुलांना माहीत असतं की सकाळच्या घाई गडबडीत सांगितलं की बाबा, हवं ते लिहून देतात. मला म्हणाली की बाबा डायरीत लिहून द्या.
“काय झालं?” – मी
“मला बरं नव्हतं म्हणून, गृह पाठ झाला नाही, असं लिहून द्या डायरीत.” – मुलगी.
मी बायकोला विचारलं, की काय झालं, डॉक्टर कडे घेऊन जायचं आहे का, तर म्हणाली, “अहो, इतका गृह पाठ देतात, की या पोरींना खेळायला वेळच मिळत नाही, कंटाळून जातात हो मुलं. द्या लिहून तुम्ही.” पूर्वी अशी पद्धत होती, की काही कारणांमुळे होमवर्क झाला नसेल, तर वडीलांकडून डायरीत लिहून आणायचं.
“ठीक आहे, देतो लिहून.” असं मी म्हणालो आणि डायरीत लिहिलं की “गृहपाठ इतका असतो, की मुलांना खेळायला वेळ मिळत नाही. काल माझी मुलगी खेळत होती, आणि नंतर थकून झोपली, म्हणून गृहपाठ करू शकली नाही.” असं लिहून मी सही करून तिच्या जवळ डायरी दिली. खाली, ऑटो रिक्शा सारखा हॉर्न वाजवत होता, म्हणून मुलीने न बघताच डायरी दप्तरात कोंबली आणि धावली.
शाळेत गेल्यावर मुलीने ऐटीत डायरी टीचरला दाखवली. साहजिकच टीचरला खूपच राग आला, त्यांनी मुलीला वर्गा बाहेर काढलं. नेहमी प्रमाणे प्रिन्सिपल मॅडम राऊंड घेत होत्या, त्यांनी पाहिलं, की एक मुलगी वर्गा बाहेर उभी आहे. त्या थांबल्या, चौकशी करत होत्या, टीचरनी त्यांना डायरीत मी काय लिहिलं आहे ते दाखवलं, आणि माझी तक्रार केली. प्रिन्सिपल मॅडम हाडाच्या शिक्षिका होत्या. शिक्षण क्षेत्रात त्या आवड म्हणून आल्या होत्या, नोकरी म्हणून नाही. त्यांनी थोडा विचार केला, काय गृहपाठ दिला हे बघितलं आणि मग एक नोटिस काढली की गृहपाठ आवश्यक तेवढाच द्या, मुलांना खेळायला वेळ मिळाला हवा, त्यांच्या सर्वांगीण विकासा साठी खेळ सुद्धा आवश्यक आहेत.
असे विचार असलेल्या शिक्षकांना माझा प्रणाम.
दिलीप भिडे.