त्रस्त गृहिणी भाग नऊ
वाचक हो, हिवाळा आला की गाजराचा हलवा आणि सांभार वडी…सांबार म्हणजे कोथिंबीर आमच्या विदर्भात कोथिंबिरीला सांभार म्हणतात, तर हिवाळ्यात गाजराचा हलवा आणि सांबारवडी करणं हे शास्त्र असतं! त्याचप्रमाणे या ऋतूमध्ये बाजारात भाजीपाला ही अगदी मुबलक प्रमाणात मिळतो, पण माझ्या घरच्या लोकांची तऱ्हाच न्यारी! जेव्हा पासून आदरणीय पंतप्रधान यांनी भरडधान्य म्हणजेच मिलेट्स खाण्यावर जोर दिला आहे तेव्हापासून माझ्या लेकीला वेगवेगळ्या उसळी खाण्याचा छंद जडला आहे. मटकी म्हणू नका, बरबटी म्हणू नका, बरबटी म्हणजे चवळी हे तुम्हाला माहितीच असेल! मुग,हरभरे,राजमा, गेला बाजार वालाची सुध्दा उसळ तीला खायची असते. बाजारात असतील नसतील तेवढ्या कडधान्यांच्या सगळ्या उसळी तिला हिवाळ्यात हव्या असतात. तर परवाच्या नेरवा लेकीने फर्मान काढलं कि ती दुसऱ्या दिवशी सकाळी राजमा खाणार! राजमा म्हणजे नुसता राजमा नव्हे हो राजमा चावल!
हिंदी सिनेमातला नट ज्याप्रमाणे ‘मक्के की रोटी और सरसो का साग, मुली किंवा गोभी के पराठे,बैंगन का भरता आणि सरते शेवटी गाजर का हलवा’ खाऊन बलशाली होतो आणि धाडधिप्पाड गुंडांना चारोखाने चित्त करून, जमिनीवर लोळवतो त्याचप्रमाणे माझ्या मुलीचा असा गोड गैरसमज झाला की राजमा चावल खाऊन तिला अफाट शक्ती मिळेल आणि शाळेतल्या बॅडमिंटन, टेबल टेनिस, बास्केट बॉल किंवा एखाद्या तत्सम खेळामध्ये ती निदान जिल्ह्यातून तरी पहिली येईल! आतापर्यंत ती शाळेत सुद्धा कधी जिंकली नाही तो भाग वेगळा!
माणसाने स्वप्न बघावीत, ती पूर्ण करण्यासाठी मेहनतही घ्यावी पण ही ‘मुंगेरी लाल की हसीन सपने’ वाली स्टोरी प्रत्यक्षात खरी होईलच याचा काही भरोसा नाही असा भरोसा मी तिला शंभरदा देण्याचा प्रयत्न केला पण पालथ्या घड्यावर पाणी!
बरं ही माझी मुलं न जाणो कोणत्या ग्रहावरून आणि कुठल्या नक्षत्रावर या भूतलावर अवतरली आहेत देव जाणे. घरातली एखादी वस्तू किंवा एखादा जिन्नस संपला असेल तर तोच त्यांना हवा असतो! त्या क्षणी मला माझ्या बालपणीची आठवण येते. नेमकं ज्या दिवशी वर्गातल्या बाई किंवा सर गृहपाठ तपासणार असायचे नेमकं त्याच दिवशी मी गृहपाठाला दांडी मारलेली असायची! तशी मी अभ्यासू मुलगी! खेळ म्हणू नका, गाणं म्हणू नका, वादविवाद स्पर्धा म्हणु नका, भाषण म्हणु नका, अभ्यास म्हणू नका या सगळ्यात मी अगदी सक्रिय सहभाग नोंदवायचे पण कधीच कशात नंबर आला नाही तो भाग वेगळा! तर मला गृहपाठाचा अजिबात कंटाळा नसायचा पण घरी मैत्रिणी जमवून खेळण्यातून आणि शाळेत विविध स्पर्धांमधून भाग घेतल्यामुळे गृहपाठाकरिता माझ्याकडे वेळच उरायचा नाही! तर अशी मी अगदी सिन्सिअर विद्यार्थिनी होती आणि मी किती अभ्यासू आहे हे माझ्या शिक्षकांना माहिती असल्याने गृहपाठ तपासताना ते सर्वप्रथम मलाच वही मागायचे आणि येरे माझ्या मागल्या म्हणून माझा गृहपाठ अपूर्णच असायचा! तर मुद्द्याची गोष्ट अशी की ज्याप्रमाणे माझ्या शिक्षकांना माझ्या गृहपाठाची बोंब माहिती होती; माझी मुलं ही अगदी तसलीच घरात जे नसेल तेच त्यांना हवं असतं!
घरी राजमा नव्हता म्हणून नवऱ्याला, दादा पुता करून मी वाण्याच्या दुकानात पाठवलं. पण हायरे माझ्या कर्मा! नवऱ्याला चांगलं दहा वेळा बजावून सांगितलं होतं,शंभर वेळा त्याच्या कानीकपाळी बोंबले होते, पण म्हणतात ना तुमचं कर्म काही चुकत नाही. तर त्या माझ्या नेहमीच्या वाण्याने मी नवऱ्यासोबत नाही असं बघून डाव साधला हो आणि राजम्या ऐवजी भलतंच काहीतरी त्याच्या माथी मारलं.
छान चमकदार गडद कध्या रंगाच्या ऐवजी फिक्या गुलाबी रंगावर कध्या रंगाचे ठिपके असलेली वस्तू नवऱ्याला दिली. घरी येवून हाश्श-हुश्श करतं, अटके पार झेंडा फडकवल्याच्या आविर्भावात त्याने स्वतःला सोफ्यावर झोकुन दिले. मी पिशवी बघीतली आणि माझी तळपायाची आग मस्तकात गेली! तीच पिशवी उचलली आणि उलट्या पावली वाण्याच्या दुकानात गेले आणि त्याची चांगली कान उघडणी केली.
‘तुम खुद को क्या समझता है? एक दिन मै घर पे रही तो तुमने ये घोळ कर दिया! मेरे पति को तुमने राजमा के बदले मे क्या दिया?” माझा चढलेला स्वर.
“भाई साहबने राजमा मांगा तो मैने राजमा ही दिया!” त्याचे निर्विकार उत्तर.
पिशवीतून तो अजब प्रकार बाहेर काढून मी त्याच्या तोंडासमोर नाचवला,”इसको तुम राजमा म्हणता? ये क्या दिया तुमने? मुझेको वो गडद कथ्ये रंग का राजमा पाहिजे ये नहीं चाहीजे, क्या समझे? माना के मेरे पती को चना डाळ और हरभरे की डाळ मे फरक नही समझता, चवळी और बरबटी मे वो हमेशा गडबड करता, इसका मतलब तुम उसको कैसे भी गंडा लगाओगे?” त्यावेळी तो काहीतरी पुटपुटला कदाचित म्हणत असावा की, ‘बाई तुला तरी कुठे फरक कळतो आहे?’ पण मला ते ऐकू आलं नाही. आणि मी माझं म्हणणं पुढे रेटलं. “लक्षात ठेव गाठ माझ्याशी आहे!”
तेवढ्यात त्याचा मालक ओरडला, “अरे काय झालं?” मी झालेलं रामायण, महाभारत आणि हल्दी घाटी नव्हे राजम्याची लढाई त्याला सांगितली. त्याच्या चेहऱ्याकडे बघून मला असं वाटलं की तो गालातल्या गालात खुदकन हसला की काय! पण त्याने मला तसं अजिबात जाणवू दिलं नाही. नाहीतर माझ्या शब्दांची एके फोर्टी सेवन मी त्याच्यावर सुद्धा रिचवली असती याचा त्याला अंदाज आलाच असावा, म्हणून ओ मग त्याने माझ्या डोक्याला जास्त डोकं न लावता, नोकराला विचारलं की कथ्या रंगाचा राजमा आहे का? त्याने नाही म्हटल्या बरोबर मालकांनं माझ्या हातातली ती अजब वस्तू परत घेतली आणि माझे पैसे मला परत केले.
मी अगदी रणांगण जिंकल्याच्या अविर्भावात घरी पोहोचले तर माझ्या मुलीने मला गुगल महाराजांच्या कृपेनं राजम्याची अनेक वाणं दाखवली.
त्यावेळी मला कळलं की राजमा अनेक रंगात आणि प्रकारात येऊ शकतो!
वाचक हो तुमच्या माहितीस्तव ही माझी आपबिती मी तुम्हाला सांगितली म्हणजे यापुढे वाण्याकडे जाताना तुम्हीही सतर्क व्हाल. काय म्हणता?
हा भाग कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू लवकरच.
©® राखी भावसार भांडेकर नागपूर
सदर लिखाण संपूर्णतः काल्पनिक असून त्याचा वास्तवात कुणाशी कुठलाही संबंध नाही तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.
सदर लिखाणाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित असून लेखिकेच्या परवानगीशिवाय कोणीही ते वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.