संयम + समाधान = सुख

बऱ्याच वेळा ज्या गोष्टी आपल्याला हव्या असतात त्या आपल्या नशिबात असतात. पण प्रत्येक गोष्टीची ए?

"एक्सक्यूज मी, हॅलो."

थंडीचे दिवस असल्याने हर्षल त्याचे हात एकमेकांवर घासत होता. त्याच्या कानांवर आवाज पडताच तो मागे वळला. मागे श्रावणी उभी होती. ती त्याच्याच वर्गात होती पण तो तिला इतक्या जवळून पहिल्यांदाच बघत होता. तिच्या हातात एक नोटबुक व अंगावर गुलाबी स्वेटर होतं. तो तिच्या घाऱ्या डोळ्यांकडेच बघत राहिला.

"सी, तू मॅथ्स टॉपर आहेस ना तर प्लिज मला हेल्प करशील का? मी थोडीशी वीक आहे मॅथ्स मध्ये. तसंही या वर्षी टेन्थ आहे ना त्यामुळे मी खूप टेन्शन मध्ये आहे. एकतर हा मॅथ्स सब्जेक्ट खुप बोरिंग आहे. याला सिल्यबस मधून काढूनच टाकायला पाहिजे. खुप डोकं खातो आणि त्यामुळे मला खुप बोलणे बसतात."

त्याने मान हलवली. ती झटकन त्याच्या बाजूला येऊन बसली. तो थोडं बाजूला सरकला. तो चेहऱ्यावर हास्य आणत बोलला.

"हे बघ श्रावणी, तुला वाईट वाटणार नसेल तर एक सल्ला देऊ का?"

"हो."

"कोणतेही काम तेव्हा सोपे होते जेव्हा आपल्याला ते आवडायला लागते. त्यामुळे माझ्या मते तू जर आवडीने मॅथ्स चा अभ्यास केला तर तुला त्याचा नक्कीच फायदा होईल."

ती क्षणभर त्याच्याकडे बघतच राहिली. तिला त्याच्या विचारांचं कौतुक वाटलं.

"हो ठीक आहे. मी आजपासून आवडीने अभ्यास करेन मॅथ्स चा."

त्याने स्मितहास्य केलं व शांतपणे, अतिशय सोप्या पद्धतीने तिला समजावून सांगितलं. ती खुश झाली. नंतर तिने अनेक वेळा त्याची मदत मागितली. त्यानेही तिला आनंदाने मदत केली. हळूहळू त्यांची मैत्री घट्ट होऊ लागली. संवाद वाढू लागले.

हर्षल तिचं बोलणं तिच्याकडे एकटक बघत ऐकत बसायचा. ती कधी खुप अल्लडपने वागायची तर कधी खुप निरागसपने. त्याला तिचे दोन्ही रूप चांगले वाटायचे. तिचं निखळ हसणं, तिचे एखादी गोष्ट रंगवून सांगतानाचे गोंडस हावभाव, तिचा मधुर ध्वनी या सर्व गोष्टी त्याला भुरळ घालत होत्या. त्याच्या मनात हळूहळू प्रेमभावना निर्माण होऊ लागल्या होत्या.

"थँक्यू यार हर्षल. तू मला माझ्या रिविजन मध्ये मदत केलीस. मला क्लास मध्ये जेवढं समजतं ना त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने तू समजावलेलं समजतं."

"एवढा पण महान नाहीये मी."

तो हसून बोलला.

"नाही माझ्यासाठी तर महानच आहेस. बरं हर्षल, शनिवारी माझा बर्थडे आहे. नक्की ये बरं. विसरू नकोस. माझे सर्व मित्र येणार आहेत. आपण सर्वजण खुप मज्जा करुत."

"हो नक्की येईल."

ती निघून गेली. तो जास्त बर्थडे पार्टीस मध्ये गेलेला नव्हता ; पण त्याला एक गोष्ट माहित होती की त्याला तिच्यासाठी काहीतरी भेटवस्तू विकत घ्यावी लागेल. त्याच्या जवळ असलेले पन्नास रुपये घेऊन तो एका दुकानाच्या शोधात निघाला. त्या दुकानाचे दरवाजे काचाचे होते. तो थोडा वेळ त्या दुकानाकडे बघत राहिला. नंतर तो दुकानामध्ये शिरला. त्याने श्रावणीसाठी एक हार बघितला. खुप छान होता तो हार. नक्षीदार व रंगाने पांढराशुभ्र होता. त्याने किंमत बघितली. साडे तीनशे! अजून तीनशे रुपये कमी होते. तो घरी परतला.

त्याने त्याच्या आईला डब्ब्यात पैसे ठेवतांना बघितलं होतं. त्याच डब्ब्यातील पैसे त्याने, कुणी बघत तर नाहीये ना या गोष्टीची खात्री करत हळूच काढून घेतले. त्याची आई घरी नव्हती. तो दुकानाच्या वाटेने चालू लागला. चालतांना त्याला रस्त्याच्या कडेला गर्दी दिसली. काय घडलं आहे हे बघण्यासाठी तो जवळ गेला. त्याच्या कानांवर काही तुटक शब्द पडले. 'चक्कर आली...... एकटी बाई.... ऊन खुप आहे.' तो गर्दीच्या मध्ये गेला व अवाक झाला. ती तर त्याची आई होती! तो झटकन त्याच्या आईजवळ गेला. त्याच्या आईला कुणीतरी पाणी दिलं होतं. आता त्यांना बरं वाटत होतं. हळूहळू जमलेली मंडळी निघून गेली.

"चल हर्षु, आता बरं वाटतंय."

त्याने सामान हातात घेतलं. ते दोघे निघाले.

"आई चक्कर कशीकाय आली? जेवण बरोबर केलं नव्हतं का?"

"अरे काही नाही ऊन जास्त आहे म्हणून."

"एक मिनिट, ऊन जास्त आहे म्हणजे, आई तू इतक्या दुरून पायी आलीस? तेही इतक्या उन्हामध्ये!"

"अरे दूर कुठं आहे? तसंही डॉक्टर सांगतात पायी चालणं चांगलं असतं. कशाला उगाच दहा रुपये खर्च करायचे?"

आईचे शब्द त्याला सुन्न करून गेले. त्याचा जीव गुरफटू लागला. त्याच्या बाबांच्या मृत्यूनंतर त्याची आईच शिवणकाम, जेवणाचे डब्बे करून घर चालवत होती. त्याला स्वतःचा खुप राग येऊ लागला. एकीकडे त्याची आई एवढी काटकसर करत होती व दुसरीकडे त्याने आईला न सांगता पैसे काढून घेतले. तीनशे रुपये गायब झाल्याचं कळल्यावर तिला किती त्रास होईल? हा प्रश्न त्याच्या मनाला छेदु लागला. त्याचे डोळे अश्रुंनी डबडडबले होते.

"आई फक्त दहा रुपयांसाठी तू....."

"अरे बाळा थेंबाथेंबानेच तळं साचतं. तुला आपली परिस्थिती माहित आहे ना. तसंही मला तुझ्या शिक्षणात कशाचीही कमी पडू द्यायची नाहीये. त्यासाठीच मी पैसे वाचवतेय."

तो निशब्द झाला होता. त्याला जाणीव झाली की श्रीमंत घरातील श्रावणी त्याला मान्य करणार नाही. तसंही इतक्या लहानपणी त्याला या गोष्टींची गरजही नव्हती. त्याचं त्याच्या आईला आधार देण्यावर प्राधान्य असायला हवं हे त्याला जाणवलं. त्याने डब्ब्यातून काढलेले पैसे परत ठेवले. तो नंतर श्रावणीला भेटलाही नाही.

त्या घटनेला तब्बल दहा वर्षे झाली होती. आज तो लग्नासाठी एका मुलीला बघायला आला होता. त्याची आई देखील त्याच्यासोबत होती. आता त्याच्या आईला दहा रुपयांसाठी उन्हात पायी चालण्याची गरज पडणार नाही, एवढा तो यशस्वी झाला होता. ते सोप्यावर बसलेले असतांना त्याचं मन दहा वर्षांपूर्वी जाऊन पोहोचलं होतं.

कप टेबलवर ठेवल्यावर निर्माण झालेल्या आवाजाने तो विचारांतून बाहेर आला. नंतर ती मुलगी त्याच्या समोर बसली. तिने छान हिरव्या रंगाची साडी नेसलेली होती. दोन्ही हातात फक्त दोन बांगड्या, एवढाच तिचा शृंगार. त्याच्या आईने तिला काही प्रश्न विचारले. नंतर त्या दोघांचा पण एकेमेकांच्या अपेक्षा, आवडीनिवडी या विषयांवर दीर्घ संवाद घडला.

त्याने त्याच्या आईशी थोडीशी चर्चा करून लगेच होकार कळवला. सगळेजण खुप खुश झाले. त्यांनीही होकार दर्शवला.

"एकदा तिलाही विचारून घेऊयात."

"हो आपल्या होकारापेक्षा मुलामुलींचा होकार असणं जास्त महत्वाचं आहे. तुला जे वाटतं असेल ते मनमोकळेपणाने बोल. आम्ही तुझ्या निर्णयाचा आदर करू."

सगळे तिच्याकडे बघू लागले. तिची नजर खाली झुकलेली होती. तिने अलगद तिची मान वर उचलली. ती हर्षल कडे बघून गालात हसू लागली. हर्षलही तिच्याकडेच बघू लागला. तेच मधुर हास्य, तेच घारे डोळे. ती श्रावणीच तर होती!

"माझाही होकार आहे."

तिच्या मधुर आवाजात ती बोलली. तोच तेथे सगळ्यांनी जल्लोष केला. श्रावणीची आई हर्षलला पेडा भरवत म्हणाली.

"जावईबापू हे घ्या तोंड गोड करा."

हर्षल त्यांच्या पाया पडला. श्रावणीही तिच्या होणाऱ्या सासूच्या पाया पडली.

"चला कपल चा फोटो घेऊया."

त्या दोघांना सर्वांनी जवळ उभा केलं.

"थोडं जवळ या ना. इतके दूर का उभे आहात?"

घरात हास्य फुललं. श्रावणी त्याच्या अगदी जवळ उभी होती. त्याच्या आईच्या चेहऱ्यावरील आनंद बघून त्याचं मन तृप्त झालं. त्याच्या आईने त्याच्यासाठी खुप कष्ट घेतलेले होते. आता मात्र त्यांच्या जीवनात सुखाचे दिवस आले होते. हर्षल त्याचा भूतकाळ आठवून गालात हसू लागला.

बऱ्याच वेळा ज्या गोष्टी आपल्याला हव्या असतात त्या आपल्या नशिबात असतात. पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. ते म्हणतात ना, 'वक्त से पेहले और किस्मत से ज्यादा इन्सान को कुछ नहीं मिलता '.

त्यामुळे ज्या गोष्टी आपल्याजवळ आहेत त्यांत समाधान मानता यायला हवं. तसेच ज्या गोष्टी हव्या आहेत त्यांसाठी आपल्याजवळ संयम असायला हवं. यावरून आपल्याला सुखी जीवनाचं एक समीकरण मिळतं.

संयम + समाधान = सुख 

आवडल्यास शेअर नक्की करा.

©Akash Gadhave