Login

सावलीमागचं ऊन...भाग 3 अंतिम

जेव्हा एक स्त्री नात्यांवर प्रेम करते तेव्हा ती घर बांधत असते
सावलीमागचं ऊन...भाग 3 अंतिम

एका कौटुंबिक कार्यक्रमात आर्यनच्या काकूंनी सगळ्यांसमोर विचारलं,
"आर्यन, तुझी बायको फार शांत आहे हो… कधी काही तक्रार करत नाही का?"

आर्यन थोडा हसत म्हणाला,
"ती माझ्या आयुष्यातली शांती आहे आणि माझं बळही. तक्रार नाही करत, पण गरज असेल तर समोर उभी राहते."

अन्विता त्या शब्दांनी ओथंबली. एक बायको म्हणून, एक सून म्हणून, एक व्यक्ती म्हणून तिच्या अस्तित्वाला आर्यनने दिलेली मान्यता, तिला नवीन बळ देऊन गेली.

दिवसभराच्या कामांनंतर सगळं घर शांत होतं. आर्यन आणि अन्विता गच्चीत बसले होते. थोडीशी हवा, चहा आणि गप्पा.

आर्यन म्हणाला,
"कधी वाटतंय का की दुसऱ्या घरात गेलं असतं तर हे सगळं थोडं सोपं झालं असतं?"

अन्विताने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं.
"सोपं झालं असतं… पण मी तुझं प्रेम, तुझी साथ आणि या घराला मिळवलेलं माझं स्थान चुकवलं असतं."

त्याच्या मिठीत अलगद हरवलेली अन्विता, आता नुसती सून नव्हती… ती होती त्या घराची सावली, ऊन आणि ओलसर प्रेमाचं वास्तव.

त्या रात्रीनंतर काही गोष्टी बदलल्या होत्या – शब्दांनी नव्हे, पण नजरेच्या नम्र स्पर्शाने.
सुलोचना बाई आता जरा वेळ काढून अन्वितासोबत गप्पा मारू लागल्या.
"आम्हाला ना तुझ्यासारखं संयम राखणं कधी जमलंच नाही गं. आमच्या काळात वाद झाला की आम्ही आवाज वाढवायचो. तू मात्र तसं काही केलं नाहीस."

अन्विताने हसून उत्तर दिलं,
"मी तुमचं ऐकलं, पण तुमच्यासारखं वागायचं नाही ठरवलं."

सुलोचना बाई जरा थांबल्या… आणि पहिल्यांदा अन्विताच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाल्या,
"हेच असतं गं, नवीन पिढीकडून शिकणं"

आर्यनचं प्रमोशन झालं होतं. ऑफिसमधून घरी आल्यावर तो थेट अन्विताला मिठी मारून म्हणाला,
"या यशात श्रेय जितकं माझं आहे तितकंच तुझंही."

किचनमध्ये सगळं ऐकून ममता वहिनींनी ओठात हसू दाबलं. त्या आता अन्विताला जास्त जवळ करत होत्या. अगदी छोटीशीही गोष्ट असली तरी सल्ला द्यायचा असेल, तर त्या अन्विताशी बोलायच्या.

विभा तिच्या नृत्याच्या क्लासमध्ये आनंदानं रमली होती.
एके दिवशी तिनं अन्विताला हळूच सांगितलं,
"तू नसतीस तर मी परत उभी राहिलेच नसते."

अन्विताने तिचा हात हातात घेत फक्त एवढंच म्हटलं,
"कधी कधी आपल्याला दुसऱ्याच्या वादळात फुंकर घालणंही खूप मोठं काम असतं."

सगळं स्थिर झालं होतं, पण अन्विता आता स्वतःसाठी काही करावं असं ठरवत होती.
तिने पुन्हा शिक्षण सुरू करायचं ठरवलं – होमसायन्सचा कोर्स.

सुलोचना बाई आधी आश्चर्यचकित झाल्या,
"अगं, घरात इतकं सगळं आहे, आता तुला शिकायची काय गरज?"

पण आर्यननं लगेचच उत्तर दिलं,
"आई, तिची गरज नाही, ही तिची इच्छा आहे."

ते ऐकून सुलोचना बाई नुसत्या मान हलवत हसल्या,
"तसंही, ती जी काही ठरवते ते अगदी योग्यच असतं."

आता सकाळी ती आईसारखी भाजी चिरायची, संध्याकाळी ताईसारखी विभाला शिकवायची, रात्री बायकोसारखी आर्यनसाठी वाट पाहायची, आणि दिवसात थोडा वेळ स्वतःसाठी शिकायची.

एका गोड सकाळी घरात सगळे चहा पित होते.
विभा आपले नृत्याचं बक्षीस दाखवत होती, ममता त्यांच्या मुलाच्या प्रोजेक्टसाठी कौतुक घेत होती आणि सुलोचना बाई नुसत्या सगळ्यांना पाहत होत्या.

"काय गं, अन्विता," त्या म्हणाल्या,
"हे सगळं घर एकत्र ठेवलंस तू. मी तर कधी विचारही केला नव्हता, की एका सूनमुळे हे असं काही घडेल."

अन्विता फक्त हसली. ती काही मोठं बोलली नाही. कारण तिला माहीत होतं –
घर एकट्याचं नसतं, ते सगळ्यांचं असतं आणि नात्यांचं गुंफणं हे एक कलाप्रकार असतो – जो ती मनापासून साधत होती.

एके दिवशी गच्चीवर आर्यन आणि अन्विता पुन्हा एकदा शांत बसलेले.
आर्यन म्हणाला,
"तुला आठवतं का, तू कधीच तक्रार केली नाहीस?"

अन्विता हलकं हसली,
"कारण मला तुला गमवायचं नव्हतं… आणि हे घर हरवू द्यायचं नव्हतं."

आर्यन तिला मिठीत घेत म्हणाला,
"आता हे घर, हे अंगण, हे नातं – सगळं तुझंच आहे अन्वी."

त्या क्षणी त्यांच्या मागे आकाशात संधीप्रकाश उमटत होता… आणि घराच्या अंगणात अन्वितानं लावलेली मोगऱ्याची फुलं दरवळत होती…

कारण, जेव्हा एक स्त्री नात्यांवर प्रेम करते, तेव्हा ती फक्त घर नाही बांधत – ती एक संपूर्ण जग उभं करते.