Login

सावलीमागचं ऊन...भाग 2

प्रेम दिलं की ते न बोलता मिळतं देखील
सावलीमागचं ऊन...भाग 2

हळूहळू घरात वातावरण बदलू लागलं. सुलोचना कधी आर्यनचा राग टाळण्यासाठी, तर कधी अन्विताची शांत ताकद पाहून नरम बोलायची. ममता वहिनी अन्विताच्या मदतीमुळे थोडी सॉफ्ट झाली आणि विभा – तिच्या आयुष्यातल्या अपूर्णतेचं भान तिला आपोआपच झालं.

अन्विताने कुणालाही दुखा:वलं नाही. पण स्वतःचा आत्मसन्मान जपला. आर्यन तिच्यासोबत होता हे खरं, पण तिची हसतमुख, समजूतदार आणि दृढ वृत्तीच खऱ्या अर्थाने त्या घरात परिवर्तन घडवून आणत होती.

एका संध्याकाळी सासूबाईंनी तिला गुपचूप कुंकवाचा डबा देत हसून विचारलं,
"तुझ्यासारखी सून मिळणं म्हणजे नशिबाचं भाग्य असतं ना?"

अन्विताने डोळे पुसले आणि गालावर एक हलकंसं हसू उमटलं.

कधीकधी, सावलीच्या प्रदेशातही ऊन सापडतं – फक्त थोडा धीर, थोडं प्रेम आणि थोडा स्वाभिमान हवा असतो.


असं ही एक घर सावरतं... आणि एक स्त्री स्वतःचं अस्तित्व गमावता गमावता त्याचं तेज बनून समोर येते.

आता घरात हळूहळू बदल जाणवत होता. अन्विता घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी छोट्या छोट्या गोष्टी करत होती — ममतासाठी तिच्या आवडीची भाजी, विभासाठी एक छानसा ओढणीचा सरप्राईज गिफ्ट, सासूबाईंना आरतीचं ताट हसतमुखाने देणं आणि आर्यनसाठी दररोज एक नवीन चहा पद्धत.

हे सगळं करताना तिने एक गोष्ट कधीच केली नाही — स्वतःचं अस्तित्व विसरली नाही. ती जशी होती, तशीच राहिली. सडेतोड पण नम्र, प्रेमळ पण स्पष्ट.

एक दिवस…

ममता वहिनींना ताप आला. त्या थोड्याशा चिडचिड्या झाल्या, पण अन्विता अगदी आईसारखी त्यांच्या पाठीमागे उभी राहिली. वेळच्या वेळी औषधं, गरम पाणी आणि थोडसं बोलणं. त्या रात्री ममता म्हणाल्या,
"आम्ही जरा जास्तच वाईट वागलो तुझ्याशी… पण तू मात्र कधी वाईट बोलली नाहीस."

अन्विताचं हसणं काहीसं थांबलं, पण डोळ्यातले चमकणारे अश्रू म्हणाले — "कारण मी घर बांधतेय वहिनी… भिंती नाही."

विभा – अजूनही थोडीशी कटू, पण आता तिच्या डोळ्यांतही कधीकधी थांबलेले शब्द दिसायचे.
एक दिवस तिला फोनवर रडताना पाहून अन्विताने तिला मिठी मारली.
"कधी वाटेल की बोलावं, तर मी आहे."

त्याच संध्याकाळी विभाने तिचं मन मोकळं केलं – एक अपूर्ण प्रेमकथा, एक नकारलेलं नातं आणि एक गोंधळलेली स्वप्नं.

अन्विताने आर्यनसोबत बोलून तिच्यासाठी एक नवा क्लास शोधून दिला – क्लासिकल डान्सचा. विभाच्या चेहऱ्यावर पुन्हा एक आशेची पालवी उमटली.

सुलोचना बाई अजूनही सून म्हणून अन्विताकडे सौम्य कटाक्ष टाकायच्या. पण एका दिवशी त्यांनी घरात एक विशेषत: वधूसाठी ठेवलेली जुनी साडी काढली – गुलाबी रंगाची, त्यांच्याच सासूबाईंच्या काळातली.

“ही साडी मी लग्नाच्या पहिल्या संक्रांतीला घातली होती… तुला शोभून दिसेल.”

ते क्षण अन्विताच्या मनात साठून राहिले. एक प्रेम न बोलता मिळालेलं.