सावर रे उंच उंच झुला ( भाग ५ अंतिम )
रात्रभर स्वानंदी आणि सुहास झोपले नव्हते. पूर्ण रात्र दोघांनी ह्या कुशीवरून त्या कुशीवर जागून काढलेली होती. सकाळी सहा वाजता स्वानंदी फ्रेश होऊन हॉटेलच्या लॉनवर चालायला गेली. तिथे सुहास आधीच येऊन गवतावर चालत होता.
"स्वानंदी, झोपली नाहीस? इथे गवतातून चालायला बरे वाटते आहे म्हणून मी आलो. मला वाटलं तू झोपली असशील म्हणून मी तुला उठवले नाही." सुहास म्हणाला.
"झोप अशी लागली नाही रे म्हणून उठून आले. आज दिवसभर असे कुठे फिरायचे नाही त्यामुळे थोडा आराम आहे. आपल्या गाईडने प्रथमेशने सांगितलं आहे की, ज्याला शॉपिंग करायची आहे तो शॉपिंग करायला बाहेर पडू शकतो. लेकीला विचारलं तुला काही हवं आहे का तर म्हणाली काहीच नको आणुस. मग उगीच कशाला जाऊ शॉपिंगला?" स्वानंदी म्हणाली.
"अग इथे साऊथ सिल्क किंवा कॉटनच्या साड्या खूप छान मिळतात. माझा विचार आहे माझ्या सुनेसाठी घेण्याचा. तू पण तुझ्या लेकीसाठी घे." सुहास म्हणाला.
"तुझ्या लेकाचं लग्न झालं आहे? इतक्या दिवसांत काही बोलला नाहीस." स्वानंदी म्हणाली.
"अग, त्याचं अजून लग्न झालेलं नाही पण त्याने स्वतःचं स्वतः ठरवलं आहे. ध्रुवी नाव आहे तिचं. अतिशय गोड मुलगी आहे. बरं ऐक ना, आपण चहा घेता घेता गप्पा मारुया. चालेल ना तुला?" सुहास म्हणाला.ते दोघे हॉटेलच्या कॉफी शॉपमध्ये शिरले.
"अरे वाह! म्हणजे तू आता सासरेबुवा होणार." स्वानंदी म्हणाली.
"तू पण झाली आहेस की सासू तुझ्या जावयाची." सुहास म्हणाला.
" हो रे! खूप छान आहे माझा जावई. लेकीला चांगली माणसे मिळाली. खूप प्रेमळ आणि आधुनिक विचारांची आहेत. मला अजून काय हवे?" स्वानंदी म्हणाली.
"तुला घ्यायला कोण येणार आहे एअरपोर्टवर? माझा लेक आणि सून येणार आहे. लेकाने प्लॅन केला आहे आम्ही एक रात्र मुंबईमध्ये राहणार आहोत. उद्या सकाळी नागपूरला जायला निघू." सुहास म्हणाला.
"माझी मुलगी आणि जावई येणार आहेत. त्यांचा काय प्लॅन आहे मला ठाऊक नाही." स्वानंदी म्हणाली.
"आपण नाश्ता करूया आणि शॉपिंगला जाऊया. येशील ना माझ्या सोबत?" सुहासने विचारले.
चहा, नाश्ता करून दोघे आपापल्या रूममध्ये तयार होण्यासाठी गेले. स्वानंदीने प्लेन फिकट गुलाबी रंगाची साडी नेसली. त्या साडीवर शोभतील असे नाजूकसे मोत्याचे दागिने घातले. ह्या वयातही किती सुंदर दिसत होती स्वानंदी. तयार झाल्यावर दोघे शॉपिंगसाठी बाहेर पडले.
"स्वानंदी, किती छान दिसतेस." सुहास पटकन बोलून गेला. स्वानंदीने त्याच्याकडे पाहून नुसते स्मितहास्य केले.
शॉपिंगसाठी दुकानात शिरल्यावर स्वानंदीपेक्षा सुहासचा उत्साह जास्त होता. त्याने आपल्या सुनेसाठी दोन कॉटन आणि दोन सिल्कच्या साड्या घेतल्या. स्वानंदीसाठी एक साडी त्याने गुपचूप बाजूला ठेवली.
स्वानंदीने देखील आपल्या लेकीसाठी दोन साड्या घेतल्या आणि दोन ड्रेसपीस घेतले.
स्वानंदीने देखील आपल्या लेकीसाठी दोन साड्या घेतल्या आणि दोन ड्रेसपीस घेतले.
लंचनंतर सगळेजण एअरपोर्टला जाण्यास निघाले. गाडीत बसल्यावर सगळयांनी एकमेकांचे नंबर शेअर केले. काही हौशी कलाकारांनी आपल्या सहलीविषयी आणि आपल्या गाईडसाठी कृतज्ञता व्यक्त करायला कविता केल्या होत्या त्या त्यांनी सादर केल्या. काहींनी आपले मनोगत व्यक्त केले.
एअरपोर्टला पोहोचल्यावर सगळ्यांनी एकमेकांसोबत सेल्फी काढले. सात दिवसांच्या सहवासाने सगळ्यांमध्ये मैत्रीचे संबंध झाले होते. केरळवरून त्यांचे फ्लाईट मुंबईसाठी झेपावले.
एअरपोर्टला पोहोचल्यावर सगळ्यांनी एकमेकांसोबत सेल्फी काढले. सात दिवसांच्या सहवासाने सगळ्यांमध्ये मैत्रीचे संबंध झाले होते. केरळवरून त्यांचे फ्लाईट मुंबईसाठी झेपावले.
मुंबईत चेक आऊट वगैरे करून स्वानंदी आणि सुहास एअरपोर्टच्या बाहेर आले. दोघांनाही आपली मुले दिसली नाहीत. दोघांनी आपल्या मुलांना फोन केला तर दोघांची मुले म्हणाली की, 'आम्ही थोडया वेळात पोहचतो. ट्राफिकमध्ये अडकले आहोत.' एअरपोर्टच्या बाहेर बसून राहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. त्यांच्याबरोबरची सहलीमधील बरीच मंडळी आपापल्या दिशेने निघून गेली होती.
"स्वानंदी, खरं सांगायचं तर तुला सोडून जाण्याचे मन होत नाही; पण काय करणार? ह्या वयात मी तुला हे देखील विचारू शकत नाही की स्वानंदी आपण पुन्हा नव्याने एकत्र येऊ शकतो का? समाज आणि आपल्या मुलांचा विचार मनात येतो. पुढे आपण कधी भेटू ते देखील माहीत नाही. खूपच विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे." सुहासच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले होते. त्याने स्वानंदीसाठी गुपचूप घेतलेली साडी तिच्या हातात ठेवली.
"सुहास, ही साडी माझ्यासाठी?" स्वानंदीने विचारले.
"हो स्वानंदी, माझ्याकडून तुला एक छोटीशी भेट. माझी एक आठवण तुझ्यापाशी राहावी म्हणून मी तुला ही साडी घेतली." सुहास म्हणाला.
"थँक्स सुहास. बघ ना, नशिबाने आपली भेट घडवली ती देखील आयुष्याच्या ह्या वळणावर. का दैवाने आपली भेट घडवून आणली? आपण आपले जीवन आहे तसे जगणार होतो मग ह्या भेटीचे आपल्याला दैवाने आमिष का दाखवले? ह्यापुढे कधी भेटू ते देखील माहीत नाही. आता ह्या आपल्या सात दिवसाच्या भेटीची आठवण ठेऊन उरलेले आयुष्य काढायचे एवढेच आपल्या हातात आहे." स्वानंदीचा उर भरून आला होता.
"त्याची काही एक गरज नाही. तुम्ही दोघे अजूनही एकत्र येऊ शकता." स्वानंदी आणि सुहासने चमकून वर पाहिले तर त्यांच्या पुढ्यात ईशा होती. ईशाच्या मागे पार्थ, अभिर आणि ध्रुवी उभे होते.
"तुम्ही सगळे एकत्र कसे?" स्वानंदीने आश्चर्याने विचारले.
"आई! पहिल्यांदा तर मी तुझी माफी मागते. तू मामाकडे गेली होतीस तेव्हा तुझी खाजगी डायरी वाचली. त्या डायरीतील मी तुझे मन वाचले. तू त्या डायरीमध्ये सुहास सरांबद्दल सारे काही लिहिले आहेस. मी 'सुहास गायकवाड' हे नाव फेसबुकवर शोधलं. तिथे त्यांचा मुलगा अभिर मला दिसला. अभिरशी मेसेंजरवर संपर्क केला असता त्याने आपल्या वडिलांबद्दल सारे काही सांगितले. मी त्याला तुझी कहाणी सांगितली. मग आम्ही दोघांनी ठरवले की जे तुमच्या दोघांचे प्रेम असफल झाले होते ते तुम्हा दोघांना परत मिळवून द्यायचे. मग आम्ही दोघांनी प्लॅन करून तुम्हाला एकत्र केरळला पाठवले." ईशा म्हणाली.
"बाबा! माझी आई माझ्या लहानपणी सोडून गेली. तुम्ही मला तुमच्या हाताचा पाळणा करून वाढवले. तुम्हाला संसारसुख मिळाले नाही. फक्त आणि फक्त माझाच विचार केलात. तुम्ही दोघांनी खूप सोसलंत. आता उर्वरित आयुष्य एकमेकांच्या साथीने घालवायचे." अभिर म्हणाला.
"अरे पण, हा समाज काय म्हणेल?" सुहास म्हणाला.
"बाबा, कुठला समाज? जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा येतो का तो समाज आपल्यासाठी? लोकं दोन्ही बाजूंनी बोलतात त्यांना घाबरून आपण आपल्या आयुष्याचा विचार करायचा नाही? ते काही नाही आम्हाला चौघांनाही वाटतं की आता तुम्ही दोघांनी एकत्र यावे. एकमेकांची साथ तुम्हाला लाभावी. उद्या आपण सगळे नागपूरला जाऊ. तुम्ही दोघे एकमेकांच्या साथीने आयुष्याचा पुढचा प्रवास सुरु करा." अभिर म्हणाला.
"ईशा तुझ्या सासरचे काय विचार करतील माझ्याबद्दल? ह्या वयात मी दुसरे लग्न कसे करू?" स्वानंदी म्हणाली.
"आई, माझ्या घरच्या लोकांना मी सगळं सांगितलं आहे. त्यांनी सगळ्या गोष्टींना मान्यता दिली आहे." पार्थ म्हणाला.
"बाबा, माझ्या आईला प्रपोज करा पाहू." अभिरने एक अंगठी सुहासच्या हातात दिली.
"स्वानंदी, माझ्याशी लग्न करशील?" सुहासने गुडघ्यावर बसून आणि स्वानंदीच्या समोर अंगठी धरून विचारले. स्वानंदीने लाजून होकार दिला. चारही मुलांनी टाळ्या वाजवल्या.
"आई, ह्या प्रसंगी तर तुझे गाणे झालेच पाहिजे. प्रसंगानुरूप अगदी फीट बसते आहे ते." ईशा म्हणाली.
स्वानंदीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू पाझरत होते. त्याच भावनांच्या हिंदोळ्यावर स्वानंदी गाऊ लागली, 'सावर रे, सावर रे, सावर रे, उंच उंच झुला, उंच उंच झुला, सुख मला भिवविते, सांगू कसे तुला?'
( समाप्त )
सौ. नेहा उजाळे
ठाणे
ठाणे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा