सावर रे उंच उंच झुला ( भाग ४ )
स्वानंदी बाबांजवळ गेली. स्वानंदीच्या बाबांनी थरथरत्या हाताने तिचा हात हातात घेतला.
कापऱ्या आवाजात बाबा म्हणाले, "स्वानंदी! बाळा, तुला भेटण्यासाठी थांबला होता बघ जीव माझा. तुला पाहिलं आता मी मरायला मोकळा झालो. स्वानंदी, खूप सोसलंस. तुझ्या स्वप्नांचा मी चुराडा केला. मी तुझा दोषी आहे. मला माफ कर मुली. मला माफ कर." एवढे बोलून स्वानंदीच्या बाबांनी प्राण सोडला.
"बाबा." स्वानंदीने टाहो फोडला. नयनने स्वानंदीला जवळ घेऊन धीर दिला.
जवळपास पंधरा दिवस राहून स्वानंदी आपल्या घरी गेली. ईशा आणि पार्थ तर तिथे होतेच. स्वानंदी घरी आल्याआल्या ईशाने तिला घट्ट मिठी मारली.
स्वानंदी घरी आल्यावर ईशा तिच्या सासरी गेली. आता स्वानंदी पुन्हा एकटी त्या वाड्यात उरली. ईशाने तिला खूप वेळा सांगितले होते की, 'माझ्या घरी चल, इथे एकटी राहू नकोस.' तरी स्वानंदीने तिचे म्हणणे कधीच ऐकले नव्हते.
जवळपास पंधरा दिवसांनी ईशाने स्वानंदीच्या हातात विमानाचे तिकीट आणि बुक केलेले केरळ टूरचे पॅकेजचे पत्रक दिले.
" अगं! हे काय आहे ईशा?" स्वानंदीने आश्चर्याने विचारले.
"आई, तुझ्यासाठी केरळ ट्रिप मी एका ट्रॅव्हल्स तर्फे बुक केली आहे. जवळपास तीस वर्षे घरात स्वतःला कोंडून घेतलंस. कुठेही फिरायला अशी गेली नाहीस. ते काही नाही. आता स्वतःसाठी जग. तुला निसर्गरम्य ठिकाणी फिरायला आवडतं ना? आता तुला हवे तिथे फिरून घे. जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी." ईशा अभिनय करत म्हणाली.
स्वानंदीला खूप हसू आले. तिने ईशाचे आभार मानले.
स्वानंदीसाठी ईशाने छान ड्रेस आणले. सुंदर साड्या आणल्या. त्यावर त्याला शोभतील असे आर्टिफिशिअल दागिने आणले. स्वानंदीने टूरला जाण्याची तयारी केली. त्यासाठी तिला पहिल्यांदा मुंबईत जायचे होते. ईशा आणि पार्थने तिला मुंबईच्या एअरपोर्टवर सोडले. ट्रॅव्हल्सच्या आयोजकांनी सगळ्या पर्यटकांची ओळख करून घेतली. पर्यटकांमधून 'सुहास गायकवाड' हे नाव स्वानंदीच्या कानावर पडले साहजिकच स्वानंदीची नजर सुहासला शोधू लागली.
'हा माझा सुहास तर नाही ना? ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम केले होते.' सुहासचा विचार करतचं स्वानंदीने विमानात प्रवेश केला. तिच्या बाजूच्याच सीटवर बसण्यासाठी सुहास आला. दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. दोघांच्याही छातीत धडधडू लागले होते. काय बोलावे दोघांनाही सुचत नव्हते.
'हा माझा सुहास तर नाही ना? ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम केले होते.' सुहासचा विचार करतचं स्वानंदीने विमानात प्रवेश केला. तिच्या बाजूच्याच सीटवर बसण्यासाठी सुहास आला. दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. दोघांच्याही छातीत धडधडू लागले होते. काय बोलावे दोघांनाही सुचत नव्हते.
शेवटी सुहास म्हणाला, "स्वानंदी, कशी आहेस?"
"मी ठीक आहे सुहास. तू कसा आहेस?" स्वानंदीने विचारले.
"मी देखील ठीक आहे. किती वर्षांनी भेटतो आहोत आपण. काय बोलावे काही सुचत नाही." सुहास म्हणाला. स्वानंदी मान खाली घालुन बसली होती. तिलाही काय बोलायचे सुचत नव्हते.
"तू देखील ह्या ट्रॅव्हल्स तर्फे केरळला येते आहेस का?" सुहासने विचारले.
"हं, हो! माझ्या लेकीने माझ्यासाठी हे पॅकेज बुक केले आहे." स्वानंदी म्हणाली.
"अरे वाह! माझ्या मुलाने मला केरळ फिरायला पाठवले आहे. किती वर्षे आपला काहीच संपर्क नव्हता त्यामुळे तुझ्याबद्दल काहीच माहिती नव्हती. मी देखील तुझ्या लग्नानंतर नागपूरला निघून गेलो. तू एकटी आली आहेस फिरायला? तुझे मिस्टर नाही आले? सुहासने विचारले.
एक उदासीपणाची रेष स्वानंदीच्या चेहऱ्यावर उमटली, "माझे मिस्टर सहा महिन्यांपूर्वी वारले. तुझी बायको नाही आली का तुझ्याबरोबर?"
"नाही. माझ्या अभिरचा जन्म झाला आणि चार महिन्यांत माझी बायको जग सोडून गेली. तिला बाळंतपणात कसलेतरी इन्फेक्शन झाले होते. घरातल्या लोकांनी, नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी मला अनेकवेळा सल्ले दिले की लहान बाळासाठी दुसरे लग्न कर पण मला नंतर इच्छाचं झाली नाही पुन्हा लग्न करण्याची." सुहास म्हणाला.
"अरे बापरे! सॉरी, मला माहित नव्हते." स्वानंदी म्हणाली.
"कसं माहिती असेल? तुझ्या लग्नानंतर मी इतका खचून गेलो होतो. खूप उदास उदास राहत होतो. गाणे वगैरे बाजूला ठेऊन मी नागपूरला नोकरी करू लागलो. माझ्या आयुष्यात स्मिता आली. स्मिता आमच्याच ऑफिसमध्ये होती. तिने मला पुन्हा माणसांत आणले. मला संगीतक्षेत्रात पुढे शिक्षण घ्यायला लावले. मी तिच्याशी लग्न करणार नव्हतो पण तिने जणू चंगच बांधला होता माझ्याशी लग्न करण्याचा. सरतेशेवटी आमचे लग्न झाले. मी खूप सुखी होतो. मला खूप चांगली पत्नी मिळाली होती; पण दैवाला माझं सुख मंजूर झाले नाही आणि स्मिताला भरल्या संसारातून त्याने नेले. माझ्या छोट्या बाळाला माझ्या स्वाधीन करून गेली ती." सुहासने एक मोठा उसासा सोडला आणि पुढे म्हणाला, "स्वानंदी, तू तुझ्या संसारात सुखी होतीस ना?"
सुहासच्या प्रश्नावर स्वानंदीने तिची कर्मकहाणी सुहासला कथन केली.
"स्वानंदी, तू देखील किती भोगलंस ग तुझ्या आयुष्यात. तुझी लेक तुला बरोबर म्हणाली आहे की आता तू स्वतःसाठी जग. तुला निसर्गात राहायला आवडतं ना? तुला केरळ खूप आवडेल. छान मनसोक्त भरभरून निसर्गाचा आनंद घे." सुहास म्हणाला.
"हम्म." स्वानंदीच्या डोळ्यांत पाणी तरळले होते.
"बरं! आता आपण फिरायला जातो आहोत ना तर हे असे डोळ्यांत पाणी बिणी नाही आणायचे. छान सात दिवस फक्त आनंद उपभोगूया आपण. ठीक आहे? आणि ह्या माणसाची सोबत तुला चालेल ना?" सुहासने स्वानंदीला विचारले.
स्वानंदीने सुहासच्या प्रश्नावर केवळ मंद स्मित केले. विमान केरळमध्ये लँड झाले. आयोजकांनी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये पर्यटकांची सोय केली होती. स्वानंदीला एक छान रूममेट मिळाली आणि नेमकी सुहासची रूम स्वानंदीच्या बाजूलाच होती. हॉटेलमध्ये पोहचल्यावर स्वानंदीने ईशाला ती सुखरूप पोहोचल्याचा फोन केला. दुपारी हॉटेलच्या डायनींग हॉलमध्ये सगळ्यांनी लंच केले. लंच झाल्यावर पर्यटकांना एका बीचवर नेले. सूर्यास्त पाहताना स्वानंदी भारावून गेली होती. कित्येक वर्षांनी सुंदर निसर्ग ती डोळ्यांत साठवत होती.
रात्री आठ वाजता डिनर झाल्यावर काही हौशींनी गाण्याच्या भेंड्या सुरू केल्या. पुरुष विरुद्ध स्त्रिया असल्याने स्त्रिया बाजी मारत होत्या. तरी सुहास आपला संघ पडू देत नव्हता. 'स' अक्षर आल्यावर स्वानंदीने 'सावर रे, उंच उंच झुला' हे गाणे म्हटले तर सुहासने 'भेट तिची माझी स्मरते' हे गाणे गाऊन दोघांनी सगळ्यांची वाहवा मिळवली. स्वानंदीने कितीतरी वर्षांनी गाणे म्हटले असल्याने तिच्या मनाला आनंद मिळाला होता. गाणी म्हणताना सुहास आणि स्वानंदी एकमेकांकडे चोरटा कटाक्ष टाकत होते.
एव्हाना बहुतेकांना समजले होते की स्वानंदी आणि सुहास हे एकमेकांना त्यांच्या कॉलेजपासून ओळखतात त्यामुळे त्या दोघांच्या ह्या अनपेक्षित झालेल्या भेटीचे सगळ्यांना अप्रूप वाटत होते. ट्रॅव्हल्सच्या आयोजकांनी पर्यटकांना केरळमधील प्रेक्षणीय स्थळे दाखवली. केरळमधील निसर्गाचा आविष्कार पूर्णपणे उपभोगून स्वानंदी तृप्त झाली होती. दुसऱ्या दिवशी सहलीचा शेवटचा दिवस होता. संध्याकाळी चार वाजताचे परतीचे फ्लाईट होते. मुंबईमध्ये ईशा आणि पार्थ स्वानंदीला न्यायला येणार होते. सुहासची आता ह्यापुढे भेट होणार नाही ह्या कल्पनेने स्वानंदीला कसेनुसे झाले होते. इथे सुहासची देखील तीच गत होती. दोघांना एकमेकांना सोडून जाण्याचे खूप दुःख वाटत होते. दोघांनाही रात्री झोप लागली नाही.
नशिबाने दोघांची भेट तर घडवली होती; पण ती ह्या अशा परिस्थितीत की ते दोघे पुन्हा एकत्र येऊ शकणार नव्हते. शेवटी त्यांची मुले आणि समाज यांची त्यांच्यावर बंधने होती.
क्रमशः
सौ. नेहा उजाळे
ठाणे
ठाणे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा