Login

सावर रे उंच उंच झुला ( भाग ३ )

स्वानंदी आणि सुहासची प्रेमकहाणी
सावर रे उंच उंच झुला ( भाग ३ )

स्वानंदीच्या लग्नानंतरचा आषाढ महिना आला. स्वानंदीच्या सासऱ्यांनी तिला माहेरी पाठवले. खरंतर स्वानंदी माहेरी जाण्यास अजिबात उत्सुक नव्हती कारण तिच्या बाबांचा तिला खूप राग आला होता. जिथे तिची स्वतःची ओळख पुसून गेली होती अशा ठिकाणी तिला आता उर्वरित आयुष्य काढायचे होते. स्वानंदीच्या बाबांनी तिच्या प्रेमाचा, तिच्या स्वाभिमानाचा, तिच्या स्वातंत्र्याचा एकप्रकारे बळीचं दिला होता.

स्वानंदी माहेरी आली पण ती पहिल्यासारखी स्वानंदी राहिली नव्हती. एकदम अबोल आणि उदास झाली होती. तिला पाहून आईने आणि वहिनीने घट्ट मिठी मारली. तिघीजणी मिठी मारून रडल्या. नयनच्याही डोळ्यांत स्वानंदीची अवस्था पाहून पाणी आले. बाबांनी तिच्याकडे तिची चौकशी केली असता स्वानंदीने त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचेच त्यांना उत्तर दिले. माहेरी आल्यावर देखील स्वानंदीने स्वतःला घरातच कोंडून घेतले कारण उगीच इथे तिथे फिरण्याची सवय लागायला नको. पुन्हा सासरी गेल्यावर तिला उंबरठ्याच्या आतच राहावे लागणार होते.

स्वानंदी माहेरी आल्याचे मंजुषाला समजल्यावर ती स्वानंदीला भेटायला आली. मंजुषाला पाहून स्वानंदीला भरून आले. दोघी मैत्रिणी मिठी मारून रडल्या. अश्रूंचा आवेग ओसरल्यावर स्वानंदी मंजुषाला म्हणाली, "मंजुषा, माझं आयुष्य आता पर्णहीन वृक्षासारखे झाले आहे. सगळ्या आशा, आकांक्षा मी मनात कोंडल्या आहेत. केवळ कर्तव्य म्हणून मी माझा संसार पुढे रेटणार आहे. त्यात प्रेम, आपलेपणा काहीच नसेल." स्वानंदीने आपल्याला सासर आणि नवरा कसा मिळाला आहे ते मंजुषाला सांगितल्यावर मंजुषाला स्वानंदीबद्दल अतिशय वाईट वाटले.

थोड्या वेळाने स्वानंदीने मंजुषाला विचारले, "सुहास कसा आहे ग? तुला भेटला का?"

"तुझ्या लग्नानंतर सुहास एकदम खचून गेला होता. तो आता पुण्यात नसतो. तो नागपूरला निघून गेला आहे. आता तो माझ्याही संपर्कात नाही त्यामुळे त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही." मंजुषाने असे सांगितल्यावर स्वानंदीच्या डोळ्यांत पाणी तरळले.

श्रावण महिन्यांतील सणवार आटोपून स्वानंदी सासरी निघून गेली. काही दिवसांनी तिला बाळाची चाहूल लागली. आपल्याला आपल्या बाळाच्या रूपाने तरी जीवनात आनंद उपभोगता येईल ह्या विचाराने ती मनोमन सुखावली.

स्वानंदीला मुलगी झाली. डॉक्टरांनी विश्वासला जवळ बोलावून सांगितले की, "स्वानंदीचे गर्भाशय खूप नाजूक असल्याने तिला पुन्हा दिवस न जाण्याची काळजी घ्या नाहीतर बाळ किंवा आई कोणाच्याही जीवाला धोका होऊ शकतो."

स्वानंदीची ही बातमी ऐकून तिच्या सासरच्या लोकांनी तिला समजावून न घेता तिला दोष देण्यास सुरुवात केली, "काय बाई हा नाजूकपणा म्हणायचा? मुले होऊ द्यायची नाही तर मग मुलगा तरी जन्माला घालायचा होता ना? जन्माला घातली मुलगी. परक्याचं धन. आता आमच्या विश्वासचे नाव लावायला वारसदार कोण?"

स्वानंदीच्या सासुसासऱ्यांनी विश्वासचे नाव लावणारा वारस हवा ह्यासाठी विश्वासचे दुसरे लग्न करून दिले. स्वानंदी ह्या सगळ्या प्रकरणाने सुन्न झाली होती आणि केवळ बघ्याची भूमिका तिने घेतली होती.

स्वानंदीची सवत कावेबाज आणि अप्पलपोटी होती. तिला मुलगा झाल्यावर तिने बरीच प्रॉपर्टी आपल्या आणि मुलाच्या नावावर केली. तिला कुठलीही बंधने नको असल्याने ती विश्वासला घेऊन वेगळी राहू लागली. तिने विश्वासवर काय जादू केली माहीत नाही विश्वास तिच्या शब्दाबाहेर नव्हता. स्वानंदीच्या नवऱ्याचे आणि सासरच्यांचे गलिच्छ वागणे पाहून नयन स्वानंदीला कायमचे माहेरी न्यायला आला असता स्वानंदीने त्याच्याबरोबर माहेरी जाण्यास नकार दिला.

काही वर्षांनी स्वानंदीच्या मोठ्या दिरांचा मुलगा शिक्षणासाठी परदेशी निघून गेला. तिथे त्याला चांगली नोकरी लागल्यावर त्याच्या आईवडिलांना त्याने तिथे बोलावून घेतले. आता स्वानंदी, तिची लेक आणि तिचे सासुसासरे इतकेच वाड्यात उरले. तिच्या सासऱ्यांना पॅरेलिसिस होऊन त्यांनी अंथरूण पकडले. तसेच सासू देखील वयोपरत्वे थकली असल्याने सासुसासऱ्यांचा भार स्वानंदीवर पडला. स्वानंदी सासुसासऱ्यांचे सारे काही मनापासून करत होती. आता स्वानंदीच्या सासुसासऱ्यांना स्वतःच्याच कृत्याची लाज वाटत होती. सासुसासऱ्यांनी स्वानंदीचा कधीच विचार केला नव्हता. सगळ्यांनी साथ सोडली तरीही स्वानंदी कर्तव्य म्हणून सासरी तग धरून उभी राहिली होती आणि ह्याच गोष्टींची जाणीव तिच्या सासुसासऱ्यांना झाली होती.

स्वानंदी तिच्या लेकीसाठी जगत होती. ईशाला चांगले संस्कार, चांगले शिक्षण देऊन घडवत होती. ईशाला आई आणि वडिलांचे प्रेम देत होती. तिच्या सासऱ्यांनी त्यांचा अंत जवळ आला आहे असे वाटून त्यांनी राहता वाडा स्वानंदीच्या नावे केला. जी नात त्यांना नकोशी होती त्या नातीच्या नावावर काही रक्कम त्यांनी ठेवली. स्वानंदीने जे काही भोगले होते तिच्या पुढच्या आयुष्यात ती मानाने जगायला हवी ह्यासाठी तिच्या सासऱ्यांनी घर स्वानंदीच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला होता. मरतेवेळी स्वानंदीची माफी मागून तिच्या सासऱ्यांनी प्राण सोडला. सासऱ्यांच्या पाठोपाठ स्वानंदीच्या सासूबाईंचे निधन झाले.

स्वानंदीला तिचा दादा भेटायला आला आणि म्हणाला, "स्वानंदी, मला माहिती आहे तुला संसारसुख कधीच मिळाले नाही. आता ह्या मोठ्या वाड्यात तुम्ही मायलेकी दोघीचं कशा राहाल? आपल्या घरी चल आपण सगळे मिळून राहू. तुमच्या दोघींचा माझ्या मनात सारखा विचार असतो. आई देखील तुझी सारखी काळजी करत असते. निदान आईला तरी भेटायला चल."

" दादा, मी आईला येईन भेटायला पण आता ह्या वाड्यातच माझा शेवट होईल. तू काही तुझ्या घरी कायमचे येण्याचा आग्रह करू नकोस. माझ्या सासऱ्यांनी माझी कदर ठेऊन मी मानसन्मानाने जगावे म्हणून तरतूद करून ठेवली आहे. आता मला सन्मानाने जगूदे." स्वानंदी नम्रपणे म्हणाली. स्वानंदीचा दादा हताशपणे निघून गेला.

काही दिवसांनी स्वानंदीच्या आईचे निधन झाले. आईच्या अंतिम क्षणी स्वानंदी आईजवळ होती. आईचा अखेरचा प्रेमळ सहवास तिला मिळाला होता.

स्वानंदीने लेकीला उच्च शिक्षण दिले. तिला स्वावलंबी बनवले. तिची लेक स्वतःच्या स्कॉलरशिपवर आयुर्वेदिक डॉक्टर झाली होती आणि तिचा नवरा देखील आयुर्वेदिक डॉक्टर होता. तिच्या लेकीने प्रेमविवाह केला होता. तिचे आणि पार्थ जगदाळेचे कॉलेजपासून प्रेम होते. पार्थचे कुटुंब सुशिक्षित आणि पुढारलेल्या मतांचे होते. ईशाचे सासर आणि क्लिनिक स्वानंदीच्या घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर होते त्यामुळे ईशा तिच्या आईला रोज भेटायला जात असे. स्वानंदीने ईशाच्या प्रेमाला मान्यता देऊन लेकीचे लग्न लावून दिले होते. ईशाला आपल्या आईच्या कष्टांची, तिच्या दुःखांची जाणीव होती आणि त्या करताच आपल्या आईला पुढच्या आयुष्यात कसे सुखी ठेवता येईल ह्यासाठी तिची धडपड असायची.

विश्वासचे चार महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाले होते. विश्वासने स्वानंदी आणि ईशाचा कधीच विचार केला नव्हता. ज्या बायको आणि मुलासाठी त्याने स्वानंदी आणि ईशाला दुर्लक्षले होते तीच बायको आणि मुलगा विश्वासला चांगली वागणूक देत नसत. मुलगा तर अतिलाडाने बिघडला होता. विश्वासला त्याची चूक समजली होती; पण आता खूप उशीर झाला होता.

विश्वास गेल्यावर लादलं गेलेलं नातं देखील संपुष्टात आले होते. नवरा असूनदेखील नसल्यासारखा आणि तरीही मंगळसूत्राचे ओझे तिला बाळगावे लागत होते. आता स्वानंदी खऱ्या अर्थाने मुक्त झाली होती. आयुष्यातल्या अनेक कटू आठवणींनी स्वानंदीला मानसिक त्रास होत होता त्यात आता बाबा सिरीयस आहेत असा दादाकडून निरोप आला होता.

"ताई, तुमचं घर आलं." ड्रायव्हरच्या बोलण्याने स्वानंदीची तंद्री भंगली आणि स्वानंदी धडधडत्या अंतःकरणाने घरात शिरली.