Login

सावर रे उंच उंच झुला ( भाग २ )

स्वानंदी आणि सुहासची प्रेमकहाणी
सावर रे उंच उंच झुला ( भाग २ )

दोन दिवसांनी कॉलेजमधून स्वानंदी आणि सुहासचा सत्कार केला गेला होता. कॉलेजमधून त्या दोघांना ट्रॉफी आणि प्रत्येकी दोनशे रुपयांचे बक्षीस देण्यात आले होते. त्या आनंदातच ती घरी आली. ती घरी आली तेव्हा तिचा दादा घरी जेवायला म्हणून आला होता. तो काहीतरी विचार करत असल्यासारखा तिला वाटला. तिने तिच्या दादाला काय झाले म्हणून खूप वेळ विचारले असता सरतेशेवटी दादाने तिला वसुधाविषयी सगळे सांगितले आणि ती त्याच्या मनात भरली आहे हे देखील सांगितले आणि आईच्या कानावर ही गोष्ट घाल असेही सांगितले.

जयेशने नयनला आईवडिलांना घेऊन वसुधाला मागणी घालायला ये असे सांगितल्याने आईशी ह्या विषयावर डायरेक्ट कसे बोलायचे म्हणून त्याने स्वानंदीला आईशी बोलायला सांगितले. दादाने आपल्यासाठी वहिनी पसंत केली आहे ह्याचा स्वानंदीला अतिशय आनंद झाला. तिने लागलीच तिच्या आईला सांगण्यासाठी धूम ठोकली.

स्वानंदीच्या आईला वसुधाविषयी समजल्यावर आईने पटापट पाऊले उचलली. स्वानंदीच्या बाबांना तयार करून ते सगळे वसुधाच्या घरी मागणी घालायला नाशिकला गेले. दोन्ही घरी पसंती झाल्यावर लग्नाचा मुहूर्त ठरवला गेला आणि तीन महिन्यांनी स्वानंदीच्या दादाचे लग्न होऊन कु. वसुधा आपटे सौ. वसुधा क्षीरसागर होऊन क्षीरसागरांची सून झाली.

स्वानंदीचा दादा तिचे आता अधिकच लाड करू लागला होता आणि वहिनीच्या रूपाने तिला एक मैत्रिणचं लाभली होती.

स्वानंदी आणि सुहास एकमेकांमध्ये गुंतत चालले होते हे त्या दोघांनाही समजत होते; पण अजूनही त्या दोघांनी आपल्या भावना एकमेकांकडे व्यक्त केल्या नव्हत्या. मंजुषाला स्वानंदीचे मन समजत असल्याने तिने पुढाकार घेऊन सुहासला स्वानंदीबद्दल विचारले. सुहासने देखील स्वानंदीवरील त्याचे प्रेम मंजुषाकडे व्यक्त केले. स्वानंदी आणि सुहासचे प्रेम जुळवून देण्यास मंजुषा दुवा ठरली होती.

स्वानंदी आणि सुहासचे प्रेम दोघांच्या आवडीनिवडी, दोघांची मते जुळत असल्याने दिवसेंदिवस फुलत होते. दोघेही प्रेमात इतके बुडाले होते की, दोघेही आता एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते.

"स्वानंदी, मी तुझ्या घरी तुला मागणी घालायला येईन जेव्हा मी माझे अस्तित्व सिद्ध करून दाखवेन. मला संगीत क्षेत्रात नाव कमवायचे आहे; पण मला भीती वाटते ग तू इतकी श्रीमंताघरची मुलगी त्यात तू माझ्यापेक्षा उच्च जातीची. तुझ्या घरचे आपल्या लग्नाला परवानगी देतील की नाही याची कायम मनामध्ये भीती असते माझ्या." सुहास म्हणाला.

" सुहास, नको काळजी करुस. मी माझ्या दादाला आणि वहिनीला तुझ्याविषयी सांगेन. माझे बाबा त्या दोघांचे म्हणणे नक्कीच ऐकतील." स्वानंदी सुहासला धीर देत म्हणाली.

स्वानंदीचे शिक्षण पूर्ण होत आले होते. तिची शेवटच्या वर्षीची परीक्षा सुरू होणार होती. सुहास तिच्या एक वर्ष पुढे असल्याने त्याचे ग्रॅज्युएशन होऊन त्याने संगीतक्षेत्रात एम.ए. करण्याचे ठरविले होते.

स्वानंदीने तिच्या वहिनीकडे सुहासविषयीचे प्रेम व्यक्त केले. तिच्या वहिनीने तिच्या दादाला सांगितल्यावर नयनने स्वानंदीला बोलावले. "स्वानंदी, मी ऐकलं ते खरं आहे का? तू एका मुलावर प्रेम करतेस?"

"हो दादा, माझं सुहासवर खूप प्रेम आहे. त्याच्या कामकाजात त्याचा जम बसला की आम्हाला लग्न करायचे आहे." स्वानंदी म्हणाली.

" स्वानंदी, तुला ठाऊक आहे की, त्याची आणि आपली जात एक नाही. तुला बाबांचा स्वभाव ठाऊक आहे ना? ते जुन्या मतांचे आहेत. बाबा तुझ्या लग्नाला तयार होतील का? जर ते तयार झाले तर तुला लग्नानंतर कितीतरी गोष्टी जुळवून घ्याव्या लागतील. आपल्या रितिभाती, आपल्या खाण्याच्या सवयी सारं काही बदलेल. तू निभावून नेऊ शकशील का सगळं?" नयनने काळजीने विचारले.

"दादा, मला सगळं माहिती आहे. मी सगळ्या गोष्टींना तयार आहे. दादा सुहास खूप चांगला मुलगा आहे रे. त्याची जात जरी वेगळी असली, भले तो मध्यमवर्गीय असला तरी त्याच्यात आत्मविश्वास, स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द, मेहनती आहे आणि मुख्य म्हणजे तो माझ्यावर प्रचंड प्रेम करतो. इतका चांगला मुलगा माझा नवरा होणार असेल तर दादा तूच सांग ना मी सुखी नाही होणार का? तू हवे असल्यास सुहासला भेट. त्याच्याशी बोल म्हणजे तुला समजेल की माझी निवड चुकीची नाही." स्वानंदी आत्मविश्वासाने म्हणाली.

"ठीक आहे, मी भेटतो सुहासला." नयन म्हणाला.

नयनने सुहासची भेट घेतली. सुहासचा नम्र स्वभाव, त्याची मह्त्वाकांक्षा पाहून साहजिकच नयनला सुहास आवडला होता. आता प्रश्न होता बाबांना स्वानंदीच्या लग्नासाठी तयार करण्याचा. स्वानंदीचे बाबा तसे जुन्या विचारांचे होते त्यामुळे ते स्वानंदीच्या प्रेमाला मान्यता देतील की नाही याची काळजी नयनला लागली होती. स्वानंदीचे ग्रॅज्युएशन झाल्यावर तिच्या बाबांनी तिच्यासाठी स्थळे शोधायला सुरुवात केली असता नयनने बाबांकडे सुहासचा विषय काढला.

"नयन! तू इतका मोठा झालास का? तुझ्या मूर्ख बहिणीची वकिली करतो आहेस? तिला एक चांगलं वाईट ह्याची अक्कल नाही; पण तुला तर समजलं पाहिजे ना? फक्त प्रेमाने पोट भरतं का? त्यात आपली उच्च जात. स्वानंदी लहानपणापासून श्रीमंतीत वाढली आहे. तिला जमणार आहे सगळं निभावायला? ते काही नाही, मी एखादं चांगलं स्थळ पाहून लग्नचं लावून देतो तिचं आणि हा विषय इथेच संपवायचा. अतिलाडाचा गैरफायदा घेतला पोरीने." स्वानंदीचे बाबा रागारागात म्हणाले.

नयनने समजावून देखील बाबांनी ऐकले नाही. त्यांनी लगेच तिचे लग्न रत्नागिरीमध्ये स्थायिक असलेल्या विश्वास जोशी ह्याच्याशी ठरवले. जोशी कुटुंब हे पुजारी असून तेथील महालक्ष्मी मंदिराचे विश्वस्त होते. गावात कोणाचेही देवाधर्माचे कार्य असले तरी त्यांनाच मान दिला जात असे. रत्नागिरीमध्ये त्यांचा स्वतःचा मोठा वाडा होता. जमीनजुमला होता. एकंदरीत सधन कुटुंब होते जोश्यांचे. जोशींना तीन मुलगे आणि तीन मुली. मुलांमध्ये मोठ्या दोघांची लग्ने झाली होती आणि दोन मुलींची लग्ने झाली होती. विश्वास मुलांमध्ये धाकटा. त्याचे आणि त्याच्या पाठच्या धाकट्या बहिणीचे लग्न व्हायचे होते. मधला भाऊ शिक्षणासाठी मुंबईमध्ये गेला आणि मुंबईमधेच त्याने त्याचे बस्तान बसवले होते.
सणासुदीला कुटुंबाला घेऊन तो गावी येत होता. दोन मुली देखील माहेरपणाला येत असत. स्वानंदीच्या बाबांनी जोश्यांचे भरलेले घर, मोठा वाडा हे सर्व पाहून सोयरीक जुळवली होती.

इथे स्वानंदी जीवाचा आकांत करून आपल्या बाबांना सांगत होती की, तिला सुहासशीच लग्न करायचे आहे तरीही तिच्या बाबांनी तिचे लग्न विश्वास यांच्यासोबत लावून दिले. विश्वास आणि त्याच्या धाकट्या बहिणीचे एकाच मांडवात लग्न लावून देण्यात आले होते.

स्वानंदी माप ओलांडून जोश्यांच्या वाड्यात आली. जोशी कुटुंबातील सदस्य अतिशय अबोल होते. कोणाच्याही चेहऱ्यावर हसू म्हणून नाही. त्यात देवाधर्माचे करणारे म्हणून अतिशय कर्मठ होते. स्वानंदीला वाटले आपला नवरा तरी बोलका असेल त्याचा तर मुक्याचाच कारभार. जोश्यांच्या घरात स्त्रियांना इतका मान नव्हता. घरातल्या स्त्रियांनी उगीच कामाशिवाय बाहेर पडायचे नाही, स्वयंपाक घरात जाताना सोवळ्याने जायचे, चार दिवसांचा मासिकधर्म पाळायचा, गाणी गायची नाहीत, कुठे फिरायला जायचे नाही, जर कुठे जायचे असेल तर एकतर देवदर्शनासाठी जायचे नाहीतर कोणा नातेवाईकांच्या लग्नासाठी.

स्वानंदीचा हसरा, खेळकर स्वभाव जोश्यांच्या घरी येऊन लुप्त झाला. तिची गाण्याची आवड, तिची निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याची आवड सारं काही स्वानंदीने मनाच्या कोपऱ्यात बंदिस्त केले. सकाळपासून ते रात्रीपर्यंत तिला घरकाम करावे लागे. नवरा केवळ पुरुषार्थ म्हणून रात्री जवळ यायचा त्यात प्रेम वगैरे काही नव्हते. स्वानंदी केवळ कर्तव्य म्हणून संसारात रुळली. त्यात तिचा मानसन्मान, तिची हौस सगळी धुळीला मिळाली होती.