Login

सावर रे उंच उंच झुला ( भाग १ )

स्वानंदी आणि सुहासची प्रेमकहाणी
सावर रे उंच उंच झुला ( भाग १ )

टेबलावरील मोबाईल खणखणला. मोबाईलवर दादाचे नाव पाहून स्वानंदीने थोडं बाचकतच फोन घेतला, "स्वानंदी, बाबा खूप सिरीयस आहेत. तुझं नाव घेत आहेत सारखे. मला कल्पना आहे तुझ्या मनःस्थितीची आणि मी तुला बाबांसाठी इथे यायला सांगतो आहे. तरीही मी तुला विनंती करतो तू लवकर ये. बाबांना तुला भेटायचे आहे." स्वानंदीचा दादा कळकळीने म्हणाला.

"ठीक आहे, येते मी." स्वानंदी दीर्घ उसासा सोडत म्हणाली. खरंतर स्वानंदीच्या लग्नानंतर तिने तिच्या बाबांशी बोलणे टाकले होते परंतु आता माणुसकी म्हणून नाईलाजास्तव माहेरी जावे लागणार होते. चार महिन्यांपूर्वी स्वानंदीच्या नवऱ्याचे विश्वासचे हृदयविकाराने निधन झाले होते. तिचा नवरा तिच्यासाठी फक्त कुंकवाचा धनी होता आणि आता तर त्याही बंधनातून तिला मुक्तता मिळाली होती.

निघण्यापूर्वी स्वानंदीने तिच्या लेकीला ईशाला ती जाते आहे याची कल्पना दिली. तिला आणि तिच्या नवऱ्याला घरी राहायला बोलावले. स्वानंदीने त्यांच्या वाड्याला कुलूप म्हणून कधी लावले नव्हते. ईशाने तिला 'आई तू निर्धास्त जा, मी क्लिनिकमधून डायरेक्ट घरी येते. माझ्याकडे आहे घराची चावी.' असे सांगितल्यावर स्वानंदीने ड्रायव्हरला गाडी काढायला सांगून ती गाडीत बसली. साहजिकच तिचे मन भूतकाळात गेले.

"स्वानंदी! अग हा बघ इथे स्पर्धेचा रिझल्ट लावला आहे. तुझा प्रथम क्रमांक आला आहे. किती मस्त ग." मंजुषा स्वानंदीला उत्साहाने बोर्डवरील तिचे नाव दाखवत होती.

स्वानंदीने तिचे बोर्डवरील नाव वाचले. तिचे नाव वाचून तिला आनंद तर झालाच होता तरीदेखील तिचे डोळे मुलांमध्ये कोणाचा क्रमांक आला आहे हे शोधू लागले. मुलांमध्ये सुहास गायकवाडचे नाव दिसल्यावर तिच्या चेहऱ्यावर हसू उमलले. 'त्याने देखील किती सुंदर गाणे म्हटले होते. त्याचा नंबर यायलाच हवा होता.' मनातल्या मनात विचार करत असताना स्वानंदी समोर सुहास उभा राहिला.

"स्वानंदी अभिनंदन!" सुहास म्हणाला.

"थँक्स! आणि तुझे देखील अभिनंदन." एवढेच बोलून स्वानंदी मंजुषाचा हात धरून वर्गामध्ये जाण्यास निघाली. त्या काळी मुलीमुले एकमेकांशी फार क्वचित बोलत असत.

स्वानंदीने 'सावर रे, उंच उंच झुला' हे गाणे म्हटले होते आणि सुहासने 'भेट तिची माझी स्मरते' हे गाणे म्हणून दोघांनी परीक्षकांची मने जिंकली होती.

एव्हाना कॉलेजमध्ये स्वानंदी आणि सुहासच्या यशाबद्दल सगळ्यांना समजले होते. जो तो त्या दोघांचे अभिनंदन करत होते. सर्वांचे आभार मानत स्वानंदी आपल्या वर्गात गेली.

कॉलेज सुटल्यावर एका वेगळ्या धुंदीत स्वानंदी घरी पोहचली. घरी गेल्या गेल्या तिने तिच्या आईला हाका मारल्या, "आई ए आई! माझा संगीत स्पर्धेत पहिला क्रमांक आला आहे आणि आई तुला माहिती आहे का? आपल्या शहरातील शंभर कॉलेजमधील जवळपास तीनशे ते चारशे मुले - मुली सहभागी झाले होते आणि त्यात माझा पहिला क्रमांक आला आणि मुलांमधून आमच्याच कॉलेजच्या मुलाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. कसलं छान वाटतंय म्हणून सांगू?" स्वानंदी भरभरून बोलत होती.

"अगबाई ! हो का? खूपच छान हो. तुझी अशीच प्रगती होत राहो. आजीआजोबांना सांगितलंस का? त्यांना देखील खूप आनंद होईल हो." स्वानंदीची आई म्हणजेच नंदिताताई म्हणाल्या.

"हो आई ! मी सांगते आजीआजोबांना आणि दादा आला का ग?" स्वानंदीने विचारले.

" हो मघाशीच आला आणि तो परत आपल्या भोजनालयासाठी घाऊक माल भरायला गेला आहे. संध्याकाळपर्यंत येतो म्हणाला." नंदिताताई म्हणाल्या.

"बरं! मी आजीआजोबांना सांगून येते." असे म्हणून स्वानंदी आजीआजोबांच्या खोलीत पोहचली. आजीआजोबांना तिने आनंदाची बातमी सांगितली. त्या दोघांना सुद्धा आपल्या नातीची बातमी ऐकून आनंद वाटला. जेऊन झाल्यावर स्वानंदी आपल्या गुरुजींना ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी तिच्या संगीत विद्यालयात गेली. स्वानंदीच्या गुरुजींना आपल्या शिष्येचा अभिमान वाटला. त्यांनी तोंड भरून स्वानंदीला आशीर्वाद दिला.

संध्याकाळी दादा घरी आल्यावर त्याच्यासमोर स्वानंदीने तिची कॉलर टाईट केल्याचा अभिनय केला आणि तिच्या दादाला ती म्हणाली, "दादटल्या! तुझ्याकडून मला काहीतरी बक्षीस हवे आहे."

"हो ग बाई! देणार आहे मी तुला बक्षीस. मी घरात शिरल्या शिरल्या आईने मला सगळं सांगितलं. बरं! माझ्या ह्या छोट्या बहिणीला काय हवं आहे बक्षीस?" स्वानंदीचा दादा नयन म्हणाला.

"दादटल्या! आता मला एक छानशी वहिनी आणून दे बाबा. मला तुझ्या लग्नात करवली म्हणून खूप मिरवायचे आहे." स्वानंदी म्हणाली. स्वानंदीच्या वाक्यावर मित्राची मेहुणी नयनच्या डोळ्यांसमोर उभी राहिली. नयनच्या खास मित्राचे जयेशचे लग्न नाशिकला असल्याने नयन दोन दिवस नाशिकला गेला होता. तिथे त्याची मेहुणी वसुधा त्याच्या मनात भरली होती. आता स्वानंदीने वहिनीसाठी हट्ट धरल्यावर त्याला साहजिकच वसुधाची आठवण आली. नयन विचार करत असताना स्वानंदी त्याला म्हणाली, " काय रे दादा? कसला विचार करतो आहेस? कोणी पसंत केली आहेस का मुलगी?"

"तू ना खूप आगाऊ झाली आहेस बरं." स्वानंदीच्या चेहऱ्याकडे न पाहता नयन तिथून सटकला.
दादाचे कुठेतरी पाणी नक्कीच मुरते आहे असा अंदाज स्वानंदीला आलाच. दादाच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायला हवे असा विचार स्वानंदीच्या मनात आला आणि तिच्या मनात आपसूकच सुहास डोकावला. जेव्हापासून स्पर्धेमध्ये सुहासचे गाणे स्वानंदीने ऐकले होते तेव्हापासून ती त्याच्यावर एकतर्फी प्रेम करू लागली होती.

स्वानंदीने नुकतेच अठरा वर्षे पूर्ण केले होते आणि ती पुण्याच्या नामांकित कॉलेजमध्ये एफ.वाय.बी.ए. ला शिकत होती. स्वानंदीला लहानपणापासून गाण्याची आवड आणि तिचा गळा अतिशय गोड असल्याने स्वानंदीच्या आईवडिलांनी तिच्या छंदाला प्राधान्य दिले होते. स्वानंदीच्या घरचा पिढीजात व्यवसाय होता तो म्हणजे 'क्षीरसागर सात्विक भोजनालय.' स्वानंदीची पणजी अतिशय सुगरण होती. स्वानंदीच्या पणजोबांच्या आकस्मिक जाण्याने तीन मुलांसाठी पणजीने कंबर कसली आणि घरात खानावळ सुरू केली. स्वानंदीच्या आजोबांनी खानावळीचे रूपांतर भोजनालयात केले आणि आता स्वानंदीच्या वडिलांनी पुरुषोत्तम दादांनी आपल्या भोजनालयाच्या चार शाखा पुण्यात चालू केल्या होत्या.

क्षीरसागर हे पुण्यातील बडे प्रस्थ समजले जात होते. पुण्यात ऐन मोक्याच्या ठिकाणी क्षीरसागरांचा चौसोपी वाडा होता. लक्ष्मी त्यांच्या घरात पाणी भरत होती. क्षीरसागरांच्या मोठ्या वाड्यातील अनेक उत्तमोत्तम चित्रे, राजेशाही झुंबर, संगमरवरी फरशा, कलात्मक फर्निचर तसेच आकर्षक टेलीफोन ह्यांचे आल्या - गेल्याना आकर्षण असायचे. त्याकाळी फार क्वचित लोकांच्या घरी फोन असल्याने लोकांना टेलीफोनचे अप्रूप वाटत असे. स्वानंदीच्या दादाने जरी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केले असले तरी त्याने आपल्याच व्यवसायात लक्ष घालण्याचे ठरविले होते. स्वानंदी नयनपेक्षा आठ वर्षांनी लहान असल्याने ती तिच्या दादाची तसेच घरात सगळ्यांचीच अतिशय लाडकी होती. नयन आता सव्वीस वर्षांचा झाल्याने आता क्षीरसागर कुटुंबाला नयनच्या लग्नाचे वेध लागले होते.

रात्री स्वानंदीचे वडील पुरुषोत्तमदादा घरी आल्यावर स्वानंदीने त्यांना तिचा पहिला क्रमांक आल्याची बातमी दिली.

"हो! मला आईने कळवले होते फोन करून. अशीच प्रगती कर आणि केवळ संगीतामध्ये नाही तर अभ्यासात देखील अशीच प्रगती कर." पुरुषोत्तम दादा स्वानंदीला जवळ घेत म्हणाले. त्यांनी तिला पन्नास रुपये बक्षीस म्हणून दिले.

पन्नास रुपये पाहून स्वानंदी खूप खुश झाली. तिने लागलीच ते पैसे तिच्या पैशांच्या डब्ब्यात टाकले. सुहासचा विचार करतंच स्वानंदी झोपेच्या आधीन गेली.