फुरसे - Saw Scaled Viper

भारतातील प्रमुख चार विषारी सर्पांपैकी आकाराने आणि लांबीने लहान असला, तरी याचं विष मात्र नागा प

३. फुरसे - (Saw Scaled Viper)

भारतात आढळणाऱ्या चार मुख्य विषारी सर्पांमधे लांबीने आणि आकाराने सर्वात लहान, सर्वांत चपळ आणि सर्वांत रागीट असा हा साप. याला कुणाचाही स्पर्श झाला तरी हा हमखास चावतो. याची लांबी एक ते सव्वा दोन फुटांपर्यंत असते. रंगाने तपकिरी आणि फिक्कट पिवळा. पाठीवर पांढरे ठिपके आणि काळी किनार. शरीराच्या डाव्या उजव्या बाजूने शेपटीपर्यंत जाणारी पांढरी नागमोडी रेषा, पाठीवरच्या पांढऱ्या ठिपक्यांच्या किंचित जवळून जाणारी. शेपूट आखूड असते. फुरसे हा घोणशीचा लहान भाऊच आपण समजू शकतो. फुरसे हा साप पहिल्या नजरेत घोणस असल्यासारखा वाटतो. पण त्याची लांबी आणि शरीरावरील नक्षी निरखून पाहिलं तर त्याची नक्कीच ओळख पटते. याचं डोकं त्रिकोणी आणि त्यावर पांढऱ्या चंदेरी आकाराच्या बाणाची खून असते. सर्व शरीरावर गव्हाच्या दाण्यांच्या आकारांचे खवले असल्यामुळे वेटोळे घालताना किंवा उघडताना खवले एकमेकांना घासून करवतीने लाकूड कापल्यासारखा करकर आवाज होतो. आणि त्यामुळेच याला सॉ स्केल्ड व्हायपर (Saw Scaled Viper) असे म्हणतात. याचा आवाज गरम तव्यावर पाणी शिंपडल्यानन्तर जसा येतो तसाही आपल्याला जाणवतो. असा आवाज करून तो आपल्या शत्रूला त्याची जाणीव व्हावी, आणि माझ्यापासून सावध राहा म्हणून एक प्रकारचा इशाराच देत असतो.

फुरसे पुष्कळदा डोंगराळ भागात, माळरानात, ओसाड व रेताड प्रदेश आणि खडकाळ डोंगराळ भाग या ठिकाणी तो आढळतो. दाट जंगलात जिथे पालापाचोळा, दाट झाडी झुडपे असतात अशा ठिकाणी सुद्धा फुरसे आढळतात. अनेकदा हा साप दगडांमध्ये, खडकांमध्ये, वाळूमध्ये, मुरुमामध्ये आढळतो. पहाटे आणि संध्याकाळी यांचा वावर जास्त प्रमाणात असतो, तरीही दिवसासुद्धा फुरसे आढळतात. जमिनीवरून सरपटत जाताना हे अत्यंत वेगाने आणि चपळतेने जातात. फुरसे हा अतिशय आक्रमक आणि सावध राहणारा. त्याला जर धोका आहे असे वाटले किंवा कुणी डिवचले तर आपल्या शरीराचे इंग्रजी एस आकाराच्या गुंडाळ्या करून आपले अंग एकसारखं घासतो त्यामुळे करवत चालल्या सारखा आवाज होतो. शरीराच्या मधोमध डोके घेऊन सेकंदाच्या आताच तो शत्रूवर आक्रमण करतो आणि पुन्हा आपल्या जागेवर येतो. हे सगळे सेकंदातच घडते. त्याच्या अशा वेगवान हालचालीमुळे तो केव्हा दंश करतो हे कळत सुद्धा नाही.

माणसासाठी ५ मिलिग्रॅम म्हणजे ०.००५ मिलिलिटर (0.005ml) एवढे विष प्राणघातक असते. फुरसे माणसाच्या शरीरात १० ते २० मिलिग्रॅम विष दंशद्वारे सोडतो. फुरसे याचे विष "हेमोटॉक्सीक" आणि "सायटोटॉक्सिक" (Haemotoxic / Cytotoxic) प्रकारचे असते, म्हणजेच रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम करणारे. जखम झाल्यानंतर जखमेच्या ठिकाणी रक्त गोठून रक्तस्त्राव थांबण्याची जी प्रक्रिया असते, त्यावरच हे विष परिणाम करत असल्यामुळे हि प्रक्रियाच बंद पडते. फुरसे चावल्यानन्तर काही मिनिटांतच तीव्र वेदना जाणवू लागतात. सूज येते. चावल्याच्या जागेवर रक्तस्राव थांबत नाही. रक्ताच्या उलट्या येणे. रक्ताची लघवी होणे. अशी लक्षणे दिसायला सुरुवात होते. ज्याप्रकारे घोणस चावल्यानंतर शरीरातून रक्त बाहेर यायला सुरुवात होते, त्याच प्रकारची लक्षणे जाणवायला सुरुवात होते. आणि अतिरक्तस्रावाने मनुष्य दगावतो. फुरसे चावल्यानंतर काही तास ते पाच सहा दिसांपर्यंत मूत्रविसर्जन कमी होते. काहींमध्ये जवळजवळ थांबते. शरीरामध्ये रक्ताच्या गुठळ्या निर्माण झाल्यमुळे रक्ताभिसरण प्रक्रिये मध्ये अडथळा निर्माण होतो. तसेच मूत्रपिंडाचे कार्यही बंद होते. आणि रक्तदाब वाढतो. काही रुग्णांमध्ये फुरसे चावले तरी मृत्यू ओढवत नाही, पण दंश केलेल्या ठिकाणी जखम सडत जाऊन हात पाय निकामी होतात. संसर्ग हळू हळू शरीरामध्ये पसरायला सुरुवात होतो. काहीच दिवसांत जखमा चिघळत जाऊन माणसाचा मृत्यू होतो.

फुरसे आकाराने आणि दिसायला जरी लहान असला तरी याचे विष नागापेक्षा पाचपट आणि घोणस पेक्षा पंधरा पट जहाल असते. दंश झाल्यानंतर मनुष्य २४ तासांत दगावतो किंवा कधी कधी २ ते २० दिवस देखील जगतो. त्यामुळे साप कोणताही असो विनाकारण पकडायला जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालू नये. आपल्या जवळच्या सर्पमित्राला फोन करून त्वरित कळवा. आणि विषारी सापाचा दंश झाल्यास लवकरात लवकर दवाखान्यात जाऊन उपचार घ्या.

पुढील भागात आपण पाहुयात नाग / राजनाग (Cobra / King Cobra) या सापाविषयी.

धन्यवाद.

🎭 Series Post

View all