सावत्र आई.. भाग:- ९
पूर्वार्ध: या कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की, सुमी पाटलांच्या घरी छान रुळली.. मुलांनाही तिचा लळा लागला होता.. ती मुलांची यशोदा झाली होती.. काही दिवसांनी चंद्रभान सुमीसोबत फिरायला घेऊन जातो असं सांगून सुमीला घेऊन मोठ्या शहरात आला.. मोठ्या दवाखान्यात दाखल करून सुमीवर कुटुंब नियोनाची शस्त्रक्रिया करून घेतली.. सुमीचं मातृत्वाचं सुख कायमचं हिरावून घेतलं होतं आता पुढे..
सावत्र आई.. भाग:- ९
चार दिवसांनी सुमी आणि चंद्रभान आपल्या गावी परत आले.. घरातून निघताना सुमीच्या चेहऱ्यावर जो उत्साह होता तो आता पूर्णपणे मावळला होता.. चेहऱ्यावर ग्लानी दिसू लागली होती.. अगदी ऐन तारुण्यात वार्धक्य आल्यासारखी.. सुमी उदास दिसू लागली.. शांत राहू लागली.. असेच काही दिवस गेले..आणि पुन्हा ती घर कामात लक्ष देऊ लागली पण कामात आता उत्साह नव्हता.
घरातली कामे उरकताना कामात संथपणा जाणवू लागला.. कामे उरकल्यावर ती स्वतःला आपल्याच खोलीत कोंडून घेऊ लागली..सुमीमध्ये अचानक आलेला हा बदल सासूबाईंना जाणवत होता. पण सुमीला काय झालंय? नेमकं हिचं काय बिनसलंय?त्यांना काही उमजेना.. दोन तीन वेळा त्यांनी सुमीला विचारण्याचा प्रयत्न केला पण सुमीने 'काय नाय' म्हणून विषय टाळला होता..
एक दिवस सुमीच्या सासूबाई राधाच्या सासूबाईंना भेटायला आल्या होत्या.. आणि बोलता बोलता सुमीचा विषय निघाला.. त्या म्हणाल्या," काय जणू! सुमीला काय झालंय? कुणाशी बी बोलना.. उगी गप गप राहती.. म्या ईचारल तर काय नाय म्हणली, काय बी उमजना..राधे बग बाय तू बोलून तिच्यासंग..तुला तरी सांगती का बगूं"
"'व्हय व्हय आत्या, बघती म्या काय ते, तुमी काय बी काळजी करू नगा" राधा उत्तरली..
दुसऱ्या दिवशी सुमीच्या सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे राधा सुमीच्या घरी आली.. सुमीच्या सासूबाईंशी थोडसं जुजबी बोलून 'सुमीला भेटून येती' असं म्हणत तिने आपला मोर्चा सुमीच्या खोलीकडे वळवला.. सुमी घरातली रोजची कामे उरकून तिच्या खोलीत बसली होती.. कुठल्यातरी गहन विचारात गडून गेल्यासारखी.. राधा कधीपासून दारात येऊन उभी होती.. तिला आवाज देत होती.. सुमीचं लक्षच नव्हतं.. आपल्याच तंद्रीत होती जणू..!! "सुमे.." राधेने मोठ्याने आवाज दिला.. तेंव्हा कुठे तिची तंद्री तुटली.. "कवा धरनं दारात उभी हाय म्या.. ध्यान कुठं हाय तुज? बरी हायस नव्ह?" राधा बोलू लागली.. राधेला समोर पाहून सुमीच्या भावना अनावर झाल्या.. तिच्या आसवांचा बांध फुटला.. ती राधेच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडू लागली.. राधा तीच्या पाठीवरून हात फिरवत होती..तिला शांत करत होती.. राधेने तिला रडू दिलं..शांत होऊ दिलं..
थोडा वेळ असाच गेला शांततेत..! ती काहीच बोलत नाही हे पाहून राधाच बोलू लागली," सुमी..!! काय हुतयां ग..?का रडतीस बाय.! भरल्यासरल्या घरात? काय दुखतय का? कुनी काय बोललं का?" सुमीने मान हलवून नकार दिला.. सुमी सांगू लागली,"ताये..!! कुनाला बी बोलणार नाय नव्ह..!!वचन दे मला..माजी आन हाय तुला. ठिव माज्या डोसक्यावर हात, घी आन" आणि सुमीने राधेचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला..
राधा विचारात पडली.. काय करावं समजेना? पण सुमीच्या मनावरचा भार कमी व्हायला हवा..मनातली सल,तिचं दुःख बाहेर पडलं,तिने ते बोलून दाखवलं तरच ती मोकळी होईल...राधेने थोडा विचार केला आणि तिच्या डोक्यावर हात ठेवत "कुणाला काय बी सांगणार नाय" असं राधेने सुमीला वचन दिलं. रडत रडत सुमीने सर्व कर्मकहाणी राधेला सांगितली.. राधेच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या.. ही कसली अट? कसली भयानक प्रतिज्ञा..?? राधा त्वेषाने पेटून उठली.. चिडून म्हणाली,"सुमे..!!काय केलं ग हे त्वा??, का केलं बाय.!?.मायपण खुडून काढलं बाय तू.. म्या जाब विचारती भावजीस्नी.. आपरेशन बी करून आली? काय म्हनावं ग म्या तुला? तुज्या माय बाला ठावं हाय का?" सुमीने "नाय"म्हणून नकारार्थी मान डोलावली.. राधेने कपाळावर हात मारून घेतला.. मायबाबा साठीच तर तिनं ही असली विचित्र अट मान्य केली होती..
राधा चंद्रभानला जाब विचारायला निघाली.. सुमीने तिला अडवलं..," ताये..!! तू शबुद दिला हायस"..राधेची पावलं तिथेच थबकली.. राधा आणि सुमी एकमेकांच्या गळ्यात पडून रडू लागल्या.. डोळ्यातलं अश्रू पुसत राधा म्हणाली," सुमे..!! जे झाल ते झालं..आता वरला ब्रम्हदेव जरी खाली आला तरी हे बदलायचं नाय.. आता ईसर समधं..संग्राम अन गौरी तुझीचं पोरं हायती..तू जलम दिला नाय म्हणून काय हुतय.. तुच त्यांची माय.. अग किसनदेव बी गोकुळात वाढला नव्ह..!!यशोदामायच्या पदराखाली..!! समदी दुनिया यशोदामायलाच देवाची माय म्हणूनशान ओळखती नव्ह..तिचाच मान लई मोटा बघ.. देवांनं कवा बी अंतर नाय दिलं यशोदामायला.. आता सोड हे समदं.. उठ बाय डोळं पूस"
राधेच्या बोलण्याने सुमीला थोडा धीर आला..ती विचार करू लागली..खरंच "आता ईचार करून काय बी उपयोग नाय जे व्हायचं हुतं ते झालं..आता गौरी आन संग्राम हीच माजी पोरं अन म्याच त्यांची माय.. म्या जतन करणार हाय त्यास्नी माज्या हातानी.." सुमीने डोळे पुसले आणि राधेसोबत बाहेर आली.. तिच्या ओठांवरचं फुललेलं ते स्मित हास्य पाहून सासूबाईंची चिंता मिटली.. तिला हसताना पाहून त्यासुद्धा आनंदी झाल्या..
दिवस पुढे जात होते.. सुमी मुलांच्या संगोपनात व्यस्त होती.. त्यांना न्हाऊ माखू घालणं, मुलांनाची शाळा, त्यांचा अभ्यास, घरातली बाकीची सर्व कामे, स्वयंपाक करणे, धुणीभांडी, केर काढणं., पै पाहुणे त्यांचा पाहुणचार यातच तिचा संपूर्ण दिवस निघून जात होता.. पण आता मात्र सासूबाईंच्या संयमाचा बांध सुटू लागला होता.. सासूबाईंच्या तिच्याकडून वेगळ्या अपेक्षा होत्या..
जसजसा काळ पुढे जात राहिला. दर महिन्याला म्हाता-या सासूबाईंच्या नजरेचा भाला सुमीच्या अंगभर फिरून कसला तरी शोध घ्यायचा. मासिक अडचण यायला उशीर झाला की सासूबाईंच्या आशा पल्लवित व्हायच्या..आणि सुमी बाजूला बसली की त्यांचा संयम सुटायचा.. दुसऱ्या नातवाच्या आशेने तिच्या सासूबाईंचं कालचक्र थांबलं होतं की काय कोण जाणे..!! पण वरचेवर त्यांचा धीर सुटू लागला. मूल का होत नाही म्हणून त्या आता सुमीला थेट जाब विचारू लागल्या..
पुढे काय होतं? सुमी सासूबाईंना हे सत्य सांगू शकेल का? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©निशा थोरे..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा