सावत्र आई १३

Hi ek samajik katha

सावत्र आई.. भाग:- १३

पूर्वार्ध: या कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की, संग्राम आणि गौरीला सुमी त्यांची जन्मदाती आई नसल्याचं सत्य समजल्यानंतर त्यांच्या नात्यात अंतर पडत चाललं होतं.. गौरीने लग्नात सुमिकडून कन्यादान करण्यास नकार दिला.. गौरीचा विवाह संपन्न झाला. ती सासरी निघून गेली आता पुढे..

सावत्र आई.. भाग:- १३

चंद्रभानने आपल्या मुलीचा, गौरीचा विवाह अगदी थाटामाटात पार पाडला.. साऱ्या पंचक्रोशीत यापूर्वी इतका शानदार विवाह सोहळा झाला नसेल तितका सुंदर रम्य विवाह सोहळा गौरीचा झाला.. लग्नात अमाप पैसा खर्च केला होता. हजारो पंचपक्वांन्नाच्या पंगती उठल्या. सर्व पाहुण्यांचं आदरातिथ्य,मानपान  स्वतः जातीनं चंद्रभान पाहत होता.. दिव्य, भव्य असा तो विवाह सोहळा..!! पुढे कित्येक दिवस त्या लग्नाची चर्चा गावभर सुरू होती.. पण या सुंदर समारंभाला गौरीच्या वागण्याने गालबोट लागलं.. सुमीचा कन्यादानाचा हक्क नाकारून तिने साऱ्या गावाला चर्चेला विषय दिला होता.. काहीजण गौरीचा निर्णय बरोबर होता म्हणत होते, तर काहीजण सुमीसाठी हळहळत होते..गौरीला नावे ठेवत होते..आयुष्यभर वांझपणाचा ऐवज मिरवून शेवटी सुमीला काय मिळालं..? लोकांची अवहेलना..!! लोकांच्या चर्चेला उधाण आलं होतं..

चंद्रभान मात्र लग्नातल्या त्या घटनेमुळे पुरता कोलमडून गेला.. सुमीवर झालेल्या अन्यायाचं शल्य त्याच्या मनाला टोचू लागलं.. आजवर तिने मुलांसाठी केलेले कष्ट, मायेने केलेलं पालनपोषण डोळ्यासमोर येत राहिलं.. सगेसोयऱ्यांनी, आप्तस्वकीयांनी  मुलांचे कान भरून त्यांच्या मनात इतकं विष पेरलं होतं की मुलं तिचं मातृत्व नाकारत होती.. तिला परकेपणानं वागवत होती.. चंद्रभानला आता वृद्धत्वाची जाणीव होऊ लागली.. लग्नाच्या वेळीस सुमीच्या दुप्पट वयाचा असलेल्या चंद्रभान आता सुमीपेक्षा जास्त वृद्ध वाटू लागला..सुमीच्या विचारानं चंद्रभानची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली होती.. आणि त्याने अंथरूण धरले.. खूप उपचार केले, मोठमोठ्या डॉक्टरांना दाखवले तरी त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती.. मनाला लागलेली ही चिंतेची वाळवी इतक्या सहज थोडीच नष्ट होणार होती..!! ती वाळवी त्याला आतून पोखरत होती. सुमी चंद्रभानची सेवा करत होती.. त्याचं खाणं-पिणं, औषधपाणी अगदी काळजीपूर्वक पाहत होती. चंद्रभानला कोणत्याही औषधांचा गुण येत नव्हता.. सुमीही काळजीत पडली..काय करावं..!! तिलाच उमजेना..

अंथरुणात पडल्या पडल्या चंद्रभानच्या मनात विचार येई.. "मुलांच्या सुखासाठी, त्यांच्या भवितव्यासाठी आजवर मी झटत आलो.. मुलांना सावत्रपणाचा त्रास नको..दुजाभाव नको., सारी संपत्ती, मालमत्ता मुलांच्या नावे केली..संपत्तीत वाटेकरी नको आणि त्या संपत्तीवरून  कुटुंबात वाद नको म्हणून मी सुमीचं आईपण हिरावून घेतलं.. ती जगावेगळी अट तिला मान्य करायला लावली.. तिचं मातृत्व मी खुडून काढलं.. काय केलं मी हे? मी सुमीवर अन्याय केला.. त्या माऊलीनं कधीही दुजाभाव केला नाही..पोटच्या पोरावांनी संभाळलं.. पण त्यांनी काय दिलं तिला? पोरीनं माझ्या तिला कन्यादान पण करू दिलं नाही.. आई होती ना ती..!! एक बाई म्हणून पण तिला दया कशी नाही आली तिची? का आटली माया तिची? रात्र रात्र तिच्या उशाशी बसून जोजवणारी माय तिला का आठवली नाही? या मुलांसाठी ती आई होऊ शकली नाही, मी तिला होऊ दिलं नाही.. माझं चुकलं रे देवा..!!  मी मुलांना चांगले संस्कार नाही देऊ शकलो.. जन्मदाती नसली म्हणून काय झालं? जन्मदात्रीने जे केलं नसतं ते सुमीने केलंय हे पोरांना का उमजत नाही? कशाची धुंदी? की पैशाचा माज?? मी खरंच खूप मोठं पाप केलंय.. माझ्या सोन्यासारख्या बायकोवर अन्याय केलाय.. सुमे.., मला माफ करशील ना.!! डोळ्यातून त्याच्या  जलधारा वहात होत्या.. कदाचित त्याचंच मन त्याला खाऊ लागलं होतं.. पश्चाताप डोळ्यातून झरत होता. 

दिवसेंदिवस चंद्रभानची प्रकृती बिघडत चालली होती. गेली काही दिवसांपासून तर त्याला जेवणही जात नव्हतं.. सुमी त्याला रव्याची, भाताची पेज करून कसेबसे दोन- चार थेंब पोटात त्याच्या ढकलत होती..चंद्रभानच्या लक्षात येऊ लागलं होतं आता अंतिम क्षण जवळ येतोय.. त्याचं बोलावणं येतेय..त्याने सुमीला खुणेनेच जवळ बोलावलं.. सुमीच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं.. सुमीचा हात हातात घेत चंद्रभान बोलू लागला..," सुमे,! म्या चुकलो ग.!! माफी दे..! या पोरांपायी म्या तुला माय होऊ दिलं नाय..!! लोकांनी तुला काय काय बोल लावले.. वांझोटी म्हणले.. तरी बी तू शांत राहिली.. माज्या मायला बी तू बोलली नाई..माजी माय बी तुलाच टाकून बोलली..  तू कवा बी तिला फिरून उलटं बोलली नाय. समदं मुकाट्यानं सोशीत राहिली.. आन म्या काय दिलं तुला.? गौरीनं तुला कन्यादान बी करू दिलं नाय? मला माफी दे सुमे..!!" चंद्रभानला धाप लागली होती.. त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला..  " धनी..! तुमी गप बसा उगी..!  तुमास्नी तरास हुतुय..बोलू नगा.." सुमी चंद्रभानला शांत करत होती.. तो तिला थांबवत म्हणाला," पुरी जिंदगी गप राहिलो.. आता तरी बोलू दी.. म्या तुज्यावर अन्याव केला.. सुमे..! मला ठावं हाय.. या पापाची भरपाई म्या नाय करू शकत.. पर सुमे..! पुढचा जन्म तू माजी बायको म्हणून येशील का गं? पुढल्या जन्मी मला तुला समदी सुखं द्यायची हाय..जी तुला आता या जन्मात मिळाली नाय.. " सुमी रडत होती.. त्याला शांत व्हायला सांगत होती.. हळूहळू  चंद्रभानचा श्वास मंदावला आणि त्याची प्राणज्योत मालवली.. चंद्रभान पाटील दोन्ही मुलांना पोरकं करून दूरच्या प्रवासाला निघून गेले.. सुमीनं "धनी..!!!" म्हणून जोरात हंबरडा फोडला.. सर्व शेजारचे, आप्तेष्ट जमा झाले.. पूर्ण वाड्यात शोककळा पसरली.. 

ज्याच्या सोबतीनं इथंवर आयुष्याचा प्रवास केला होता.. तो तिला कायमचा सोडून गेला.. ज्याच्या भरवशावर ती आजवर तग धरून उभी होती.. तो आधार तिच्यापासून ईश्वराने काढून घेतला होता..शेजारच्या बायका गोळा झाल्या.. चंद्रभानच्या अंतिम प्रवासाची तयारी सुरू झाली.. सुमीचं कुंकू पुसलं गेलं..हातातल्या हिरव्या बांगड्या फोडण्यात आल्या.. गळ्यातलं मंगळसूत्र काढून चंद्रभानच्या चितेवर टाकण्यात आलं.. आता सुमी लेक नव्हती, बायको नव्हती,सून नव्हती,आई नव्हती,ती फक्त आता कैलासवासी  चंद्रभानची एक विधवा होती.. इतकीच तिची ओळख उरली.. सर्व पाहुण्यांसमवेत चांद्रभानला स्मशानभूमीत आणून त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.. आणि संग्रामने त्याच्या चितेला अग्नी दिला.. आणि चंद्रभानचा देह पंचतत्वात विलीन झाला..सुमी खूप रडत होती.. तिचा एकमेव आधार संपुष्टात आला होता..राधिका आपल्या मैत्रिणीला सावरत होती.. सांत्वन करत होती.., 

चंद्रभानच्या अंतीमसंस्कारानंतर दहा दिवसांनी त्याचा दशक्रिया विधी होत होता.. पंचपक्वांन्नाचं भरलेलं नैवेद्याचं ताट  समोर असतानाही कावळा अन्नाच्या घासाला शिवला नव्हता.. लोकं हळहळत होती..त्याच्या आत्म्याला शांती मिळणार कशी? सुमीच्या चिंतेने त्याला ग्रासले होते अगदी मरणानंतरही..!!

चंद्रभानच्या जाण्यानं सुमीवर आभाळ कोसळलं होतं..सुमी एकटी पडली होती.. तिचीच मुलं आता तिला परक्यासारखं वागवू लागली..एखादया आश्रितासारखी तिची अवस्था झाली..तिच्याच घरात ती उपरी झाली होती.. 

पुढे सुमी सोबत काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः

निशा थोरे..

🎭 Series Post

View all